या गावात घरांपेक्षा मंदिरांची संख्या जास्त आहे !

प्रत्येक गावाची काही तरी स्टोरी असते. प्रत्येक गावात काही प्रसिद्ध ठिकाणे असतात, फेमस मंदिरे असतात. पण तुम्ही फक्त मंदिरांच गाव ऐकलं आहे का? हो भारतात असे एक गाव आहे जिथे घरांपेक्षा मंदिरांची संख्या जास्त आहे.

झारखंड राज्यातलं मलुटी हेचं ते गाव .

मलुटी गावामध्ये आज घडीला जवळपास छोटी मोठी अशी ७२ मंदिरे आहेत. त्यापैकी अनेक मंदिरे महादेवाची आहेत. शेकडो वर्षे जुनी असलेल्या या मंदिरांवर रामायण महाभारतातल्या कथा चितारल्या आहेत . भारतातल्या सर्वोत्तम शिल्पकारांनी ही मंदिरे उभारलेली आहेत. असं म्हणतात एकेकाळी तिथे १०८ मंदिरे होती. पण वर्षानुवर्षे नीट देखभाल न केल्यामुळे यातील काही मंदिरे कालौघात नष्ट झाली.

ही मंदिरे कोणी उभारली? याच गावात का उभारली? अशी अनेक प्रश्न आपल्याला पडली असतील. यासाठी आपल्याला मलुटी गावाचा इतिहास जाणून घ्यावा लागेल.

तसं पाहिलं तर मलुटी गावाचा इतिहासाचा मागोवा घेतला तर त्याची मूळं प्रागैतिहासिक काळापर्यंत जातात. अश्मयुगीन काळातील काही पुरावे या गावात सापडतात. ख्रिस्तपूर्व काळात हे गाव गुप्त काशी म्हणून ओळखले जायचे. शुंग राजांनी येथे अश्वमेध यज्ञ देखील केला होता. पुढच्या काही वर्षात येथे वज्रायणी बौद्धपंथांचे भिख्खू येऊन राहिले.

त्यांच्या पाठोपाठ तांत्रिक विद्या जाणणारे साधू येथे आले. त्यांनीच इथल्या सर्वात जुन्या मां मौलीक्षा माता मंदिराची स्थापना केली. याच देवीच्या नावावरून किंवा तेव्हा राज्य करत असणाऱ्या बनकुराच्या मल्ला राजांवरून या गावाला मलुटी हे नाव मिळालं. पाल घराण्याच्या राज्यात इथे काही मंदिरे बांधली गेली.

पण मलुटी गावाला मंदिरांच गाव ही ओळख पंधराव्या शतकात मिळाली.

तेव्हा मलुटी गाव हे नानकर राज्याची राजधानी होती आणि तिचा राजा होता “बाज बसंत रॉय”. या राजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या राज्यात कोणताही कर गोळा केला जायचा नाही. त्याचे नाव बाज बसंत कसे पडले यामागे ही एक गंमतीशीर कथा आहे.

खर तर बसंत रॉय हा कटीग्राम या गावचा. त्याकाळात बंगालचा सुलतान होता गौराचा अल्लादिन हुसेन शाह. त्याचे राज्य बिहार झारखंड त्रिपुरा ओरिसा पर्यंत पसरले होते. तो शांतताप्रिय असल्यामुळे प्रजेचा प्रिय होता. एकदा तो आपल्या राज्याच्या दौऱ्यावर निघाला होता. त्याने एक बहिरी ससाणा पाळला होता.  हा ससाणा सुलतान दौऱ्यावर असताना अचानक हरवला. 

अल्लादिन हुसेन शाहचा तो ससाणा जिवापेक्षा जास्त प्रिय होता. त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली जो कोणी हा ससाणा शोधून आणेल त्याला मोठे इनाम देण्यात येईल.  तेव्हा कटीग्राम गावच्या बसंतरॉयने तो ससाणा शोधून आणला. याकामासाठी त्याला वाराणसीच्या सुमेरू मठातल्या दांडी स्वामींनी मदत केली होती.  खुश होऊन  सुलतानाने बसंतरॉयला मलुटीची जहागिरी दिली. ससाणा शोधून दिलेला बसंत रॉय राजा बाज बसंत बनला.

तर हा बाज बसंत आपल्या जनतेकडून कर गोळा करायचा नाहीच शिवाय त्याने स्वतःसाठी कोणताही राजवाडा बांधला नाही. तो मोठा धार्मिक होता.वाराणसीच्या सुमेरू मठाचा तो मोठा भक्त होता. त्यांच्याच आशीर्वादाने त्याला हे राज्य मिळाले होते. तिथले मठाधिपती हे मलूटी राज्याचे राजगुरू असायचे. त्यांच्याच आदेशानुसार बाज बसंतने  राजवाड्याच्या ऐवजी मलुटी गावात सुंदर मंदिर बांधले.  

बाज बसंतनंतर आलेल्या त्याच्या वंशजानी ही परंपरा सांभाळली. पुढे त्यांच्या घराण्याला भाऊबंदकीचा शाप लागला. एका मोठया राज्याचे छोटे छोटे तुकडे झाले. पण या प्रत्येक राजाने आपल्या वंशपरंपरेप्रमाणे  मलुटीमध्ये मंदिरे उभारली. अनेक वर्षे ही परंपरा चालू राहिल्या मुळे मलुटी गाव हे मंदिरांच गाव बनले.

खास बंगालच्या कारागीरांच्या चाला या पद्धतीने लाल विटांनी ही मंदिरे बांधली गेली आहेत. पुढे मलुटीची राजेशाही नष्ट झाली तसे या छोट्या गावात या मंदिरांच देखभाल करण्यासाठी कोणी उरले नाही. स्वातंत्र्यानंतरही कित्येक वर्षे या गावात वीज पोहचली नाही. यामुळे पर्यटकांना सुद्धा या गावाबद्दल जास्ती माहिती नाही.

असं म्हणतात आदिशंकराचार्य यांच या गावात वास्तव्य होऊन गेले आहे. या घटनेची स्मृती म्हणून  सुमेरू मठाचे स्वामी आजही मलुटी मध्ये दरवर्षी मोठा उत्सव भरवतात. इथे भरणाऱ्या काली मातेच्या यात्रेमध्ये १०० बोकडांचा बळी दिला जातो. 

आज या पैकी अनेक मंदिरे नष्ट झाली आहेत, काही मंदिरे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. २०१० साली ग्लोबल हेरीटेज फंडने या गावाला जगातल्या बारा अशा जागा ज्या कालौघात संपून जाण्याच्या मार्गावर आहेत या यादीत समावेश केला आहे.

आपल्या महान इतिहासाचा हा वारसा वेळीच सांभाळला नाही तर फक्त पुस्तकांमध्ये आणि फोटोमध्येच ही मंदिरे पहावी लागतील.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.