असा होता महाराष्ट्रातील ४ हजार वर्षांपूर्वीचा शेतकरी

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील दायमाबाद येथे गुराखी मुलांना काही जुन्या मुर्त्या सापडल्या आहेत. श्रीरामपूरच्या पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत. पुरातत्व शास्त्रज्ञानी जाऊन पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे सिंधू संस्कृतीला समकालीन अवशेष आहेत.

महाराष्ट्राच्या काळी मातीने शेतकऱ्यांना भरपूर दिलंय. अजूनही आपल्याकडे कृषिप्रधान संस्कृतीचा पगडा आहे. इडापीडा टळू दे बळीराजाचं राज्य येऊ दे असं कायम म्हटल जातं. छत्रपतींनी आपलं स्वराज्य उभारलं ते शेतकरी रयतेला सोबत घेऊनच. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी लिहिलेली आज्ञापत्रे मार्गदर्शक ठरतात.

आजही इथलं राजकारण देखील शेतकऱ्यांच्या सहकाराभोवती फिरत असते. एकूण काय महाराष्ट्र शेतकऱ्यांनी आपल्या घामाने उभा केलाय.

पण तुम्हाला ठाऊक आहे का महाराष्ट्रातल्या शेतीला साडे-चार हजार वर्षाचा इतिहास आहे.

अश्मयुगीन मानव गुहेत राहायचा. शिकार करणे आणि कंदमूळ खाणे अस त्याच जीवन असायचं. या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अन्नपाण्याच्या शोधात भटकंती चालू असायची. कुऱ्हाडीसारख्या हत्याराचा वापर व्हायचा. काही काळाने त्याला जमिनीत पेरल की उगवत याचा शोध लागला. हा शोध क्रांतिकारी होता. त्यातूनच शेतीची कल्पना पुढे आली.

अस म्हणतात की, मानवाला शेतीचा शोध लागला आणि त्याच भटक आयुष्य स्थिर झाल. नदीच्या आसपास एकेठिकाणी वस्ती करून राहणे भाग पडले. जगभरात अशा नदीच्या शेजारच्या संस्कृती सापडल्या. यात सर्वात महत्वाची मानली जाते ती सिंधू संस्कृती.

हडप्पा मोहोन्जोदारो मध्ये आढळून आलेले अवशेष दाखवून देत होते की सिंधू संस्कृती एक प्रगती संस्कृती होती. ते शेती करायचे, गायी, बैले असे प्राणी पाळायचे, घाटाची भांडी स्वैपाकाला वापरायचे. इतकच काय त्यांनी शहरे वसवली होती. त्याच्या अभ्यासातून बरीच माहिती समोर येत होती. मात्र फाळणीनंतर हे सिंधू संस्कृतीचे अवशेष पाकिस्तानात राहिले.

भारतात इतरत्र या संस्कृतीची अवशेष शोधून काढण्याचे प्रयत्न सुरु झाले.

एकदिवस एका वर्तमानपत्रात बातमी आली की महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील दायमाबाद येथे गुराखी मुलांना काही जुन्या मुर्त्या सापडल्या आहेत. श्रीरामपूरच्या पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत. पुरातत्व शास्त्रज्ञानी जाऊन पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे सिंधू संस्कृतीला समकालीन अवशेष आहेत.

भारतीय पुरातत्वखात्यातर्फे डॉ. शंकरराव साली यांनी तिथे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले. त्या मुर्त्या इ.स. पूर्व २२००-२००० म्हणजेच जवळपास साडेचार हजार वर्षापूर्वीच्या होत्या.

उत्तरेतील पर्यावरण प्रतिकूल होऊ लागल्या मुळे या काळात तिथल्या लोकांनी स्थलांतरे सुरु केली. सरस्वती नदी आटू लागली होती. पावसाचे प्रमाण कमी झाले होते. शेती करणे अशक्य होऊ लागले. हेच शेती करणारे लोक गुजरात महाराष्ट्र येथे नद्या काठी येऊन वसले.

गोदावरी नदीच्या खोऱ्यात प्रवरा नदी जवळ दायमाबाद येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका ओळीत आखणी केलेली कच्च्या विटांची घरे सापडली. यात धान्य साठवण्यासाठी वेगळी खोली, गुरांचा गोठा देखील आढळून आला. याचाच  अर्थ हा शेतकरी पशुपालनाला देखील तितकेच महत्व देत होता,

हे हजारो वर्षापूर्वीचे शेतकरी त्याकाळच्या मानाने प्रगत होते.

शेतीसाठी ते लाकडी नांगर वापरायचे.  नदीच्या पाण्याचा वापर ते सिंचनासाठी करत. त्याकाळात त्यांनी गहू, तांदूळ, बार्ली, मसूर,वाटाणे, तीळ या पिकाच उत्पादन घेतल्याचे पुरावे मिळाले आहेत. या शेतकऱ्याच्या स्वैपाकघरात चुली होते. त्यांची भांडी मात्र भाजून बनवलेली होती. यात लहानमोठे घडे, रांजण,वाडगे देखील होते. त्यांना रंगवलेही जात होते. त्याकाळच्या कुभाराची भट्टीदेखील सापडली आहे.

पुढे या ताम्रपाषाण युगीन माळवा संस्कृतीमधून महाराष्ट्राच्या जोर्वे संस्कृतीचा उगम झाला. संपूर्ण राज्यभर या शेतकरी संस्कृतीचे अस्तित्व आढळून आले. ही सारी स्वयंपूर्ण खेडी होती.

पुण्याजवळच्या इनामगाव येथे देखील जोर्वे संस्कृतीचे अवशेष सापडले.

इनामगाव येथे घाटगे घराण्याची प्राचीन गढी आहे. तिच्याजवळ हाडे सापडत असल्यामुळे गावकरी या भागात कधी जात नसायचे. पण १९६८ साली तिथे केलेल्या संशोधनानंतर सापडलं की हे जोर्वे कालीन दफनभूमीचे अवशेष आहेत.  तिथे एका टेकडीवर प्रागऐतिहासिक काळातील खेडदेखील सापडले. या घरांचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे अंगणात भाकरी भाजण्यासाठी भले मोठे चुलाने सापडले. धान्यसाठवण्यासाठी कणगीची सोय देखील आहे.

इनामगाव आणि दायमाबाद या दोन्ही ठिकाणच्या संशोधनावरून असे सिद्ध होते की तेथील शेतकरी रब्बी व खरीप या दोन्ही प्रकारचे पिक घेत होते.

इनामगावजवळ पाउस जास्त झाल्यावर घोडनदीला पूर येत असे. या पुराचे पाणी एका नाल्यावाटे वळवून साठवून ठेवायची दूरदृष्टी देखील हजारो वर्षापूर्वीच्या आपल्या पूर्वजांनी केली होती.

त्याकाळात दगडी हत्याराचा वापर जास्त केला जायचा. या सोबतच कुऱ्हाड, छन्नी अशी तांब्याची हत्यारे देखील आढळून आली.याच शिवाय त्याकाळच्या शेतकरी महिला थोड्या प्रमाणात का होईना सोन्याचे दागिने देखील वापरायची. कर्णफुले, सोन्याचा मणी आढळले आहे. तसेच इनामगाव येथे सोनाराच घर सापडलं आहे. त्यात मूस,तांब्याचे चिमटे होते.

या जोर्व्हे संस्कृतीच्या धार्मिक समजुतीबद्दलचा अभ्यास अजूनही चालू आहे. दायमाबाद आणि इनामगाव येथे शिरोहीन देवतेच्या मातीच्या मुर्त्या सापडतात. काही ठिकाणी मातीची चित्रे देखील सापडली. एक तर ती लहानमुलांची खेळणी असावीत अथवा गावजेवणापूर्वी एखादी पूजाविधी असावी.

दायमाबाद येथे खापरावरील रंग आढळते. येथे तांब्याचा गेंडा, रथ, हत्ती यांच्या जवळजवळ ६५ किलो वजनाच्या मूर्ती आढळल्या.

तिथे सापडलेल्या मुर्त्यामध्ये सर्वात महत्वाची मूर्ती आहे ती बैल जोडी च्या रथात बसलेल्या देवाची. सिंधू लिपी अद्याप वाचली गेली नसल्यामुळे हा देव कोण याच उत्तर मिळाल नाही पण तो शेतीशी संबंधित देव असावा.

सिंधू संस्कृती आणि जोर्वे संस्कृतीमधला फरक म्हणजे ही संस्कृती पूर्णपणे ग्रामीण होती.

जवळपास १००० वर्षे ही संस्कृती टिकली. इस.पूर्व १००० नंतर इथल हवामान देखील प्रचंड बदलले. या प्रतिकूल वातावरणामुळे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांना एकेठिकाणी वस्ती करून स्थिर जीवन जगणे अशक्य बनले. त्यामुळे हा महाराष्ट्राचा आद्य बळीराजा परत कंदमुळे आणि शिकारीच्या शोधात हा भाग सोडून बाहेर पडला. या वसाहती रिकाम्या झाल्या.

त्यांनतर मात्र या भागात तीन हजार वर्षे कोणीही वस्ती केली नाही यामुळे हे अवशेष जमिनी खाली शाबूत राहिले.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.