आषाढी एकादशीची पुजा कोण करेल ; “ठाकरे, फडणवीस की कोश्यारी”..?

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बर्‍याच मोठ मोठ्या घडामोडी घडताना दिसतायेत. सत्ताधारी शिवसेना पक्षातल्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बंड पुकारलंय आणि ते आसाम मधल्या गुवाहाटीत जाऊन बसलेत. 

 कायदेशीर लढाई देखील चालू झाली आहे. आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या पक्षांतराबंदी अंतर्गत अपात्रतेच्या  नोटिसी विरोधात शिवसेनेच्या शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. त्यावर कोर्टाने निकाल दिला आहे. 

११ जुलैपर्यंत परिस्तिथी जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार नाही.

मात्र त्याचवेळी फ्लोअर टेस्ट घेऊ नका असा आदेश देण्यात मात्र कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळं या काळात सरकारवर अविश्वास ठराव देखील दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळं हे सरकार तरणार की फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री हेणार हा मुद्दा पुन्हा अधांतरीच राहतो. तिसरा पर्याय ज्यामध्ये राज्यपाल राष्ट्रपती राजवट लावू शकतात याचीही शक्यता नाकारता येत नाही.   

यात अजून एक मुद्दा येतो मग आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय पूजा कोण करणार.

महाराष्ट्रात सध्या आषाढी वारी सुरू आहे ३, ४ दिवसांपूर्वीच पालख्यांनी पंढरपूराकडे प्रस्थान केलंय. ९ जुलैला सगळ्या पालख्या पंढरपूरात दाखल होतील. आणि १० जुलैला आषाढी एकादशी तब्बल २ वर्षांनी मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल. 

दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठल मंदिरात शासकीय महापुजा असते. या शासकीय पूजेचा मान हा मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीला असतो.

ही विठ्ठल पूजेची परंपरा तशी ब्रिटिश कालावधी पासून चालू असल्याचं सांगितलं जातं. त्यावेळी ही पुजा कलेक्टर किंवा प्रांत अधिकारी यांच्या हस्ते केली जात असे. ब्रिटिश काळात वार्षिक २००० रुपयांचं अनुदान या पूजेवेळी विठ्ठल मंदिराला दिलं जात असे.

पुढं संयुक्त महाराष्ट्र चळवळी नंतर या प्रथेत थोडा बदल करून ही पुजा महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या हस्ते होऊ लागली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महसूलमंत्री राजारामबापू पाटील यांनी आषाढी एकादशीची पहिली पुजा केली होती. १९६३ ला तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी  मुख्यमंत्री असताना तर  १९७७ ला वसंतदादांनी मुख्यमंत्री असताना ही पुजा केली होती. पुढे पूजेचा मान कोणाला द्यायचा यावरून वाद होऊ लागले.

१९९५ ला शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ही पुजा ‘शासकीय पुजा’ म्हणून जाहीर केली आणि तिथून पुढे ती फक्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ लागली. 

आजपर्यंत सर्वाधिक वेळा या शासकीय पूजेचा मान मिळालेले मुख्यमंत्री म्हणजे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे आहेत.

त्यांना तब्बल ६ वेळा हा मान मिळाला होता. त्यांच्या खालोखाल शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि देवेन्द्र फडणवीस यांना प्रत्येकी ४ वेळा हा शासकीय पूजेचा मान मिळाला होता. 

मागच्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी लाखो वारकर्‍यांशिवाय ही पुजा केली होती.

आता सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्यामुळे यंदाच्या शासकीय पूजेचा मान कोणाला मिळणार? हा मोठा प्रश्न आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आषाढी वारीला शासकीय पूजे साठी जातील की देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीसांबरोबर पुन्हा पूजेचा मान पटकावतील याबद्दल उत्सुकता असणार आहे.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे या ज्येष्ठ मंत्र्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध केलेल्या बंडाला आता जवळपास एक आठवडा उलटून गेलाय. या आठवड्याभरात दोन्ही बाजूंनी एकेमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. 

दोन्हीही बाजुंनी अजून कुठलीही ठोस भूमिका कुणीही घेतलेली दिसून येत नाहीये. एकनाथ शिंदे आता वेगवेगळ्या पक्षात जाण्यासाठीचे पर्याय चाचपडून पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी देखील फोन वर चर्चा केली असल्याचे समजते. 

शिंदे यांची सुरुवातीची मागणी अशी आहे की उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि भाजप सोबत युती करून सरकार स्थापन करावं.

परंतु उद्धव ठाकरे आता त्यांच्या कुठल्याही मागण्या मान्य करायला तयार नाहीयेत. 

आता यातून ३ शक्यता आपल्याला दिसतात..

पहिली म्हणजे हे आमदार परत येतील आणि पुन्हा महाविकास आघाडीत सामील होतील. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर कायम राहतील. ही झाली पहिली शक्यता. 

असं झालं तर विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान हा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनाच मिळेल.

दुसरं म्हणजे शिंदेंच्या गटाला भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना कोणत्या न कोणत्या पक्षात विलीन व्हावं लागेल, उदाहरणार्थ ते भाजपात विलीन झाले तर भाजप पक्षाचं आमदारांच बळ वाढेल आणि बहुमताचा आकडा गाठला जाऊन देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. ही झाली दुसरी शक्यता.

जर असं झालं तर देवेंद्र फडणवीस यांना हा शासकीय महापूजेचा मान मिळेल. 

आणि तिसरं म्हणजे  राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.

जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता आलं नाही तर राज्यातील सध्याचं महविकास आघाडीचं सरकार पडू शकतं. अशा वेळी राज्यपाल दुसऱ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावू शकतात. 

जर दुसऱ्या पक्षानेही सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवली तर राज्यपाल राज्यात राज्यघटनेच्या कलम ३५६ नुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून सहा महिन्यात नव्याने निवडणुका घेतल्या जाऊ शकतात.

जर आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असेल, तर अशावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ही शासकीय पुजा केली जाईल.

ही सुद्धा एक शक्यताच आहे. याआधी महाराष्ट्रात एकदा शंकर दयाळ शर्मा आणि त्यानंतर दुसर्‍यांदा सी सुब्रमण्यम या २ राज्यपालांना विठ्ठलाची शासकिय पुजा करण्याचा मान मिळाला होता. परंतु तेव्हा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू नव्हती.

तब्बल २ वर्षांच्या प्रतिक्षेने पुन्हा एकदा तितक्याच चैतन्याने वारीचा हा आनंददायी सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडत असताना महाराष्ट्रातल्या या सत्तेच्या ‘खुर्चीच्या’ राजकरणामुळे या सोहळ्यात देखील ‘राजकारण’ होऊ नये इतकीच पांडुरंगा चरणी प्रार्थना!!

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.