स्मृती मंधनाच्या यशामागं सांगलीच्या या तरुणाचे कष्ट आहेत.
२०१७ सालचा मुलींचा वर्ल्ड कप इंग्लंडला होणार होता. भारताची स्टार बॅट्समन स्मृती मंधना गुढ्घ्याला झालेल्या दुखापतीमुळे पाच महिने टीमच्या बाहेर होती. वर्ल्ड कप क्वालीफायिंगचे महत्वाचे सामने तिच्या कडून मिस झाले होते. बंगलुरुला असलेल्या नॅशनल क्रिकेट असोशिएशनवर तीचा सराव सुरु होता.
भारतातले सर्वोत्कृष्ट तज्ञ फिजिशियन प्रशिक्षक तिच्या तंदुरुस्तीवर मेहनत घेत होते. पण पाच महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहिलेली स्मृती वर्ल्ड कपमध्ये कितपत चांगली कामगिरी करू शकेल याबद्दल निवड समितीपासून अनेक जणानी शंकाच व्यक्त केली होती.
स्मृतीला माहित होत आपल्याला स्वतःला प्रुव्ह करून दाखवावच लागणार आहे. त्यासाठी ती भरपूर कष्ट घेत होती पण तिच्या मनासारखा रिझल्ट मिळत नव्हता. तेव्हा तिने मदतीसाठी एका व्यक्तीला फोन केला.
ती व्यक्ती म्हणजे स्मृतीने आपल्या क्रिकेटचे सगळ्यात पहिले धडे ज्यांच्याकडे गिरवले असे तिचे पहिले कोच अनंत तांबवेकर.
सांगलीचा अनंत तांबवेकर म्हणजे कोणी जख्ख म्हातारा प्रशिक्षक नाही. वय असेल तीस-बत्तीस. जिल्हास्तरावर त्यांनी सांगलीचे प्रतिनिधित्व केले होते. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी त्यांची निवड झाली होती.
आधी तर त्यांना विश्वासच बसत नव्हता की आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरस्टार झालेल्या स्मृतीला आपल्या कोचिंगची गरज आहे?
स्मृतीला एनसीएच्या प्रशिक्षणाला दर शनिवारी रविवारी सुट्टी असायची. अनंत तांबवेकर दर विकेंडला बंगळूरुला जाऊ लागले. त्यांना तिची स्टाईलं टेक्निक माहित होती. स्मृतीचा शालेय स्पर्धेपासून ते देशाकडून शतक मारण्यापर्यन्तचा प्रवास त्यांच्याच डोळ्यासमोर झाला होता. दुखापतीमुळे तिच्या खेळात नेमके काय बदल झाले आहेत आणि तिला नेमकी कशाची गरज आहे हे त्यांच्यापेक्षा जास्ती कोणाला ठाऊक असणार होत?
अनंत तांबवेकरनी स्मृतीच्या फुटवर्कवर मेहनत घेतली. त्यांना स्वतःला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव होतं. यामुळे वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड मधील खेळपट्टी नेमकी काय रंग दाखवेल त्यांना माहित होत. तिच्या नैसर्गिक आक्रमक खेळाला न बदलता तिच्या बॅकफुटच्या शॉटला अधिक धारदार कसे बनवता येईल हा प्रयत्न त्यांनी केला. मुद्दामहून बंगलुरुच्या पहाटेच्या थंडीत वारा जोरात वहात असताना स्मृतीचा सराव घेतला.
याचाच फायदा स्मृतीला झाला. तिची प्रगती बघून इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसाठी तिची निवड करण्याची रिस्क सिलेक्शन कमिटीने घेतली. स्मृतीसुद्धा त्यांच्या अपेक्षेला खरी उतरली.
इंग्लिश वातावरणात स्विंग होणाऱ्या बॉलला व्यवस्थित खेळू शकणारी एकमेव भारतीय खेळाडू होती. आपल्या अविस्मरणीय कामगिरीच्या जोरावर तिने भारताला फायनल पर्यंत पोहचवल. वेस्ट इंडिजच्या सामन्यात स्मृतीने आपल्या कारकिर्दीतल दुसर शतक झळकवल होत. त्यासामन्याच्या मॅन ऑफ दि मच सेरेमनी वेळी मुलाखतीमध्ये तिने आपल्या यशाच क्रेडीट आपल्या या सांगलीच्या कोचला दिलं.
त्या शतकानंतर स्मृतीने लहान मुलीच्या उत्साहात अनंत तांबवेकराना आपली इनिंग कशी वाटली हे विचारायला फोन केला त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
आज स्मृती एकापाठोपाठ एक जगातले विक्रम मोडत चालली आहे. स्मृतीने नुकतंच ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या टेस्टमध्ये शतक झळकावले आहे. या शतकानंतर तिनं अनेक विक्रमांची नोंद केली आहे. डे-नाईट टेस्टमध्ये शतक झळकावणारी स्मृती ही दुसरी भारतीय बनली असून पहिली महिला क्रिकेटपटू आहे. यापूर्वी फक्त विराट कोहलीनं २०१९ साली बांगलादेश विरुद्ध झालेल्या डे-नाईट टेस्टमध्ये शतक झळकावले आहे.
२०१९ मध्ये तिला आयसीसीने २०१८सालची सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार दिला आहे. लहानवयात मिळालेल्या या यशामुळे स्मृतीला लेडीसचिन तेंडूलकर म्हटल जातय.
पण अनंत तांबवेकर यांना आजही संगकाराच्या अॅक्शनची नक्कल करते म्हणून ओरडा खाणारी, नजर चुकवून ‘संभा’ ची भेळ खाणारी शाळकरी स्मृती आठवते. ती प्रत्येक सामन्यानंतर अनंत यांना फोन करून आपल्या काय चुका झाल्या याची चर्चा करते. स्मृतीच्या आयुष्यात अनंत तांबवेकर याचं स्थान आईवडीलभाऊ यांच्या बरोबरीच आहे.
सांगली सारख्या छोट्या शहरातून जिथे क्वालिटी क्रिकेट खेळण्यासाठी लागणाऱ्या सुविधा अगदी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत, तिथे अनंत तांबवेकरानी स्मृती सारखा वर्ल्डक्लास खेळाडू घडवला. आज स्मृती जगभरातल्या छोट्या शहरातल्या मुलामुलींचा ‘हम भी किसे से कम नही’ हा आत्मविश्वास निर्माण करणारी आयडॉल बनली आहे.
हे ही वाचा भिडू.
- रमेश पोवारला ‘कबीर खान’ बनता आलं नाही, म्हणून भारताला विश्वचषक गमवावा लागला !
- १९ सामन्यात नावावर होते १७४ रन्स, २० व्या सामन्यात द्विशतक ठोकत बनली सर्वात तरुण द्विशतकवीर!!!
- त्याने आचरेकर सरांच ऐकलं असत तर भारताला व्हिव रिचर्डस मिळाला असता..