गेल्या १८ वर्षांपासून दुध वाटप करणारी महिला ‘महापौर’ बनलीये !
भारतातल्या दक्षिण टोकाचं एक छोटंसं राज्य केरळ. तिथल्या थिसूर महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि दोन दिवसांपूर्वी सीपीआयच्या अजीथा विजयन यांची महापौरपदी निवड झाली. आता तुम्ही म्हणणार की मग झाली तर झाली आम्हाला काय त्याचं..? तिकडच्या केरळातल्या महापालिकेच्या महापौराविषयी आम्हाला का सांगताय..?
थिसूरच्या महापौर अजीथा विजयन यांच्याविषयी आम्ही तुम्हाला सांगतोय कारण त्यांची स्टोरी आपल्याकडच्या राजकारण्यांसारखी नाही तर ती आम्ही सांगण्यासारखी आणि तुम्ही वाचण्यासारखी आहे.
आम्ही तुम्हाला सांगितलं की गेल्या १८ वर्षांपासून त्या थिसूरमधल्या कनीमंगलम या गावात दुध बॅग वाटपाचं काम करताहेत आणि आता महापौर झाल्यानंतर देखील त्यांचा ते काम सोडायचा कुठलाही विचार नाही, तशी आवश्यकताच त्यांना वाटत नाही तर..?
गेल्या १८ वर्षांपासून अजीथा आपल्या मोटार सायकलवरून दुध बॅग वाटपाचं काम करतात. या कामात त्यांना कसलाही कमीपणा वाटत नाही, कुठलंही काम कमीपणाचं असतं, असं त्या मानत नाहीत. उलट या कामाच्या माध्यमातून आपल्याला लोकांच्या अधिक जवळ जाता येतं, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेता येतात, असं त्या सांगतात.
दररोज सकाळी ४.३० वाजता आपल्या मोटार सायकलवरून त्यांचं दुध बॅग वाटपाचं काम सुरु होतं आणि २०० पेक्षा अधिक घरापर्यंत त्या दुध पोहचवतात. त्यांच्या या कामामुळे त्या केरळात ‘मिल्क वूमन’ म्हणून ओळखल्या जातात.
खेडेगावात दुध वितरीत करणारी महिला म्हणून जरी आता अजीथा चर्चेत आल्या असल्या तरी हे काम त्या नगरसेवक असल्यापासून करताहेत. १९९९ सालापासुन त्या सीपीएमच्या सदस्या असून त्या २००५ साली सर्वप्रथम नगरसेवक झाल्या. त्यानंतर २०१० साली त्या स्थायी समितीच्या अध्यक्ष झाल्या. गेल्या ५ वर्षात त्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून देखील काम करत होत्या. पण त्यासाठी स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून बरखास्त करण्यात आलं होतं.
आता मात्र अंगणवाडी शिक्षिकांच्या संदर्भातील निवडणुका न लढविण्याचा नियम शिथिल करण्यात आल्याने त्या महापौर आणि शिक्षिका असे दोन्हीही पदे भूषवू शकतात. अजीथांच्या या प्रवासात गेल्या २२ वर्षांपासून सीपीएमचे नेते असणाऱ्या, त्यांचे पती विजयन यांची त्यांना मोठी साथ लाभलीये.
महापौरपदी नियुक्त झाल्यानंतर केरळमधील स्थानिक माध्यम प्रतिनिधींनी त्यांना आता दुध बॅग वितरणाच्या कामाचं काय होणार असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अजीथा म्हणतात,
“आपण जीवन जगतो, बरोबर..? जगण्यासाठी आपल्याला काम करायला लागतं. खूप काम करायला लागतं. दोन्हीही कामाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत आणि दोन्हीही कामं मी त्या-त्या वेळेत करेन”
अजीथांच्या त्यांच्या कामाप्रतीच्या निष्ठेतून सगळ्याच राजकारण्यांसाठी बरंच काही शिकण्यासारखं आहे. बाकी अजीथा विजयन यांच्या या निर्णयामुळे कनीमंगलमकरांना मात्र आता दररोज थेट महापौरांकडूनच दुध मिळणार आहे.
हे ही वाच भिडू
- शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरील बंदी नेमकी कुणी आणि का घातली होती..?
- ती आहे भारताची पहिली महिला ट्रक मॅकेनिक !
- सर्व्हे अस सांगतो, अमेरिकेत महिलांमुळेच जास्त अपघात होतात. आणि भारतात ?
- युद्धभूमीवर उतरणारी पहिली महिला एअरफोर्स पायलट, जिला कारगिलमध्ये शौर्यपदक मिळालं !