पुण्यात अंधश्रद्धेमुळे देवीची लस घेण्यास कोणी तयार नव्हतं तेव्हा दुसरा बाजीराव पुढे आला.

आजचा दिवस ऐतिहासिक असाच म्हटलं पाहिजे. गेल्या एक वर्षांपासून जगाला छळलेला रोग म्हणजे कोरोना. तर आजपासून भारतात सर्वसामान्यांना कोरोनाची लस देणे सुरु झालंय. सुरवात जेष्ठ नागरिकांपासून करण्यात आली आहे. सकाळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लस टोचून घेतली. जनतेमध्ये कोरोना लसी बद्दलची जागरूकता वाढावी जास्तीत जास्त लोकांनी याला प्रतिसाद द्यावा म्हणून आज पंतप्रधान पुढे आले.

आता कोरोनाला हरवण्यासाठी भारताचं पहिलं पाऊल पडलंय असच म्हणावं लागेल.

आज जगभरात कोरोनाने जसे थैमान घातले आहे तसे अठराव्या शतकात देवी या साथीच्या रोगाने जगाला वेठीस धरल होत. खर तर हा रोग जग जिंकायला बाहेर पडलेल्या युरोपमधल्या लोकांनी सर्वत्र पसरवला.

या रोगाबद्दल आधीपासून खूप गैरसमज होते. विशेषतः भारतात  देवी रोग देवाचा कोप झाल्यावर होतो अशी मान्यता होती. देवी रोगाचे खूप खूप भय होते. देवी रोगावर लस, औषधे उपलब्ध नव्हते. १८ व्या शतकात युरोपात दरवर्षी चार लाख लोक मरण पावले आणि २५% लोक जे रोगातून वाचले ते आंधळे झाले.

जगाला सगळ्यात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे देवीचा रोग ही होती.

अनेक देशांतील अनेक तज्ञ डॉक्टर याचा उपाय शोधण्यासाठी कंबर कसून प्रयत्न करत होते.

पण या रोगावरील उपाय शोधून काढला ब्रिटीश डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांनी. ते इंग्लंडच्या ग्रामीण भागात आपला दवाखाना चालवायचे. हा दवाखाना चालू असताना अनेक शेतकरी त्यांच्याकडे औषध घेण्यासाठी येत असत. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की दुध काढणाऱ्या गवळीणीमध्ये देवी हा रोग होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

अभ्यास केल्यावर लक्षात आल कि दुध काढताना गायींच्या स्तनातून येणाऱ्या रक्तामुळे होणारा काऊपोक्स हा रोग जर एखाद्या व्यक्तीला झाला तर त्याला देवीची लागण होत नाही.

योगायोगाने मिळालेल्या या माहितीवरून एडवर्ड जेन्नरने बरेच संशोधन केले आणि देवीची लस शोधून काढली. हे वर्ष होतं १७९८.

भारतात तेव्हा ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचे सरकार आपल हातपाय पसरू लागलेले होते. व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी कधी हातात तलवार घेऊन राजकारण सुरु केले हे इथल्या राज्यकर्त्यांना कळलेच नाही.

यातच होते पुण्याचे पेशवे दुसरे बाजीराव.

सवाई माधवरावांच्या आत्महत्येनंतर त्यांना वारस नसल्यामुळे रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव सत्तेत आला. त्यांना राजकारणाचा कोणताही अनुभव नव्हता. त्यांच्या ऐवजी त्यांचा धाकटा बंधू चिमणाजी याला पेशवेपदी बसवून सत्ता आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न नाना फडणवीस यांनी केला पण त्यांच्या मृत्यू नंतर सर्व मराठी साम्राज्य दुसऱ्या बाजीरावाच्या हाती आल.

दुसरे बाजीराव हे आपल्या चंचल स्वभावासाठी कुप्रसिद्ध होते.

त्यांच्याकडे सत्ता चालवण्याची चलाखी नव्हती ना त्यांना सल्ला देण्यासाठी नाना फडणवीस यांच्या सारखा धुरंधर होता. या बाजीरावांना राज्यकारभार तर चालवता येत नव्हताच शिवाय ते रणांगणातदेखील पराक्रमी नव्हते.

हलक्या कानामुळे त्यांनी होळकर,शिंदे असे आपलेच पराक्रमी सरदार दूर केले होते. त्यांच्याविरुद्ध कारवाया केल्या व अखेर त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी थेट ब्रिटीशांची मदत घेतली.

महाराष्ट्राच्या इतिहासात एवढे वाईट निर्णय दुसऱ्या कोणत्याही राज्यकर्त्याने घेतले नसतील. दुसऱ्या बाजीराव आपल्या मदतीसाठी आला आहे याचा प्रचंड फायदा इंग्रजांनी करून घेतला. त्यांनी वसईचा तह करून बाजीरावाला आपला अंकित करून ठेवले.

पुण्यात कंपनीसरकारचे सैन्य तैनात झाले, बाजीरावाच्य दरबारात एक रेसिडंट नेमण्यात आला.

दुसऱ्या बाजीरावांना मात्र आपल्या पारतंत्र्याची जाणीवच नव्हती. ते आपल्या चैनीत व मौजमजेत मश्गुल आहेत याच्या कथा दंतकथा सगळीकडे पसरल्या होत्या. प्रजा या वागण्याला वैतागली होती.

१८०३ साली इंग्रज रेसिडंट सोबतच एक इंग्रज डॉक्टर सुद्धा पुण्यात आला होता. त्याचे नाव थॉमस कोट्स. हा एक सर्जन होता. रेसिडेंट व इतर इंग्रज अधिकारी, इंग्लिश सैन्य यांची देखभाल करण्याच काम त्याच्याकडे असायचं.

हे सोडून थॉमस कोट्स पुण्यातील गोरगरीब जनतेवर फुकटात उपचार करायचा. पण त्याच्याकडे फार कोणी उपचार करून घ्यायचं नाही.

जवळपास दोनशे वर्षांपूर्वीचा तो काळ. भारतात गोऱ्या इंग्रजांच्या अलोपथीवर कोणाचा विश्वास नव्हता. हे इंग्रज औषधाच्या नावाखाली आपल्याला काही तरी खायला घालून आपला धर्म बाटवतील अशी भीती असायची. अनेक प्रकांड धर्मपंडित इंग्लिश औषध खाणे आपल्या धर्मात अमान्य आहे अस सांगायचे.

दुसरा बाजीराव स्वतः प्रचंड अंधश्रद्धाळू होते, कर्मकांड व इतर गोष्टीवर त्यांचा भर असायचा. पण काय जादू झाली कोणाला माहित पण दुसरे बाजीराव पेशवे यांचा डॉ. थॉमस कोट्सवर प्रचंड विश्वास बसला.

साधारण १८०७ साली पुण्यात देवीच्या रोगाचे आगमन झाले. थॉमस कोट्सने एडवर्ड जेन्नर यांनी शोधलेली देवीची लस रुग्णांना देऊ केली पण धर्म बाटल या भीतीने अनेकांनी ती घेतली नाही.

अखेर ही गोष्ट पेशव्यांच्या कानावर घातली गेली. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी देवीची लस टोचून घेण्याचा निर्णय घेतला.

एवढेच नाही तर त्यांच्या मुली व त्यांची बायको यांनाही देवीची लस टोचण्यात आली. 

हा त्याकाळच्या मानाने क्रांतिकारी निर्णय होता. खुद्द पेशवे लस टोचून घेत आहेत हे कळल्यावर प्रजेमध्येही या लशीबद्दलची भीती कमी होत गेली. थॉमस कोट्सने मराठी भाषा शिकून घेतली होती. स्थानिकांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत म्हणून तो रुग्णांना औषधाबरोबरच भवानी देवीच दर्शन घेण्याचाही सल्ला द्यायचा.

या सगळ्यामुळे पुण्यात आपोआप लसीबद्दलची जनजागृती झाली. थॉमस कोट्सने या लसीकरणासाठी स्वतःला वाहून घेतले. पुढे दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांचे संबंध दुरावले पण थॉमस कोट्स पुण्यातच राहिला. त्याने कंपनी सरकारकडून याबद्दलची परवानगी काढली.

दुसऱ्या बाजीरावांनी थॉमस कोट्ससाठी पुण्यात एक घर बांधून दिल.

१८१२ या सालापर्यंत थॉमस कोट्स यांनी एकट्या पुण्यात जवळपास १७,०५४ जणांना लस दिली होती व एकूण भारतातील वास्तव्यात जवळपास ३० हजार जणांना देवीची लस दिली.

भारतात देवी अगदी मागच्या शतकापर्यंत होती. जवळपास दीडशे वर्ष अखंड प्रयत्न केल्यावर हा रोग जवळपास समूळ नष्ट झाल्यात जमा आहे. बाकी दुसऱ्या बाजीरावांच्या खाती अनेक चुकांचं पातक आहे मात्र अडाणीपणा आणि अंधश्रद्धा यात अडकलेल्या समाजातून देवीचा रोग हटवण्यासाठी पाहिले प्रयत्न करण्याच पुण्य मात्र कोणी हिरावून घेऊ शकत नाही.

संदर्भ-Health and Population in South Asia: From Earliest Times to the Present by Sumit Guha

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.