समलैंगिकता ही पाश्चात्य संकल्पना आहे असे ज्यांना वाटते त्यांनी खजुराहो येथे जायलाच हवे

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला..

तारीख होती ६ सप्टेंबर २०१८ आणि निर्णय होता, सेक्शन ३७७ च्या विरोधात..

त्या दिवसापासून समलिंगी आचरण ठेवणारा व्यक्ती गुन्हेगार ठरणार नव्हता. कायद्याने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली होती.

पण या बदलाचे स्वागत करण्याऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते अरुण कुमार यांनी या निर्णयाला “अनैसर्गिक” म्हंटल. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हंटले,

‘समलिंगी विवाह आणि नातेसंबंध निसर्गाशी सुसंगत नाहीत. त्यांना नैसर्गिक मानता येणार नाही. आम्ही अशा प्रकारच्या अनैसर्गिक संबंधांना समर्थन देत नाही. भारतीय परंपरा पाहता, भारतीय समाज देखील अशा संबंधांना मान्यता देत नाही.’

आता या निर्णयाविरोधात तसेच समलिंगी विवाहाच्या विरोधात असणारे उजवे पक्ष आरएसएस सोबत गळे काढू लागेल.

पण आपल्याला खरच १०० टक्के सांगता येईल का, भारतात समलैंगिक संस्कृती अस्तित्वातच नव्हती? आपण प्रामाणिकपणे अस म्हणू शकतो का गे आणि लेस्बियन्स यांचं पुराणकाळात ‘अस्तित्वच’ नव्हत?

थोडासा इतिहास खरच जाणून घ्यायची गरज आहे.

अमारा दास विल्यम यांनी आपल्या ‘तृतीय – प्रकृति पीपल ऑफ द थर्ड सेक्स’ या पुस्तकात मध्ययुगीन व प्राचीन भारतातील संस्कृत ग्रंथांचे व्यापक संशोधन संकलित केल आहे. या पुस्तकाच्या आधारे असं म्हणता येईल कि, समलिंगी आणि तृतीय पंथी तेव्हाच्या भारतीय समाजात अस्तित्वात होते.

पुढे जाऊन आपण असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही ते म्हणजे, समलिंगी ही ओळख त्यावेळच्या समाजात मोठ्या प्रमाणावर स्वीकारली गेली होती.

दुसर्‍या शतकातील प्राचीन हिंदू ग्रंथ कामसूत्रातील पुरुषायिता या अध्यायाचा संदर्भ देत, पुस्तकात असे नमूद केले आहे की त्यावेळी लेस्बियन स्त्रियांना ‘स्वारिनि’ म्हंटल जाई. या स्वारीनी इतर स्त्रियांशी लग्न करून आपली मुलं वाढवू शकत होत्या. त्यांना तृतीयपंथी समुदाय आणि सामान्य समाजाने सहज स्वीकारले होते .

या पुस्तकात समलिंगी पुरुषांचा ‘क्लीबास’ असा उल्लेख केला आहे. पुरुषांच्यात असलेल्या समलैंगिक प्रवृत्तीमुळे नपुंसक ठरलेल्या पुरुषांचा इथं उल्लेख करण्यात आला आहे. समलिंगी पुरुषांचा संदर्भ कामसूत्रातील औपरिष्टका या अध्यायात करण्यात आला आहे. त्या अध्यायात मुखमैथुनाबद्दल ही सखोल मार्गदर्शन केले आहे.

मुखमैथुनात निष्क्रीय भूमिका घेणार्‍या समलैंगिक पुरुषांना ‘मुखेभाग’ किंवा ‘असेक्य’ असे नाव आहे. कामसूत्रातील समलिंगी माणूस एकतर नामर्द (बायल्या) किंवा मर्दानी अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. असे समलिंगी लोक त्याकाळी एकमेकांशी विवाह करू शकत होते.

पुस्तकात वैदिक व्यवस्थेअंतर्गत आठ वेगवेगळ्या प्रकारचे विवाह सांगितले आहेत. त्यापैकी दोन समलिंगी पुरुष किंवा दोन समलिंगी स्त्रिया यांच्यातील झालेला विवाह गंधर्व विवाह म्हणून ओळखला जाई.

इथपर्यंत तरी आपण आपल्या पोथ्या पुराणांमध्ये असलेले संदर्भ बघितले… कदाचित लोकांना ते ही खोटे वाटतील पण..

खजुराहोला कोण नाकारणार?

प्राचीन भारतातल्या समलैंगिकतेबद्दल बोलण्यासाठी आपल्याला व्हिज्युअल असे पुरावे बघितले पाहिजेत. यात सर्वांना पुरून उरणारा पुरावा म्हणजे मध्यप्रदेशातील खजुराहो मंदिर. हे मंदिर त्याच्या खास समलिंगी कोरीव शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर १२ व्या शतकाच्या आसपास बांधण्यात आलं असावं.

खजुराहो मंदिराच्या भिंती घुमटावर असलेल्या शिल्पांमध्ये समलिंगी पुरुष, आणि स्त्रीया यांच्यातील लैंगिक भावना दाखवण्यात आल्या आहेत. तसेच शिल्पांमध्ये नैसर्गिक अशा स्त्री – पुरुषांचे लैंगिक संबंध ही कोरण्यात आले आहेत. पण खजुराहो मंदिर समलैंगिक शिल्पांसाठीच प्रसिद्ध हे जगमान्य आहे.

मंदिराला भेट देणाऱ्या प्रवाशांपैकी अमेरिकेतील एक तंत्रज्ञ हृषीकेश साठावणे यांनी डीएनए या वृत्तपत्रात लिहिले आहे कि,

समलैंगिकता ही एक पाश्चात्य संकल्पना आहे असे ज्यांना ज्यांना वाटते त्यांनी खजुराहो येथे जायलाच हवे. या गोष्टी भारतात सामाजिकरित्या मान्य झाल्या असत्या तर त्यावर वादविवाद करावा लागलाच नसता.

असा ही एक राजा जो दोन राण्यांपासून जन्मला.

१५ व्या शतकातील बंगाली कवी कृतीबास ओझा यांनी रचलेल्या कृतिवासी रामायणानुसार, अयोध्येचा राजा सागर याला कपिल ऋषींच्या क्रोधाला सामोरं जावं लागलं. कपिल ऋषींच्या शापामुळे त्याने आपले बहुतेक पुत्र गमावले. त्याला आपले राजवंशी रक्त कायम राखणे आवश्यक होते.

राजघराण्याचा धोका आणखीनच वाढला जेव्हा दिलीप हा त्याचा एकुलता एक वारस, त्याच्या दोन राण्यांना गर्भवती बनविण्याआधीच मरण पावला. पण कृतिवासी रामायणानुसार, त्या दोन्ही विधवांनी गर्भधारणा होण्यासाठी एका जादुई औषधाचे सेवन केले. आणि मुलाला जन्म देण्यासाठी त्या राण्यांनी एकमेकींसोबत संभोग केला. या संभोगातूनच त्यातील एक राणी गर्भवती राहिली.

त्या दोघींपासुन झालेले हे मुलं दुसरे तिसरे कोणी नसून, गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणणारा पौराणिक कथांमध्ये प्रसिद्ध असलेला राजा भगीरथ होता.

ऋग्वेद या प्राचीन भारतीय वेदात ही समलिंगी जोडीचा संदर्भ आहे.

वरुण आणि मित्रा असे या जोडीचे नाव आहे. वैदिक विधी, इतिहास आणि पौराणिक कथा सांगणाऱ्या शतपथ ब्राह्मण ग्रंथानुसार वरुण आणि मित्रा हे दोघे अर्धचंद्रांचे प्रतिनिधी आहेत. अमावस्येच्या रात्री मित्रा आपले बीज वरुणात रोपण करतो. यामुळे चंद्र अदृष्य होतो. जेव्हा ते बीज वाढू लागते तेव्हा चंद्र वाढू लागतो आणि पौर्णिमा येते. भविष्यकाळातील सुरक्षिततेच्या दृष्टीने वरुण पौर्णिमेच्या रात्री मित्रा मध्ये आपल्या बीजाचे रोपण करतो.

भागवत पुराणानुसार वरुण आणि मित्रा यांना मुले होती. जेव्हा वीर्य (सीमेन) वाळवीच्या मातीवर पडले तेव्हा वरुणाने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. उर्वशीच्या उपस्थितीत जेव्हा मित्रा आणि वरुण यांनी मातीच्या भांड्यावर आपले वीर्य सोडले त्यातून अगस्त्य आणि वसिष्ठ या दोन मुलांचा जन्म झाला.

अगदी रामायणातले राक्षससुद्धा समलिंगी होते.

आता रामायणवर तर आजच्या भारतातला कोणीही व्यक्ती डोळे झाकून विश्वास ठेवतो. वाल्मिकींच्या या प्रसिद्ध महाकाव्यात देखील समलैंगिकतेचा उल्लेख आहे. बरेच उजव्या विचारसरणीचे लोक रामायणाची पूजा करतात आणि त्यांच्या मते रामायण महाकाव्य नसून ऐतिहासिक दस्तऐवज आहेत.

या लोकांच्या म्हणण्यानुसार ती कपोकल्पित कथा नाही. मग तर त्यात दिलेला समलैंगिकतेचा दाखला ही नाकारता येणार नाही. वाल्मीकींच्या रामायणात असे म्हंटले आहे कि,

ज्या स्त्री राक्षसी होत्या, त्या रावणाने चुंबन घेतलेल्या आणि मिठी मारलेल्या स्त्रियांचे चुंबन घेत आणि त्यांना मिठी मारत. यासाठी वाल्मिकींनी आपल्या हनुमानांना या घटनेचे साक्षीदार केले आहे.

जर साक्षात हनुमानजी साक्षीदार आहेत तर हे स्पष्ट आहे कि, प्राचीन भारतात समलैंगिकता मान्यता पावली होती. त्यामुळे, समलैंगिकता ही भारतीय परंपरेचा भाग आहे हे नाकारणे केवळ खुळचटपणाचे आहे. असं आम्ही नाही आपले प्राचीन ग्रंथ म्हणतात.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.