या आज्जीबाई बनवतात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणारे युट्युब व्हिडीओ.

डोंगरदऱ्यामध्ये वसलेलं एक दुर्गम गाव. सगळी आदिवासी वस्ती. तिथ गेलं तर वाटत की या गावात वीज तरी पोहचली आहे की नाही. पण धक्का तेव्हा बसतो जेव्हा दिसत की काही पन्नाशीतल्या शेतकरी बायका एक कॅमेरा घेऊन शुटींग करत आहेत.

या आहेत तेलंगाणा राज्यातील नाल्लामला डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या अप्पापुर पेंटा या गावातील चेंचू आदिवासी जातीतील तीन स्त्रिया, लक्ष्माम्मा, मोल्लंमा आणि चंद्रम्मा.  

सध्या शेतकऱ्यांच्या समस्या हा देशातील एक प्रमुख प्रश्न आहे. शेतीतून भागत नाही म्हणून शेतकरी इतर शेतीला जोडधंदा करायला लागतो तर त्याचीही परिस्थिती जवळजवळ शेतीसारखीच झाली आहे. शेतीच काही काम मिळालं तर ठीक नाही तर दोन वेळ खाण्याचं कस भागवायच हाच प्रश्न.

शेती उद्योगासमोर अनेक प्रश्न असले तरी कालानुरूप शेती देखील आधुनिक होत चालली आहे. यात शेतमालाची ऑनलाईन विक्री करणे, विविध तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करणे चालत असत. शेतकऱ्यांना शेतकऱ्याइतकी मदत दुसर कोणी करू शकत नाही, याचं विचारातून एक अनोखा उपक्रम सुरु झाला.

डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी नावाची एक आदिवासींचा विकास करावा म्हणून स्थापन केलेली एनजीओ आहे. गेली तीस वर्षे ते या भागात काम करत आहेत. काही वर्षापूर्वी त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्यासाठीच्या नव्या योजना त्यांच्या शब्दात कळाव्यात म्हणून २००१ साली (डीडीएस) कम्युनिटी मीडिया ट्रस्टची स्थापना केली. आणि यातून संगारेड्डी गावच्याकाही महिलांना कॅमेरा चालवण्याचे, व्हिडीओ बनवण्याचे प्रशिक्षण दिले.

लक्ष्माम्मा, मोल्लंमा आणि चंद्रम्मा या तिघी आज्जीबाई आपली दिवसाची कामे आटपून दिवस मावळतीला आला की, कॅमेरा घेऊन शूटिंगचे काम करतात. त्या आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत घेऊन त्यांना शेतातील विविध प्रयोग, सीड बँकिंग यांची माहिती सांगायला लावून ती रेकॉर्ड करतात.

अशा जवळपास एकूण २० दलित स्त्रिया आहेत ज्या या उपक्रमाच्या भाग आहेत. त्यापैकी काही स्त्रिया शेतीतील घडामोडींचे दस्तऐवजीकरण व लागवडीखाली असलेल्या पिकांविषयी माहिती गोळा करून अहवाल तयार करण्याचे काम करतात. या सगळ्याजणी या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन काम करत असतात. या कार्यात त्यांना डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटीच्या (डीडीएस) कम्युनिटी मीडिया ट्रस्ट ऑफ पास्तापुर, संगारेड्डी यांच्या कडून मदत मिळते.

न्यूजमिनिट या वृत्त संस्थेला आपल्या उपक्रमाबद्दल माहिती देताना कॅमेरा हँडल करणाऱ्या लक्ष्माम्मा म्हणाल्या,

“आम्ही आमच्या शेतकऱ्यांना लाल हरभरा, सोयाबीन आणि बाजरी यांचे बियाणे वाटप करतो व त्यांना निरोगी आणि स्वावलंबी पद्धतीने शेती करण्याचे प्रशिक्षण देतो. जे शेतकरी कमी शिकलेले आहेत किंवा निरक्षर आहेत ते असे व्हिडिओ बघून सहजपणे शिकू शकतात. म्हणून, आम्हाला वाटले की बियाणे पेरणी पासून ते काढणीपर्यंतची प्रक्रिया त्यांना दाखवणे हे शिकण्याचे मोठे साधन असेल.”

कम्युनिटी मीडिया ट्रस्टच्या या महिला पत्रकार शेतकऱ्यांशी संबंधित सर्व सणांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात. त्यात पथा पंतला जत्रा (जुन्या पिकांचा सण) आणि एरुवाका पांडुगा (पावसाळ्याची सुरुवात) यांचा समावेश असतो. डीडीएस सोबत काम करण्यापूर्वी लक्ष्माम्मा इतर दलित स्त्रियांसारखी मजुरी करून भागावणारी होती.

डीडीएसच्या माहितीनुसार लक्ष्माम्मा आतापर्यंत १५ हुन अधिक देश फिरल्या आहेत. त्या नुकत्याच एका प्रोजेक्टसाठी मालदीवला जाऊन आलेल्या. सध्या या संस्थेसोबत ७५ हुन अधिक खेड्यातील शेतकरी स्त्रिया कार्य करत आहेत. त्या एकमेकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढत असतात.

मोल्लंमा सांगतात की,

“सिनेमॅटोग्राफीच्या टेक्निक शिकल्यानंतर त्यांना समाजातील लोकांकडून खूप सन्मान मिळतो. पूर्वी आम्ही रोजंदारीवर काम करणारे शेतमजूर होतो. पण आता आम्ही प्रोफेशनल फिल्ममेकर्स आणि पत्रकारही आहोत. आम्ही कॅमेरा घेऊन फिरतो तेव्हा इतर लोकं मोठ्या उत्सुकतेने आमच्याकडे बघत असतात. हे शिकायला आम्हाला बरेच महिने लागले पण आता आम्ही सारं कौशल्य आत्मसात केले आहे.”

चंद्रम्मा एक उत्साही फिल्ममेकर अन रिपोर्टर आहेत. त्या त्यांच्या जीवनाशी निगडित कुठलाही क्षण रेकॉर्ड करण्याची संधी घालवत नाही. त्या म्हणतात की,

“कौशल्ये आत्मसात केलेत म्हणून आम्ही इथवर पोहचलो आहोत नाहीतर त्याच जागी पडून राहिलो असतो जिथे ३० वर्षांपूर्वी होतो.”

आता त्यांनी व्हिडिओ डायरीजचा प्रोग्राम चालवत असून त्याचे सगळे व्हिडिओज युट्युबवर अपलोड करत आहेत. त्यांचा कंटेंट मुख्यतः शेती संस्कृती आणि पारंपरिक पद्धतींचे दस्तऐवजीकरण आहे. बियाणे वाटप करण्यापासून ते त्यांची लागवड व काढणी करणे पर्यंत प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड त्या रेकॉर्ड करत आहेत.

डेक्कन डेवलपमेंट सोसायटी या नावाने त्यांचे युट्युब चॅनल आहे. आजकाल सगळ जग टिकटॉकच्या वेडात रमून गेलंय तिथ शेतकऱ्यांना उपयोगी पडतील असे व्हिडीओ बनवणाऱ्या या आजी कमाल आहेत. या वयात त्यांची नवंं शिकण्याची आणि आपल्या भावाबहिणींना नवी माहिती पोहचवण्याची जिद्द निश्चितच वाखाणण्याजोगी आहे.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Jitendra Chandrakant Balsaraf says

    They should Store our country Seed beads and government should help them.
    Excellent job

Leave A Reply

Your email address will not be published.