स्वयंपाकात हिंगाचं महत्व लक्षात घेऊन या बहिणींनी वयाच्या २० व्या वर्षी मोठा व्यवसाय उभारलाय

आपल्या लहानपणी आई बऱ्याचदा आपल्याला दुकानात हिंग आणायला पाठवायची. हे हिंग असतं तरी कसं बघायला एकदा मी दुकानातून आणलेल्या हिंगाच्या डब्बीचं झाकण उघडून पाहिलं आणि वास घेतला…झट्कन तो उग्र वास नाकात शिरला…पण आईने सांगितलं कि, याच उग्र वासाच्या हिंगाचं मसाल्यात खूप मोठं महत्व आहे…. आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील त्याचं महत्व आहे.  

अगदी खमंग वास असलेले लहान खडकासारखे दिसणारे हिंग थोडं जरी स्वयंपाकांत टाकले तरी अन्नाची पूर्ण चवच बदलते. भारतातील स्वयंपाकघरात वापरण्यासाठी हा एक आवश्यक मसाला आहे. संपूर्ण भारतात हिंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हिंगाचा वास अनेकांना आवडत नसला तरी त्याचा उपयोग स्वयंपाकाच्या पदार्थांमध्ये पाचक पदार्थ म्हणूनही केला जातो….

भारतात वापरल्या जाणाऱ्या हिंगाची आयात मुख्यत्वे इराण, अफगाणिस्तान, उज्बेकिस्तान या देशातून होते. काही व्यापारी कझाकस्तान मधून देखील हिंगाची आयात करतात. उज्बेकिस्तान मधील हिंगाला भारतीय बाजारात सर्वाधिक मागणी आहे. जगात उत्पादित हिंगाच्या ४०% हिंग हे एकट्या भारतात वापरले जाते. भारतीय बाजारातील याच हिंगाची निकड लक्षात घेऊन ३ बहिणींनी  हिंग विकण्याचं ठरवलं…

वर्षा, विस्मया आणि वृंदा प्रसंथ या ३ बहिणींनी  हिंग विकण्यासाठी २०१९ मध्ये ‘3vees इंटरनॅशनलची’ स्थापना केली. आज हा ब्रँड कढीपत्ता पावडर आणि नाश्त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंसह ३० प्रकारची उत्पादने विकतो… यातूनच या तिघी बहिणी २० टक्के निव्वळ नफा कमावत आहेत.

हिंगाची किती गरज आहे हे लक्षात घेऊन केरळच्या एमबीए पदवीधर वर्षा प्रसंथने तिचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हिंगाचे उत्पादन घेण्याचा तिचा निर्णय पुढे चालून अचूक ठरला. २०१९ मध्ये, तिच्या दोन लहान बहिणी – विस्मया आणि वृंदा यांच्यासमवेत तिने, ‘3vees इंटरनॅशनल’ नावाची स्वतःची मालकी असलेली फर्म सुरू केली.

याबाबत २६ वर्षीय वर्षा सांगते कि, “माझे कुटुंब आधीपासूनच व्यवसायाच्या क्षेत्रात होते. त्यामुळे आम्ही शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःचं काहीतरी सुरू करायचं हे मनात पक्के होते. परंतु नेमका कशाचा व्यवसाय करायचा हे पक्के नव्हते. बऱ्याच विचारांती आम्ही शेवटी, आम्ही हिंगाच्या उत्पादनापर्यंत पोहोचलो.”

प्रसंथ भगिनींचा ‘3vees इंटरनॅशनल’ हा ब्रँड हिंगाच्या उत्पादनाबरोबरच नाश्त्यासाठी आवश्यक ३० इतर वस्तूंचे देखील उत्पादन केले जाते. या सर्वांसाठीचा उत्पादन प्रकल्प एर्नाकुलम जवळील कलमसेरी येथे आहे….या तीन बहिणीमध्ये कामाची वाटणी करण्यात आली आहे. त्यात दैनंदिन काम पाहण्याची जबाबदारी वर्षाकडे आहे. तर चार्टर्ड अकाउंटंट असणारी विस्मया आर्थिक व्यवहार बघते तर बीबीए पदवीधर असणारी वृंदा ही डिजिटल मार्केटिंग तसेच सोशल मीडिया अकाउंट सांभाळते.  त्यांच्या या सगळ्या पसाऱ्यात त्यांचे आई-वडील सपोर्ट सिस्टिमची भूमिका पार पडतात….

सुमारे दोन वर्षांपूर्वी हि कंपनी मुद्रा कर्ज घेऊन केवळ दोन लाख रुपयांच्या अल्प भांडवलावर  सुरू करण्यात आली होती. कंपनी सुरू करण्यापूर्वी वर्षा यांनी पिरावोम अॅग्रोपार्कमधून प्रशिक्षण पूर्ण केले आणि संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी तामिळनाडूमधील काही उत्पादन युनिट्सला भेट दिली होती. भाड्याच्या जागेत सुरू झालेला त्यांचा हा व्यवसाय ५० लाख रुपयांच्या स्वतःच्या मशिनरी पर्यंत येऊन थांबला आहे. 

स्थानिक तीस महिलांना या व्यवसाय रोजगार मिळाला आहे. त्यांचे प्रॉडक्टस आज फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, इंडियामार्ट वर उपलब्ध आहेत. पंचवीस लाखापर्यंतचा निव्वळ नफा ते वर्षाकाठी कमावत आहेत.

हिंग हे फेरुला वनस्पतींच्या मुळांपासून काढलेले डिंक राळ आहे. ते कोरडे झाल्यानंतर स्वयंपाकासाठी तसेच औषधी उपयोगासाठी त्याचा वापर होतो.  जरी ते अफगाणिस्तान आणि इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकवले जात असले तरी ते मुख्यतः भारतीय खाद्यपदार्थांमध्ये दिसून येते. आयुर्वेदातही त्याची महत्त्वाची भूमिका आहे.

अफगाणिस्तान आणि इराण या देशातून कच्च्या मालाची आयात करून त्यावर प्रक्रिया करून स्वयंपाकात वापरण्यायोग्य हिंग त्यांच्या प्रकल्पात तयार केले जाते. बाजारातील इतर उत्पादनापेक्षा कमी किमतीत चांगली गुणवत्ता ते पुरवीत आहेत.त्यामुळे त्यांच्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंगा सोबतच धना पावडर,काश्मिरी मिरची पावडर,तसेच रवा, गहू पीठ यांचेदेखील ते उत्पादन करतात. संपूर्ण देशभरात आपले उत्पादन पोचवण्यासाठी डिस्ट्रीब्युटर्स नेटवर्क उभारणीसाठी ते काम करत आहे.

येत्या तीन ते चार वर्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचा ब्रॅण्ड तयार करणे हे त्यांचे टार्गेट आहे. शिवाय या तिघी बहिणी आपली भूमिका मांडतं असा संदेश देतात कि, “भारतीय महिलांनी त्यांना जे योग्य वाटेल व त्यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी धडपड करावी”..

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.