सैफच्या पप्पांनी सिक्स मारुन नटी पटवली होती…

मन्सूर अली खान पतौडी, जितकं लांबलचक नाव तितकाच मोठा दबदबा. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्यांच्याकडे टीम इंडियाचं नेतृत्व आलं, काही महिन्यांआधीच एका कार अपघातात त्यांना आपल्या एका डोळ्याची दृष्टी गमवावी लागली होती. तो जमाना काय आतासारखा नव्हता, हेल्मेट, चेस्ट गार्ड असल्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. तिथं एकाच डोळ्यानं विंडीज, इंग्लंडच्या तोफखान्यांचा सामना करणं काय सोपी गोष्ट नव्हती; मात्र नावाप्रमाणंच टायगर असलेल्या पतौडी यांनी आव्हान स्वीकारलं आणि पेलूनही दाखवलं.

त्यांनी ४० कसोटी सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं, त्यातले ९ सामने आतापण जिंकलो. आता तुम्हाला वाटू शकतं की, यात काय मोठी गोष्ट नाही. पण त्या काळात भारतानं कसोटी जिंकणं हीच गोष्ट फार मोठी होती. अशक्य वाटत असताना, त्यांच्या नेतृत्वात भारतानं न्यूझीलंडमध्ये टेस्ट सिरीज जिंकून दाखवली. पतौडी यांच्या नेतृत्वाची, स्टाईलिश बॅटिंगची आणि जबरदस्त व्यक्तिमत्वाची छाप भल्याभल्यांवर पडली होती.

टायगर पतौडी यांची चढउतारांनी भरलेली संपूर्ण क्रिकेट कारकिर्द तर गाजलीच, पण त्यासोबतच आणखी एक गोष्ट गाजली ती म्हणजे त्यांची लव्ह स्टोरी.

टायगर पतौडी पडले नवाब, त्यांच्या घरात रितीरिवाजांना आणि परंपरांना फार मान. आपल्या मित्रांमुळं त्यांची एका बंगाली हिंदू परिवारातल्या मुलीशी ओळख झाली. बरं, मुलगीही साधी नव्हती, ती होती अभिनेत्री शर्मिला टागोर. शर्मिलाचं रुप, तिचं बोलणं आणि पाणीदार डोळे यामुळं कित्येक जण घायाळ झाले होते, तिथं पतौडी साहेबांची विकेट पडणं काय अवघड गेलं नाही. दोघांचे धर्म वेगळे, संस्कृती वेगळे पण पतौडी प्रेमात पडले होते, त्यामुळं त्यांनी प्रयत्न करुन बघायचं ठरवलंच.

सध्या आपल्या बाबूचं रिचार्ज करणं, तिला रोज चार टाईम जेवलीस का विचारणं आणि फोटोखाली गूळ पाडणं ही बऱ्याच पोरांची ट्रिक. याआधीची पोरं कॅडबऱ्यांच्या जीवावर मोहीम जिंकायची, तर त्याही आधी फक्त इशारे करुन. पण एक नवाब एका अभिनेत्रीला पटवणार ही काय किरकोळ गोष्ट नाही. त्यामुळे पतौडी साहेबांनी मोठे विषय केले.

त्यांनी शर्मिला यांना गिफ्ट केला फ्रिज. त्या काळात फ्रिज ही लय महाग आणि दुर्मिळ गोष्ट. एक फ्रिज देऊन अभिनेत्री पटत नसते, म्हणून त्यांनी सात फ्रिज गिफ्ट केले. आपल्या घराचं काश्मिर झालं, तरी शर्मिला यांचा होकार आला नाही. पण पतौडी यांनी वापरली ओल्ड स्कुल आशिकी ट्रिक. त्यांनी सलग चार वर्ष शर्मिला यांना गुलाबाचं फुल पाठवलं. आता रोज न चुकता तुम्हाला गुलाबाचं फुल मिळतंय, पाठवणारा माणूस क्रिकेटर, नवाब आणि दिसायला देखणा आहे म्हणल्यावर शर्मिलाच काय बऱ्याच पोरी हृदय देऊन बसतील. ही गुलाबाची ट्रिक मात्र जमली.

टायगर खेळत असताना शर्मिला मॅच बघायला मुंबई जिमखान्याच्या ग्राऊंडवर जायच्या. त्या जिथं बसल्या आहेत, हे अगदी परफेक्ट डोक्यात ठेवून पतौडी त्यांच्या पुढ्यातच सिक्स मारायचे. त्यांची ही सवय लग्न झाल्यानंतरही थांबली नाही, मुलगी सोहा अली खान हिला मांडीवर घेऊन शर्मिला बसल्या असतील तरी पतौडी तिथंच सिक्स मारायचे आणि पतौडी ओ किंवा शर्मिला दोघांच्या चेहऱ्यावर हसू फ़ुटायचं.

फक्त क्रिकेटचं मैदानच नाही, तर मुलगी पटवण्यातही पतौडी उस्ताद निघाले, सैफ भाऊंनी भले क्रिकेटमध्ये वडिलांचा वारसा चालवला नाही… फ्लर्टींगमध्ये मात्र गडी भारी ठरला.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.