पुण्यात चहा पिण्यावरून राडा झाला, टिळकांवर धर्मभ्रष्ट होण्याची वेळ आली होती
पुणेकरांच चहा प्रेम तुम्हाला वेगळं सांगायला नको. गल्लीबोळात अमृततुल्य तुडुंब भरलेले असतात. वाफाळत्या चहामुळे जहाल पुणेकरांना चर्चा करायची एनर्जी मिळत असते.
चहाचे टपरीवाले अब्जाधीश झालेत हे फक्त पुण्यातच पाहायला मिळतं.
पण एक काळ असा होता की फक्त एक कप चहा प्यायल्यामुळे पुणेकर टिळकांना धर्मभ्रष्ट करायला उठले होते.
गोष्ट आहे १८९०च्या दशकातली. तेव्हाचे पुणे अत्यंत कर्मठ होते. पेशवाईच्या काळातील अनेक जुनाट परंपरा, विचार अजून पुसट झाले नव्हते. लोक अजून जातीपाती प्रखरपणे पाळत होते.
मात्र महात्मा फुले यांच्या पासून सुरू झालेले सुधारकी विचार देखील इथलेच. आगरकरांसारखा जहाल समाजसुधारक पुण्यातच होऊन गेला.
पुणे तेव्हा भारताच्या राजकीय घडामोडीचे देखील प्रमुख केंद्र होते.
न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक हे भारतीय काँग्रेसचं आणि पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करत होते. देशभरात घोंगवणारे सुधारकी विचार पुण्याच्या दारावर देखील घोंगावत होते.
पुण्यात गोपाळ जोशी नावाचे विक्षिप्त गृहस्थ राहायचे. त्यांचे आणि सनातनी विचारांचे वाकडे. जिद्दीने आपल्या बायकोला शिकायला इंग्लंडला पाठवलं आणि डॉक्टर बनवलं. याच म्हणजे आनंदी गोपाळ जोशी ज्यांना भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आपण ओळखतो.
आनंदी बाईंचं निधन झाल्यावर गोपाळ जोशी यांचा विक्षिप्तपणा वाढला होता.
एकदा त्यांनी अचानकच बाप्तिस्मा घेतला व ख्रिस्ती झाले. पुढच्याच आठवड्यात परत हिंदू धर्मात परत आले. पाणी शिंपडून कधी माणूस बदलतो काय हे त्यांचं म्हणणं होतं आणि ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी हा उपद्व्याप केला होता
पुण्यातले नेते जनतेशी बोलताना वेगळं बोलतात आणि ब्रिटिशांच्या समोर वेगळं वागतात हे गोपाळ जोशींच निरीक्षण होतं. त्यांना सगळ्यांपुढे उघडे पाडण्यासाठी त्यांनी एक योजना आखली.
हेच ते सुप्रसिद्ध पंचहौद मिशन प्रकरण.
पुण्यात गुरुवार पेठेत पंचहौद मिशन हा महाराष्ट्रातल्या सर्वात जुन्या चर्चपैकी एक चर्च आहे. तिथल्या शाळेत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुण्याचे मोठमोठे नेते झाडून हजर होते.
खरंतर गोपाळ जोशी यांनी रे.रिव्हिंगटन यांना सांगून हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी रमाबाई रानडे व इतर दहा बारा स्त्रिया हजर होत्या.
कार्यक्रम छान झाला, भाषणे वगैरे पार पडली. कार्यक्रमानंतर श्रमपरिहार म्हणून रेव्हरंड यांनी सर्वांना चहा बिस्किटे आणून दिली. आता या पुणेकर मंडळींची पंचाईत झाली.
त्याकाळी पुण्यात जातीपातीचे स्तोम खूप मोठे होते.
एका ख्रिश्चनाच्या हातचा चहा पिणे म्हणजे पापच. पण समोर आलेल्या चहाला नकार देणे म्हणजे यजमानांचा अपमान झाल्याप्रमाणे होते. काहींनी चहा घेतला, काहींनी घेतल्यासारखं केलं व ठेवून दिलं.
रमाबाई रानडे व इतर स्त्रियांनी स्पष्ट नकार दिला. गोपाळ कृष्ण गोखले यांनी तो चहा पिऊन टाकला तर न्यायमूर्ती रानडे यांनी चहाचा कप हातात घेऊन ठेवून दिला.
टिळकांनी मात्र मी फक्त ब्राम्हणाच्या हातचा चहा पितो असं सांगितले.
लगेच गोपाळराव जोशी यांनी आपल्या धाकट्या भावाला पिटाळलं व त्याच्या हातचा चहा टिळकांना आणून दिला. आता पर्याय नसल्यामुळे टिळकांना तो प्यावा लागला. हे सगळं टिळकांचे शिष्य न.चि.केळकर यांनी लिहिलेल्या चरित्रात सांगितलेलं आहे.
चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला, सगळे खुश होऊन घरी निघून गेले. फक्त एक व्यक्ती सोडून…
गोपाळराव जोशी
जोशींनी घराच्या ऐवजी पुणे वैभव या वर्तमानपत्राच्या ऑफिसचा रस्ता धरला. तिथे जाऊन पुण्याच्या या नेत्यांचे चहा पिण्याचे अगदी रसग्रहित वर्णन केले. कोण कुठे बसलं होतं, त्यांनी चहा बिस्किटे मिटक्या मारत संपवली याचा नकाशा काढून पुरावा दिला होता.
दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी छापून आली आणि अख्ख्या पुण्यात धर्म बुडाला म्हणून खळबळ उडाली.
हे सगळं करण्यामागे गोपाळराव जोशी यांचा दुहेरी हेतू होता. जर टिळक, रानडे व इतर नेत्यांनी चहा नाकारला असता तर त्यांना ते सुशिक्षित असून जुन्या विचारांचे असल्याचं म्हणून टीका करता आली असती जर ते चहा प्यायले तर त्यांनी अधर्मकृत्य केलं त्याबद्दल सनातन्यांच मत काय विचारता आलं असतं.
गोपाळराव जोश्यांनी नारदमुनी स्टाईलमध्ये कळ लावली आणि पुणेकर पेटून उठले.
सर्व नेत्यांनी प्रायश्चित्त घ्यावे म्हणून टुम निघाली अथवा टिळकांसकट सगळयांना धर्मभ्रष्ट करण्याची धमकी देण्यात आली.
थेट जगद्गुरू शंकराचार्य यांच्यापर्यंत हे प्रकरण गेलं. त्यांनी व्यंकटशास्त्री निपाणीकर व न्यायगुरू बिन्दुमाधवशास्त्री धर्म सर्वाधिकारी यांना शिककामोर्तब देऊन पुण्यास रवाना केले. हेच ते सुप्रसिद्ध ग्रामण्य कमिशन.
१८९२ साली ग्रामण्य कमिशनच कामकाज सुरू झालं. त्यांनी चौकशी केली त्याला काहीजण उपस्थित राहिले तर काहीजण आलेच नाहीत. टिळकांनी चहा पिऊ नये असे कुठल्याही धर्मग्रंथात लिहिलेलं नाही म्हणून आपले काही चुकले नाही अशी भूमिका घेतली.
न्या.रानडे यांनी कोणताही वाद नको म्हणून सरळ प्रायश्चित्त घेतले.
टिळकांवर पुण्याच्या ब्राम्हणांनी बहिष्कार टाकला. त्यांच्या घरी पूजेसाठी व इतर कार्यासाठी पुरोहित, स्वयंपाकासाठी आचारी मिळणे बंद झाले. त्यांच्या मुलाचं मौजिबंधन व मुलीचं लग्न याच काळात कसबस पार पडलं.
लोकमान्य टिळक हे कायद्याचे अभ्यासक होते. बीबीसी मराठी या वेबसाईटवर मिळालेल्या माहिती नुसार त्यांनी केसरी मध्ये लेख लिहून स्वतःची भूमिका मांडली होती. त्यात ते म्हणाले होते,
‘प्रत्येक निषिद्धाचरण ज्ञानत: केल्यानें जर जात मोडते तर बर्फ खाणारे, सोडा पिणारे, कांदे भक्षण करणारे आणि व्याजबट्ट्याचा व्यापार करणारे सर्वच ब्राह्मण लोक जातिबाह्य नाहीत काय?’
हा वाद अनेक वर्षे चालला. टिळकांनी काशीला जाऊन गंगेत डुबकी मारली व त्याच सर्टिफिकेट आणून दाखवलं. टिळकांनी प्रायश्चित्त घेतलं अस म्हणत हा वाद पुढे मागे पडला.
पण एरव्ही सनातनी विचारांचे समजल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळकांनी चहाच्या बाबतीत सुधारकी भूमिका घेतली व हळूहळू पुणेकरांना चहाची भीती कमी झाली. आज पुण्याच्या गल्लीबोळात उभे राहून चहा पिता येते याच थोडं फार श्रेय लोकमान्यांना जातं हे नक्की.
हे ही वाच भिडू.
- रँडच्या जाचाला वैतागून टिळकांनी पुण्यात वेगळं प्लेग हॉस्पिटल सुरु केलं होतं.
- टिळकांनी जिच्यावर टीका केली होती ती रखमाबाई भारताची पहिली महिला डॉक्टर बनली.
- आंबेडकर म्हणाले ,श्रीधर टिळक हाच खरा लोकमान्य.
टिळक आणि चहा या संदर्भातील लेख खूप छान आहे. एरवी न वाचलेली माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद. लेखाच्या शेवटी १९९२ साली ग्रामण्य कमिशन असं लिहिलंय त्या ठिकाणी १८९२ असं असायला हवं बहुतेक. तुमच्याकडून टायपिंग मिस्टेक झाली असेल. ती दुरुस्त करा.
आपल्याला वाटते का समाज आजतरी सुधारला आहे ? भारतीय संस्कृती अजूनही विचारांनी खूप मागे आहे, आजच्या काळातील कोरोना महामारी हे त्याचेच उदाहरण अनुभवास येत आहे ?