जगात सर्वात जास्त वाचलं जाणारं इंग्रजी वर्तमानपत्र एका मराठी माणसाने सुरु केलं होतं

गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकातली. दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या चुकांमुळे मराठा साम्राज्याचा अस्त झाला आणि देशात इंग्रजांची सत्ता आली. मुंबईचं रूपांतर भारताच्या दुसऱ्या राजधानीत झाले. इंग्रजांनी सात बेटांना एकत्र करून शहराचा विकास करण्यास सुरवात केली. अनेक उद्योगधंदे सुरु झाले. 

इंग्रजांच्या काळात फक्त गावाचा औद्योगिक विकासच क्साला असे नाही तर अनेक सुधारणा देखील घडून आल्या. यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शैक्षणिक सुधारणा.

मुंबईचा तत्कालीन गव्हर्नर आणि मराठ्यांची सत्ता बुडवणारा लॉर्ड माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा उदारमतवादी होता. त्याने मराठी, संस्कृत अशा भारतीय भाषांना, त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुरु करून प्रोत्साहन तर दिलेच मात्र त्याच बरोबर इथल्या स्थानिकांना इंग्रजी भाषेतून आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून व्यवस्था केली.

त्याचीच आठवण म्हणून मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना करण्यात आली. भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित महाविद्यालयापैकी हे एक.

याच कॉलेजच्या पहिल्या बॅचमध्ये पास आऊट होणारे विद्यार्थी म्हणजे नारायण दीनानाथ वेलकर.

नारायण वेलकर यांचा जन्म एका पाठारे प्रभू कुटुंबात झाला. त्यांची घरची परिस्थिती उत्तम होती, लहानपणापासून हुशार देखील होते. इंग्रजी शिक्षणाचे शिवधनुष्य त्यांनी सहज उचलले. चांगल्या मार्काने आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण देखील केलं. महाराष्ट्रातील सुरवातीच्या ग्रॅज्युएटमध्ये त्यांचा समावेश होतो. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी, जस्टीस रानडे, पांडुरंग शास्त्री तर्खडकर असे मुंबईचा नाव उंचावणारे अनेक विद्वान त्यांचे सहकारी होते.

आपल्या शिक्षणाचा आपल्या समाजबांधवांसाठी व्हावा यासाठी नारायण वेलकर यांनी प्रयत्न केले. त्यांनी आणि दादाभाई नौरोजी यांनी ज्ञानप्रसारक मंडळी नावाची संस्था स्थापन करून अनेक शाळा सुरु केल्या. नेटिव्ह जनरल लायब्ररी म्हणजेच आजची एशियाटिक लायब्ररीची स्थापना देखील त्यांच्याच पुढाकारामुळे झाली.

तत्कालीन इंग्रज सरकार कडून अनेक समाजसुधारणा करणाऱ्या नारायण वेलकर यांना रावबहादूर ही पदवी प्रदान करण्यात आली होती.  

सुरवातीला ते बॉम्बे हायकोर्टात अनुवादक म्हणून नोकरी करायचे. पुढे त्यांची मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून नेमणूक झाली. त्याकाळी मुंबईत चार आयुक्त असायचे. यातील तीन इंग्रज आणि एक भारतीय. यातील पहिला भारतीय आयुक्त म्हणजे नारायण वेलकर.

मुंबईच्या अनेक विकासकामांना त्यांच्याच काळात सुरवात झाली. पामची जंगले हटवून बंगले बांधण्यास त्यांनी विरोध केला होता. म्हणून ही जंगले वाचली. 

वेलकरांनी त्याकाळी सरकारला मुंबईत गुजरात आणि इतर राज्यातून येणाऱ्या लोंढ्याची जाणीव केली होती. परप्रांतीयांच्या आगमनावर बंदी घालण्याची मागणी करणारे पहिले नेते म्हणून देखील त्यांची ओळख सांगता येईल.

रावबहादूर वेलकरांनी मुंबईकरांचे प्रश्न सरकारच्या कानावर घालता यावे म्हणून बॉम्बे असोशिएशनची स्थापना केली. याच संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पुढे जाऊन भारतीय काँग्रेसची स्थापना केली.

पण त्यांचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे मुंबईत वर्तमानपत्राची सुरवात.

३ नोव्हेम्बर १८३८ साली रावबहादूर एन.डी.वेलकर यांनी बॉम्बे टाईम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स या वृत्तपत्राची सुरवात केली. बुधवारी आणि शनिवारी प्रकाशित होणारे हे साप्ताहिक लंडन, ब्रिटन सोबतच मुंबईच्या बातम्या पोहचवणारे हे वृत्तपत्र. याचा संपादक म्हणून जे.ई.ब्रेनन या इंग्रजांची नेमणूक वेलकरांनी केली होती. बॉम्बे टाइम्सच्या आधी देखील मुंबईत वर्तमानपत्रे होती मात्र त्यांचा दर्जा या नव्या वर्तमानपत्राच्या जवळपास देखील नव्हता.

फक्त इंग्रजच नाही तर नवसुशिक्षित असणाऱ्या भारतीयांच्यातही हे वर्तमानपत्र प्रचंड फेमस झाले.

१८५० साली हे वृत्तपत्र दररोज प्रकाशित होऊ लागले. राव बहादूर वेलकरांना याचा व्याप सांभाळणे अशक्य होऊन बसले म्हणून त्यांनी रॉबर्ट नाईट नावाच्या इंग्रजाला विकले. या रॉबर्ट नाईटने वर्तमानपत्राचे नाव बदलले.

TIMES OF INDIA

आजही आपण याच नावाने त्या वृत्तपत्राला ओळखतो. तुम्हाला ऐकल्यावर धक्का बसेल पण टाईम्स ऑफ इंडिया हे  फक्त भारतातीलच नाही तर जगातील सर्वात जास्त वाचले जाणाऱ्या इंग्लिश वृत्तपत्रापैकी एक आहे. १८९२ साली थॉमस बेनेट आणि फ्रॅंक कोलमन या दोघांनी टाइम्स ऑफ इंडिया विकत घेतले.

पुढे भारताच्या रामकृष्ण दालमिया यांनी हा वर्तमानपत्र त्यांच्याकडून घेतला आणि मात्र आजही बेनेट अँड कोलमनच्याच नावाने हा वर्तमानपत्र ओळखला जातो.

आज टाइम्स ऑफ इंडियाला दीडशेच्या वर वर्षे झाली. आज फक्त इंग्रजी नाही तर हिंदी मराठी अशा अनेक भाषेत वर्तमानपत्रे प्रकाशित होतात. फिल्मफेअर पासून रेडिओ मिरची पर्यंत सर्वठिकाणी टाइम्सने आपला ठसा उमटवून ठेवला आहे.

ही वृत्तसंस्था जागतिक स्तरावर आपला दर्जा राखून आहे. पण अनेकांना त्याची सुरवात इंग्रजांनी केली असे वाटते. खरं तर टाइम्स ऑफ इंडियाची स्थापना एका मराठी माणसाने केली होती याची जाणीव ना त्या वृत्तसंस्थेने ठेवली ना महाराष्ट्राने ठेवली. दुर्दैवाने रावबहादूर नारायण दीनानाथ वेलकर हे नाव विस्मृतीच्या काळात गडप झाले.

हे ही वाच भिडू 

 

2 Comments
  1. हेमंत says

    ‘इंग्रजी शिक्षण’ म्हणजे शिक्षण नव्हे, मुस्लिम आक्रमक येण्या अगोदर आपण ‘ज्ञान-विज्ञानसंपन्न होतो.

  2. Hemant says

    ही प्रतिक्रिया वाचल्यानंतर आपले म्हणणे लक्षात आले. ते खरे आहे. भारतीय शिक्षण पद्धतीचे जाणीवपुर्वक खच्चीकरण केले गेले होते. ईतिहास डोळे उघडून वाचला तर कळते की भारत हा सदैव लचके तोडले गेलेला देश आहे.
    अर्थात रावबहादुरांचे कार्य सुद्धा
    अचाट होते. त्या काळात ते आवश्यक होते. जगात मान उंच करून उभे राहण्यासाठी इंग्रजी वर प्रभुत्व मिळवणे आवश्यक होते.
    परंतु आता मात्र भारतीय लोकाना स्वाभिमान जागृत करण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.