वेटरला टीप देण्यामागे अमेरिकेच्या वर्णभेदाचा ‘काळा इतिहास’ आहे

कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलं तर जेवणानंतर बिल दिल्यावर वेटरना टीप देण्याची पद्धत आहे. फक्त वेटरच नाही तर सामान उचलणारे हमाल व इतर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या वर्कर्स यांना आपण स्वखुशीने टीप देतो.

काही काही वेळा आपली इच्छा नसते पण वेटर असा दिनवाणा चेहरा करतात, काही काही वेळा टीप न देणाऱ्या कस्टमरवर चीड चीड देखील करतात, त्यांना चांगली सर्व्हिस देत नाहीत.

मग टीप न देऊन आपण चूक केली असंच आपल्याला वाटत राहतं.

अमेरिकेत तर बिलाच्या काही टक्के टीप मिळणे हा वेटरचा हक्कच मानला जातो.

पण काही अभ्यासकांच्या मते टीप देणे हा त्या वेटरचा हक्क नसून गुलामगिरीच प्रतीक आहे.

अस म्हणतात की टीप चा लॉंगफॉर्म आहे To Insure Promptness. म्हणजे तत्पर सेवा मिळण्याच्या खात्री. काही काही वेळा याचा लॉंगफॉर्म To Improve Performance असा ही सांगितलं जातो. पण हे सगळं नंतर सुरू झालेल्या गोष्टी आहेत.

टीप देण्याची सुरवात अमेरिकेत अठराव्या शतकात झाली.

तत्पूर्वी अनेक वर्षांपूर्वी अमेरिका खंडाचा शोध कोलंबसने लावला. या प्रचंड मोठ्या पसरलेल्या खंडात कृष्णवर्णीय लोक राहत होते. आधुनिकता अजून तिथवर पोहचली नव्हती.

युरोपमधल्या देशांनी अमेरिकेत वसाहती उभ्या केल्या.

तिथल्या मूळ लोकांना गुलाम बनवलं. तिथल्या खाणीमध्ये, शेतात, रस्ते बांधणे, रेल्वे रूळ उभे करणे यासाठी कामाला लावलं.

गोरे लोक हे श्रेष्ठ आहेत आणि काळ्या लोकांचा जन्मच गोऱ्यांची सेवा करण्यासाठी झाला आहे अशी काहीशी विचित्र समजूत त्याकाळात होती. म्हणून कृष्णवर्णीयांच्या कित्येक पिढ्या यात भरडल्या गेल्या.

पुढे अमेरिका स्वतंत्र झाला.

या नव्या देशात रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत हे ओळखून युरोपमधील लाखो नागरिक इकडे येऊ लागले. यातले अनेकजण पैसे कमवून गब्बर देखील झाले.

कधी सुट्ट्यांमध्ये हे अमेरिकी नवं श्रीमंत आपल्या युरोपमधल्या गावांमध्ये जात. तिथल्या गढ्यांमध्ये राहणारे सरंजाम आपल्या गुलामांना चूक झाली की चाबकाचे फटके देतात आणि चांगलं काम केलं की बक्षीस देतात हे त्यांनी पाहिलं होतं.

आपल श्रेष्ठत्व ठसवण्यासाठी आपल्या खालच्या लोकांना टीप देण्यास अमेरिकन लोकांनी सुरवात केली.

१८६५ सालच्या दरम्यान अमेरिकन यादवी युद्धे संपली आणि लिंकनने गुलामगिरी संपुष्टात आणली.

मात्र शिक्षणाच्या अभावामुळे त्याकाळी हॉटेलमध्ये साफसफाई, ऑर्डर आणून देणे ही हलकी कामे कृष्णवर्णीय लोकांकडे होती. त्यांना एकतर पगार दिला जात नव्हता किंवा दिला तरी गोऱ्या लोकांच्या प्रमाणात खूप कमी दिला जायचा.

युरोपमधील सरंजामी पद्धतीची कॉपी करणाऱ्या अमेरिकन लोकांनी जेवण झाल्यावर वेटरला बक्षीस देण्यास सुरुवात केली. वेटर ना पगार अत्यन्त कमी होता यामुळे हा वरून मिळणारा पैसा त्यांच्यासाठी एकप्रकारे सुसंधी ठरली.

कृष्णवर्णीय लोकांना आपला पगार कमी आहे हे जाणवू नये यासाठी टिपचा पायंडा पाडला गेला. वरून त्यांना बक्षिसी देऊन उपकार केल्याचा आव आणला गेला.

गेल्या शे-दोनशे वर्षात यात काहीही बदल झालेला नाही.

औद्योगिक क्रांती आली, संगठित क्षेत्रातील कामगारांनी स्वतःचे हक्क भांडून मिळवले.

आज अमेरिका सर्वात प्रगत देश आहे. जगातली महासत्ता म्हणून गणला जातो मात्र तिथे अजूनही वेटर व तशी कामे करणाऱ्या वर्कर्सना सर्वात कमी पगार आहे.

आजही अमेरिकेत इतर काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतन 7.25$ डॉलर इतके आहे तर वेटर व इतर टीप मिळणाऱ्या वर्कर्ससाठी तो 2.13$ डॉलर इतका कमी आहे.

काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील काही राज्यांनी टीप देण्याची पद्धत बंद करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. टीपची पद्धत ही हॉटेल मालकांना फायद्याची आहे, वेटरना द्याव्या लागणाऱ्या पैशांचा भुर्दंड थेट कस्टमरवर टाकल्यामुळे हॉटेल मालक ही पद्धत बंद होऊ देत नाही आहेत.

टीप मिळत असल्यामुळे पगार कमी आणि पगार कमी असल्यामुळे टीप अशा या दुष्टचक्रात सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करणारे वर्कर अडकलेले आहेत.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.