टिपूच्या मदतीला नेपोलियन येईल या भीतीने इंग्रजांनी मुंबईत किल्ला बांधला.

मुंबईचा फोर्ट भाग म्हणजे किल्ला होता हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. बॉम्बे कॅसल म्हणून याला ओळखलं जात होतं. पण या भल्या मोठ्या किल्ल्या सोबतच आत्ताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शेजारी आणखी एक किल्ला होता.

त्याचे नाव सेंट जॉर्ज किल्ला. या किल्ल्याच वैशिष्ट्य म्हणजे त्याची उभारणी नेपोलियन बादशाहपासून संरक्षण करण्यासाठी करण्यात आली होती.

गोष्ट आहे अठराव्या शतकातली. दिल्लीची मोगलाई मोडकळीस आली होती. भारतात मुख्यतः मराठ्यांची सत्ता होती. महादजी शिंदे लाल किल्ल्यात बसून संपूर्ण देशाची सत्ता हाकत होते. याच काळात मराठ्यांचे दोन शत्रू उदयास येत होते. एक म्हणजे इंग्रज तर दुसरे दक्षिणेतील हैदर अली आणि टिपू सुलतान.

इंग्रज तेव्हा जगातील सर्वात मोठे जगज्जेते म्हणून उभे राहत होते. आशिया , आफ्रिका, अमेरिका सर्वत्र निर्माण होणाऱ्या वसाहतीमध्ये त्यांनी आघाडी घेतली होती. मात्र त्यांना सर्वात मोठे आव्हान होते फ्रेंचांचे. फ्रेंच युरोपमधील सर्वात मोठी ताकद बनू लागली होती.

महादजी शिंदेंचा राजकारणाचा अभ्यास मोठा होता. युरोपमधील घडामोडीवर देखील त्यांचे लक्ष होते. 

फ्रान्सचा राजा सोळावा लुई याने मराठ्यांना संपर्क करून भारतात घुसण्यास मदत मिळेल का याची चाचपणी केली होती. महादजींनी इंग्रजांना आवर घालण्यासाठी त्यांच्या शत्रूंना चुचकारण्याच धोरण त्यांनी अवलंबल होतं. मात्र शिवरायांनी फिरंग्यावर विश्वास ठेवू नये असे दिलेले आदेश महादजी शिंदेनी तंतोतत पाळले होते.

इंग्रजांना हरवण्यासाठी फ्रान्सची मदत घेण्याची आयडिया आणखी एकाला सुचली होती. तो म्हणजे हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान.

१८८२ साली म्हैसूरचा सुलतान बनलेला टिपू हा देखील महादजीच्या प्रमाणे दूरदृष्टीचा होता. आपापसात लढाया जरी सुरु असल्या तरी परकीय इंग्रज हे भारतासाठी सर्वात मोठा धोका आहेत हे त्याच मत होतं. युरोपमध्ये काय घडतंय याच्या खबर त्याच्या पर्यंत देखील पोहचत होत्या.

फ्रान्समध्ये तिथल्या राजाबद्दल असलेला असंतोष, तिथे नव्याने बनत असलेली समीकरणे या कडे त्याचं व्यवस्थित लक्ष होतं. टिपूला फ्रान्सच्या सेनाधिकाऱ्यांमधील एक तरुण अधिकारी प्रचंड आवडला होता. याच नाव नेपोलियन बोनापार्ट.

१७९५मध्ये फ्रेंच क्रांती झाली. सोळावा लुई मारला गेला. पुढे जेव्हा राजेशाही समर्थक व क्रांतिकारकांमध्ये सशस्त्र उठाव झाला. तेव्हा नेपोलियनने बजावलेल्या कामगीरीमुळे बंडखोरांचा कणाच मोडून पडला व नेपोलियन फ्रान्समधील प्रभावशाली लष्करी अधिकारी म्हणून गणला जाऊ लागला.

इकडे भारतात महादजी शिंदेचा मृत्यू झाला. त्यानंतर मराठ्यांची सत्ता देखील दुरबा होत गेली. फ्रेंच आणि मराठे यांच्यातील संपर्क तुटला. याचा फायदा टिपूने घेतला.

टिपू सुलतानाने भारतातल्या फ्रेंच अधिकाऱ्यांना म्हैसूरमध्ये जॅकोबियन क्लब स्थापन केला होता. त्याच उदघाटन टिपूच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आलं होतं . याप्रसंगी सुलतानाने स्वतःला सिटीझन टिपू म्हणवून घेतले होते.

नेपोलियन तेव्हा जग जिंकण्याच्या मोहिमेवर निघाला होता. त्याने इटली जिंकली. त्याच्या फ्रेंच सेनेचं पुढचं लक्ष्य इजिप्त हे होते. इंग्रजांचं वर्चस्व असणारे इजिप्त जिंकून आशियात पाय रोवायचे आणि तिथून सोने कि चिडिया म्हणवल्या जाणाऱ्या भारतावर हल्ला करायचा हे नेपोलियनचं स्वप्न होतं .

खुद्द टिपू सुलतानने त्याला भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतं. या दोघांची बोलणी देखील झाली होती. प्लॅन सुद्धा रेडी करण्यात आला होता.

याचा सुगावा इंग्रजांना आधी लागला. त्यांनी नेपोलियनच्या आक्रमणाची तयारी सुरु केली. सुस्त आणि आळशी गव्हर्नर असलेल्या जनरल जॉन शोरला काढून लॉर्ड वेलस्लीला भारताची जबाबदारी देण्यात आली. हा वेलस्ली प्रचंड हुशार होता, युद्धनीतीमध्ये निपुण होता. त्याने टिपू सुलतानच्या विरुद्ध निजाम आणि मराठ्यांना एकत्र आणले.

हैद्राबादचा निजाम याचे स्वतःचे फ्रान्सशी राजनैतिक संबंध होते. पण वेलस्लीने त्याला बरोबर पटवले. निजामाने आपल्या राज्यातून फ्रेंच सैनिकांना हाकलून लावले. पेशव्यानी देखील इंग्रजांना साथ देण्याचं ठरवलं.

हे सगळं चालू होतं पण जर नेपोलियन भारतात आला तर तो सर्वप्रथम मुंबईत उतरणार याची सगळ्यांना खात्री होती. त्याच्या साठीच मुख्य किल्ल्याच्या जवळ सेंट जॉर्ज किल्ला उभारण्यात आला. जर नेपोलियनचे आक्रमण झाले तर मुख्य किल्ल्यावरील व नौदलातील लोक फ्रेंच सेनेशी झुंझ देतील आणि त्यात अपयश येत आहे असं वाटलं तर हि सर्व मंडळी छोट्या नौकांमधून किंवा गलबतांमधून ठाण्याला किंवा पनवेलला मराठ्यांच्या आश्रयार्थ जातील अशी ही योजना होती.

१७९९ साली नेपोलियन सीरियामध्ये लढत होता. मात्र इकडे वेलस्लीने निजाम आणि मराठ्यांची मदत घेऊन म्हैसूरवर हल्ला केला. या चौथ्या अँग्लो-म्हैसूर युद्धात टिपू सुलतानाचा पराभव झाला. युद्धात गुंतलेला नेपोलियन त्याच्या मदतीला येऊ शकला नाही.

पुढे ब्रिटिशांशी झालेल्या सप्तवार्षिक युद्धात स्वतः नेपोलियन हरला आणि फ्रेंचांचे भारतावर विजय मिळवण्याचे स्वप्न कायमचे संपून गेले. भारतात देखील टिपू सुलतानच्या पाठोपाठ मराठ्यांना देखील इंग्रजांनी हरवलं. इंग्रजी सत्ता फक्त भारतातच नाही तर जगभरात सर्वात शक्तिशाली साम्राज्य म्हणून उदयास आली.

यानंतर या सेंट जॉर्ज किल्ल्याचे सामरिक महत्व संपुष्टात आले. इंग्रजांना मुंबईचे रक्षण करण्याची आवश्यकताच उरली नाही. १८६२ ते १८६५ या काळात सर बार्टल फ्रेयर याने सेंट जॉर्ज किल्ला पाडून टाकला. पुढे इथे एक रुग्णालय उभे राहिले. त्याला देखील सेंट जॉर्जचेच नाव देण्यात आले.

आजही या किल्ल्यातील दारुगोळा कोठाराची एक इमारत सुरक्षितपणे टिकून आहे, तिलाच आजचे मुंबईकर जॉर्ज फोर्ट म्हणून ओळखतात.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.