टिपू सुलतानची तलवार भारतात परत येतेय मग शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार का नाही?

जेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा भारतातील अनेक प्राचीन वस्तू भारतातून इंग्लंड मध्ये नेण्यात आल्या होत्या. त्या वस्तू इंग्लंडमध्ये गेल्या आणि तिथल्याच झाल्या. परंतु त्या वस्तू भारतात परत आणण्यात याव्यात यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले आहेत. 

नुकतंच १९ ऑगस्टला ब्रिटनचं ग्लास्गो म्युजिअम आणि भारतातील केंद्रीय संस्कृती मंत्रालय यांच्यात एक करार करण्यात आलाय. त्या करारानुसार भारतातून इंग्लंडमध्ये नेण्यात आलेल्या ७ प्राचीन वस्तू भारतात परत आणण्यात येणार आहेत. करारानुसार ठरलेल्या वस्तू २०२२ संपेपर्यंत भारत सरकारच्या ताब्यात देण्यात येतील.

या तलवारींमध्ये टिपू सुलतानची तलवार असल्याच्या बातम्या देखील देण्यात आल्यात मात्र ग्लासगो म्युझियमकडून मात्र याची कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाहीये. 

मात्र या सगळ्या चर्च्यांमध्ये एक प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे गेल्या पाच दशकांपासून   प्रयत्न चालू असलेली लंडनला असलेली शिवाजी महाराजांची तलवार अजूनही भारतात का परत आलेली नाही. 

छत्रपती शिवरायांकडे नेमक्या किती तलवार होत्या, याविषयी कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाहीत. तरीही छत्रपती घराण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार तसेच कागदोपत्री मिळणाऱ्या नोंदीमधून शिवाजी महाराजांच्या ‘तीन तलवारी’ ज्ञात आहेत. यातील एक तलवार आजच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर. 

भवानी तलवारी विषयी तर महाराष्ट्रातील प्रत्येकालाच विलक्षण आकर्षण आहे आणि ‘भवानी’ च्या अस्तित्वाचा शोध अविरतपणे सर्वच संशोधक करत आहेत. मात्र या तीन तलवारींमधील एक तलवार उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रात पाहायला मिळतो, तेही तिच्या नावासकट ती म्हणजे जगदंबा तलवार.

 ही जगदंबा लंडनला गेली कशी? यामागेसुद्धा एक कहाणी आहे. ‘ऑक्टोबर 1875’ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स भारतभेटीवर आला असता, त्याला भारतातील राजेरजवाड्यांनी अत्यंत मौल्यवान वस्तू भेटस्वरूपात दिल्या.कोल्हापूरच्या गादीवर तेव्हा ‘छत्रपती शिवाजी महाराज चौथे’ विराजमान होते. त्यांच्याकडूनही काही मौल्यवान नजराणा प्रिन्स ऑफ वेल्सला पेश करण्यात आला त्यामध्ये या जगदंबा तलवारीचा समावेश होता असं सांगितलं जातं.

कोल्हापूरच्या शस्त्रागारात असलेल्या कागदपत्रामध्ये या तलवारीविषयी अजून बराच तपशील वाचायला मिळतो. यात तलवारीचे नाव ‘जगदंबा’ असे दिलेले असून तपशिलात‘नाकीत्यास हिरे ६,माणके ४४ ,पाचा १० एकूण पराज हिरे १३,पाचा १८ , माणके ४६७ मिळून सबंध तलवार’ अशी नोंद वाचायला मिळते. तसेच, इंद्रजित सावंत यांच्या ‘शोध भवानी तलवारीचा’ या पुस्तकात जगदंबेविषयी अतिशय तपशीलवार माहिती प्रकाशित झालेली आहे.

मग आता ही तलवार लंडनमध्ये नेमकी कुठे आहेत याबद्दल माहिती घेण्यासाठी बोल भिडूने इतिहास संशोधक केतन पुरी यांना संपर्क केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही तलवार इंग्लडच्या राणीच्या बकिंगहॅम पॅलेस या इस्टेटमध्ये राणीच्या पर्सनल कलेक्शनमध्ये ही तलवार आहे.

मात्र कोणत्याही म्युझीयममध्ये नं ठेवता राणीच्या खाजगी संग्रहात तलवार असण्याने प्रकरण थोडं अवघड आहे. मौल्यवान वस्तू जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या खाजगी संग्रहात असते तेव्हा त्याला म्युझियमसाठी जे आंतरराष्ट्रीय कायदे कानून आहेत ते लागू होत नाहीत. 

त्यामुळे महाराजांची तलवार कायदेशीर मार्गाने भारतात आणण्यासाठी अनेक अडचणी आहेत हे लक्षात येतं. 

मात्र तरीही राणीची तलवार महाराष्ट्रात आणण्यासाठीचा सर्वात निर्णयक प्रयत्न होऊ घातला होता १९८० मध्ये अब्दुल रहेमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना. त्यांच्या कार्यकाळात शिवाजी महाराजांची भवानी तलवार भारतात आणण्यासाठी राज्यभर जनआंदोलन उभारण्यात आलं होतं. बॅ. अंतुले स्वतः वकील असल्यामुळे त्यांनी पुराव्यांच्या आधारावर ती तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न करत होते.

परंतु तलवारीच्या ऐतिहासिक संदर्भावरून समस्या निर्माण झाली होती. तेव्हा मुख्यमंत्री अंतुले यांनी प्रयत्न न सोडता ब्रिटनच्या महाराणी बरोबर चर्चेची सुरुवात केली होती. 

याबाबत ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ आणि मुख्यमंत्री अंतुले यांची भेटही निश्चित करण्यात आली होती.  परंतु ही भेट होण्याच्या आधीच बॅ. अंतुलेंना राजीनामा द्यावा लागला होता. 

त्यामुळे बॅ. अंतुले यांचे तलवार परत आणण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. मुख्यमंत्री ए आर अंतुले यांनी राजीनामा दिल्यांनतर बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. परंतु ब्रिटनच्या राणीबरोबर आयोजित बैठकीला बाबासाहेब भोसले गेलेच नाहीत असं सांगण्यात येतं. त्यांनतर अनेक वेळेस भवानी तलवार भारतात परत आण्यासाठी मुद्दा मांडण्यात आला. परंतु त्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये सातत्य नसल्यामुळे हा मुद्दा तसाच पडून आहे.

त्यानंतर अनेक अनेक मोठ्या व्यक्तींनी महाराजांची तलवार आणण्यासाठी प्रयत्न केल्याच्या वावड्या अनेकदा उठत होत्या मात्र त्याला कोणताही कागदपत्री पुरवठा मिळत नाही. मग बाकी मागण्या मात्र नेहमीच होत गेल्या. 

२००२ मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी स्पेनच्या दौऱ्यावर होते. तेव्हा महाराजांची भवानी तलवार स्पेनच्या कारागिरांनी बनवली होती असा दावा स्पेनच्या काही संशोधकांनी केला होता. तेव्हादेखील अशीच तलवार आणण्याची मागणी झाली होती. 

२०१० मध्ये यूकेचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून भारताच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाराजांची भवानी तलवार भारताला परत करण्याची मागणी केली होती. अलीकडच्या काळात मार्च २०२१ मध्ये पुण्यात भारत आणि इंग्लंडचा क्रिकेट सामना झाला. तेव्हा कोल्हापूरच्या शिवदुर्ग संस्थानानं कोल्हापुरात आंदोलन केलं होतं. 

सध्याच्या परिस्थिती बोलायचं झाल्यास नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारतातून चोरी झालेल्या अनेक पुरातन मौल्यवान वस्तू भारतात आल्याचं दिसतात. मात्र यासाठी डिप्लोमॅटिक लेव्हलला प्रयत्न झाल्याचे दिसतात. मत तसेच प्रयत्न जगदंब तलवार भारतात आणण्यासाठी तोकडे पडताना दिसतात.

ग्लासगो येथील म्युझिअममधून भारतात ज्या ७ वस्तू आल्या आहेत हि या दृष्टीने एक वेलकम स्टेप यासाठी म्हणता येइल की भारतातून ब्रिटनमध्ये नेण्यात आलेले आर्टिफॅक्ट्स ब्रिटनच्या एका म्युझिअममधून परत आणण्याची ही पहिलीच वेळ आहे.त्याचबरोबर भारतातून नेण्यात आलेल्या वस्तू पुन्हा भारताला पुन्हा दिल्या पाहिजेत हि ही गोष्ट मान्य करण्यास सुरवात झाल्याचं कळतं.

मात्र यासर्वात अजून एक शोकांतिका म्हणजे जगदंब तलवारीसाठी महाराष्ट्रात किंबहुना भारतात व्यापक जनआंदोलन झालेलं नाही. ब्रिटिशांकडे असणाऱ्या कोहिनुर हिऱ्याला भारतात आणण्यासाठी  अनेकदा प्रयत्न झाले . मात्र त्याचवेळी असे प्रयत्न मराठीजनांसाठी कोहिनुर इतकीच मौल्यवान असणारी जगदंबा तलवार मात्र दुर्लक्षितच राहिली. 

हे ही वाच भिडू  

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.