विजयी झाल्यास प्रत्येक कुटूंबाला महिना १० लिटर दारू देणार.

आगआयआय गं. हे कांड कुठं झाल आहे. पत्ता द्या पहिल्या गाडीने प्रचारात सहभागी होतो. अहं मद्यप्रेमी तळीराम मित्रांनो. लगेच खूष व्हायची गरज नाही. जरा शांतपणे वाचा, पत्ता घ्या, बाकीचे आश्वासनं पण निरखून वाचा आणि मगच गाडी पकडा.

तर मॅटर असा आहे की, 

लोकसभेच्या इलेक्शनसाठी एकजण अपक्ष उभा राहिला आहे. इथपर्यन्त सर्व गोष्टी लोकशाही मुल्यांची जपवणूक करणाऱ्या होत्या. पण पुढ जे काही आहे ते राडा करणारा खासदार लोकांना मिळू शकतो याची जाणीव करुन देणाऱ्या आहेत. 

तामिळनाडूच्या तिरूपूर लोकसभा मतदार संघात शेख दाऊद नावाचे व्यक्ती अपक्ष उभा राहिले आहेत. त्यांनी लोकांना जी आश्वासने दिली आहेत त्यामुळे सध्या ते सर्व भारतात व्हायरल होत आहेत. 

शेख दाऊद यांच पहिलं आश्वासन आहे की ते,

प्रत्येक कुटूंबाला महिना १० लिटर ब्रॅण्डी मोफत देणार आहेत. हा मोफत. एकही रुपया खर्च न करता प्रत्येक कुटूंबाला महिन्याला १० लिटर ब्रॅण्डी मिळणार. बर या गोष्टीमागे त्यांचे विचार असे आहेत की, विषारी दारू पिवून लोकांचा मृत्यू होतो. म्हणून शुद्ध आणि उच्चप्रतीची दारू देणं हे माझं कर्तव्य असणार आहे. 

आत्ता दूसरं आश्वासन अस की,

प्रत्येक महिलेला मासिक २५,००० रुपये भत्ता देण्यात येणार आहे. महिना पंचवीस हजार म्हणजे. वर्षाला तीन लाख. म्हणजे पाच वर्षाचे १५ लाख. आहे का परत पंधरा लाखांवरच हिशोब आला. पण इथे एकदम १५ लाख नाही तर मासिक हप्त्यात फक्त गृहिणींच्या हातात पैसै देण्यात येणार आहेत. 

त्यांच तिसरं आश्वासन म्हणजे,

मुलींच्या लग्नात १० सोन्याची नाणी नाहीतर १० लाख रुपये देणार असल्याचं जाहिर केलं आहे. बरं फक्त खैरात वाटत सुटणे हे त्यांच ध्येय नाही तर शेतकऱ्यांची काळजी देखील त्यांनी घेण्याच महत्वाच काम त्यांनी केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेख दाऊद म्हणतात, मैत्तूर धरणातून कालव्याद्वारे सेलम आणि तिरूपूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडवला जाणार आहे. त्याद्वारे दारू आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवता येवू शकतो. 

आत्ता इकडे लपून छपून दारू मटणाच्या पार्ट्या झडत असताना तिकडे तामिळनाडूत जाहिरपणे दारू वाटणारे हे नेते संबंध दारूभक्तांना आदरणीय वाटू लागले असतील तर दोष का द्या. तसही आपल्याकडे लोकशाही आहे. लोकांचे प्रश्न समजून घेणारा माणूस नेता होतो.

दारू, लग्न, पाणी, पैसै या मुलभूत समस्यांना आपल्या जाहिरनाम्यात स्थान देवून त्यांनी मोठ्ठा तीर मारला आहे हे नाकारता येत नाही. बाकी हा माणूस निवडून आल्यानंतर तुम्ही इथेच थांबणार का तिरूपूरला कायमच स्थायिक होणार तेवढं सांगा. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.