सरकार टाटांना घड्याळ तयार करण्याची परवानगी देत नव्हते, तेव्हा टाटांनी आयडिया केली..

‘टाटा ग्रुप म्हणजेच देशाचा ग्रुप’ असं समीकरण भारतीय लोकांच्या मनात रुजलंय. भारतातील सर्वात मोठा उद्योग समुह. अगदी जेवणातल्या मीठापासून ते भल्या मोठ्या ट्रकपर्यंत अशा अनेक गोष्टी टाटांनी बनवल्या. लाखो इंजिनियर्स टाटांकडे कामाला आहेत. भारताची औद्योगिक क्रांतीच मुळात टाटांमुळे असे म्हंटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

या टाटा ग्रुपची स्थापना १८६८ मध्ये २९ वर्षीय जमशेदजी टाटा यांनी केली. कापूस आणि अफूच्या व्यापारापासून सुरु झालेला हा टाटा उद्योगसमूह आज भारतातील सगळ्यात मोठा उद्योग समूह आहे.

विशेषतः जे. आर. डी. टाटांच्या नेतृत्वाखाली टाटा उद्योगसमूहाने मोठी भरारी मारली होती.

गोष्ट आहे १९८३-१८८४ सालची.

टाटा ग्रुपमध्ये टाटा स्टील, टीसीएस, टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स, टायटन, टाटा कपिटल, टाटा पॉवर, इंडियन हॉटेल्स, टाटा कम्युनिकेशसन्स, टाटा डिजिटल्स, टाटा इलेकट्रोनिक्स, टाटा पॉवर्स यांसारख्या बलाढ्य कंपन्या टाटा ग्रुपच्या हातात आहेत. या सगळ्या कंपन्यांचा कारभार टाटा सन्सच्या माध्यमातून चालतो. थोडक्यात मीठापासून ते ट्रकपर्यंत सगळ्या गोष्टी टाटांनी बनवल्या. पण भारतातील आर्थिक उदारीकरणापूर्वी त्यांना एक गोष्ट बनवण्याची परवानगी मिळाली नव्हती.

अनेक प्रयत्न केले, पण सगळे व्यर्थ…!

ती गोष्ट होती ‘मनगटी घड्याळ’

आपली अर्थव्यवस्था परदेशी गुंतवणूकदारांसाठी खुली करण्यापूर्वी ‘परवाना राज’ च्या काळात भारतात व्यवसाय करणे मोठ्या कंपन्यांसाठी कठीण होते. घड्याळे तयार करणे हा व्यवसाय तेव्हा लघु आणि छोट्या उद्योगांसाठी राखीव होता. त्यामुळे मोठं मोठ्या वस्तुंची परवानगी असताना या महाकाय उद्योग समुहाला घड्याळ बनवण्याची परवानगी मिळत नव्हती.

पण शांत बसतील ते टाटा कसले..!

जे.आर.डी. टाटांनी एक आयडिया केली. तेव्हा हा परवाना होता तमिळनाडूमधील ‘तमिळनाडू इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन’ (TIDCO) कडे. टाटांनी त्यांच्यासमोर जॉईंट व्हेंचर म्हणून प्रस्ताव दिला. एचएमटी सारख्या ब्रॅन्डशी स्पर्धा करणे आपल्याला कसे शक्य आहे याबद्दल समजावून सांगितले. टीआयडीसीओ ने देखील यावर विचार केला. आणि जेआरडींचा प्रस्ताव स्विकारला आणि व्यवसाय सुरु झाला.

सुरुवातीला त्यांना कंपनीत काम करण्यासाठी कुशल कामगार मिळत नव्हते, नंतर त्यांनी तामिळनाडूत चाचण्या घेऊन लोकांना कामावर घेण्यास सुरुवात केली. टाटा समूहाला तामिळनाडू प्रदेशात रोजगारनिर्मितीही करायची होती, अशी भागीदारी सुरू झाली व टायटनने १९८७ मध्ये तामिळनाडूतील होसूरला १५ एकरच्या कारखान्यासह क्वार्ट््झ घड्याळांसह मार्केट मध्ये एंट्री मारली.

 टायटन हे टाटा इंडस्ट्रीज व तामिळनाडूचे संक्षिप्त रूप आहे. तमिळनाडू इंडस्ट्रिज (TI) आणि टाटा (TA) यांच्या नावातून ‘टायटन’ या प्रकल्पाचे नामकरण झाले. टायटन कंपनी टाटा इंडस्ट्रीज आणि टिडको म्हणजेच तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळ यांच्या भागीदारीत १९८४ मध्ये सुरू झाली. आणि ‘टायटन’ हा वर्ल्ड फेमस ब्रॅन्ड जन्माला आला..!

सर्व वयोगटांना, विशेषतः तरुणाईला भुरळ घालणारे डिझाइन्स बनवणे, हे नव्याने मार्केट मध्ये आलेल्या या ब्रँड समोरचे सगळ्यात मोठे आव्हान होते. 

कंपनीला सरकारने ४० लाख घड्याळे बनवायचे लायसेंस दिले होते, त्यापैकी यात ३२ लाख मेकॅनिकल वॉचेस आणि केवळ ८ लाख मनगटी घड्याळ बनवायचे होते. सुरवातीला मेकॅनिकल वॉचेसच्या उत्पादनावर ह्या प्रकल्पाचं लक्ष केंद्रित झाले होते. पण तत्कालीन मार्केटची गरज पाहता, ‘क्वार्ट्झ’ वर लक्ष केंद्रित करुन त्यात आवश्यक ते बदल केले गेले.

या प्रकल्पाचे पहिले CEO होते मराठमोळे देसाई.

देसाई हे मुळचे मुंबईचे. पदवीपर्यंतच शिक्षण देखील मुंबई विद्यापीठातुनच झाले. पुढे ऑक्सफर्डमध्ये प्रवेश मिळाला. पण शिक्षण सुरू असताना सुट्टीवर भारतात आलेले देसाई १९६१ साली टाटा ग्रूपमध्ये सहभागी झाले.

टाटा केमीकल्स, टाटा इंडस्ट्रीज, इंडीयन हॉटेल्स (ताज) आणि टाटा प्रेस अशा वेगवेगळ्या टाटा कंपन्यांसोबत काम केल्यानंतर १९८५ साली त्यांची रवानगी टायटन मध्ये केली गेली, तिथून पुढे १५ वर्षे देसाई आणि टायटन ही नावे एकत्र घेतली गेली.

एच.एम.टी., सिटीझन, ओलवीन या घड्याळ्यांच्या ब्रॅण्डचे वर्चस्व त्याकाळात भारतीय बाजारांत होते. त्याचबरोबर कस्टम शॉप्स मधून परदेशातून आयात केलेली घड्याळ खरेदी करण्यात लोकांचा ओढा होता.

टायटन भारतात सुरु होण्यापुर्वीच्या काळात घड्याळ ही सर्वात जास्त स्मगलिंग करून भारतात आणल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी एक होती.

टायटनची सुरुवात झाल्यानंतर या घड्याळांनी मात्र थोड्या कालावधीतच आपला जम बसवला. उत्कृष्ट दर्जा, उत्तम ग्राहक सेवा, वस्तूंमध्ये दोष असल्यास बदलून द्यायची गॅरंटी, आक्रमक जाहिराती यामुळे टायटन भारतभर वाढत गेला. मॉल संस्कृती उदयाच्या फार पूर्वी टायटन ने आपली स्वतःची दुकाने सर्वत्र थाटली.

भारतीय बाजापेठेत मिळवलेला लौकिक परदेशी बाजारपेठेत ही मिळावा, म्हणून ‘टायटन’ ने काही ‘युरोपियन’व ‘आशियाई’ बाजारपेठेत प्रवेश केला. परंतु तिथल्या बाजारपेठांमध्ये ‘टायटन’ला अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

या बाजारपेठ मिळवण्यासाठी अथवा टिकवून ठेवण्यासाठी ‘टायटन’ हा ब्रँड ‘टाटा उद्योग समूहाचा’ असणं इतकेच पुरेसे नव्हते. परदेशी ग्राहकांच्या पसंतीला उतरणे हा मुळ मुद्दा होता. भारतीय तरुणाईला भुरळ घालणाऱ्या डिझाइन्सना तिकडच्या बाजारपेठेत मात्र, पसंतीची दाद मिळत नव्हती.

अपेक्षांची गणितं चुकली होती.

ही परिस्थिती बदलण्यासाठी, ‘टायटन’ने तिथल्या बाजारपेठेतील ग्राहकांच्या अपेक्षा विचारात घेतल्या. आणि देसाई यांनी यासाठी शक्य तितक्या कमी जाडीचे घड्याळ तयार करायचे अशी कल्पना सहकाऱ्यांसमोर ठेवली.

हे घड्याळ इतके पातळ होते की संपूर्ण घड्याळाची अपेक्षीत जाडी ३.५ मिलीमीटर होती. बाजपेठेच्या स्ट्रॅटेजी बदलून त्यांच्यासाठी खास वेगळे डिझाइन्स बनवून घेतले. यामुळे ‘टायटन’ च्या यशोगाथेत आणखी एक सुवर्ण पान लिहिले गेले, यात शंकाच नाही.

२३ डिसेंबर १९८७ ला मुंबई मधील ‘सकीना प्लाझा’ येथे टायटनचे पहिले शोरूम सुरु करण्यात आले.

यासाठी वर्तमानपत्रांत मोठ्या जाहिराती टायटनने दिल्या होत्या. यामध्ये घड्याळे बनवण्याची प्रक्रिया दिली होती. त्याकाळात म्हणजे जवळपास ३३ वर्षांपूर्वी, लोकांना हे सर्व नवीन, आश्चर्यकारक होते.

ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे बघून कंपनीने मग जास्तीत जास्त दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला. प्रति १०,००० लोकसंख्येमागे एक तरी टायटनचा डीलर असला पाहिजे, असे ठरवण्यात आले.

पण टायटनला एकदम इतकी सगळी दुकाने उघडणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांनी अपारंपरिक दुकानांकडे मोर्चा वळवला. पुस्तकांची दुकाने, ज्वेलरी शॉप्स, हॉटेल्स, उपहारगृह  यांच्या मोठ्या दुकानात एका कोपऱ्यात टायटनचे छोटेखानी काउंटर सजवण्यात आली.

टायटनच्या या सगळ्या प्रवासात ‘ग्राहकसेवा’ या गोष्टीचा फार मोठा भाग आहे. सुरुवातीच्या काळात टायटनने स्वतःचे ‘सर्विंस सेंटर’ उभी केली.

“घड्याळ रिपेअर करणे म्हणजे कंपनीची नावलौकिक रिपेअर करणे”

असे टायटनचे ब्रीदवाक्य होते.

एरव्ही दुकानदाराची जबाबदारी घड्याळ विकल्यावर संपून जायची. टायटन मात्र सर्व्हिस देताना आजही खुप काळजी घेतात. या सर्वाचा परिणाम ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास दृढ होण्यात झाला. पुढच्या काळात टायटने तनिष्कसारखा ब्रॅन्ड सुरु केला. तर फस्टट्रॅक, सोनाटा हे देखील टायटनचीच भावंड.

आज जवळपास २० हजार कोटींपर्यंत कंपनीची आर्थिक उलाढाल आहे. ग्राहकांना या ब्रँडचे प्रचंड आकर्षण आहे. टायटनची घड्याळे वापरणारे म्हणजे “क्लास”, “स्टेट्स” हे ग्राहकांच्या मनावर ठसवणाऱ्या जाहिराती आजही आपणाला दिसून येतात. सोबतच हा एक व्यवसाय व्यवस्थापन या अभ्यासाचा भाग आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.