सत्तेत आल्या-आल्या तृणमूल नेत्यांची झोप उडवणारं नारदा स्टिंग ऑपरेशन समजून घ्या… 

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सत्तेत येऊन अजून १५ दिवस पण झालेलं नाहीत. त्यामुळे सध्या सेलिब्रेशनवर बंदी असली तरी पक्षाचे नेते अजून आनंदात असणार यात शंकाचं नव्हती. पण भावांनो कायदा सगळ्यांपुढे सारखा असतो म्हणतं सीबीआयनं आज या सगळ्यांच्याच आनंदावर विरजण टाकलय.

आज सक्का-सक्काळी मुख्यमंत्र्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांची सीबीआयनं अक्षरशः झोप उडवली आहे. त्याला कारण पण तसचं आहे. 

नारदा स्टिंग ऑपरेशन या एका जुन्या प्रकरणात ममतांच्या मंत्रिमंडळातील २ मंत्री आणि २ माजी मंत्र्यांना सीबीआयकडून आज अटक करण्यात आली आहे. या अटकेविरोधात ममता स्वतः निजाम पॅलेसमधील सीबीआयच्या कार्यालयात पोहोचल्या आणि तिथं धरणं आंदोलन सुरु केलं. एक तर त्यांना सोडा किंवा मला अटक करा अशी त्यांची मागणी होती.

पण हे नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरण आहे तरी काय ते आधी समजून घ्या.

२०१६ मध्ये नारदा स्टिंग ऑपरेशन समोर आलं होतं… 

२०१६ च्या बंगाल विधानसभा निवडणुकीच्या बरोब्बर आधी नारदा न्यूज पोर्टलचे संपादक आणि मॅनेजिंग डायरेक्टर सॅम्युएल यांनी एक स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ प्रकाशित केला. २०१४ मध्ये हे स्टिंग केल्याचा दावा त्यांनी त्यावेळी केला होता. या स्टिंगमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना यात मग अगदी मंत्री, आमदार आणि खासदार यांना ऑन कॅमेरा कथित रित्या लाच घेताना दाखवलं होतं.   

कोणीकोणी किती लाच घेतल्याचा दावा केला होता?

स्टिंगमध्ये फरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा, शोवन चटर्जी या चार मंत्र्यांचा समावेश होता, हे चौघे देखील २०१४ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री बनले होते. याशिवाय सौगत राय, इकबाल अहमद, सुल्तान अहमद यांचा देखील समावेश होता. या सगळ्यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये घेतले असल्याचं स्टिंगमध्ये दाखवलं होतं. 

या सोबतच मुकुल रॉय यांनी सर्वात जास्त म्हणजे २० लाख रुपये लाच घेतली असल्याचं सांगितलं होतं. 

तर शुभेंदु अधिकारी, काकोली घोष दास्तीदर, प्रसून बनर्जी या नेत्यांनीही प्रत्येकी ४ लाख रुपये लाच घेतल्याचा दावा व्हिडीओमध्ये केला होता. 

या नेत्यांशिवाय एक वरिष्ठ पोलिस अधिकारी अहमद मिर्जा यांचा देखील यात समावेश होता. त्यांनी ५ लाख रुपये घेतल्याचं सांगितलं होतं.

२०१७ मध्ये न्यायालयानं दिले होते चौकशीचे आदेश… 

या स्टिंग ऑपरेशन नंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात अक्षरशः जमीन चिरणारा भूकंप आला होता. विरोधी पक्षानं या प्रकरणाला घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यासाठी अगदी उच्च न्यायालयात देखील गेले. अखेरीस २०१७ मध्ये कोलकता उच्च न्यायलयाने या स्टिंग ऑपरेशन संदर्भात सीबीआय चौकशीचे आदेश दिले.

त्यानंतर प्रकरणाचा तपास सुरु झाला, तो आज तागायत सुरु आहे.

आता कोणाकोणाला अटक झाली आहे?

आज सकाळी फरहाद हकिम आणि सुब्रत मुखर्जी या दोन मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. तर मदन मित्रा आणि कोलकात्याचे माजी महापौर शोवन चॅटर्जी यांना देखील अटक करण्यात आली आहे. शोवन यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण तिकीट न मिळाल्यानं त्यांनी २ दिवसात भाजपला राम राम केला होता. 

भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना अटक नाही… 

तृणमूल काँग्रेसच्या आरोपांनुसार सीबीआयनं भाजपमध्ये गेलेल्या शुभेंदू अधिकारी, मुकुल रॉय यांना अटक केलेली नाही. पण त्या दोघांवर देखील सारखेच आरोप ठेवण्यात आले आहेत.

थोडं मागं जाऊन एक घटना आठवायची म्हंटलं तर डिसेंबर २०२० भाजपनं आपल्या चॅनेलवरून शुभेंदू अधीकारी यांचा व्हिडीओ हटवला होता, ज्यामुळे भाजपवर बरीच टीका झाली होती. आणि आज देखील बघितलं तर या दोघांना अटक करण्यात आलेली नाही.

चौकशीला बोलावून अटक केल्याचा दावा… 

या प्रकरणात राज्याचे परिवहन आणि गृहविकास मंत्री फिरहाद हाकिम यांनी दावा केला आहे कि चौकशीला बोलावून अटक केली आहे. ते म्हणाले कि,

सीबीआयने आम्हाला चौकशीसाठी बोलावलं होतं, पण त्यानंतर अचानक अटक केली. आम्ही या विरोधात न्यायालयात जाणार आहोत.

राज्यपालांच्या परवानगीनंतर अटक : 

सीबीआयने दावा केला आहे कि, या चार नेत्यांना अटक करण्याआधी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची परवानगी घेतली होती. त्यांच्या परवानगीनंतरच या सर्वांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्याची तयारी केली असून त्याचाच एक भाग म्हणून या चार नेत्यांना अटक केली आहे.

घटनाबाह्य अटक असल्याचा दावा :

पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांनी ही अटक घटनाबाह्य असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही आमदारला अटक करण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते, पण सीबीआय अशी कोणतीही परवानगी माझ्याकडून घेतलेली नाही. 

तृणमूल कडून कारवाईचा निषेध :

सीबीआयने केलेल्या कारवाईवर तृणमूलने तीव्र विरोध केला आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाले सीबीआयची हि कारवाई म्हणजे राजकीय आकसापोटी केलेली आहे. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खासदार कल्याण बॅनर्जी आणि सांतनु सेन यांच्या सोबत सीबीआयच्या कार्यालयात पोहोचल्या आणि तिथं एक तर त्यांना सोडा किंवा मला अटक करा असं म्हणतं धरण आंदोलन सुरु केलं.  

सोबतच आता या सगळ्याविरोधात न्यायलायत जाण्याची तयारी तृणमूल काँग्रेसने केली आहे. त्यामुळे आता पुढे या प्रकरणात काय होणार हे पाहायला लागणार आहे. पण एकीकडे कोरोना महामारी आणि दुसरीकडे तृणमूलने आणि त्यात देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी निजाम पॅलेसमध्ये केलेल्या गर्दीवर देशभरातून टीका होताना दिसत आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.