रेमेडीसीव्हीरने हात टेकले की कोरोना पेशंटला दिलं जाणारं इंजेक्शन ‘टॉसिलीझुमॅब’

देशात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. नवीन संक्रमितांचा आलेख वाढतच चालला आहे. या वाढत्या आकड्यामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. ऑक्सिजन, रेमेडीसीव्हीर नंतर आता टॉसिलीझुमॅब इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांतला त्याचा स्टॉक संपला आहे.

कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या टॉसिलीझुमॅबला अ‍ॅट्लिझुमॅब देखील म्हटलं जात. जे प्रतिरक्षाविरोधी हे इंजेक्शन आहे.

मुख्यत: संधिवात (आरए) आणि लहान मुलांमधील संधिवाताशी संबंधित एका गंभीर स्वरूपाच्या आजारात उपचारासाठी होतो. मात्र सध्या याचा वापर कोरोना रूग्णांवर उपचारासाठी केला जातोय. संक्रमणाने गंभीर पिडीत रुग्णांसाठी हे इंजेक्शन प्रभावी असू शकते. REMAP-CAP चाचणीने मंजूर केलेल्या यादीमध्ये जोडले जाण्यासाठी पुरेसे पुरावे प्रदान केले आहेत. ओसाका युनिव्हर्सिटी आणि चुगाई यांनी संयुक्तपणे हे इंजेक्शन विकसित केले होते आणि 2003 मध्ये याचा परवाना मिळाला होता.

‘ बोल भिडू’ च्या टीमशी बोलताना डॉ. अजित गायकवाड (MD) यांनी या टॉसिलीझुमॅबला रेमेडीसीव्हीरची पुढची स्टेप म्हंटले आहे.

ते म्हणाले की,

रेमेडीसीव्हीर हे बहूतेक वेळी कमी जोखमीच्या रूग्णांना दिले जाते. तर या इंजेक्शनचा वापर लक्षणे पाहून कमी जोखमीच्या रूग्णांप्रमाणे गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी देखील केला जातो.

या इंजेक्शनच्या उपलब्धते विषयी विचारले असता डॉ. अजित म्हणाले की, भारतात तर सध्या हे सगळीकडे शॉर्टेजचं दाखवत आहे. कारण सरकार सध्या ते इंस्टीट्यूट लेवलाच उपलब्ध करत आहे. म्हणजे मुख्यतः सरकारी संस्थांमध्येच परंतु मोठमोठ्या इंस्टीट्यूटचा देखील यात समावेश आहे. जसं पुण्याचा विचार केला तर जहांगीर, रूबीसारखी. परंतु तिथेही त्याची उपलब्धता सध्या नाहीये. कारण रुग्णांची वाढती संख्या पाहता त्याचा साठा कमीच आहे.

या टॉसिलीझुमॅबला इंजेक्शनच्या किंमतीबद्दल विचारले असता डॉ. अजित गायकवाड यांनी सांगितले की, त्याची किंमत सध्या 38,000- 40,000 दरम्यान आहे. आधी हे मोठमोठ्या मेडीकलमध्येही उपलब्ध होत होतं. मात्र, रूग्णांच्या वाढत्या आकड्यामुळे त्याचा स्टोक आता जवळपास संपला आहे.

टॉसिलीझुमॅबला इंजेक्शनचे उत्पादन जगात फक्त स्वित्झर्लंडमधील रॉश कंपनीच करते. तर भारतात
सिपला ही एकमेव औषध निर्माण कंपनी त्याचे मार्केटिंग करते. मात्र, मध्यंतरी कंपनीने त्याचे उत्पादन थांबवले होते. आणि उत्पादन होत नसल्याने त्याची अवस्थाही रेमेडीसीव्हीर सारखीच झाली आहे.

या इंजेक्शनची एक्सपायरी 3 महिन्यांची असते. त्यामुळे मेडिकलमध्ये किंवा रूग्णालयात त्याचा स्टॉक लिमिटेड असतो.

दरम्यान, 4 एप्रिलनंतर 28 एप्रिलला या इंजेक्शनची दूसरी खेप आली आहे. जवळपास 3 आठवडे याची भारतात प्रतिक्षा होती. सिपलाने त्याचे 3 हजार 245 डोस आयात केले आहे. केंद्र सरकारने याविषयी माहिती दिली.

माहितीनुसार, या नवीन खेपेचे राज्यवार वाटप केले जाईल. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला याचे सर्वाधिक 800 डोस मिळणार आहेत. तर दिल्लीला 500, गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू आणि पंजाबला प्रत्येकी 200 दिले जातील. तसेच केंद्राअंतर्गत असलेल्या संस्थांना देखील टॉसिलीझुमॅबचे 200 डोस मिळणार आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.