आज भारताच्या पोरी वर्ल्डकप खेळतायत, पण त्यामागे एका मराठी महिलेची दूरदृष्टी आहे…

काय भिडू लोक, रविवारची भारत-पाकिस्तान मॅच पाहताय का? बघत असणारच शंभर टक्के. आता निकाल काहीही लागला, तरी आपण भारत-पाकिस्तान मॅच बघणं काय सोडत नाही. त्यात वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान भिडणार म्हणल्यावर गंभीरच विषय असतो.

आता काही भिडू असतील, ज्यांना आज भारत-पाकिस्तान मॅच होती, हेच माहीत नसेल. तर भावांनो आणि बहिणींनो सध्या वुमन्स वर्ल्डकप सुरुये. स्मृती मानधना, मिताली राज, हरमनप्रीत कौर, झुलन गोस्वामी अशी अनेक नावं तुम्हाला माहीत असतील, या मुली आज आंतरराष्ट्रीय स्टेजवर भारताचं नाव मोठं करतायत. पण या मागं एका मराठी महिलेचे कष्ट आणि दूरदृष्टी आहे. त्या म्हणजे कराडच्या माजी खासदार प्रेमलाकाकी चव्हाण.

प्रेमलाकाकी चव्हाण यांची ओळख जर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री, केंद्रीय मंत्री आनंदराव उर्फ दाजीकाका चव्हाण यांच्या पत्नी अशी सांगितली तर तो त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. महाराष्ट्र काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष, केंद्राच्या राजकारणात स्वबळावर दबदबा निर्माण करणाऱ्या त्या एक समर्थ राजनेत्या होत्या.

प्रेमलाकाकी मूळच्या बडोद्याच्या. त्यांचं घराणं सरदार मराठ्यांचं. वडील मालोजीराजे जगदाळे हे इंदौरच्या होळकरांच्या दरबारातले मानकरी होते. त्याकाळात त्यांच्या वडिलांनी इतरांचा विरोध डावलून प्रेमलाकाकींना शिकू दिलं.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सांगतात, “आईला डॉक्टर व्हायचं होतं. इंटरपर्यंत शिक्षण झालं. मात्र पुढं शिकवण्यासाठी आजोबांनी नकार दिला. आईला शिक्षणाची ओढ होती, वाचनाची, लेखनाची आवड होती. तिच्यात प्रचंड आत्मविश्वास होता. ‘इंदौर विमेन्स कोअर’ अशा एका एनसीसीच्या धर्तीवरच्या युनिटची स्थापनाही आईनं केली होती.’’

प्रेमलाकाकींच्या धडाडी वृत्तीचं उदाहरण म्हणजे लग्न ठरवताना त्यांनी थेट एक अट घातली होती. मुलगा श्रीमंत नसला तरी चालेल, पण उत्तम शिकलेला असला पाहिजे. त्यावेळच्या मराठा समाजात शिकलेली मुलं कमीच होती. त्यामुळं आनंदराव चव्हाण यांचं स्थळ प्रेमलाकाकींच्या वडिलांना आवडलं.

सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या कुंभारगावचे आनंदराव चव्हाण मुंबईत LLM करत होते. त्यावेळी मुंबई विद्यापीठातून ते एकटेच उत्तीर्ण झाले होते. अशा कर्तबगार मुलाशी प्रेमलाकाकींनी लग्न केलं. शिक्षणाकडे त्यांचा प्रचंड ओढा होता. म्हणूनच लग्नानंतर दोन मुलांना घेऊन त्यांनी मुंबई गाठली आणि दादरमध्ये येऊन माँटेसरी डिप्लोमाचं प्रशिक्षण पूर्ण केलं. पुन्हा कराडमध्ये येऊन त्यांनी माँटेसरीची पहिली शाळा सुरू करण्याचं धाडसही दाखवलं. पुढं त्यांनी शिक्षणाविषयीच्या प्रेमामुळे उभारलेल्या अनेक शिक्षणसंस्थांचा समाजाला फायदा झाला आणि होतोय.

लग्नापूर्वीच आनंदरावांचा राजकारणाशी संबंध आला होता. सातारा जिल्हा स्थानिक महामंडळाच्या निवडणूकीत ते पराभूत झाले, मात्र त्यांच्या प्रत्येक कामात प्रेमलाकाकी पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लाटेत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून आनंदराव चव्हाण लोकसभेवर निवडून गेले.

त्यांच्या प्रचारात काकींचा फार मोठा रोल होता. पडदा पद्धत असतानाही त्यांनी गावोगावी जाऊन सभा घेतल्या, त्यांच्याशिवाय महिलांपर्यंत पोहोचणं एरवी शक्य झालं नसतं. सातारा-सांगली भागातून राजकारणात पुढे येणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. रात्री १२-१ वाजता येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही भाकऱ्या थापून जेऊ घालणाऱ्या प्रेमलाकाकी उत्तम संघटक आणि कुशल नेतृत्वशालिनी होत्या.

आनंदराव चव्हाण यांनी नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात महत्वाचं मंत्रिपद भूषवलं. त्यांच्या दिल्लीच्या कार्यकाळात प्रेमलाकाकींची इंदिरा गांधींशी चांगली ओळख झाली. इंदिरा गांधींनी प्रेमलाकाकींमधली राजकीय क्षमता ओळखली होती. त्यामुळंच १९७३ साली आनंदरावांच्या निधनानंतर प्रेमलाकाकींना काँग्रेसचं तिकीट देण्यात आलं. यशवंतराव चव्हाणांनी ही लोकसभा निवडणूक बिनविरोध घडवून आणली. संसदेत गेल्यावर प्रेमलाकाकींनी अभ्यासपूर्ण प्रश्न मांडणाऱ्या खासदार म्हणून आपली चांगलीच छाप पाडली.

प्रेमलाकाकी आणि क्रिकेट प्रेम
त्यांचा आणि क्रिकेटचा संबंध तसा लहानपणापासूनचा. इंदौर संस्थानच्या होळकर महाराजांनी बनवलेली क्रिकेटची टीम देशभरात नाव गाजवत असलेलं पाहातच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या. त्यांना वाटायचं फक्त भारतीय पुरुषांनीच नाही, तर भारतीय महिलांनीही क्रिकेटमध्ये नाव कमवावं. पण भारतात महिलांचं वेगळं क्रिकेट असोसिएशनच नव्हतं. त्यांनी हा प्रश्न इंदिरा गांधींपर्यंत पोहचवला. प्रेमलाकाकींनी इंदिराजींना पटवून दिलं, की ज्या देशाच्या पंतप्रधान एक महिला आहेत, त्या देशातल्या महिलांची क्रिकेट टीम नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. साहजिकच इंदिरा गांधींनी हिरवा झेंडा दाखवला.

त्यांच्या पाठिंब्यामुळं १९७३ मध्ये प्रेमलाकाकी चव्हाण यांनी पुण्यात भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली. हळूहळू प्रत्येक राज्यात जाऊन मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. भारताची टीम बनवली. जेव्हा या मुली कोणत्याही दौऱ्यासाठी जायच्या तेव्हा प्रेमलाकाकी आणि महिला क्रिकेट असोसिएशनचे सदस्य स्वतःच्या खिशातले पैसे टाकून त्यांचं तिकीट काढायचे.

त्यांच्याच प्रयत्नामुळं १९७६ साली पहिल्यांदा वेस्ट इंडिजची महिला क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर आली. मद्रासच्या शांता रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला टीमनं पहिली आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅच खेळली. पुढच्या दोनच वर्षात १९७८ साली पटनामध्ये त्यांनी देशाला पहिला कसोटी विजयही मिळवून दिला.

जेव्हा देशातल्या जुन्या पिढ्या स्त्रियांना चूल आणि मूलच्या पुढं जाऊ देण्यात कचरत होत्या, त्याचवेळी पुरुषी समजल्या जाणाऱ्या खेळात भारतीय महिला स्वतःचं नाव जगाच्या पातळीवर उज्वल करू लागल्या, अनेक विक्रम प्रस्थापित करू लागल्या आणि आज वर्ल्डकप जिंकण्याच्या शर्यतीत पुन्हा एकदा नव्या ताकदीनं उतरल्यात, याचं श्रेय जातं प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या धडाडीला, दूरदृष्टीला आणि अथक प्रयत्नांना.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.