आज कोणता मुहूर्त होता, पंचांग काय सांगत ऐका..! 

आज अनेकांनी फॉर्म भरले. पहिल्यांदा तुम्हाला नाव सांगणार होतो पण लिस्ट काढताना चार वेळा दम लागला. टक्केवारीत मोजायच झालं तर आज ५० टक्यापेक्षा जास्त उमेदवारांनी फॉर्म भरून टाकले. पितृपक्ष असल्यामुळे कोणीच फॉर्म भरायला उत्सुक नव्हतं. त्यानंतर जागावाटप आलं. सेना भाजप कडे किती जागा चर्चा सुरू झाल्या. आपल्याला AB फॉर्म मिळणार का नाही इथून धाकधुक वाढली. 

सगळे सोपस्कार पुर्ण होवू लागले आणि तारीख आली ३. वार गुरवार..

एकामागून एक सगळ्यांनी आज फॉर्म भरले. निवडणुक अधिकाऱ्यांना दम लागला तरी उमेदवार काय मागे हटणात. सगळे एकाच दिवशी रांगा लावू लागले. कसय विचित्र घडायला लागलं की सर्वात पहिला बोलभिडू कार्यकर्त्यांच्या फ्यूजा उडू लागतात. झालं, कायतरी असणाराय म्हणून शोधाशोध सुरू झाली. बाजारातनं पंचाग आणलं. लॉग टेबल नंतर बघितलेली सर्वात अवघड गोष्ट म्हणजे पंचांग होतं. यातलं आपल्याला काहीही कळणार नाही म्हणून आम्ही ते बंद केलं. 

आत्ता घरचा ज्योतिषी म्हणून घरी फोन लावला. घरातल्यांनी घरच्या ज्योतिष्याचा फोन नंबर दिला. त्याला विचारलं आज काय आहे तर तो म्हणाला चांगला दिवस आहे. काम करण्यास उत्तम. लग्न करताय का? मलाच सांगा. ओके गुरूजी म्हणून आम्ही फोन ठेवून दिला. 

चांगला दिवस म्हणून भागणारं नव्हतं. कडक माहितीसाठी पुजारीपण कसा कडक पाहीजे. मग डिपमधल्या माणसांना फोनाफोनी चालू केली. एकदम डिटेलमध्ये सांगणाऱ्या पुजाऱ्यांचा नंबर मिळाला. त्यांना फोन केला. 

म्हणलं, आजचा दिवस कसा आहे. विस्कटून सांगल का? आज सगळे फॉर्म भरायलेत काय कळणा. 

मग त्यांनी मम म्हणून चालू केलं, 

सोमवार, बुधवार आणि गुरुवार हे तीन वार कोणतही शुभ काम करण्यासाठी उत्तम असतात. त्यामुळे वार म्हणता आजचा दिवस उत्तम आहे. 

आज चंद्र राशीत मंगळ आहे. किंवा चंद्राच्या राशीत मंगळ आहे. किंवा वृश्चिक राशीत मंगळ आहे. कशातरी कायतरी आहे पण मंगळाचा प्रभाव आहे इतकं नक्की. 

मंगळ हा सत्तेच प्रतिक आहे. मंगळाचा प्रभाव असल्याने आज सत्ताप्राप्ती, हुकूमत अशा गोष्टीकडे ओढा असणाऱ्यांसाठी देखील वेळ चांगली ठरते. 

आज 10.51 ते 12.21 मध्ये चर योग आहे. 12.21 ते 1.50  लाभ योग आहे आणि 1.50 ते 3.19 अमृत योग आहे.

या योगाचं काय असत तर असे योग लाभ देतात म्हणे. दूपारी 1.50 नंतर 3.19 पर्यन्त राहू काळ असल्याने योग चांगला असला तरी उपयोग नाही अस भविष्यकर्त्यांनी सांगितलं. त्याच सोबत अनुराधा नक्षत्र असल्याचं त्यांनी सांगितलं. या नक्षत्राचा काय फरक पडतो तर एखादी शस्रक्रिया करण्यासाठी देखील आजचा दिवस चांगला असल्याचं सांगणात आलं. पुढं सांगितल की राजकारण म्हणजे पण एखादं ऑपरेशन असल्यासारखंच असतं त्यामुळे इथे तर या नक्षत्राचा फायदाच होतो. 

याहून अधिक विचारल्यानंतर त्यांनी अजून डिटेल सांगितलं आणि नेहमीप्रमाणे ते आमच्या डोक्यावरून गेलं. असो ज्या ज्या लोकांनी आज फॉर्म भरले त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. ज्यांना यातलं कळतं त्यांनी कमेंटमध्ये अजून भर घाला आनंद वाटेल. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.