सत्या पलीकडे? आजच्या संदर्भात गांधी….

‘हिंद स्वराज’मध्ये महात्मा गांधींनी सर्वात प्रथम वर्तमानपत्रांच्या भूमिकेवर चर्चा केली आहे. १९०९ मध्ये लिहिल्या गेलेल्या या ‘मैनिफेस्टो’ मध्ये एक काल्पनिक संपादक आणि वाचकाचा संवाद आहे.

ज्यात संपादक आपल्या दुसऱ्याच वाक्यात म्हणतो की,

“वर्तमानपत्राचे पहिले काम हे आहे की, लोकांच्या भावना समजून घेणे आणि त्यांना जाहीर करणे;  दुसरे काम हे आहे की लोकांमध्ये आवश्यक भावना निर्माण करणे; आणि तिसरे काम आहे लोकांमध्ये दोष असतील तर मग कितीही संकटे आली तरी बेधडकपणे ते दाखवणे.”

या तीनही जबाबदाऱ्यांमध्ये आपल्याला सत्याग्रहाचे वेग-वेगळे पैलू दिसून येतात. सत्यापर्यंत पोहचण्यासाठी निरंतर प्रयत्न करणे, लोकांना सत्याच्या शोधाकडे वळवणे आणि तमाम अडचणींना पार करून त्यांना सत्याचा परिचय करून देणे. 

आज माध्यम समूहांची खूप गर्दी आहे. प्रश्न आता फक्त वर्तमानपत्रापुरता मर्यादित राहिला नाही. परंतु वेगळे सांगायची गरज नाही की पैसा आणि सर्व संसाधन-सामग्री असून देखील मिडिया वरीलपैकी कोणत्याही कर्तव्याचे पालन करत नाही. आपण सत्यापासून दूर होत चाललो आहोत. किंबहुना आपण सत्याच्या पुढे निघून गेलो आहोत. ज्याला पाश्चिमात्य मिडियाने ‘पोस्ट ट्रुथ’ (उत्तर सत्य) असे नाव दिले आहे.

२०१६ मधील सर्वात प्रचलित शब्द म्हणून ऑक्सफोर्ड डिक्शनरीने ‘पोस्ट ट्रुथ’ ची नोंद केली आहे.  गांधींच्या डिक्शनमध्ये ‘सत्य’ हा सर्वात आवश्यक शब्द राहिला आहे. पंरतु सत्याचे कोणतेही एक रूप आपल्या जवळ उपलब्ध नाही तर अशावेळी काय केले पाहिजे?

आज बंद खोल्यात बसून बातम्यांची निर्मिती केली जात आहे. आपल्याकडे इतकी आकडेवारी आणि माहिती उपलब्ध आहे की यांना तोडून-मोडून कोणत्याही गोष्टीची सत्य रुपात पुष्टि केली जाऊ शकते. बातम्यांची विश्वसनीयता तपासल्या विनाच त्यांचा प्रचार-प्रसार केला जातो आहे. ज्याला जे पहायचे आहे, जाणून घ्यायचे आहे ते त्याच्या पर्यंत सहजपणे पोहचत आहे, आणि यामुळे आपले पूर्वग्रह अधिकच दृढ होत चालले आहे.

आपल्या लोकशाहीत ‘वाद-प्रतिवादाची जागा संपत चालली आहे. आज प्रत्येकाजवळ आपले-आपले सत्य आहे ज्यासाठी लोक जीव देण्यापत तुललले आहेत. 

अशा परिस्थितीमध्ये, मला वाटते की, आपल्याला पत्रकारितेची मुलभूत समज गांधींकडून मिळू शकते. खरतर गांधी पत्रकारितेचा उद्देश्य सेवा मानत होते. ‘सत्याचे प्रयोग’मध्ये त्यांनी आपल्या वर्तमानपत्राबाबत लिहिले आहे, ‘इंडियन ओपिनियनच्या पहिल्या महिन्याच्या कामकाजातून मी समजून गेलो होतो की वर्तमानपत्र हे सेवा भावनेनेच चालवले पाहिजे. 

वर्तमानपत्र एक जबरदस्त शक्ती आहे, परंतु ज्याप्रमाणे अनियंत्रित पाण्याचा प्रवाह गावाची-गाव बुडवून टाकतो आणि पिकाला नष्ट करतो, अगदी त्याचप्रमाणे कोणताही अनियंत्रित प्रवाह नाश करतो.’ ‘हिंद स्वराज’मध्ये त्यांनी इंग्लंडच्या वर्तमानपत्रांना ‘अप्रामाणिक’ आणि ‘एका गोष्टीला दोन चेहरे देणारी संस्था’ म्हटले होते. ‘इंडियन ओपिनियन’च्या ४ सप्टेंबरच्या संपादकीय मध्ये  त्यांनी  आपल्या वर्तमानपत्रात जाहिरात न घेण्याची घोषणा केली होती.

त्यांनी लिहिले होते की जाहिरात घेणे हे त्या लोकांचे तंत्र आहे ज्यांना श्रीमंत होण्याची घाई-गडबड आहे आणि जो आपल्या विरोधकाला बळजबरीने हरवू इच्छित आहे. त्यांनी जाहिरातींना आधुनिक सभ्यतेची सर्वात मोठी दुखद प्रवृत्ती मानले.

गांधींनी आपल्या जीवनकाळात चार वर्तमानपत्रं काढली होती, ज्यांसाठी त्यांनी कधीच जाहिरात घेतली नाही. 

गांधी जी एक आगळ-वेगळ व्यक्तिमत्व होते. दक्षिण-आफ्रिकेत असतानाचा त्यांच्या पुस्तकं छापणे सुरु झाले होते. कविगुरू रवीन्द्रनाथ टागोरांनी १९१५ मध्येच त्यांना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली होती. जगभरातील प्रेस त्यांच्या मागे असायची आणि ते निडरपणे आपल्या मार्गावर चालायचे. 

चमचमत्या कॅमेऱ्यांच्या मध्ये इंग्लंडच्या राणीला भेटायला बकिंघम पैलेसमध्ये काठी घेऊन घुसणाऱ्या व्यक्तीला जाहिराती शिवाय वर्तमानपत्र चालवणे कदाचित शक्य झाले असेल. पण आज आपण ज्या किंमतीत पेपर्स विकत घेतो, तितक्या पैश्यात त्या पेपर्सच्या कागदाचा खर्च तरी निघतो का? काही पत्रिका आहेत ज्या सदस्य प्रणालीवर चालत आहे.

प्रामाणिक व तथ्यपूर्ण रिपोर्टिंग करत आहे. उदाहरणार्थ इकोनोमिक एंड पोलिटिकल वीकली’, ‘कैरवान’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’ वगैरे.

परंतु या पत्रिका केवळ समाजाच्या एकासामान्य विशिष्ट वर्गापुरत्या मर्यादित ठरल्या नाही का? काय या पत्रिका लोकांपर्यंत पोहचत आहेत का? केवळ सदस्यांच्या पाठबळावर चालणाऱ्या साहित्यिक पत्रिकांचे हाल आपण पूर्वीच पाहिलेले आहेत.

फेक न्यूज आणि मिथ्य-प्रचार काही नवीन घटना नाही.

सरकारं या गोष्टींचा वापर लोकांची संमती तयार करण्यासाठी करत आलेली आहेत. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान ब्रिटीश मिडियाने जर्मनीच्या कृत्यांना बढून-चढवून दाखविले होते आणि आठवड्याभरात त्यांची युद्ध विरोधी जनता युद्धाकरिता उतावीळ झाली होती. स्वत: गांधी खोट्या प्रचाराचे शिकार झाले होते. 

१९४६ ला ते नोआखालीला होते जेव्हा बिहारमध्ये दंगे पेटले होते. अफवाह पसरली होती की पन्नास हजार पेक्षा अधिक मुस्लीम लोक मारले गेले. ज्याची पुष्टि वर्तमानपत्रांनी केली होती. परंतु वास्तविक पाहता मृतकांची संख्या दहा हजार पेक्षा कमी होती.

बातमीची न  सत्यता पडताळताच हिंसेचा डोंब पसरतच गेला. 

एका वर्षानंतर, २७ नोहेंबरला गांधींनी प्रार्थना सभेत पाकिस्तानी पेपर ‘डॉन’चा संदर्भ देत काठियावाडच्या हिंसेबद्दल सरदार पटेल व सामलदास गांधीची निंदा केली. त्यावेळी ते बढून-चढवून प्रसारित केलेल्या बातम्यांमुळे प्रभावित झाले होते. सरदार पटेलांनी तीन दिवसानंतर गांधीजींशी झालेल्या चर्चेत इथपर्यंत सांगितले की त्यांच्यापर्यंत आलेल्या बातम्यात खूप काही गोष्टी बनवलेल्या असतात, या बातम्या प्रसारित नाही व्हायला पाहिजे. 

जर गांधी खोट्या बातम्याच्या चक्रात अडकू शकतात तर तुमची-आमची काय गोष्ट आहे. 

अशा वेळी आपल्याकडे कोणता मार्ग उरतो? याचे उत्तर देखील आपल्याला गांधीकडून मिळते. इतिहासकार सुधीर चंद्र यांनी ‘गांधी एक असंभव संभावना’ (राजकमल प्रकाशन २०१६) मध्ये या प्रसंगाचा उल्लेख करत मान्य केले आहे की, ‘गांधींनी या प्रकरणाची खबरदारी घ्यायला पाहिजे होती.’ मात्र एका गांधीवादीची विचारधारा या पुस्तकात साफ-साफ दिसून येते.

‘प्रश्न हा चूक किंवा बरोबर  असण्याचा नाही, तर तो त्याच्या अस्तित्वाच्या नैसर्गिक आत्म-जागृतीचा आहे. एकदा आम्हाला अशा प्रकारच्या प्रतिक्रियेच्या स्वाभाविकतेची जाणीव झाल्यास हे शक्य आहे की इतर तत्सम संदर्भांच्या पार्श्वभूमीवर आपल्यावर ज्या प्रतिक्रिया आहेत त्याबद्दल आपण आत्म-जागरूक होऊ शकतो.

उदाहरणार्थ, शक्य आहे की पाकिस्तानातल्या त्या दिवसांत झालेल्या हिंसाचाराच्या भारतीय वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्या वाचताना आपण स्वतःला हे विचारलं पाहिजे की त्या अहवालांची पुष्टी किती झाली. एकदा मनामध्ये अशी समस्या उद्भवली की मग आपण ‘आपले’ आणि ‘एलियन’ दरम्यान समान गोष्ट पाहिल्यावर आपले डोळे कसे बदलतात हे आपल्याला त्रासदायक ठरेल आणि आपल्याला ते लक्षातही येत नाही.’

आत्म-जागरूकता आणि भेदभाव नष्ट करण्यासाठी गांधींजी या दोन्हीही गोष्टी स्वत:वर लागू करत होते. याच कारणामुळे ते स्वत:ला पण वेळोवेळी खंडित करताना दिसतात. सत्य गांधींकरिता काही स्थायी गोष्ट नव्हती.

रेल्वे रोगराई आणि अपराध वाढविण्याचे काम करते म्हणून त्यांनी  ‘हिंद स्वराज’मध्ये रेल्वेला विरोध केला होता.

पण जवळ-जवळ ४ दशकानंतर ५ ऑक्टोबर १९४६ ला जवाहरलाल नेहरूंना लिहिलेल्या पत्रात हिंद स्वराजाचा दाखला देत स्वंतत्र भारताच्या खेड्यापर्यंत रेल्वे पोहचण्याची चर्चा केली आहे. शेवटच्या काळात होणारी धार्मिक  हिंसा पाहून त्यांना असा विश्वासही होता की त्यांच्यासोबत चालणाऱ्या सत्याग्रह्यांची अहिंसा ही दुर्बलांची अहिंसा होती, अर्थात ‘निष्क्रीय प्रतिकार’ होता. अहिंसेसाठी धैर्य आणि आत्म-शक्तीची आवश्यकता असते.

स्वातंत्र्याच्या एक महिन्यापूर्वी प्रार्थना सभेत संबोधित करताना ते म्हणाले होते की, ‘आम्ही असहायतेपासून अहिंसक होतो, परंतु आपल्या अंत: करणात हिंसाचार होता. आता इंग्रज इथून निघून गेले आहेत म्हणून आम्ही आपल्यातच लढून ती हिंसा खर्च करत आहे.’ गांधींजी या संशयाने घेरले होते की कोणीही त्यांच्या सत्याग्रहाचा अर्थ समजलाच नाही. फक्त त्याचा वापर केला गेला आहे. 

जर ‘फेक न्यूज’ आपल्याला निराश करते, तर विचार करा की गांधीजींनी त्यांचे जगलेले वास्तव खोटे असल्याचे पाहिले ही किती वाईट घटना घडली असेल! 

गांधींचे सत्ये हे स्वत:ला ओळखण्याचे सत्य आहे. या संदर्भात, मी माझा एक अनुभव सामायिक करू इच्छित आहे. मागच्या वर्षी आय आय टी खड्गपूर येथील माझ्या एका मित्राने सांगितले की त्यांच्या कँटीनमध्ये काही दिवस ज्यूस मिळत नव्हते. माहिती मिळाली की शहरात दंगे झाले होते आणि फळांचा पुरवठा बंद होता. कारण फळांचा सप्लायर मुसलमान होता. भाजीपाल्याचा सप्लायर हिंदू होता आणि म्हणून सँडविच उपलब्ध होते.

दंगलीचा तपास केल्यानंतर असे कळले की व्हाट्सअपवर एक बातमी पसरली होती की मुस्लीम मुलीला घरी सोडण्यासाठी गेलेल्या एका हिंदू मुलाचा मोहल्ल्यातील लोकांनी खून केला. या घटनेचा पोलीस किंवा मीडियाकडे कोणताही  तपशील अथवा प्रमाण नव्हते. पण एका रात्रीत ही अफवा काही भयानक फोटोंसहित सर्वत्र शहरात पसरली गेली. दुसऱ्या दिवशी हिंदूंनी मुसलमानांची दुकान लुटली व काही दुकानं जाळली. तिसऱ्या दिवशी मुसलमानांनी हिंदूंची दुकानं लुटली. नंतर शहरात कर्फ्यू लागला आणि तेव्हापासून कॅन्टीनमधील फळांचा सप्लाय बंद झाला. या घटनेसाठी तर मिडियाही जबाबदार नव्हती, परंतु हिंसा पसरवली गेली. 

बातमी खरी जरी असती तरी काय असा हिंसाचार योग्य होता?

गांधींचे सत्याचे शोध आपल्याला मिडिया आणि व्हाट्सएपला ओळखण्यापुरता मर्यादित ठेवत नाही, तर ते आपल्याला स्वत:मध्ये पाहण्याचा आग्रह धरतात. समोरचा व्यक्ती चूक असला तरी मी त्याला कसे जिंकू शकतो? असा प्रश्न निर्माण करतात. बिहार आणि काठियावाडमधील घटनांच्या बातम्या चुकीच्या असल्या तरी गांधींनी त्यांच्या निषेधाबद्दल दिलेला प्रतिसाद खरा होता. 

गांधींचे सत्य हे सखोल मानवी चेतनेचे सत्य आहे. अरुंधती रॉय यांनी ‘‘एक था डॉक्टर एक था संत” (राजकमल प्रकाशन, २०१९) या लेखात त्यांना राजा राममोहन राय, दयानंद सरस्वती और विवेकानंद यांच्या परंपरेशी जोडून पाहिले. असे करतांना त्यांनी गांधींचे व्यक्तिमत्व कमी करून पाहिले.

राजा राममोहन राय, दयानंद सरस्वती आणि विवेकानंद हे राजभक्त होते, किंवा किमान राजाच्या विरोधात ते गेले नव्हते. गांधींचा उद्देश केवळ धार्मिक सुधारणा पर्यंत मर्यादित नव्हता. ते प्रजा आणि राजा, सर्वांमधील मानवाला एकत्रित आवाहन करत होते. गांधींच्या सत्याग्रहाने ब्रिटीश ज्या दांभिक सांस्कृतिक श्रेष्ठत्वाच्या जोरावर राज्य करत होते त्याला अगदी पलटून टाकले. त्यांनी ब्रिटिशांना त्यांच्या क्रूरतेचा आरसा दाखवला.

माझ्या मते, ते बुद्ध आणि येशुंचे उत्तराधिकारी आहे. आणि तसेच त्यांच्या सर्व अंतर्विरोधा व्यतिरिक्त ते आपल्या सभ्यतेतील युगपुरुष आहे. आज जगभर सत्याग्रह आणि शांतीपूर्ण आंदोलन-प्रदर्शन विरोध व्यक्त करण्याची प्रभावी पद्धती आहे, आणि हा काही अपघात नाही. 

गांधींचा युटोपिया म्हणजे ‘रामराज्य’ होय.

त्यांच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या अर्थाचा अनर्थ केला गेला आहे. जेव्हा व्यक्तीचे व्यक्तिमत्व मिथक केले जाते तेव्हा असे होते. गांधींचा राम आणि हिंदुत्वचा राम यामध्ये तितकाच फरक आहे जितका ‘हे राम’च्या नामस्मरणात आणि ‘जय श्रीराम’च्या धमकीमध्ये आहे. रामची जी प्रतिमा हिंदुत्ववादी आपल्या समोर मांडतात त्यात राम क्रोधित आहे. त्यांचे केसं मोकळे आहेत आणि धन्युष्य घेऊन ते लढण्यासाठी उभे आहेत.

ते हे विसरून गेले आहेत की संपूर्ण रामायणात राम कधी कोणाही व्यक्तीवर क्रोधित  झाले नाहीत. माझ्या शहरात, बेंगळूरूमध्ये टॅक्सींच्या मागील काचावर चिडलेल्या हनुमानाचा भगव्या रंगात फोटो लावण्याचा ट्रेंड चालू आहे.  हा कोणता  हनुमान आहे, मला नाही माहित. अशाच प्रकारे गांधींच्या ‘स्वदेशी’चा अर्थ गावांचा मुलभूत विकास बदलून भारतीय करोडपती लोकांचे ब्रांड विकत घेणे इतकाच राहिला आहे. 

आपल्या काळातील एक बाबा स्पष्टपणे जाहिरातींद्वारे असा प्रचार करत आहे. गांधींसाठी  चरखा चालवणे हे एक पोलिटिकल स्टेटमेंट होते. आजच्या नेत्यांना फोटो-ऑपच्या पलीकडे काही नाही.  आयुष्यभर ब्रह्मचर्यातून ऊर्जा घेणारे गांधी आज युवक-युवतींना ‘नॉन-व्हेज’ जोक्समध्ये सापडतात. किमान आमच्या पिढीमध्ये तरी असेच आहेत.

हे जॉर्ज ऑरवेलच्या १९८४ या कादंबरीतील ‘डबलस्पीक’ सारखं आहे.  जिथे शब्दांच्या अर्थांचे अनर्थ केले गेले आहे. या संदर्भात मला केदारनाथ सिंह यांच्या  ‘बुद्ध की मुस्कान’ (ताल्सताय और साइकिल) या कवितेची आठवण येत आहे-

 ‘मेरी समस्या यह है
कि वह कौन-सा नियम है भाषा का
जिससे पोखरण में होने वाला बम-विस्फोट
चुपके से बन गया था बुद्ध की मुस्कान।’

उद्या जर गांधींच्या सत्याचा अर्थ खोटे आणि  फसवणूक झाला तर काय आपल्याला आश्चर्य वाटेल! 

समारोप करण्यापूर्वी, मी  ‘हिंद स्वराज’ उद्धृत करू इच्छितो. गांधींनी कॉंग्रेसचे संस्थापक ह्यूम यांचा संदर्भ देत सांगितले होते की, ‘हिन्दुस्तानमध्ये असंतोष पसरविण्याची गरज आहे. असंतोष खूप उपयोगी बाब आहे. जोपर्यंत माणूस आपल्या सद्यस्थितीत आनंदी आहे तोपर्यंत त्याला त्यातून बाहेर पडायला पटवणे कठीण आहे.

त्यामुळे प्रत्येक सुधारनेपुर्वी असंतोष असला पाहिजे.’ आपण गांधींनी शिकवलेल्या त्याग व साधेपणापासून खूप पुढे आलो आहोत. आज आपण उपभोक्तावाद आणि व्यक्तिवादाच्या युगात जगत आहोत. जी याच असंतोषातून निर्माण झाली आहे, आणि पुढेही वाढत आहे. हे स्पष्टच आहे की आपली वृत्तपत्रे देखील त्यांच्या पहिल्या पानावर कपडे, कार, घरे आणि नेत्यांच्या जाहिरातींना स्थान देत आहेत.

हा असंतोष दूर करण्यासाठी सरकारं लोकांचे मूलभूत उत्कर्ष टाळत राहतात आणि त्यांना मोफत वस्तूंचे वितरण करतात. परंतु यामुळे असंतोष कमी होणार नाही. तो काळानुसार वाढेल आणि आज नाही उद्या तर आपल्याला स्वतः मध्ये आणि आपल्या समाजात पाहायला भाग पाडेल. या ऐतिहासिक आवश्यकतेचा सामना समाजातील प्रत्येक पिढीला करावा लागेल.

ही  माध्यमे व सरकारच्या आवाक्या बाहेरची गोष्ट आहे. सत्ता, जनता, आणि माध्यमे या सर्वांना आपल्या अंतर्मनात  डोकावून पाहावे लागेल. तेव्हाच गांधी आणि त्यांचे विचार आपणांस अधिक उपयोगी पडतील.

  • लेखक : सौरभ राय
  • मराठी अनुवाद : सतीश गोरे
सौरभ राय हे बेंगळूरु स्थित कवी, अनुवादक व स्वतंत्र लेखक आहेत. त्याच बरोबर ते ‘बेंगळूरु रिव्यू’ या ऑनलाईन पत्रिकेचे संपादक आहेत. सतीश गोरे हे महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव आहेत.   

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.