शब्दांचा जादूगार असणाऱ्या टोनी ग्रेगला आपल्याच शब्दांमुळे गुडघ्यावर बसावं लागलं होतं
“Sachin Tendulkar, Whattaa Playa” हे शब्द कानावर पडले की आपल्याला शारजावर झालेली ऐतिहासिक डेझर्ट स्टॉर्मवाली मॅच आठवते. धुळीचं वादळ आणि ऑस्ट्रेलियन बॉलिंगला फाट्यावर मारत सचिन तेंडुलकरनं धुव्वा केला होता. चाहत्यांचा लाडका तेंडल्या, वॉर्नला पुढं येऊन छकडा हाणायचा आणि आपल्या मनाला शांती मिळायची. पण सचिनच्या इनिंगला कुणी साज चढवला असेल, तर टोनी ग्रेगच्या आवाजानं. साऊथ आफ्रिकेत जन्मलेला पण इंग्लंडकडून खेळणारा टोनी ग्रेग त्याच्या मैदानातल्या खेळीपेक्षा कॉमेंट्री बॉक्समधल्या बोलण्यामुळं अजरामर झाला.
त्याचे शब्द आजही आपल्याला जसेच्या तसे लक्षात आहेत, हे त्याचं यश म्हणावं लागेल.
पण याच शब्दांमुळं एकदा टोनी ग्रेगला अपमान सहन करावा लागला होता आणि भर मैदानात (तेही इंग्लंडच्या) गुडघ्यावर बसावं लागलं होतं.
इंग्लंडच्या कॅप्टनला गुडघ्यावर बसायला लावणारा आणि क्रिकेटमध्ये वर्णभेदाची पाळमुळं किती खोलवर रुजलेली हेच सांगणारा हा किस्सा…
साल होतं १९७६. वेस्ट इंडिज टीम स्थित्यंतरातून जात होती, ऑस्ट्रेलियामध्ये खच्चून माती खाल्ल्यानंतर त्यांच्यापुढं आव्हान होतं, ते टीम पुन्हा उभं करण्याचं. विंडीज कॅप्टन क्लाईव्ह लॉइडनं टीमची ताकद फास्ट बॉलिंगमध्ये आहे, हे ओळखलं आणि फास्ट बॉलर्सची संख्या वाढवण्यावर भर दिला. होल्डिंग, अँडी रॉबर्ट्स आणि वेन डॅनियल अशी फौज लॉईडनं तयार केली.
भारताला लोळवल्यानंतर त्यांचा सामना होता, इंग्लंडशी आणि तेही इंग्लंडमध्ये. इंग्लिश टीमचा फॉर्म मात्र गंडलेला होता, ऍशेसमध्ये स्वीकारावा लागलेला पराभव त्यांच्या कमकुवत बाजू उघड्या करणारा ठरला होता.
तेव्हा इंग्लिश टीमची धुरा होती, टोनी ग्रेगकडे. काहीही करुन ग्रेगला या टीममध्ये नवी जान फुंकायची होती. आपल्या टीमला उत्साह यावा म्हणून ग्रेगनं थेट विंडीज टीमलाच अंगावर घेण्याचं ठरवलं. त्यानं एक वक्तव्य केलं, “We’re going to make the Windies grovel.”
शब्दश: अर्थ काढायचा झाला, तर आम्ही विंडीजला लोटांगण घालायला लाऊ किंवा गुडघ्यावर बसायला लाऊ.
आता ग्रेग हे वाक्य टीममध्ये उत्साह यावा यासाठी बोलला होता. पण त्याला वर्णद्वेशाची किनार मिळाली. विंडीज बेटंही कधीकाळी ब्रिटिश अधिपत्त्याखाली होती. अनेक विंडीज नागरिकांना वर्णभेदाचा फटका बसला होता. श्वेतवर्णीय लोकं कृष्णवर्णीय लोकांना गुडघ्यावर बसवून याचना करायला लावायचे, त्यांच्यासमोर झुकायला लावायचे. त्यामुळं ग्रेगच्या या वक्तव्यामुळं चांगलाच वाद पेटला.
त्यात विंडीज टीमनं ड्रेसिंग रुममध्ये असताना ग्रेगचं हे वक्तव्य टीव्हीवर ऐकलं. त्यानंतर लगेचच त्यांची टीम मिटिंग झाली. पण ग्रेगच्या वक्तव्याचा इतका खोलवर परिणाम झाला, की त्या टीम मिटिंगमध्ये एकही प्लेअर एकही अक्षर बोलला नाही आणि इथंच मिटिंग संपली.
कुणी काही बोललं नसलं, तरी इंग्लिश टीमला या सिरीजमध्ये कसं सामोरं जायचं, हे विंडीज प्लेअर्समध्ये अगदी बरोबर झिरपलं होतं.
परिणाम दिसला पहिल्याच टेस्टमध्ये. ग्रेगच्या या बोलण्यामुळं कुणी सगळ्यात जास्त पेटलं असेल, तर तो होता व्हिव रिचर्ड्स. त्यानं इंग्लिश बॉलिंगचा पहिल्याच इनिंगमध्ये कचरा केला आणि २३२ रन्स चोपले. मग इंग्लिश टीम बॅटिंगला उतरली. जेव्हा टोनी ग्रेग क्रीझवर आला, तेव्हा अँडी रॉबर्ट्सनं त्याला शून्यावर आऊट केलं. इंग्लंडला कशीबशी पहिली टेस्ट ड्रॉ करता आली.
दुसऱ्या टेस्टमध्येही इंग्लंडचे हाल काही वेगळे नव्हते. पुन्हा एकदा विंडीज बॉलिंग लाईनअप त्यांच्यावर तोफखान्यासारखी तुटून पडली. अँडी रॉबर्ट्सनं तर दोन्ही इनिंग्समध्ये ५-५ विकेट्स काढल्या होत्या. कॅप्टन टोनी ग्रेगला या मॅचमध्येही चांगला स्कोअर करता आला नाही. ही मॅच सुद्धा ड्रॉ झाली.
तिसरी टेस्ट तब्बल ३ आठ्वड्यानंतर सुरू झाली, पहिल्या इनिंगमध्ये विंडीजला फक्त २११ रन्स करता आले होते. इंग्लंडला वर्चस्व मिळवण्याचा पूर्ण चान्स होता. मात्र त्यांचा स्कोअर झाला ७१ ऑलआऊट. टोनी ग्रेगचं पुन्हा एकदा दांडकं निघालं होतं. दुसऱ्या इनिंगमध्ये गॉर्डन ग्रिनीजच्या जोडीला व्हिव रिचर्ड्सनंही सेंच्युरी मारली आणि दुसऱ्या डावात इंग्लंडचा पार्ट बाजार उठला, त्यांनी ही टेस्ट ४२५ रन्सनं हरली.
सीरिज जिंकायला आणि विंडीजला खाली खेचायला इंग्लंडला पुढच्या दोन्ही टेस्ट जिंकणं गरजेचं होतं. मात्र चौथ्या टेस्टमध्येही त्यांचं नशीब बदललं नाही. विंडीजनं ४५० रन्स ठोकले, बदल्यात सिरीजमध्ये पहिल्यांदा सूर गवसलेल्या टोनी ग्रेगनं शतक मारलं. दुसऱ्या इनिंगमध्येही त्यानं जिगरबाज बॅटिंग केली, पण अखेर ५५ रन्सनं त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
पाचवी टेस्ट होती ओव्हलवर, या टेस्टमध्ये व्हिव रिचर्ड्सनं इंग्लिश बॉलर्सवर कोणतीही दयामाया दाखवली नाही. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये २९१ रन्स मारले. त्याची विकेट टोनी ग्रेगनं काढली आणि आनंद साजरा केला, तेव्हा स्वतः रिचर्ड्सला पण एक प्रश्न पडला की, हा इतका आनंद का साजरा करतोय. आपली ट्रिपल सेंच्युरी ९ रन्सनं हुकण्यापेक्षा जास्त आनंद रिचर्ड्सला इंग्लंडला चोपण्याचा होता.
विंडीजचे बॅट्समन इतके खतरनाक खेळले की टोनी ग्रेगनं तब्बल ९ बॉलर्स वापरुन पाहिले होते. इंग्लंडकडून डेनिस अमिसनं डबल सेंच्युरी मारत प्रतिकार केला खरा, मात्र तोही अपुरा ठरला. दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा विंडीजनं चोपाचोपी केली आणि अखेर इंग्लंडचा डाव २०३ रन्सवर संपवत विंडीजनं २३१ रन्सनं मॅच मारली. मायकेल होल्डिंगनं दोन्ही इनिंगमध्ये टोनी ग्रेगला बोल्ड केलं, एवढंच नाही तर पहिल्या इनिंगमध्ये ८ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ६ अशा एकूण १४ विकेट्सही काढल्या.
या मॅचच्या तिसऱ्या दिवशी, १४ ऑगस्टला, विंडीज चाहत्यांनी ग्रेगला चिडवण्याचा सपाटा लावला होता, त्याला डिवचायला ‘Who is groveling now ?’ असं गाणंही बनवण्यात आलं होतं. शेवटी ग्रेग हसत हसत गुडघ्यावर बसला आणि विंडीज चाहत्यांची माफी मागितली, त्यांनीही टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
या सिरीजनंतर ग्रेगनं विंडीज चाहत्यांची, खेळाडूंची माफी मागितली आणि आपल्या मनात वर्णभेदी टिपण्णी करण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असं स्पष्टीकरण दिलं.
पण कधीकाळी ब्रिटिश अधिपत्याचा आणि वर्णभेदाचा प्रचंड फटका बसलेल्या साऊथ आफ्रिकेतून येऊनही ग्रेगनं अशी टिपण्णी करणं याचा विंडीज खेळाडूंनाच नाही तर सगळ्याच क्रिकेट चाहत्यांना प्रचंड धक्का बसला होता. रिचर्ड्स, लॉईड, होल्डिंग, रॉबर्ट्स यांनी ही टिपण्णी मनावर घेतली आणि इंग्लंडच्या त्यांच्याच मातीत पराभवाचं पाणी पाजलं.
आजही म्हणतात, त्या सिरीजमध्ये विंडीजनं फक्त इंग्लंडलाच नाही, तर क्रिकेटमध्ये खोलवर रुजलेल्या वर्णभेदालाही हरवलं होतं.
हे ही वाच भिडू:
- मुंबईच्या ४१ रणजी विजेतेपदांपैकी एक ट्रॉफी वेस्ट इंडिजच्या खुंखार फास्ट बॉलरमुळं आलीये
- वेस्ट इंडिजच्या तोफांमधलं सगळ्यात खतरनाक नाव मायकेल होल्डिंग होतं…
- ईडन गार्डनवर पेटलेल्या दंगलीतही या खेळाडूने भारताचा व वेस्ट इंडिजचा झेंडा वाचवला..