सासू-सुनांचा मेलोड्रामा काय घेऊन बसलात, मराठीतले हे १० हॉरर सिनेमे पाहिलेत का ?

हॉलीवूडमधला ॲनाबेला सिनेमा तुम्हाला माहित असेल. हा सिनेमा थेटरात बसून पाहिला, तर मानलं. कारण हा सिनेमा एवढा भयंकर की अक्षरशः लोकांना हार्ट अटॅक यायचा राहिला होता. बॉलीवूडमध्ये सुद्धा अनेक सिनेमे असे आहेत की ते पाहिल्यावर लोकांना झोप येत नाही. आता त्याच सिनेमांच्या तोडीस तोड असे काही मराठी सिनेमे सुद्धा आहेत.

भूताबिताला घाबरत असाल तर तुम्ही हे सिनेमे नक्कीच पाहिलेले नसतील.

पूर्वी जरा समवयस्कर लोकं भूत झालेली दाखवायचे पण आता जमान्यासोबत भूतं सुद्धा बदललीत, लहान-लहान पोरं, तरुण मंडळींना सुद्धा या सिनेमात भूत म्हणून दाखवलंय… 

१. कर्म चक्र ( २०१९ )

Karma Chakra (2019) Movie: Watch Full Movie Online on JioCinema

कर्म चक्र….२०१९ मध्ये आलेला हा सिनेमा. यात काय होतं तर तरुण पोर-पोरी अलिबागला फिरायला गेलेलं असतात. तिथं एका फार्म हाउसवर थांबतात. एक म्हातारा फार्म हाउसचं राखण करत असतोय. त्या फार्म हाउसच्या जागेचा जुना इतिहास असतो, राजा-महाराजांनी तिथं त्यांची धनसंपत्ती गाडून ठेवलेली असते. आता आपण आजा-आजीकडून ऐकत आलोय अशी संपत्ती टिकत नाय आणि ती मिळवण्याचा प्रयत्न केला तर आपण पण टिकत नाय. म्हणजे सिनेमातलं भूत टिकू देत नाय. पण तरुण मंडळी कुठ कर्मावर विश्वास ठेवत असती व्हय… यातूनच जे घडतं ते आहे कर्मचक्र    

मिलिंद रोकडे आणि बी. सुधाकर सुदर्शनराव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमात श्रावणी जाधव, कोमल चंडेल, सुषमा भागवत, जय श्रींगारपुरे, तेज रैना, अपूर्व नाईक, शिल्पा जोशी, अमित चक्रवर्ती या कलाकारांनी काम केलंय.

२) स सासूचा ( २०१० ) 

Sa Sasucha (2010) - IMDb

या सिनेमात सोनाली कुलकर्णीला साधीभोळी सून दाखवली आहे तर सासूच्या भूमिकेत शुभांगी गोखले आहेत. आता सासू कितीही प्रेमळ असली तरी ‘स्वर्गीय’ झाल्यावर ती डेंजरच वाटणार. तर सिनेमात काय होतं की विनय आपटे आपल्या स्वर्गीय पत्नीच्या फोटो पुढ रडत असतात. बायको आर्ध्यात सोडून गेली म्हणून तिच्यावर रागवत असतात. मग मध्येच तिला खडसावून सांगतात आता पोराच्या लग्नाला तीन वर्ष झाली, तरी अजून मुलबाळ नाय, तू येच आता असं म्हणतात. मग सासूला काय दम पडणार.. सासू सूनेच्या पोटी येण्यासाठी धडपड करत असते. अन् सासू-सुनेच्या प्रेमामुळं इकड प्रेक्षकांना भीती बसतेय.

किशोर बेळेकरांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. सुनिल बर्वे, सोनाली कुलकर्णी, विनय आपटे, शुभांगी गोखले यांच्यासह यतिन कार्येकर, कमलेश सावंत, ओंकार कर्वे, विमल म्हात्रे, अरुण भडसावळे, राजेश भोसले, अनिता निनावे या कलाकारांनी काम केले आहे. 

३) बळी ( २०२१ ) 

Bali (2021) - IMDb

या सिनेमात एलिझाबेथ आहे, म्हणजे एलिझाबेथ नावाचं भूत आहे. पण हे भूत जरा चांगलं दाखवलं आहे. त्या भुताला आणि तिच्या मुलाला जिवंतपणी एका फेक डॉक्टरने फसवलेलं असतं. त्यात त्यांचा मृत्यू होतो. जे सगळं त्या एलिझाबेथसोबत झालेलं असतं तोच प्रकार मिडलक्लास कुटुंबातल्या श्रीकांत सोबत होतो. आता हा श्रीकांत म्हणजे स्वप्नील जोशी. 

त्याचा पोरगा आजारी पडतो म्हणून तो त्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तर सगळ रहस्य त्या हॉस्पिटलमधेच असत. ते भूत पण तिथच असत अन् त्या सिनेमाचा शेवट सुद्धा त्याच हॉस्पिटलात होतो. 

विशाल फुरिया यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात स्वप्नील जोशी, पूजा सावंत, श्रीकांत साठे, प्रीतम कागणे, समर्थ जाधव, श्रध्दा कौल, रोहित कोकाटे, अभिषेक बचनकर हे कलाकार आहेत.

४) गोवा ३५० किलोमीटर ( २०१५ ) 

Watch Goa 350 KM | Prime Video

प्यार मे धोका बिका म्हणतो ना… तर तसंच आहे या सिनेमात. प्रेमात असलेल्या मुलीला धोका मिळतो आणि त्यात तिचा जीव जातो. मग काय ते भूतच प्यार का दुश्मन होतं आणि प्रेमी युगुलाला त्रास देत असतं. म्हणजे या सिनेमातून असं दिसतं की भूतांना सुद्धा भावना असतात आणि ते बदला घेण्यासाठीच येतात. सिनेमाच्या शेवटी  मॅसेज दिला आहे कि, “डोंट मेक प्रॉमिसेस, इफ यू डोंट इंटेंट इट.” 

अमोल पडवे दिग्दर्शित या सिनेमात माधुरी देसाई, विकास बांगर, रुचिता जाधव, यतीन कार्येकर, रोहित पानसरे, दीपक सावंत, नम्रता भोंडवे, गौरव घाटणेकर, संजय मोने, उषा साटम हे कलाकार आहेत.

५) लपाछपी ( २०१७ ) 


हा सिनेमा तसा भारी आहे. ३ लहान लहान पोरं भूतं दाखवलीत. ऊसातल्या एका विहिरीत ती पोरं रहात असतात. त्यांना खेळायला कुणी नसतं म्हणून बाळांतीन बाईला आधीच वशिला लावतात, का तर तिच्या पोटातल्या बाळाला खेळायला घेऊन जायचं असतंय. 

आता पूजा सावंत त्या गरोदर बाईच्या भूमिकेत दाखवलीये. मग ती पोरं पूजा सावंत बरोबरच लापाछापी खेळताना दाखवलीत. 

विशाल फुरिया यांनी या सिनेमाच दिग्दर्शन केलय. या सिनेमात पूजा सावंत, अनिल गवस, विक्रम गायकवाड, उषा नाईक, सचिन मोरे, अपर्णा आंबवणे, धनश्री खांडकर, हृदयनाथ राणे हे या कलाकारांनी काम केले आहे.

६) ऐक ( २०१२ )

तीन लोकांच एक सर्वसामान्य कुटुंब असत. त्यांना घर घ्यायचं असत म्हणून एजंटद्वारे ते घर पाहायला जातात. घर स्वस्तात भेटतय मग काय घेऊन टाकतात.

खरं तर सस्ती चीझे भी कभी कभी मेहेंगी पडती है असचं काहीतरी होत. 

मग काय त्या तीन लोकांच्या कुटुंबात अजून एक व्यक्ती वाढती भुताच्या कॅराक्टरमध्ये असलेली एक लहानशी पोरगी. त्या जोडप्याकडे ती आई-बाबा म्हणून पाहत असती बिचारी. पण एकदा त्या जोडप्यात जाम वादावादी होते, ते त्या पोरीला सहन होत नाही म्हणून मग काय ती त्यांना त्रास द्यायला सुरुवात करते.

प्रतिक कदम दिग्दर्शित ऐक या सिनेमात  चिन्मय  मांडलेकर , स्वप्नील  जाधव , अदिती  सारंगधर,  प्रसाद  ओंक,  शेखर  फडके,  भूषण  घडी,  प्रशांत  नेमान,  मौसमी  तोंडवळकर, पूनम  जाधव,  स्वरांगी  करंदीकर,  हृषीकेश  गुजर या मंडळीनी काम केलय.

७) अनवट ( २०१४ ) 

images?q=tbn:ANd9GcRouG3TcKJVYutipU VyCvziPP0vwmQDWX0TBVzyE4sJAa6Ggm5

१९७५ च्या काळातील कोकण, गोवा, हैद्राबाद येथील पार्श्वभूमीवर आधारित असा हा सिनेमा आहे. या सिनेमात ज्युनिअर कोठारे दाम्पत्य आहे. डॉक्टरच्या भूमिकेत असलेला आदिनाथ आणि आर्किओलॉजिस्टच्या भूमिकेत असलेली उर्मिला हे दोघे शहरातून आजोबांच्या इच्छेखातीर गावाला जातात. फोटोग्राफीचा छंद असल्यामुळे माधुरीच्या भूमिकेत असलेली उर्मिला नवरा दवाखान्यात गेल्यावर या परिसराचे फोटो काढण्यात दंग होते.

याच दरम्यान परिसरातल्या एका विशिष्ट झाडाचे फोटोही ती काढते. गावातल्या मुंज्याने या झाडाची पूजा केलीय. हे फोटो ती घरी आणते आणि घरी विचित्र घटना घडू लागतात.

पण शिकलेली मंडळी या गोष्टींना मानत नाही अन मग काय तर त्याचे परिणाम त्यांना या सिनेमात भोगावे लागतात. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित या सिनेमात आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे, भार्गवी चिरमुले, मकरंद अनासपुरे, विभावरी देशपांडे, किशोर कदम, अनुश्री जुन्नारेकर, उमेश कामत ही सगळी मंडळी आहेत. 

८) कनिका ( २०१७ ) 

या सिनेमात सुद्धा हॉस्पिटल, डॉक्टर आहेत. या सिनेमात डॉक्टरच्या भूमिकेत शरद पोंक्षे आहेत. त्यांनाच हे भूत दिसत असत. त्यांच्या वागण्या बोलण्यात बदल होतो, एवढचं काय तर ऑपरेशन करताना ते पेशंटवरच वार करायला लागतात. त्या सिनेमात ती जी भूत दाखवलिये तिच्याच नावानं या सिनेमाला कनिका नाव आहे.

पुष्कर मनोहर दिग्दर्शित या सिनेमात शरद पोंक्षे मुख्य भूमिकेत आहेत. चैत्राली गुप्ते, स्मिता शेवाळे, आनंदा कारेकर, फाल्गुनी रजनी, निलेश भेरे, वंदना मराठे आणि कमलकर सातपुते हे स्टारकास्ट या सिनेमात आहे.

९) झोंबीवली ( २०२२ ) 

Zombivli (2022) - IMDb

भुताटकी, कॉमेडी आणि रोमँटिक असं फ्युजन असलेला हा सिनेमा आहे. या सिनेमात तर चक्क हॉलीवूडचे झॉम्बीच डोंबिवली मध्ये आणलेत. झॉम्बी सुरुवातीला फक्त अमेय वाघलाच दिसत असतात. अत्यंत किळसवाणे असे ते झॉम्बी दाखवलेत.

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या सिनेमात अमेय वाघ, वैदेही परशुरामी, ललित प्रभाकर, सिद्धार्थ जाधव, जानकी पाठक, तृप्ती खामकर, विजय निकम आणि झॉम्बीच्या भूमिकेत जनार्दन कदम हे आहेत.

१०) भयभीत ( २०२० ) 

bhaibheet 1

कधी धो धो कोसळणारा पाऊस, कधी घनदाट जंगल तर कधी अस्वस्थ करणारं स्वप्न, हे वाचून तुम्हाला थरारक वाटत असेल ना ?  ते पाहूनही तुम्हाला भिती वाटेल असा आहे ‘भयभीत’ हा सिनेमा आहे. बायकोच्या निधनानंतर मुलीचा सांभाळ करताना सुबोध भावे दिसतात. परंतु आई आणि मुलीचे जवळचे नाते असल्याने आईला काय मुलीला सोडावं वाटत नाय.

मग मुलीसाठी ती आत्मा बनून तिथंच भटकत राहते आणि कुठेही न जाण्याचा शब्द आपल्या मुलीला देते. 

दीपक नायडू दिग्दर्शित या सिनेमात बालकलाकार मृणाल जाधव आणि सुबोध भावे हे मुख्य भूमिकेत आहेत. भोजपूरी सिनेमांतील प्रसिद्ध अभिनेत्री मधू शर्मा, पूर्वा गोखले, गिरीजा जोशी, यतीन कार्येकर अशी स्टारकास्ट या सिनेमात आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.