हे आहेत यावर्षीचं आयपीएल गाजवणारे ५ सर्वोत्तम युवा खेळाडू …!!!

 

आयपीएल २०१८ शेवटच्या टप्प्यात असून २७ तारखेला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. स्पर्धेच्या पहिल्या सीजनपासूनच ‘आयपीएल’ हे युवा खेळाडूंसाठी महत्वपूर्ण व्यासपीठ ठरलं आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याची नामी संधीच युवा खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने प्राप्त होत असते. या वर्षीच्या आयपीएलमध्ये देखील काही युवा खेळाडूंना  आपल्या दमदार कामगिरीद्वारे क्रीडा रसिकांचं  आणि निवड समितीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात यश मिळवलय. नजर टाकूयात त्यांपैकी काही खेळाडूंच्या कामगिरीवर…

  • ईशान किशन- आयपीएल सुरु होण्यापूर्वीच देशांतर्गत क्रिकेटमधील एका टी-२० सामन्यात ४२ बॉल्समध्ये शतक फटकावलेल्या ईशान किशनवर या आयपीएलमध्ये सर्वांच्याच नजरा खिळलेल्या होत्या. त्यानेही चाहत्यांना निराश न करता जबरदस्त कामगिरी नोंदविली. मुंबई इंडियन्सकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाविरुद्ध ईडन गार्डन्सच्या मैदानावर त्याने २१ बॉल्समध्ये ६२ रन्सचा पाऊस पाडला. यावेळी त्याने १७ बॉल्समध्ये फिफ्टी झळकावत या आयपीएलमधला दुसऱ्या क्रमांकाचा जलद फिफ्टी झळकावणारा प्लेअर होण्याचा मान मिळवला. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर ईशानने मुंबईकडून १४ मॅचमध्ये सजवळपास दीडशेच्या स्ट्राईक रेटने २७५ रन्स फटकावले. त्यात त्याच्या २ फिफ्टीजचा समावेश आहे. संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्याने २२ फोर आणि १७ सिक्सर्सचा पाऊस पाडला.
  • मयंक मार्कंडे- सर व्हिवियन रिचर्डस ज्याच्या बॉलिंगच्या प्रेमात पडले असा मुंबई इंडियन्स संघाने शोधलेला हा आणखी एक हिरा. मुंबईकडून १४ मॅचमध्ये खेळताना त्याने १५ विकेट्स मिळवल्या. आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध त्याने २३ रन्स देऊन ३ विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीने तो आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातील डेब्यू मॅचमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. पुढच्याच सामन्यात त्याने हैदराबादविरुद्ध खेळताना परत २३ रन्स देऊन ४ विकेट्स मिळवल्या. हे त्याचं स्पर्धेतील सर्वोत्तम प्रदर्शन ठरलं.
  • पृथ्वी शॉ- १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार राहिलेला पृथ्वी शॉ हा आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा सदस्य होता. दिल्लीच्या संघाची आयपीएलच्या या सिझनमधली कामगिरी खराब राहिली असली तरी पृथ्वी शॉ ने मात्र जबरदस्त कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील भेदक बॉलर्सचा सामना करताना ९ मॅचमध्ये २४५ रन्स जमवले. त्यात त्याच्या २ फिफ्टीजचा समावेश आहे. हैदराबादविरुद्ध साकारलेली ६५ रन्सची इनिंग हे त्याचं या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन ठरलं. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध कोटलाच्या मैदानावर फटकावलेल्या ४४ बॉल्स मधील ६२ रन्सच्या इनिंगने देखील त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. संपूर्ण स्पर्धेदरम्यानचा त्याचा स्ट्राईक रेट दीडशेपेक्षाही अधिक राहिला.
  • शुभमन गिल- १९ वर्षाखालील संघाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघातील आणखी एक महत्वाचा नाव म्हणजे शुभमन गिल. शुभमनने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना शानदार कामगिरी केलीये. आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यात त्याने १७३ रन्स काढल्यात. त्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यातील ५७ रन्सची इनिंग हे त्याचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन राहिलं. स्पर्धेच्या पहिल्या इलीमिनेटर लढतीत राजस्थानविरुद्ध खेळताना देखील त्याने कॅप्टन दिनेश कार्तिक सोबत महत्वपूर्ण भागीदारी साकारत सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यास मदत केली. त्याच्या या इनिंगची दिनेश कार्तिकने तोंडभरून स्तुती केली.
  • अभिषेक शर्मा- आयपीएलच्या ४५ व्या सामन्यात दिल्ली डेअर डेव्हिल्सच्या संघाकडून आयपीएल डेब्यू करणाऱ्या अभिषेक शर्माने १९ बॉल्समध्ये नाबाद ४६ रन्सची तुफानी खेळी साकारत सर्वांचंच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. या खेळीसह डेब्यू मॅचमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा रेकॉर्ड अभिषेकच्या नावावर जमा झाला. त्याची ही खेळी बघून युवराज सिंगने देखील या मुलामध्ये काहीतरी ‘खास’ आहे, असं ट्वीट करून त्याचं कौतुक केलं होतं. अर्थात फार उशिरा संधी मिळाल्यामुळे त्याला दिल्लीच्या संघाकडून फक्त ३ सामनेच खेळता आले, ज्यात त्याने ६६ रन्स काढले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.