दहीहंडीची लोकप्रियता जगभरात पसरवणाऱ्या या आहेत महाराष्ट्रातल्या ५ सर्वात मोठ्या दहीहंड्या…
एकामागुन एक येणारे आणि मुंबईत धुमधडाक्यात साजरे होणारे दोन सण म्हणजे दहीहंडी आणि गणेशोत्सव. ऑगस्ट लागला की फक्त मुंबईकरांना बघायचं. त्यांच्या उत्साहाला पारावार उरत नसतो. त्यात गोपाळ काला म्हणजे तर फूल कल्लाच.
मुंबईतल्या चाळी आणि चाळीतल्या हंड्या म्हणजे अगदी पूर्वापार चालत आलेला विषय. आजही ज्या चाळी शाबूत आहेत तिथे या हंड्या अगदी पूर्वीसारख्याच खेळल्या जातात.
शंभर वेळा २ थर रचून एखाद हंडी फुटते तेव्हा चाळीतल्या पोरांना जग जिंकल्यागत वाटत असतं, २-३ हंड्या फोडून झाल्या की मग सामूहिक काकडीची कोशिंबीर करायची, प्रसाद म्हणून वाटायची, आणि धाक्कूमाकूम धाक्कूमाकूमच्या तालावर नॉन स्टॉप नाचायचं.
आता हे झालं चाळीतल्या हंड्यांचं. पण मुंबईतल्या स्पर्धा आयोजित करणाऱ्या दहीहंडी मंडळांचा विषय तर आणखीनच मोठाय.
स्पर्धेत भाग घेतलेली गोविंदा पथकं, त्यांचे थर, त्यांच्या हंड्या, त्यांच्यावर लावली जाणारी बक्षीसं, त्यांच्यासाठी होणारी गर्दी, त्यांच्यावर लागणाऱ्या बोल्या आणि त्यांच्याच भोवती फिरणारं राजकारण सगळंच लय मोठं. तर आज आम्ही तुम्हाला सांगतोय अशाच ५ दहीहंडी मंडळांची नावं, जी मंडळं महाराष्ट्रात सगळ्यात मोठी मंडळं मानली जातात.
संघर्ष प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे.
मुंबईत असणाऱ्या दहीहंड्यामध्ये संघर्ष प्रतिष्ठान मंडळाची हंडी सर्वात श्रीमंत दहीहंडी मानली जाते. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामार्फत ही हंडी आयोजित केली जाते. इथल्या बक्षिसाची रक्कम लाखाच्या घरातून सुरु होते तर कोटींमध्ये जाऊन थांबते. सोबतच काही ग्रॅम सोनं एक्सट्रा प्राईझ म्हणूनही दिलं जातं. २०१३ मध्ये बक्षिसाची रक्कम म्हणून १.११ कोटी रुपये देण्यात आले होते तर २०१४ मध्ये ५१ लाख रुपये देण्यात आले. यात १० थरांच्या हंडीला २५ लाख रुपये आणि इतर संघांना २६ लाख रुपये देण्यात आले होते.
पण यंदा ही दही हंडी आयोजित केली जाणार नाहीये, उंचीला स्थगिती, वयाचं बंधन आणि अशा अनेक निर्बंधातून दहीहंडी साजरी होऊ शकत नाही, शिवाय लॉकडाऊन नंतर आता दहीहंडी साजरी करण्यात रस वाटत नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय.
राम कदम दहीहंडी, घाटकोपर.
भाजप आमदार राम कदम यांचं नाव असलेल्या या दहीहंडीच्या कार्यक्रमात संपूर्ण मुंबईतली गोविंदा पथकं सहभागी होतात. यास्पर्धेत दिल्या जाणाऱ्या बक्षिसाची रक्कम एक कोटी रुपयांपर्यंत असते. मात्र या दहीहंडीची खरी खासियत म्हणजे इथे मोठमोठे सिलेब्रिटीज हजेरी लावत असतात.
शाहरुख खान, आशा पारेख, अमिषा पटेल यांच्यासारख्या सेलिब्रिटींनी आजवर या हंडीला हजेरी लावलीये. आधीच गर्दी त्यात या सेलिब्रिटींना बघण्यासाठी लोकं अक्षरशः तारेवरची कसरत करतात. सगळ्यात जास्त गर्दी जर कोणत्या दहीहंडीला असेल तर ती हीच हंडी समजा. मुंबईच्या घाटकोपरमध्ये ही दहीहंडी आयोजित केली जाते.
टेंबी नाका दहीहंडी, ठाणे
आता पुण्यात जसे मानाचे गणपती असतात तशा ठाण्यात चार मानाच्या हंड्या असतात. यातली सगळ्यात पहिली मनाची दहीहंडी म्हणलं की टेंबी नाका दहीहंडीचं नाव येतं. शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी या दहीहंडीची सुरुवात केली होती. ही हंडी सर्वात जुनी दहीहंडी असल्याने या हंडीला ‘सर्व दहीहंड्यांची जननी’ म्हणूनही ओळखलं जातं.
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत या हंडीचं आयोजन केलं जातं. यात विजेत्यांना २०० ग्रॅम सोनं दिलं जातं. तसं पहिलं इतर आयोजकांच्या तुलनेत ही बक्षिसाची रक्कम इतकी मोठी नाही पण मानाची हंडी फोडण्याची प्रतिष्ठा मिळवण्यासाठी गोविंदा पथकं इथे गर्दी करतात. आणि त्यांना बघण्यासाठी लोकं गर्दी करतात.
संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे.
ठाण्यातली दुसरी मानाची दहीहंडी म्हणून या दहिहंडीकडे पाहिलं जातं. आमदार प्रताप सरनाईक ही दहीहंडी आयोजित करतात आणि दरवेळी नवीन रेकॉर्ड बनवणारी हंडी म्हणून हिला ओळखलं जातं. ठाण्यात जय जवान गोविंदा पथकाने याच प्रतिष्ठानाच्या दहीहंडीत ९ थर लावून गिनीज बुकमध्ये आपल्या नावाची नोंद करत विक्रम केला होता. २०१२ मध्ये ४३.७९ फूट उंचीचा थर गोंविंदा पथकाने लावला होता आणि बक्षीस म्हणून या गटाने ११ लाख रुपये जिंकले होते.
ठाण्यातल्या वर्तकनगर परिसरात आयोजित केली जाणारी ही हंडी यंदाही एक नवीन विक्रम करण्याचा मानस घेऊन रिंगणात उतणार असल्याचं या प्रतिष्ठानाच्या वतीने सांगण्यात आलंय. यावेळी नवीन विक्रम करणाऱ्या गोविंदा पथकाला २१ लाख रुपयांचं पारितोषिक आणि एक आकर्षक ट्रॉफी दिली जाणारे. या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीला मोठ-मोठे नेते आणि सिने सृष्टीतले कलाकार हजेरी लावणार असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलंय.
संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी, वरळी.
आमदार सचिन अहिर यांनी स्थापन केलेल्या श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टमार्फत या दहिहंडीचं आयोजन करण्यात येतं. वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या जांबोरी मैदानात या हंडीचं आयोजन करण्यात येतं. ही हंडी दक्षिण मुंबईतली सर्वात उंच हंडी असल्याचं म्हटलं जातं. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे या हंडीची लोकप्रियता अधिक वाढते.
पण यावर्षी मात्र हे चित्र जरा बदललय. भाजपचे नेते आशीष शेलार यांनी सचिन अहिर यांच्या दहीहंडीला हायजॅक केलंय. वरळीच्या जांबोरी मैदानात शिवसेनेकडून ही हंडी बांधली जाणार होती. मात्र, आता हे मैदान भाजपने मिळवलय. जांबोरी मैदान भाजपकडे गेल्यामुळे आता शिवसेनेकडून वरळी नाक्याच्या जवळ असणाऱ्या श्रीराम मीलच्या चौकात दहीहंडी उभारली जाणार असल्याचं बोललं जातय.
तर ही होती मुंबई आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मानली जाणारी ५ दहीहंडी मंडळं.
हे ही वाच भिडू:
- श्री कृष्ण मालिकेत कृष्णाचा रोल केला अन् त्यानंतर बॅनर्जींनी सिने इंडस्ट्री कायमची सोडली
- आज प्रत्येक चौकात वाजणाऱ्या ‘गोविंदा आला रे आला’ गाण्याचं शूटिंग गिरगावच्या चाळीत झालं होतं