हातात बॉल घेऊन काश्मिरी पोरगा पुढं आला, आता डेल स्टेन त्याचं कौतुक करताना थांबत नाहीये

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स अशी मॅच सुरू होती. सनरायझर्सच्या डगआऊटमध्ये मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन असे दिग्गज बसलेले. स्ट्राईकवर होता कोलकात्याच्या कॅप्टन श्रेयस अय्यर आणि बॉलिंग करत होता २२ वर्षांचा उमरान मलिक.

हि ओव्हर गेली, १, ०, १, १, ० अशी.. लास्ट बॉल बाकी होता. मलिकनं अनुभवी आणि प्रभावी अय्यरला रोखून धरण्यात यश मिळवलं होतं. शेवटचा बॉल तो बाउन्सर टाकणार असा अंदाज स्वतः डेल स्टेननं लावला. आता स्टेन म्हणजे भल्याभल्यांच्या पुंग्या टाईट करुन बसलेला फास्टर बॉलर. तर मुरलीचा अंदाज होता, हा यॉर्कर टाकेल.

उमराननं खरंच यॉर्कर टाकला आणि श्रेयस अय्यरचे स्टम्प उडाले. हा बॉल इतका भारी होता, की कितीही वेळा पाहिलात तरी कंटाळा येणार नाही. हा बॉल तुम्हाला आम्हालाच नाही, तर स्वतः डेल स्टेनलाही लय आवडला.

यंदाच्या आयपीएलमध्ये उमरानची हवा होण्याची ही काय पहिली वेळ नाही. आयपीएल मॅचमध्ये सगळ्यात फास्ट बॉल टाकला म्हणून त्याला लाख-लाख रुपये मिळालेत. मोठे प्लेअर्स त्याचं कौतुक करतायत.

पण आजच्या घडीला कौतुक होत असलं, तरी इतिहास माहित पाहिजेल आणि स्ट्रगलही.

उमरान मूळचा जम्मू काश्मीरचा. सतत धुमसणाऱ्या काश्मीरमध्ये तरुणांची पावलं चुकीच्या मार्गावर जाण्याची भीती असते. पण इमरानपुढं मार्ग भटकण्याचा प्रश्न कधी उभा राहिलाच नाही. आपल्या फळविक्रेत्या वडिलांच्या कष्टाची त्याला जाण होती आणि आवड होती क्रिकेटची.

जम्मू काश्मीरमध्ये टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे प्रचंड मोठा विषय. रात्रीच्या वेळी होणाऱ्या या मॅचेसमध्ये उमरान बादशहा होता. याचं कारण म्हणजे त्याची बॉलिंगचा स्पीड.

उमरान या स्पीडमुळं प्रचंड लोकप्रिय झाला होता. तो सिमेंटच्या पिचवर सराव करत असताना भारताच्या अंडर-19 सिलेक्टर्सचं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्यांनी विचारल्यावर समजलं की उमरान अजून जिल्ह्याच्या टीमकडूनही खेळला नाही. त्याला सल्ला मिळाला, की एकदा ट्रायल्स देऊन बघ.

जम्मू काश्मीरच्या अंडर-१९ संघात ट्रायल्स द्यायला गेल्यावर वयाच्या अठराव्या वर्षी उमराननं पहिल्यांदा लेदर बॉल हातात घेतला. तिकडं बॉलिंग करताना उमरानला पहिल्यांदा समजलं की, ‘बॉलिंग करण्यासाठी वेगळे शूज असतात.’ तिकडं एका कार्यकर्त्याकडून त्यानं शूज घेतले. पण त्याला सांगण्यात आलं की, भाऊ तू अजून कुठल्याच जिल्ह्याच्या टीमकडून खेळलेला नाही. त्यामुळं तुला संघात जागा मिळू शकत नाही.

हे असं बऱ्याच पोरांच्या आयुष्यात घडतं. ते काय करतात, तर दुसऱ्या दिवशी ग्राऊंडला जात नाहीत. उमरान मात्र परत एकदा ट्रायल्सला गेला आणि बॉलिंगला सुरुवात केली. त्याचा स्पीड बघून एका सिलेक्टरनं एकच गोष्ट सांगितली की,

‘बाकी कसला विचार करू नको. तू टीममध्ये आहेस.’

जम्मू काश्मीरची अंडर-१९ टीम, त्यांचीच अंडर-२३ टीम आणि मग मुख्य संघ, उमराननं एक-एक टप्पे पार पाडले. पण नावाला आणि बॉलिंगला ग्लॅमर आलं ते, आयपीएलमुळंच.

उमरानला आयपीएलमध्ये संधी कशी मिळाली याची स्टोरीही भारी आहे. जम्मू काश्मीरचा अब्दुल समद आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत होता. त्याची आणि उमरानची दोस्ती जमलेली आणि समदला उमरानचं टॅलेंट माहीत होतं.

त्यानं शब्द टाकला आणि उमरानची सनरायझर्सच्या कॅम्पमध्ये नेट बॉलर म्हणून निवड झाली. त्याचा पेस बघून जेसन होल्डर, केदार जाधव, जॉनी बेअरस्टोही इम्प्रेस झाले. तेवढ्यात टी. नटराजनला कोविडमुळं उरलेल्या आयपीएलला मुकावं लागलं आणि नेट बॉलर असलेल्या उमरानची संघात एंट्री झाली.

त्याचं नाव इथंही चर्चेत आलं याचं कारण होतं स्पीड.

भारतीय बॉलर, त्यात वय फक्त २१ वर्ष आणि डायरेक्ट दीडशेच्या स्पीडनं बॉलिंग? लोकं खुळी व्हायची बाकी होती. त्यात जेव्हा उमरानच्या बॉलनं १५२ चा भोज्जा शिवला, तेव्हा मात्र फेटे उडले.

हैदराबादला २०२१ चा सिझन जरा जास्तच बंडल गेला. त्यांचा शेवट गोड झाला असला, तरी कामगिरी पार बेकार झाली. २०२२ च्या मेगा ऑक्शनआधी त्यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला. राशिद खान, नटराजन, भुवी अशा बॉलर्सला सोडत त्यांनी उमरानला टीममध्ये कायम ठेवलं.

इतक्या मोठ्या बॉलर्सपेक्षा जास्त विश्वास आपल्यावर दाखवला जातोय म्हणजे विषय डीप असतोय.

उमराननं २०२२ च्या आयपीएलमध्ये आतापर्यंत तरी हा विश्वास कायम ठेवलाय. त्याच्या बॉलिंगचा स्पीड अजिबात कमी झालेला नाही आणि दुसऱ्या बाजूला कंट्रोल आणखी वाढलाय. उमरान नुसताच जोरात टाकत नाही, तर दिशा देतो बॉल चांगला स्विंग करतो. कधी यॉर्कर टाकायचा हे माहिती असल्यानं श्रेयस अय्यरच्या दांड्या उडवतो आणि कधी बाऊन्सर टाकायचा हे माहीत असल्यानं आंद्रे रसेलला लेझीम खेळायला लावतो.

उमरानला घडवण्यात भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणचाही मोलाचा वाटा आहे. इरफान जेव्हा भारतीय संघात होता, तेव्हा त्याच्या स्विंगची हवा होती. स्पीड आणि स्विंगच्या गणितात त्याचा कार्यक्रम डुबला नसता, तर त्यानं आणखी मोठी मैदानं मारली असती. आता तेच स्वप्न उमरानच्या रूपात पाहिलं जातंय.

आयपीएलमधल्या कौतुकावर उमराननं थांबता काम नये. कारण भारताकडे सातत्यानं १५० प्लस टाकणारा बॉलर सध्या तरी नाही. उमरानच्या वेगानं त्याला दिशा दाखवलीये आता अजून एक पाऊल बाकी ए… त्याच्या तर इन्स्टाग्राम बायोमध्येही लिहिलंय… India Soon!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.