डिप्रेशन मधून घरातल्या सर्वांना मारलं आणि इस्टेट मेडिकल फंडला दान करून टाकली

खूप प्रयत्न केले… आता शक्य होत नाहीये… रोज रोज स्वतःशीच लढून थकलो आहोत… रोजचा दिवस काढणं कठीण झालंय… आम्ही असे आहोत तर आहोत… सत्य का स्वीकार केलं जात नाहीये… आता यातून सुटका होणं गरजेचंय… शांती आणि अखंड सुख शोधणं हाच पर्याय आहे… आणि याचा एकमेव मार्ग आहे –

‘मृत्यू’

स्वतःसोबत घरातील सर्वांना हे सुख देतोय, त्यांची देखील या नरकातून मुक्ती करतोय… सगळ्या कुटूंबाला मारून स्वतः देखील आत्महत्या करतोय !!

असे शब्द लिहिलेलं पत्र फरहानच्या मित्राला दिसलं. रात्री जवळपास १ च्या सुमारास. तातडीने त्याने पोलिसांना कळवलं. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. बघतात तर काय…

‘ते सर्व सत्य होतं’. 

घरात एक नाही दोन नाही तब्बला सहा मृतदेह जमिनीवर पडलेले होते. सगळ्यांना गोळ्या झाडून मारण्यात आलं होतं. 

या दुर्दैवी कुटुंबाचं नाव ‘टॉव्हीड फॅमिली’ आणि ज्यांनी हे कृत्य केलं ते याच कुटुंबाचे चिरंजीव फरहान आणि तन्वीर टॉव्हीड.

जास्त दूरची नाही २०२१ ची म्हणजेच गेल्याच वर्षीची ही घटना आहे. अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये हे टॉव्हीड कुटुंब हसत खेळत राहत होतं. आजूबाजूंच्या लोकांशी सलोखा जपून होतं. कधीही कुणाला त्यांच्याकडे बघून वाटलं नव्हतं की, या कुटुंबासोबत असं काही होईल.

मात्र या कुटुंबावर काळे ढग साचले होते. त्यांना ग्रहण लागलं होतं – त्यांच्याच मुलांचं. 

१९ वर्षांचा फरहान टॉव्हीड आणि २१ वर्षांचा तन्वीर टॉव्हीड.  दोघे भाऊ आई, वडील, बहीण आणि आजी यांच्या सोबत राहत होते. 

याची सुरुवात झाली जेव्हा फरहान ९ वर्षांचा होता. तो तेव्हा शाळेत जायचा. तेव्हाच त्याला खूप जास्त नैराश्य आलेलं होतं. त्याचं मन कशातच लागायचं नाही. त्याच्यासोबत राहणाऱ्या मित्राची देखील अशीच परिस्थिती होती. मात्र तो मनाने पक्का होता. नेहमी आशावादी राहणं त्याला जमायचं. त्याच उमेदीने तो परत दुसऱ्या दिवशी कामाला लागायचा. 

फरहानचं असं नव्हतं. त्याला नैराश्य म्हणजेच डिप्रेशन आलेलं होतं. जगण्यात त्याला कोणताच पॉईंट दिसत नव्हता. नेहमी शांत आणि एकटं राहायचा मात्र ते त्याला आतून खात होतं. त्याच्याकडे मित्रासारखी विल पॉवर नव्हती. तो स्वतःचा हात किंवा शरीरावर रोज नवे घाव करायचा. चाकूने स्वतःला कापायचा. रोज असं स्वतःला कापण्याची संख्या तो वाढवायचा. 

आज एक व्रण असेल तर उद्या दोन, मग तीन. त्याची सहनशक्ती वाढायची आणि त्याला समजायचं की त्याचं हे डिप्रेशन अजूनच वाढत जात आहे. त्याला सगळं समजायचं – उमजायचं. मात्र काहीच करू शकत नव्हता, तो हतबल होता. तो स्वतः म्हणायचा की, तो तितका मजबूत नाहीच. 

जेव्हा फरहानच्या घरच्यांना हे कळलं तेव्हा त्यांनी त्याला मेंटल हेल्प कॅम्पमध्ये पाठवलं. 

तिथे गेल्यावर त्याच्यात सुधारणा दिसू लागली. त्याने सुरुवात केली त्याचं वजन कमी करण्यापासुन. दुसरी गोष्ट तो सोशल मीडिया खूप वापरायचा, तेही अगदी विभत्स गोष्टींसाठी. आजच्या भाषेत ‘क्रिन्ज कन्टेन्ट’ तो शेअर करायचा. त्याचं हे वागणं बदललं. त्याला एक मुलगी देखील आवडायला लागली होती. कम्प्युटर आवडत असल्याने प्रोग्रामिंगमध्ये जिनियस होण्यासाठी तो काम करू लागला. 

सगळ्यांसोबत वावरत होता. अगदी बघणाऱ्याला वाटेल तशी नॉर्मल लाईफ जगत होता. मात्र खरं तर काही वेगळंच होतं…. 

तो आतून खुश नव्हता. ‘माणूस जगतो आनंदासाठी’ असं त्याचं म्हणणं होतं आणि नेमकं हेच त्याला मिळत नव्हतं. 

अशातच त्याने शिक्षण सोडून दिलं आणि घरी आला. 

त्याची घरची परिस्थिती तशी एकदम चांगली होती. बऱ्यापैकी आर्थिक स्थैर्य आणि समाजात चांगलं नाव असणारं कुटुंब होतं. घरात टॉव्हीदुल इस्लाम (वडील), आयरेन इस्लाम (आई), ल्ताफुन नेसा (आजी), फरबिन टॉव्हीड (बहीण), तन्वीर टॉव्हीड (भाऊ)  असे एकूण पाच जण राहत होते. 

फरहान जेव्हा घरी गेला तेव्हा त्याची जास्त करून त्याच्या मोठ्या भावाशी तन्वीरशी गट्टी जमायला लागली. का?… कारण त्याचा भाऊ देखील त्याच सेम परिस्थितीमधून जात होता. त्यालाही डिप्रेशननं घेरलेलं होतं.

त्याचा भाऊ तेव्हा टीव्हीवर लागणारा एक कार्यक्रम बघायचा. ‘द ऑफिस’ असं त्या शोचं नाव होतं. दोघांसाठी थोडं शांत होण्याचं ते कारण होतं. दोघांमध्ये नैराश्याबाबत गप्पा व्हायच्या. तेव्हा त्यांनी ठरवलं होतं की, आपण एक वर्ष वेगवेगळे उपाय करून बघू. जर जमलं तर ठीक नाहीतर मग नेहमीचा तोडगा काढण्यापासून पर्याय नाही.

त्यांनी ही गोष्ट ठरवली मात्र त्याच्या महिनाभरातच ‘द ऑफिस’ शो संपला.

बस्स. दोन्ही भावांना वाटलं यापेक्षा नैराश्यात जास्त भर काय असू शकते. आणि त्यांनी स्वतःलाच दिलेली एका वर्षाची मुदत लगेच संपवली. दोन्ही भाऊ पोहोचले अमेरिकेच्या बंदुकीच्या एका दुकानात.

तिथे गेल्यावर त्यांची कोणतीही नीट चौकशी न करता त्यांना गन देण्यात आली. दोघांनी प्रॉपर प्लॅन बनवला होता की, पुढे काय करायचं आहे, कसं करायचं आहे.

अशा नैराश्याच्या प्रभावात असूनही फरहान इतका जागृत होता आणि त्याच्यातील चांगुलपणा असा होता की त्याने त्याच्या नावावर असलेली सगळी संपत्ती एका मेडिकल फंडला दिली होती.

मेडिकल फंड त्याने यासाठी निवडलं होतं कारण त्याच्यावर जी बितली होती ती कुणावर अजून वेळ येऊ नये, लोकांनी मेडिकल हेल्थवर लक्ष द्यावं, म्हणून…

आणि अखेर २०२१ चा तो दिवस आला. दोन्ही भावांनी गनचा वापर केला. स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा जीवनप्रवास संपवला…!

या सगळ्याचा खुलासा झाला तो फरहानने लिहीलेल्या लांबसडक पत्रातून, जे त्याने स्वतःच्या इंस्टाग्रामवर टाकलं होतं. त्या पात्राच्या पोस्टनंतर त्यांनी हे कृत्य केलं होतं.

त्यांनी हे का केलं? याचं उत्तर होतं, त्यांचा मानसिक आजार, त्यांचं डिप्रेशन.

दोन्ही भाऊ प्रचंड डिप्रेशनमध्ये होते. कुणाशी तरी बोलुन यातून बाहेर येण्याची त्यांना इच्छा होती मात्र तसे पर्याय उपलब्ध नव्हते. त्याने त्याच्या लेटरमध्येही याचा उल्लेख केला होता.

“मानसिक आजार हा मोठा इशू आहे. मात्र ते असणं वेगळं असं काही नसतं. ब्रेनचा एक भाग असतो ज्याला विकार झालेला असतो आणि म्हणून डिप्रेशन येतं. मात्र सोसायटीचा विचार करून आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. मुळात का शारीरिक आणि मानसिक आजारामध्ये फरक केला जातो? त्याला का ॲक्सेप्ट केलं जात नाही? त्यावर उपचार केले तर बाहेर निघणं शक्य आहे. मात्र आमच्यासोबत असं झालं नाही म्हणून आम्ही हा पर्याय निवडत आहोत”

तर त्यांनी यामध्ये घरच्यांचा का जीव घेतला, याबद्दल म्हटलं होतं…

“मी आणि माझा भाऊ आमच्या घरच्यांवर सगळ्यात जास्त प्रेम करतो. म्हणून आमच्या जाण्याने आम्ही आमच्या घरच्यांना त्रास नाही करू देऊ शकत. म्हणून त्यांनाही आम्ही सोबत घेऊन जात आहोत.”

शेवटचा प्रश्न ज्याने सगळ्या आजूबाजूच्या लोकांना देखील प्रश्नात पाडलं होतं ते म्हणजे…

गनने शूट करूनही आवाज कसा आला नाही?

याचं उत्तर दिलं पोलिसांनी – त्या गन सायलेंट होत्या.

अशाप्रकारे खूप प्लॅन करून या टॉव्हीड भावांनी आपला आयुष्य संपवलं होतं. मात्र जाता जाता डिप्रेशन, मानसिक आजार यावर लक्ष देणं किती गरजेचं आहे, हे सांगितलं!

हे ही वाच भिडू :

 

 

                                                                                                    

Leave A Reply

Your email address will not be published.