टोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम किर्लोस्करांमुळेच!
टोयोटा कंपनीचं नाव ऐकलं की एकतर बड्या नेत्याचा ताफा आठवतो किंवा मग एखाद्या सिनेमामधली हीरोची एंट्री डोक्यात येते. टोयोटाच्या गाड्यांनी श्रीमंतांपासून ते अगदी सामान्यांच्या मनात घर केलंय. फॉर्च्यूनर, ईनोव्हा सारख्या गाड्यांनी श्रीमंतांच्या दारात जागा मिळवलीय.
ही टोयोटा कंपनी मुळात भारताची नाही तर जापानची. ही कंपनी भारतात येण्यामागे आणि आज ज्या उंचीवर पोहोचलीय त्यामागे विक्रम किर्लोस्कर या मराठमोळ्या उद्योजकाचा फार मोठा हात आहे.
विक्रम किर्लोस्कर यांचं कुटूंबच मुळात उद्योगात होतं. वडील श्रीकांत किर्लोस्कर तर आजोबा एस एल किर्लोस्कर… भारतातला पहिला लोखंडी नांगर बनवणारा कारखाना एस एल किर्लोस्करांनी 1988 साली सुरू केला.
किर्लोस्कर गृपच्या संस्थापकांचे ते नातू, म्हणजे विक्रम किर्लोस्कर हे मुळातच श्रीमंत होते.
प्राथमिक शिक्षण त्यांनी उटी मध्ये घेतलं. त्यानंतर एम आय टी महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरींगचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर ते घरच्या व्यवसायात उतरले. असं म्हणतात की, ‘हॉटेलच्या मालकाला जेवण बनवण्यापासून ते टेबल पुसणं, भांडी घासणं इथपर्यंत सगळी कामं येत असतील तर ते हॉटेल नक्कीच बक्कळ पैसा कमवतं’ असंच काहीसं विक्रम किर्लोस्कर यांनीही टोयोटाला भारतात लाँच करण्यापुर्वी केलं केलं.
मुळची जापानमधली ही टोयोटा कंपनी भारतात 1997 साली आली. खरंतर, टोयोटा कंपनी किर्लोस्कर गृपच्या साथीनं भारतात पदार्पण करणार हे ठरलं होत. त्यासाठी कंपनीच्या इंजिनीअर्सवर प्लानिंगची जबाबदारी सोपवणं किंवा भरपूर पैसे देवून एखादा हुषार व्यक्ती या कामासाठी नेमणं हे विक्रम यांच्यासाठी अगदी सोपं होतं.
पण तसं न करता विक्रम यांनी स्वत: जपानमध्ये जावून टोयोटा मोटर्सचं काम कसं चालतं हे पाहायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी टोयोटामध्ये जनरल मॅनेजर या पोस्टवर काम सुरू केलं. हे काम करत असताना प्रत्येक गोष्टीतले बारकावे, प्रत्येक मशिनची काम करण्याची पद्धत हे त्यांनी जवळून पाहिलं आणि प्रत्येक गोष्टीत सुधारणा कशी करता येईल हा विचारही सुरू असायचा.
आता हे सगळं करताना त्यांची फॅमिली किंवा त्यांची गर्भश्रीमंती त्यांना कुठेही आडवी आली नाही. “जर एखादी गोष्ट करायची असेल तर ती शक्य तितक्या चांगल्या प्रकारे केली पाहिजे आणि हे करताना जर हात मळणार असतील तर त्यात काहीच हरकत नाही.” असं त्यांचं म्हणणं होतं.
त्यानंतर ते भारतात परतले आणि त्यांनी स्वत: प्रोडक्शन प्लांट डीजाईन केला. हा प्लांट त्या काळातील भारतातील गाड्या बनवणाऱ्या इतर सर्व प्लांट्सपेक्षा अतिशय वेगळा आणि आधुनिक होता. त्यांनी जापानमधली टोयोटाची प्रत्येकच गोष्ट भारतात आणली असंही नाही.काही गोष्टी ज्या तेव्हा जापानमध्ये गरजेच्या होत्या पण भारतामध्ये त्या काहीही कामी आल्या नसत्या त्या गोष्टी त्यांनी भारतातील प्रोडक्शन प्लांटमध्ये वगळल्या.
भारतात टोयोटानं ‘टोयोटा किर्लोस्कर मोटर्स’ या नावानं पाऊल ठेवलं.
भारतातील ग्राहकांची गरज लक्षात घेऊन 2000 साली टोयोटानं क्वालिस ही गाडी भारतात लाँच केली. क्वालिसनं भारतातलं मार्केट इतकं खाल्लं की, फक्त दोनच वर्षात टोयोटानं लोकल मॅन्यूफॅक्चरर्स असलेल्या टाटा आणि महिंद्रा च्या मागून येऊन 20 टक्के मार्केट शेअर मिळवलं.
2003 मध्ये कॅम्री आणि कोरोला या दोन गाड्या लाँच केल्या. पण या दोन गाड्या काही फारश्या चालल्या नाही आणि मग 2005 साली क्वालिसला रिप्लेस करण्यासाठी कंपनीनं ईनोव्हा गाडी लाँच केली. ही गाडी मार्केटमध्ये प्रचंड चालली. जवळपास सर्वच नेतेमंडळींच्या ताफ्यात ईनोव्हा दिसू लागली.
त्यानंतर 2008 मध्ये लाँच केलेल्या फॉर्च्यूनर नेही जबरदस्त मार्केट खाल्लं. ग्लांझा, अर्बन क्रुझर, इनोव्हा-फॉर्च्यूनरची नवी मॉडेल्सही मार्केटमध्ये आली. टोयोटाच्या या एकंदरीत प्रवासात विक्रम किर्लोस्कर यांचा मोलाचा वाटा होता.
टोयोटा ही आता चारचाकी गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांच्या यादीत भारतात चौथ्या क्रमांकावर आहे. टोयोटानं मागच्या 20-25 वर्षांत मारलेल्या या मुसंडीमागे सर्वात मोठा वाटा हा विक्रम किर्लोस्कर यांचाच आहे.
हे ही वाच भिडू
- ज्या काळात भारतातून गोष्टी निर्यात होत नव्हत्या तेव्हा ‘किर्लोस्कर’ कंपनी मैदानात उतरली
- अप्पासाहेब पंतांच्या सांगण्यावरून नेहरू जेंव्हा किर्लोस्करवाडीला भेट देतात…
- आणि म्हणून सातारच्या ब्रिटीश कलेक्टरनी स्टेशनचं नाव बदलून ‘किर्लोस्करवाडी’ केलं.