जगभरातल्या दहशतवाद्यांकडे TOYOTA चे हायलक्स पिकअप-ट्रक्स कसे पोहचायचे..
२४ डिसेंबर १९९९ या दिवशी इंडियन एअरलाईन्सच्या विमानाच अपहरण करण्यात आलं. हे विमान अफगाणिस्तानातल्या कंदहार येथे नेण्यात आलं. पुढचे काही दिवस पेपरात फोटो झळकत होते. या फोटोत इंडियन एअरलाईन्सचं विमान दिसत होतं.
आतंकवादी दिसत होते, त्यांच्या हातात AK47 दिसत होत्या. पण या सगळ्यात उठून दिसत होते ते टोयोटा लिहलेले पिकअप ट्रक्स..
कट टू २००१ च्या सप्टेंबर महिन्यात येवू.
या काळात अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला. याचा परिणाम म्हणजे अमेरिका अफगाणिस्तानात घुसला. पाठोपाठ जागतिक मिडीया देखील पोहचली. यातलेच एक होते डेविड किलक्युलैन. ते अफगाणिस्तानात तालिबान्यांना भेटत होते. AK 47 घेतलेल्या अनेक तरुणांना भेटल्यानंतर त्यांना एक कॉमन गोष्ट आढळली. ती म्हणजे बऱ्याच मुलांच्या हातावर कॅनडाच्या झेंड्यावर असणाऱ्या मॅपल वृक्षाच्या पानाचा टॅटू होता..
अफगाणिस्तानातल्या ते ही तालिबानी तरुणांच्या अंगावर मॅपड वृक्षाच्या पानांचा टॅटू असण्याचा दूरदूर संबंध नव्हता. डेविड याच शोधाच्या मागे लागले. हा शोध पोहचला टोयोटाच्या ट्रकपर्यन्त..
टोयोटाच्या हायलक्स मॉडेलबद्दल जगभरात प्रचंड क्रेझ होती.
खासकरून युद्धासारख्या कारवाईत हे मॉडेल हमखास वापरलं जायचं. तालिबानी फौजेकडे तर टोयोटा हायलक्स हेच एकमेव मॉडेल होते. डेविड यांनी शोध घेतल्यानंतर त्यांना माहिती मिळाली की, सुरवातीला टोयोटाच्या याच हायलक्स मॉडेलची क्रेझ पाहून खाजगी व्यापाऱ्यांनी डुप्लीकेट बनावटीचे, जूने ट्रक्स अफगाणिस्तानात विकले होते. पण ते ओरिजनल नसल्याने काही महिन्यातच हे ट्रक्स फेल जावू लागले.
त्यानंतर कॅनडा मधून अफगाणिस्तानात टोयोटाचे ओरिजनल हायलक्स पीकअप ट्रक आले. या सर्व ट्रक्स वरती कॅनडाच्या मेपल वृक्षाच्या पानाचा आकार छापण्यात आला होता. तेव्हापासून अफगाणिस्तानात एक समीकरण झालं ते म्हणजे मॅपडलच पान म्हणजे ओरिजनल. याच प्रभावातून बऱ्याच तालिबानी मुलांनी आपल्या शरीरावर मॅपल वृक्षाचं पान गोंदवून घेतलेलं होतं..
टोयोटा हायलक्स चा आतंकवादी इतिहास.
जगभरातल्या दहशतवाद्यांमध्ये काही गोष्टी कॉमन होत्या. त्यातली प्रमुख गोष्ट AK 47 आणि टोयोटाचा हायलक्स ट्रक. फक्त अफगाणिस्तानातच नाही तर सोमालिया, निकारगुआ, आफ्रिकन देशात टोयोटा हायलक्स वापरला जायचा. टोयोटा कंपनीने हायलक्स मॉडेल पहिल्यांदा १९६८ साली बाजारात उतरवण्यात आले.
त्यानंतर दरवर्षी हायलक्स आणि लॅण्डक्रुझरची विक्री वाढतच गेली. आजही टोयोटाचे हे मॉडेल चालूच आहेत. मुळात हा पीकअप ट्रॅक दणकट आणि वजनाला त्या मानाने कमी होता. कोणत्याही रस्त्यावर चालायचा. मेन्टनन्स नावालाच. वीस माणसं आणि पाहीजे ती छोटी हत्यारे घेवून जाण्यासाठी सगळ्यात परफेक्ट मॉडेल म्हणून दहशतवाद्यांनी हा ट्रक्सला पसंती दिली..
सगळ्यात पहिल्यांदा हा ट्रक्स सोमालियातील बंडखोरांकडून वापरण्यात आल्याचं सांगितलं जातं. सोमालिया आणि इथोपियातमध्ये जेव्हा युद्ध झालं तेव्हा हे पीकअप ट्रक सोमालियात आणले गेले. तिथून पुढे सोमालियाच्या समुद्रीचाच्यांनी ( म्हणजे समुंदर के लुटेरे ) यांनी तो वापरायला सुरवात केली. समुद्रातलं काम झालं की मिळालेला माल जमिनीवर उतरवून घेवून हवं तिथं पळून जाण्यासाठी या ट्रक्सचा उपयोग झाला.
१९७२ सालात लिबियाने आफ्रिकेतल्या चाड देशाच्या उत्तर भागावर हल्ला केला.
हा भाग आपल्या ताब्यात घेतला. पुढे १९८७ ला चाड आणि लिबियात यावरून युद्ध झालं. या युद्धात चाड च्या बाजूने फ्रान्स उतरला होता. यावेळी फ्रान्सने चाड देशाला बरीच मदत केली. या मदतीत मुख्य गोष्ट होती ती टायोटाच्या हायलक्स ट्रक्सची. फ्रान्सने या ट्रक्सना मॉडिफाय केलं होतं. पाठीमागे मशीनगन देवून ४०० ट्रक्स त्यांनी चाड देशात पाठवले. या युद्धात या ट्रक्सनी लिबीयाच्या टॅकरना धुळ चारल्याचं सांगण्यात येतं..
आत्ता तूम्ही म्हणालं इतकं सगळं आहे तर हे टोयोटा कंपनीला कस समजलं नाही. मुळात आपल्या गाड्या दहशतवादी कृत्यांसाठी वापरल्या जात आहेत म्हणल्यानंतर त्यांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष कस काय केलं..
यासाठी २००१ मध्ये न्यूयार्क टाईम्सची बातमी पहायला हवी. या बातमीत सांगण्यात आलं होतं की अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन आणि त्याचा कमांडर मुहम्मद लतिफ यांची आवडती कार टोयोटाची लॅण्डक्रुझर आहे. त्यानंतर मुहम्मद लतिफचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात तो लॅण्डक्रुझरमधून प्रवास करत होता. हाच संदर्भ घेवून टोयोटा कंपनीला प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा त्याचं उत्तर होतं. आम्ही आजवर फक्त एकच लॅण्डक्रुझर अफगाणिस्तानला निर्यात केलेलं आहे. संपूर्ण अफगाणिस्तानात आमच्या कंपनीचं कुठलही नेटवर्क नाही..
थोडक्यात कंपनीकडून हायलक्स किंवा लॅण्डक्रुझर थेटपणे कधीच दहशतवाद्यांच्या हातात पोहचल्या नाही. मग या गाड्या आल्या कुठून. तर याच उत्तर पुन्हा अमेरिका आणि युरोपात जातं. सिरीयाई युद्धात युरोपीयन देशांनी हायलक्स बंडखोरांना पाठवल्या होत्या. फ्रान्सने देखील चाड देशात टोयोटा हायलक्स पाठवले. बऱ्याचदा युरोप, अमेरिका, कॅनडा येथे आयात करून या गाड्या आफ्रिकन देशात पाठवण्यात आल्या. तिथून पुढे त्या दहशतवादी व बंडखोरांच्या हाती येत गेल्या.
दूसरी थेअरी अशी की टोयोटाने आपल्या या गाड्या मोठ्या प्रमाणात रेडक्रॉस संघटना आणि UN च्या जगभर चालणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी देवू केल्या.
गेल्या चार दशकात सुमारे दिड लाख गाड्या अशा संस्थाकडे टोयोटाने दिल्याची नोंद आहे. साहजिक स्थानिक ठिकाणी रेड क्रॉस किंवा UN काम करत असताना त्यांनी टोयोटा हायलक्स सारखे ट्रक्स वापरले. त्यामुळे यांच्यावर “मानवी कल्याणासाठी” हा टॅग लागला. बंडखोर असोत किंवा दहशतवादी यांनी देखील यातूनच आपण देखील मानवी कल्याणासाठी काम करतोय हे दाखवून देण्यासाठी टोयोटा चे हायलक्स ट्रक्स वापरले. बऱ्याचदा ते अशा संस्थाकडूनच बंडखोरांनी ताब्यात घेतले.
हे ही वाच भिडू
- मोठी दाढी ठेवल्याच्या कारणावरून कॉमेंटेटर हाशिम अमलाला आतंकवादी म्हणाला होता
- भूकंपामुळे जपानमध्ये क्रांती झाली आणि त्यातूनच टोयोटा कारचा उदय झाला
- पैसा मिळवणं हे मुख्य धोरण तरीही टाटांनी गुड कॅपिटलिस्ट ही इमेज कशी सेट केली…?