कोकणात भूतांमुळे गावातली लोकं गाव रिकाम करून चार दिवस वेशीवर जावून राहतात.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या प्रथा आहेत. त्यात कोकणात जरा जास्तीच. आम्हा घाटी लोकांना भिती दाखवण्यासाठी कोकणातल्या लोकांकडे असणारं ब्रम्हास्त्र म्हणजे भूतं. कोकणातली भूतं लय डेजंर हे लहानपणापासून ऐकत आलोय. चुकून एखाद्याचे पै पावणे कोणतात असले तर त्यांच्यातला पोरगा लहानपणी सुट्टीला कोकणात जायचा. आत्ता कोकणात गेलाय म्हणल्यानंतर आल्यावर आंबे खाल्ले, फणस खाल्ले, समुद्रावर गेलो अस काहीतरी इंटरेस्टींग सांगेल कनाय. तर नाही.

ही कोकणातलं सुट्टी घालवून आलेली लहान पोरं पण भूतांच्या गोष्टी सांगायची आणि आमची कोकणाच्या नावानं लहानपणापासून टरकायची. बर कोकणातल्या भूतांच प्रकरण इतक्यावरच थांबल नाही. टिव्ही लावला तर हातात बंदूक घेवून आत्ता आण्णा पण येत असतात. 

कोकण आणि भूतं हे समीकरण घाटी लोकांसाठी अस लहानपणापासून जुळलेलं आहे. कोकण जितकां दिवसा भारी वाटतो तितकाच रात्रीचा भयानक असतो अस आमचं घाटी लोकांच मत. 

कोकणातल्या भूतांच्या स्टोऱ्यामध्ये अशीच एक गोष्ट लोकं गाव सोडून जायची. इतकं माहिती होतं की कोकणातल्या काही गावात ही प्रथा आहे. म्हणजे काय करतात तर चार वर्षातून एकदा संपुर्ण गावातली लोकं गावाच्या वेशीबाहेर जावून राहतात. 

का? 

तर म्हणे चार दिवस आणि तीन रात्री गावात भूतं येतात. गावभर भूतं असल्याने गावातली माणसं बाहेर जावून राहतात. या चार दिवसात गावात एकही माणूस पाऊल ठेवत नाही. प्रथा ऐकून होतो. म्हणून विचार केला याचा शोध घ्यावा आणि आपल्यासोबतच बोल भिडूच्या कार्यकर्त्यांना देखील चार शब्द सांगावेत. 

तर या प्रथेला गावपळणीची प्रथा म्हणतात.

जितकं भूताटकीचं वातावरण घाटी लोकांसाठी सेट करून ठेवलं जात तितकं भयानक वगैरे काही नसतं. गावपळणीची ही प्रथा सिंघदुर्ग जिल्ह्याच्या आचरे आणि पंचक्रोशीतल्या गावात प्रसिद्घ आहे. वायंगणी, चिंदर, मुगणे अशा गावांमध्येही दर चार वर्षींनी गावपळण होत असल्याची माहिती देण्यात येते. 

आत्ता गावपळण म्हणजे नेमकं काय असतं ? 

गावपळण म्हणजे गावातली लोकं दर चार वर्षांनी एकत्र जमतात. गावातल्या ग्रामदैवताचा कौल घेतला जातो. कौल मिळल्यानंतर या तारखेपासून त्या तारखेपर्यन्त असे चार दिवस ठरवले जातात. तीन रात्री आणि चार दिवस गावाच्या वेशीबाहेर जावून रहायचं असतं. कौल मिळाली आणि तारिख ठरल्याची बातमी गावासोबतच पै पाव्हण्याच्यात, मुंबईच्या चाकरमान्यांच्यात पोहचते आणि बाहेर राहणारी मंडळी बुकींगच्या कामाला लागतात. संपुर्ण गाव यात्रेला जमतो तसा गावपळणीसाठी गावात येतो. 

या दरम्यान गावपळणीत राहण्यासाठी तात्पुरत्या मंडपाचा खुंटी पुरून शुभारंभ केला जातो. घर सारवले जाते. गावपळणीच्या राहूट्या दिवाळीच्या दिवसांप्रमाणे सजवल्या जातात. जेवणासाठी स्वतंत्र जागा, कोंबड्यासाठी स्वतंत्र खोली, गुरांचा गोठा तयार केला जातो. 

हे सगळ झाल्यानंतर संपुर्ण गाव गावाच्या वेशीवर येवून राहतो. या चार दिवसात सर्वजण एकत्र राहतात. संपुर्ण गावाचे एक कुटूंब होते. दिवसभरात नदीवरचे मासे खायचे, दंगामस्ती करायची, शिकार करायची असे कार्यक्रम चालतात. या चार दिवसात गावात कोण फिरकत नाही. चार दिवसात संपुर्ण गाव ओस पडलेला असतो. पण इकडे एक जत्राच भरलेली असते. महिलांच्या फुगड्या, भेंड्यापासून अंताक्षरीपर्यन्त वेगवेगळे कार्यक्रम रंगतात. 

गावपळणीच्या प्रथेच कारण खरच भूतं असतात का ? 

कोकण म्हणजे भूतं ओघाने आलीच. असं सांगितलं जातं की आचरे गावाच ग्रामदैवत असणारे श्री देव रामेश्वर शिवशंभूने हे गाव भूतगणांना वावर करण्यासाठी तीन दिवस दिलेलं आहे, दूसरी एक आख्यायिका अशीही आहे की पूर्वी गाव नांदत नव्हता तेव्हा गाव नांदावा म्हणून तीन दिवस मी गाव ओस पाडेल असे वचन रामेश्वराने दिले होते. ते वचन पाळण्यासाठी चार वर्षातून एकदा ही प्रथा पाळण्यात येते. 

सोबतच शास्त्राच्या भाषेतून सांगणारी माणसं सांगतात की या चार दिवसात घरातली रोगराई मरते, गावातली घाण नष्ट होवून जाते. आणि चार दिवस आपल्या जो गाव एकत्र येतो तो पुढचे चार वर्ष एकत्र गुण्यागोविंदाने नांदतो. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.