देवा काहीही कर पण पुढच्या जन्मात मला “शिक्षकाचा पोरगा” करु नको.

भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकिय प्रश्नाबाबत आमचा पक्ष पुढाकार घेत असून सर्वांना समान संधी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असु. समाजामध्ये सध्या जे प्रश्न आहेत ते आम्ही नक्कीच दूर करु….

बाता मारणारे खूप आले. प्रत्येक पक्षाने, प्रत्येक राजकिय नेत्याने वेगवेगळ्या वर्गाचे प्रश्न उभा करुन लय म्हणजे लय मोठ्ठा संघर्ष उभा केला. मालकांच्या संघटना, चालकांच्या संघटना, रिक्षावाल्यांच्या संघटना, हमालांच्या संघटना, इंजिनियरच्या संघटना, बेस्ट वाल्यांच्या संघटना. बसल्या ठिकाणी उभ्याने निघणाऱ्या संघटना. आत्ता तर MPSC च्या पोरांनी पण संघटना काढली. राजकिय पक्षांना प्रत्येकाच दुखणं कळालं पण शिक्षकांच्या पोरांच दुखणं काय? त्यांच्या संघटना काढायचा कोणीच का विचार करत नाही?

मुळात या पोरांचा विद्रोह असाच घराचं दार बंद करुन चालणार काय? आज सामाजिक प्रश्नांचा गदारोळ माजवण्याची वेळ आली आहे, म्हणून हा एक विद्रोही लेख.. 

तर मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. माझी हि आयडेंटी मला जाती आणि गावामुळे मिळालेल्या आयडेंटीपेक्षा मोठ्ठी होती. आज मी या लेखाद्वारे शिक्षकांच्या मुलांची आणि त्याद्वारे होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडणार आहे. तुम्ही फक्त शेवटपर्यन्त साथ द्या इतकच. 

तर या गोष्टीची सुरवात होते अगदी माझ्या जावळापासून. आईबाप शिक्षक आहेत म्हणल्यावर माझं जावळ काढण्याचा मुहूर्त रविवारचा ठरवण्यात आला होता. मला वाटतं हा माझ्यावर झालेला पहिला अत्याचार असावा. जावळाच्या दिवशीच माझी शाळा कोणती असावी यावर माझे वडिल आणि शाळेतील इतर शिक्षक यांच्यात गुढ चर्चा झाल्याचं मला आठवतय. पप्पांनी तर पतसंस्थेच कर्ज काढण्याची तयारी केली होती पण मम्मीने चौथीच्या स्कॉलरशीपला हा निर्णय घेवू अस सांगितलं आणि विषय लांबला. 

माझ्या शाळेचा निर्णय हा घरातल्यांच्या समोरचा सर्वात मोठ्ठा पेचप्रसंग होता. आपल्याच शाळेत घालावं तर सत्यपरस्थिती माहिती होती. दूसऱ्या शाळेत घालावं तर लक्ष राहणार नाही. आईबाप माध्यमिक असल्याने प्राथमिकचा प्रश्नांचा लोड आला नव्हता. खाली बसून निवांतपणे प्रार्थना म्हणायला लावणाऱ्या शाळेत मला अॅडमिशन मिळालं होतं यात मी सुखी होतो. 

तीन वर्ष आपल्या घरात दिवसभर कोणी नसतं हे समजण्यात गेली. याच काळात भोसले सरांची मुलगी, शिंदे सरांचा पोरगा, कुलकर्णी मॅडमची पोरगी असे हितसंबध समजण्यात गेले. आत्ता हि मुलं इयत्ता तिसरी पर्यन्त माझे चांगले मित्र होते. पण पुढे चौथीची स्कॉलरशीप होती.

हाच तो क्षण होता ज्या क्षणी सगळ्या मास्तरांची पोरं एकमेकांची आयुष्यभर शत्रू होणार होते. 

पहिला दिवस होता. स्कॉलरबॅचच्या पोरांची खास स्कॉलरबॅच सुरू करण्यात येणार होती. नेमका त्या दिवशी दैवी योगाच्या कृपेने मी आजारी पडलो. पण आमच्या शिक्षक बापाने तरिही मला या फालतू चाचणीला घालवलं. कसाबसा मी वर्गातल्या ५० पैकी ३० जणांच्या स्कॉलरबॅचमध्ये आलो. इथेच मला स्पर्धा म्हणजे काय याची जाणिव झाली. सरसकट शिक्षकांची पोरं या स्कॉलरबॅचमध्ये असायची. दोन चार जण ग्रामीण भागातून नंबर येतो म्हणून तालुक्याच्या गावातनं फक्त चौथीसाठी शेजारच्या गावात शाळेला जावू लागली. 

रिझल्ट लागला. आपणाला स्कॉलरशीप मिळाली नाही. तसही ते पैसे घेवून आमचे फादर पाचव्या वेतन आयोगात कसला बोनस मिळवणारं होतं ते त्यांनाच माहिती. पण इथे आयुष्यातला माझा शत्रू समजला होता. भोसले सरांची पोरगी आणि जाधव सरांच पोरगं दोघांच्या पोरांना स्कॉलरशीप मिळाली. ठिक आहे न, स्कॉरलशीपचे पैसे घ्यायचे आणि शांत बसायचं अस तर ते नाही, भोसले आणि जाधव सर आपल्या पोरांना घेवून घरला आले, पेढे देवून गेले. दूसऱ्या दिवसापासून भोसले सराची पोरगी आपल्याबरोबर बोलायची बंद झाली.

एका फटक्यात शिक्षकांचा फेल गेलेला पोरगा म्हणून माझ्यावर शिक्का बसला. बर हा क्षण होता इयत्ता चौथीतला. 

असल्याच वातावरणात पाचवी आली. वडिलांचे सगळे मित्र, शिवाय भोसले सरांच्या पोरीबरोबर बोनस म्हणून खुद्द भोसले सर, पाटील सराचं पोरगं आणि पाठीमागं जागा पकडणारा मी. पाचवीतच आपल्याला कळालं, आपण काय पहिल्या बॅचवर बसायला जन्माला आलो नाही. पण पहिल्याच लेक्चरला पाटील सरांचा पोरगा म्हणून चव्हाण नावाच्या शिक्षकाने मला पुढं बसवलं. या प्रसंगाचा एकच तोटा झाला. जातीव्यवस्थेचा गोड अनुभव आल्याने माझ्यासारखा एक समाजसुधारक महाराष्ट्रातून वजा झाला. 

असो, तर इथून पुढे मी पाठीमागे रहात गेलो. शिक्षकांची इतर पोरं पुढेच होती. मग प्रत्येक ठिकाणी अरे तो रे पाटील सरांचा मुलगा वाया गेला ना. पुर्वअनुभवावर शहाणं न होता पुन्हा आमच्या वडिलांना सातवीच्या स्कॉलरशीपला बसवलं. रिझल्ट सांगायची गरज नाही. मस्तपैकी भोसले सरांच्या पोरींचे पेढे खावून ढेकर दिला. इयत्ता सातवीत आपण फेल जाण्याबरोबर निर्ल्लज देखील झालो आहोत याचा अनुभव आला.

आत्ता वर्ग बदलत होता पण हेच रिपीट होत होतं. तेच शिक्षक. तेच शिक्षकांचा मुलगा म्हणून येणार बर्डन. अहो गावातल्या चौकात भेळ खाल्ली तर एखादा शिक्षक जावून बापाला सांगणार. एक्स्टॉ क्लास आणि वेतन आयोगावर दिर्घ चर्चा हेच पहात दिवस जात होते. पण याच काळात एक रंगेबिरंगी चित्र टिव्हीवर आलं होतं. त्याच नाव फॅशन टिव्ही. दूपारच्या सुट्टीत घरी कोणीच नसल्यानं दूपारचा फॅशन टिव्ही नाहीतर स्टार वर्ल्ड वरची बेवॉच ठरलेली असायची. त्यातही “पुढारी” वाले विश्वसंचार म्हणून एक खटाखटी फोटो छापूनच टाकायचे. वेगवेगळे प्रयोग शिकलो तेव्हा याच देवाणघेवाणीतून फेल गेलेल्या पोरांची एक भट्टी जुळून आली. सिडी प्लेअर आले. घरात कोणी नसलं की सेटअप लावायचा आणि संपुर्ण दिवस घुमायचा.

आत्ता पाटील सरांच पोरगं फेल गेलं यावर शिक्का बसला होता. तसे माझ्याबरोबर असणाऱ्या सगळ्यांवर तोच शिक्का होता पण आपण खास शिक्षकाची पोरं होतो. त्यामुळे हे खास होतं.

दहावीत भोसले सराची पोरगी बोर्डात आली. मी पास झालेलो. दहावीची एकच आठवण म्हणजे मी सराव चाचणीला कॉपी करताना सापडलेलो. ते पण बरोबर भोसले सरालाचं. मला आठवतय त्या रात्री कारगील प्रश्न सोडवायला बसल्यासारखं आमच्या वडिलांनी आणि भोसले सरांनी चार तास चर्चा केलेली. दोघात घेतलेल्या पाशवी बहुमताच्या आधारावर माझ्यावर पुन्हा एकदा वाया गेलय म्हणून शिका मारला होता. आत्ता हा भोसले सर काय माझा सासरा होणार नव्हता. पण संस्थेच्या पतसंस्थेच कर्ज आमच्याच बापाला कस मंजूर होतं याचा खरा राग भोसले सराला होता. 

तरिही मी सायन्सला गेलो. पैसे देवून इज्जत वाचवण्यासाठी आईबाप शेवटचा उपाय म्हणून पोराला सायन्सला घालतात. मी काठावरच पास झालो. ग्रुप गेला म्हणून फादर विट्याच्या एका कॉलेजला पैसे भरुन आले. आत्ता डिप्लोमा नायतर BCA, BBA करायला लागणार होतं. मी मार्ग शोधला तो MPSC चा. घरात UPSC च नाव देखील घेवू शकत नव्हतो.

घरी म्हणालो, इक दिन आयेंगा….

OK म्हणून बापाने BA ला टाकलं. चार वर्ष कॉलेजबरोबर एकनाथ पाटील नाचवले, इथं फेल झालेला शिक्का पुसायचा म्हणून अभ्यास केला पण काय जमलं नाय गड्या. मग पुन्हा बापाला बोललो. बाप म्हणला आत्ता तूला काय करायचं ते कर. मग जर्नेलिझम केलं. हे आपल्याला जमलं. मापं काढण्याचा पिंड हा आपल्या अंगात आलेला तो भोसले सराच्या पेढ्यामुळच. हळुहळु करत पुण्यात बस्तान बसवलं.

आत्ता खा, प्या आणि निवांत रहा हे आपलं ध्येय झालं होतं. देवा मला काहीही कर पण शिक्षकाच पोरगं करु नको. निम्म आयुष्य कम्पॅरिझन मध्ये गेलं याच दुख: पोटात गिळून मी माझ्या पातळीवर लढत होतो. हळुहळु पोरगं त्याच्या मनासारखं करतय ना मग ठिकाय हे तत्व आमच्या बापाला कळून आलेलं. फादरने आत्ता टिचर रुममधल्या चर्चा वाऱ्यावर सोडायला सुरवात केलेली. 

आणि अखरे तो दिवस आला. एका थंडिच्या गुलाबी संध्याकाळी मोरपीसासारखी अलगद मला भोसले सरांची पोरगी भेटली. अगदी कानाच्या मागून येवून तिने ओळख दिली. गुलाबी आवाजात मला म्हणाली काय करतो. मी सांगितलं. आत्ता तिची वेळ होती. मी विचारलं तेव्हा म्हणाली. इंजिनियरींग केलं आत्ता UPSC. पप्पा म्हणतायत या वर्षी पोस्ट निघाली पाहीजे. बघू लास्ट अटेंम्प्ट आहे. ऑल इज वेल म्हणतं आपण हे देवा शिक्षणाकाचा पोरगा काय पोरगी पण करु नको म्हणून तिथून आलो. इक दिनं आयेंगा.

हे ही वाचा. 

2 Comments
  1. Prasad Waghmode says

    डोळ्यात पाणी आलं रे..

Leave A Reply

Your email address will not be published.