तिची आठवण कायम राहावी म्हणून माणिक सीताराम गोडघाटे “ग्रेस” बनले..

मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरी खोल

दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फुल…

अशा अनेक जीवाला हुरहूर लावणाऱ्या कविता ग्रेसांनी लिहिल्या. कवी ग्रेस म्हणल्यावर त्यांच्या कवितेत आढळणारी एक गूढता. लवकर न समजता येणाऱ्या त्यांच्या कविता. आभाळाची निळाई, संध्याकाळ,गूढता, दुःख , नैराश्य , काळोख याविषयी असणार अगम्य आकर्षण ग्रेसांनी आपल्या कवितेतून मांडलं.

आय एम फ्री बट ; नॉट अव्हेलेबल अशी गूढ वाटणारी त्यांच्या घराची पाटी होती.

ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता ‘ या काव्याने मराठी रसिकांच्या मनामनात ग्रेस पोहचले. ग्रेस यांच्या आईचे ज्यावेळी निधन झाले त्यावेळी आईला तिरडीवरून नेत असताना त्यांना या ओळी सुचल्या. त्यांच्या दुःखी मनाने हि कविता लिहिली. तो उगम होता साहित्यविश्वातल्या दुःखाच्या महाकवीचा अर्थात कवी ग्रेस यांचा.

ग्रेसांबद्दल बोलायला बरंच काही आहे पण आजचा त्यांच्याबद्दलचा किस्सा जास्त महत्वाचा आहे.

१० मे १९३७ रोजी ग्रेसांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव होतं माणिक सीताराम गोडघाटे. त्यांचे वडील सैन्यात होते. अगदीच लहानपणी आईच्या अकाली निधनाने घरची जबाबदारी त्यांच्यावर पडली होती. आईच्या जाण्याने आणि वडील सैन्यात असल्याने त्यांच्यात एकाकीपणा आणि गूढपणा वाढत राहिला.  या विस्कळीत झालेल्या अवस्थेत शिक्षण आणि घर यांचा ताळमेळ राखत ते शिकत राहिले.

सुरवातीला असलेलं माणिक सीताराम गोडघाटे नाव पुढे ग्रेस कस झालं याचाही एक किस्सा आहे. १९५८ पासून त्यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला.

पाश्चात्य अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमनच्या अभिनयाने माणिक गोडघाटे प्रचंड प्रभावित झाले. द इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस या सिनेमात इन्ग्रिड बर्गमन या अभिनेत्रीशी संबंधित ‘ शी इज इन ग्रेस ‘ असं वाक्य उच्चारलं जात.

हा सिनेमा पाहत असताना माणिक गोडघाटे याना वाटलं कि तिने आपल्याला शीळ घातलेली आहे. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला. इन्ग्रिड बर्गमनचे ऋण आठवणीत राहण्यासाठी त्यांनी ग्रेस हे नाव धारण केले.

महाश्वेता नावाच्या एका मालिकेला ग्रेस यांचे शीर्षकगीत होते, हे शीर्षकगीत प्रचंड गाजले. त्याचे शब्द होते

भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते ,

मी संध्याकाळी गातो तू मला शिकवलेली गीते….

मूळ कविताचे नाव होते निष्पर्ण तरूंची राई. हि कविता ग्रेस यांच्या चंद्रमाधवीचे प्रदेश या काव्यसंग्रहातील होती.

कवितांचे शब्द साधे पण वेगळ्याच धुंदीत घेऊन जाणारे, कविता वाचताना आपल्या मनात वेगवेगळे दृश्य उभे राहतात. संध्याकाळच्या गूढ वातावरणाची झलक फक्त ग्रेसांच्या कवितेतून पाहायला मिळते. वाचकांना एका गूढ प्रदेशाची सफर घडवून आणणाऱ्या ग्रेसांच्या कविता आहेत. सध्या सोप्या शब्दांमध्येहि गूढता निर्माण करणारं काव्य त्यांनी निर्माण केलं ,

चांदण्यात आईसाठी वारा दारी येतो , ओळखीच्या वाऱ्या तुझे घर कुठे आहे सांग ?

ग्रेसांच्या कविता या अनुभवायच्या असतात.

ग्रेसांबद्दल त्यांच्या कविता या दुर्बोध आणि समजायला अवघड आहेत असा ठपका ठेवण्यात येतो मात्र याचं उत्तरही त्यांनीच दिल आहे,  कविता दुर्बोध असल्याच्या आरोपांना उत्तर देताना,

  मी माझ्या कवितेचा प्रियकर नाही असे त्यांनी म्हटले होते. माझ्या कवितेने मराठीला काय दिले आहे व ती काय देत आहे याचा विचार मला स्वतःला करण्याचे अजिबात कारण नाही असं म्हणत.

एका भाषणात त्यांनी सांगितलं होतं कि, कठीण भाषेत सांगितले तर ते दुर्बोध आणि सोप्या भाषेत सांगितले तर हे काय सांगता, असा लोक प्रश्न करतात पण, माझी जगण्याची एक तऱ्हा आहे आणि मी आपल्याच तऱ्हेने जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे.

मी जे काव्य करतो ते माझे ‘ स्वगत ’ आहे, असे समजा. ‘ स्वगता ’मध्ये भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वतः निर्माताच असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते पण, हे स्पष्ट करतो की, मी ज्ञानाचे सोंग करत नाही आणि अज्ञान मिरवत नाही, मी शब्दकोषांना नवे शब्द देणारा आहे.

२०११ साली वाऱ्याने हलते रान या काव्यसंग्रहाला ग्रेस याना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. ओल्या वेळूची बासरी, राजपुत्र आणि डार्लिंग, कावळे उडाले स्वामी, चर्चबेल , मितवा असे अनेक काव्यसंग्रह त्यांनी लिहिले, अत्युच्च दर्जाच्या कविता गूढ अगम्य प्रदेशात घेऊन जाणाऱ्या. ग्रेसांबद्दल बोलायचं म्हणजे त्यांच्याच कवितेच्या दोन ओळी,

हे सरता संपत नाहीत ,

चांदणे तुझ्या स्मरणाचे……

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.