मरद लोग पचास रुपये दे के मुझे आती क्‍या पुछते है…मै क्‍या बाजारू हू???

दुपारचे दोन वाजले होते. धोधो कोसळणारा पाऊस. मी एका हॉटेलमध्ये बसून चहा पीत होते. चहामुळे अंगात कणभर का होईना हवेत पसरलेल्या गारव्यासाठी ऊर्जा आली आणि इतक्‍यात मागून टाळीचा आवाज आला. ही टाळी माझ्या कानांना आणि मनाला अस्वस्थ करणारी होती कारण त्या टाळीसोबत बाईपणाचा बाज असणारा खरडा आवाजही होता. मी पटकन माझी मान वळवली तर एक सुंदर तृतीयपंथी महिला एका माणसाकडे पैशाची मागणी करीत होती. बेंबीच्या खाली अगदी शरीराला चापूनचोपून गुंडाळलेली साडी, तिचं ब्लाऊज अत्यंत विलक्षण आणि मोहक पद्धतीने शिवलं होतं. ओठांना साजेसा लिपस्टीकचा रंग, आयलायनर, खांद्यावर अडकवलेली छोटीशी पिशवी आणि त्यात तिचा तो गव्हाळ वर्ण.

मी तिच्याकड स्वतः स्त्री असूनही प्रेमात पडल्यासारखी पाहतच राहिले. मला नेहमी वाटतं, आम्ही बाईपण घेऊन मिरवतो, पण तृतीयपंथी बाया बाईपण सिद्ध करतात. स्वतःला स्वीकारण्याची त्यांच्याइतकी भन्नाट ताकद कोणाकडेच नसते.

त्या माणसाकडून न मिळणारा प्रतिसाद पाहून ती चालत चालत पुढे आली आणि बाहेर पाऊस पडत असल्याने हॉटेलच्या कांउंटरजवळ एक हात कंबरेवर ठेवून उभी राहिली. हॉटेल तसं लहानच होतं. तिच्या या सगळ्या हालचाली पाहताना मात्र माझ्या विचारांची शक्‍ती गोठली होती का ते माहीत नाही. ती पुढे जाऊन उभी राहिली आणि का माहीत नाही पण मी तिला मोठ्याने.

‘दीदी’ अशी हाक मारली.

अर्थात इतरांकडून तिला दीदी ऐकायची सवय नव्हती म्हणून पहिल्या खेपेत तिने माझ्याकडे पाहिले नाही पण नंतर दोन ते तीन हाका मारल्यावर तिने पाहिले.

मी तिला पाहून म्हंटल ‘दीदी, चाय लोगी क्‍या??? ती आली आणि जवळ बसली का माहीत नाही पण एक अनामिक धडधड आता माझ्यात थैमान घालू लागली.

माझा चेहरा बघत तिने विचारलं, ‘तू मेरेको चाय क्‍यूं देगी???

मी म्हटलं, आपसे बात करनी है….

स्वतःच्या मानेला हिसका देत ती म्हणाली, ‘मै क्‍यू अपना वक्‍त खराब करू तेरेसे बात करके???

मी माझ्या पर्समध्ये हात घालून उरळी करून ठेवलेले जवळपास अडीचशे रुपये काढले आणि तिच्यासमोर ठेवले.

ती माझ्याकडे पाहून हसली आणि माझ्या गालावर हात फिरून ती बोट स्वतःच्या कपाळावर नेऊन मोडत ‘बोल मेरी अम्मी…’असं म्हणाली.

इतक्‍यात वेटर आला मी त्याला दोन चहा आणि दोन बनपाव सांगितले.

तिच्याशी जे प्रश्‍न बोलायचे होते, ते डोक्‍यात फिक्‍स असल्याने सुरवात केली. ‘आप कहाकी हो’???

केरला…

मी थोडं निवांत होत, फिर गोवामे कैसे???? हा प्रश्‍न ऐकताच तिने एक सुस्कारा सोडला, खांद्यावरची बॅग काढून समोर ठेवली आणि बोलू लागली, ‘तू पत्रकार है क्‍या…या कोई फेमिनिश्‍ट है. किसी एनजीओमे काम करती है क्‍या ???

तिच्या तोंडी ‘फेमिनिस्ट’ हा शब्द ऐकताच मला हसायला आलं.

मनात विचार आला ‘हाय ये जालीम दुनिया’… पण तरी तो आवरत मी तिला म्हणाले…’इन्सान हूं, अच्छा, ऐसा समजो आपकी छोटी बहन हूं..

आपण एका बोलघेवड्या बाईच्या जाळ्यात अडकलोय हे तिला एव्हाना कळलं होतं, पण ती उठूही शकत नव्हती कारण बाहेर खूप पाऊस होता आणि तिच्याकडे छत्री नव्हती.

ती मानेला हिसके देत बोलू लागली, ‘मरनेको चली थी. अम्मी और अप्पाको मेरे वासते शरम आती थी. खाना खानेकोभी नही पुछते थे. एकबार लिपस्टीक लगाई तो हातको चुल्हे मे डाला.

असं म्हणतं तिने तिचा उजवा हात दाखवला. तकतकीत वॅक्‍स केलेल्या त्या हातांवरच्या भाजलेल्या खुणा तिच्या हातांना विद्रूप सिद्ध करण्यासाठी नक्‍कीच असमर्थ असल्याची जाणीव त्या हातांकडे पाहून मला झाली.

ती पुढं बोलू लागली. ‘अम्मी बोलती थी तुम मरद हो, मेरेको लगता था मै औरत हूँ. मै ऐसी क्‍यूं हूं इसलिये अप्पा अम्मीको मारते थे फिर अम्मी मुझे. ऐसा रोज चलता था. एक दिन मेरी जैसी ही एक दिदिने बोला, गोवा जा, तब दस सालकी थी मै..

भागके आई…इधर आके कुछ समज नही आ रहा था लेकीन इधरका लोग बहुत अच्छा…और मेरे जैसे बहोत लोग थे इधर उनके साथ रेहने लगी, कमाने लगी अभी मै 24 सालकी हूं देख, असं म्हणत ती हसली आणि नंतर आपणच लाडात येत म्हणाली, ‘लडकीलोग किसीको उमर नही बताते, लेकिन तू भी लडकी है ना इसलिए बताई.

मी तिला विचारलं, ‘उसकेबाद आपके घरवालोने कभी ढुंडा नही ?

ती उदास होत म्हणाली, ‘पता नही मै भी ये जाणती नही. ती इमोशनल होतीय हे लक्षात येताच, मी विषय बदलला, ‘आप ये काम क्‍यूं करते हो..कहीपे नोकरी ढुंढो….

आता मात्र मी तिच्या अस्तित्वाबाबतच्या गहन विषयात हात घातला होता. माझे शब्द कानावर पडताच ती आवेगात म्हणाली, ‘नोकरी कौन देगा??? अरे, पाससे कोई गुजरा और गलतीसे हात लगा तो घर जाके नहाता है, और आप नौकरीकी बात करते होते.

मुझे सामने देखके लोग रस्ता बदलते है, मै कोई भूत हूं क्या???

हां मै पैसा मांगती हूं, क्‍योंकी कोई कमानेका चान्स नही देता. कभीकभी सडकपे सोई हूं लेकिन चोरी नही की, इमानदारीसे मांगती हूं. असं म्हणत तिने पदराचे एक टोक तोंडावरून फिरवल आणि चहाचा घोट घ्यायला सुरवात केली.

तिचा आवेग पाहून मी निरुत्तर झाले, आणि मान खाली घातली.

माझा मूड गेलेला पाहून ती म्हणाली, आपके बारेमे बताओ, क्‍या करते हो??? शादी हुआ क्‍या???

मी म्हटलं, नही अभी होनेवाली है…तिच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर आली, ‘अरें वा…दिखाओ फोटो है क्‍या उसका?

मी तिला माझ्या मोबाईलचा वॉलपेपर दाखवला, त्याला पाहून ती म्हणाली, ‘चिकना है ना रे, तेरेसे अच्छा दिखता है…मी मिस्कीलपणे हसत म्हटलं, ‘आप मेरी बेहन हो, और तारीफ उसकी करती हो. ..अरे ऐसेही मजाक, असं म्हणतं ती हसू लागली.

मी तिला विचारलं, यहापे कहा रेहते हो, और गोवा कैसा लगा????

यावेळेस ती आमच्या संभाषणातील शेवटची दोनच मिनीट बोलली पण आयुष्याची शिदोरी देऊन गेली, ‘रेहती हूं इधरउधर किधरभी, ये जगही मेरा घर है. रातको सोनेको सेफ प्लेस चाहिये इसयिए दिदिके यहा सोती हूं, नही तो ये साले, कुत्ते, मरद लोग पचास रुपये दे के मुझे आती क्‍या पुछते है…मै क्‍या बाजारू हू???

कमिनोको एैसेही लगता है. मै अपने दमपे जीती हूं, जिस मां बापने जनम दिया, उन्होने छोडा. अब जो साथ है, वो मेरे जैसे है, खुनके रिश्‍तेके नही फिरभी मेरेको बीचमे छोडते नही, देख….

(मानेला हिसका देत) लोग मेरेको छक्‍का, हिजडा और वो क्‍या होता है वो ट्रांन्सजंडरभी बोलते है, लेकिन मेरेको पता है मै औरत हूं और औरतही रहूंगी.

ती पुढे बोलणार इतक्‍यात तिथे तिची दुसरी मैत्रीण छत्री घेऊन आली, आणि म्हणाली, अरे गीता चल रे…ती माझ्याकडे बघून ‘चल आती मै’ असं म्हणाली आणि टेबलवर ठेवलेलं बिल तीन हातात घेतलं, मी ठेवलेले अडीचशे रुपयेही तिथं तसेच होते.

मी म्हटलं ‘बिल मै दूंगी, आप जाओ और ये आपके पैसे भुलके जा रही थी आप… ये लो… ‘

तिने मंद हसत माझ्याकडे पाहिले, माझ्या चेहऱ्यावरून परत एकदा हात फिरवला आणि म्हणाली, ‘तुने मेरेको दीदी बोला, पेहली बार किसी अंजान इन्सानने मेरेको दीदी बोला इसलिये ये बिल मै दुंगी’.. असं म्हणतं डोळा मारतं ती म्हणाली, ‘इस हाटेलवालेको मैरे पैसे चलंगे रे. आणि त्या अडीचशे रूपयांना माझ्या हातावर ठेवत ती म्हणाली, ‘तेरे शादी के टाइम मेरे नामकी मिठाई बाट’, असं म्हणतं काउंटरवर पन्नास रू. देऊन ती टाळ्या वाजवत निघून गेली आणि मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीला न्याहाळत राहिले.

तिला ती बाई असण्याची केवळ जाणीवच नव्हती तर किंमत आणि अभिमानही होता.

– इब्तिदा.

4 Comments
  1. Anonymous says

    Good article

  2. Anonymous says

    Nice story …..writer had a wondurful experience which she wrote in very interactive manner …would like to read such types of stories more and more

  3. Anonymous says

    अप्रतिम संवाद…..

  4. Akash Pawar says

    अप्रतिम एवढा सुंदर लेख की संपुच नए हा संवाद अस वाटत होत

Leave A Reply

Your email address will not be published.