कोरोना शहरातून सह्याद्रीत पोहचता कामा नये, त्यामुळे ट्रेकिंग काही महिने थांबवा..

साधारण १५-१६ वर्ष होऊन गेली पुण्यात येऊन. माझं मूळ मराठवाड्यातलं. पुण्यात येईपर्यंत औसा, उदगीर, धारूर, नळदुर्ग आणि देवगिरीचा किल्ला एवढीच गडकोटांची मिळकत. पुण्यात आलो तेंव्हा कामधंद्यापेक्षा इथल्या डोंगर दऱ्यांची आणि गडकोटांची ओढ जास्त, मराठवाड्याच्या पठारी भागाचा परिणाम असावा.

गाडीतून पुणं जसं जसं जवळ येत गेलं तसं तसं पहाटेच्या काळोखातही नजर खिडकीबाहेरची डोंगरं शोधत भिरभिरायची.

पुण्याच्या छत्रपती संभाजी पुलावरून पहिल्यांदा जेंव्हा सिंहगड पाहिलेला तेंव्हा कमरेत वाकून लवून तीन हात मुजरा घातलेला, गडालाही आणि गडपती शिवछ्त्रपतींनाही. गडावर कसं जायचं माहित नव्हतं. कोणाला विचारावं म्हटलं तर ओळखीचं कोणी नव्हतं. स्थानिक पहिल्या मित्राला पहिली मागणी केलेली ती सिंहगडावर न्यायची. त्यानंही इच्छा पूर्ण केली. (जायच्या यायच्या पेट्रोलचे, पंक्चर काढायचे आणि गडावरच्या कांदा भजीचे पैसे मला द्यायला लावलेले, पण तो काय आजचा मुख्य विषय नाही.

ट्रिप परवडली नव्हती.

गडाकडे येण्याच्या रस्ता, पब्लिक आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट याची माहिती काढून घेतली होती. त्या जुजबी माहितीवर परत परत गडावर येणं वाढलं. पाच सात फेऱ्या होईपर्यंत गडावरून समोर राजगड तोरणा दिसतो हे माहित नव्हतं. एके रविवारी पहिल्यांदा “ट्रेकर” गडावर दिसला. पायातली फॅशन स्ट्रीटवरचा झंकिपंकी शूज, २०० रुपयांची तिथलीच जीन्स आणि ८० रुपयांचा रंगीत टी शर्ट अंगावर अडकवलेल्या मला ट्रेकर म्हणजे एलियन वाटलेला.

गडी त्याच्यासोबतच्या चार पाच टाळक्यांना गडाचा इतिहास आणि गडावरून दिसणारा भूगोल समजावून सांगत होता. तेंव्हा समजलं तोरणा आणि राजगड माझ्या समोर उभे होते. मन चुकार पाखरासारखं अलगद सिंहगडावरून थेट राजगड तोरण्याच्या आसमंतात घुमू लागलं.

एसटी जिंदाबाद थी, है और रहेगी.

एसटीच्या पुण्याईनं राजगड- तोरणा पाहून झाले. पुढं पुरंदर, लोहगड, तुंग, तिकोना, शिवनेरी ते अगदी हरिश्चंद्रगड, दुर्गराज रायगड, प्रतापगड, मधू मकरंदगड, वासोटा, साल्हेर-सालोटा- मुल्हेर- मोरा या आणि अशा अनेक गडकोटांच्या उदरात एसटीनेचं पोचवलं. साधारण २००९-१० पर्यंत स्वतःची दुचाकी घेईपर्यंत हा खेळ सुरू राहिला. दुचाकी घेतली तेंव्हापासून आडवाटेचे किल्लेही कवेत आले. भटकंतीचं गणित बऱ्यापैकी छान जुळलं.

आज २०२० सुरुय, गडकोटांच्या भटकंतीत अजून खंड नाही. या मागच्या पंधरा एक वर्षाच्या भटकंतीत एक गोष्ट लक्षात आली ती ही की या गडकोटांच्या ऱ्हाळात एक लाख टक्के गरिबी आहे पण मुजोरी, मिंधेपणा किंवा पैश्यापायी स्वत्त्व कोणाच्या पायाशी ठेवणं अजिबात नाही.

अगदी २०१३-१४ पर्यंत बऱ्याच गड पायथ्याची माणसं गडाची वाट दाखवायसाठी सोडा जेवणाचे पैसे देऊ केलं तरी नाराज व्हायची. बारवाई माथ्यावरची ती मावशी अजूनही लक्ख आठवते, जिणं आम्ही वाट चुकून इकडं कसं आलो या कौतुकात आम्हाला वाडगाभर दहीसाखर खाऊ घातलेली. अशी एक नाही पाच पन्नास उदाहरणं माझ्या एकट्याच्या काखोटीला आहेत, अनेकांच्या असतील.

सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. फेसबुक- व्हाट्सअँपद्वारे गडकोटांची मार्केटिंग झाली आणि गणितं बिघडायला सुरुवात झाली. (त्यात कदाचित माझाही हातभार असावा, अमान्य करण्यात मजा नाही.) पहिला मुडदा लोहगड, हरीशचंद्रगड, सांधण व्हॅली, राजमाची, पेब या किल्ल्यांचा पडला. इरशाळच्या, चंदेरीच्या माथ्यावरून अगदी समोर मोठे मोठे टॉवर दिसू लागले.

प्रबळ, तिकोना, तुंग, पुरंदर, राजगड, तोरणा यांना खेटून फार्म हाऊस प्लॉट पडले. ज्या लिंगाण्यासमोरच्या रायलिंगपर्यंत जायला तीन एक तासाचा घामटा काढावा लागायचा, त्या वाटेवर आता दुतर्फा सेकंड होम्सच्या पाट्यांची गर्दी उडाली. अंधारबनात पावसाळी दिवट्यांची गर्दी वाढली.

ज्या मोहरीतल्या मोरे मामाची म्हातारी वर्षानुवर्षे गुढगेदुखीचा गोळ्या मागायची, गावची पोरं बिस्कीट- चॉकलेट मिळेल या आशेनं मागं पुढं करायची त्यांच्या जमिनींचा बेभाव सौदा होऊन त्यांच्या जमिनीच्या पुण्याईचा बाजार मांडून कोणीतरी तिऱ्हाईत दिवसागणिक स्वतःचे खिसे गरम करत असतो याचा त्यांना कसलाही अंदाज नसतो.

महाबळेश्वर, इगतपुरी, लोणावळ्याच्या जमिनी कोणाच्या ताब्यात गेल्या हे दिसून न दिसल्यासारखं करायचं काय? रायरेश्वरच्या, कोळेश्वरच्या, ढाकच्या पठारावर कोणाचा डोळा आहे हे वेगळं सांगायला हवं का? पाटणजवळच्या डोंगरांवरच्या नवीन महाबळेश्वरनं कोणाचे खिसे भरणार आहेत हे समजून घ्यायचं नाही का? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प घोषित होण्याआधी आजूबाजूची शेकडो एकर जमिनीचे व्यवहार कसे झाले कधी शोधणार? ताम्हिणी अभयारण्य घोषित होऊ नये म्हणून कोण प्राण पणाला लावलेले, घोषित झालं तेंव्हा तिथल्या गावांच्या आडून स्वतःच्या शेकडो एकर जागा वाचवायचा घाट कोणी घातला ? आरेचं पुढं काय होणार? सिंधुदुर्गातली मायनिंगमध्ये कोणाचे लागेबांधे आहेत?

या गोष्टींकडं कधी लक्ष घालणार.

गडकोट संवर्धनाला चांगले दिवस येऊ घातले आहेत. अनेक संस्थांच्या संस्थात्मक कामाचं ते फळ आहे. पण सेकंड होम्स आणि मायनिंगच्या टेकूवर गडकोट तरतील की मरतील यावर कोण बोलणार ?

असे बरेच मुद्दे आहेत. यावर काही जण काम करतही आहेत. काही संस्था पुढंही येतील. पण सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अवघड निर्णय घेणं गरजेचं आहे असं एकमतानं अजूनही का वाटू नये आपल्याला?

मागच्या काही वर्षात दुर्दैवानं म्हणा सुदैवानं म्हणा ट्रेकिंग एक खेळ न राहता व्यवसाय बनला.

कमर्शियल ट्रेकिंगला सरसकट पाठिंबा किंवा सरसकट विरोध या दोन्ही टोकाच्या बाजूच्या मताचा मी नाही आणि नसणार. पण कमरेचं सोडून डोक्याला बांधलं जाणार असेल तर त्याविरुद्ध बोलावं लागणार. कमर्शियल ट्रेकिंगनं स्थानिक भागात काही प्रमाणात रोजगार निर्माण केला की पारंपरिक रोजगार मोडला यावर कधीतरी एखाद्या किल्ल्यावर मैत्रीपूर्ण डिबेट नक्की करूया.

आजवर १००-१००, २००-२०० टाळकी किल्ल्यावर नेली गेली तरी रेटून आम्ही गडकोटांचा इतिहास रुजवतो असं म्हणता आलं. गॅंग करून ट्रोलिंगच्या माध्यमातून, शिवराळ भाषेतून दडपशाही करताही आली. आजवर काय घडलं हे थोडा वेळ बाजूला ठेवून सध्या १००-२०० सोडा दोघं चौघंही शहर सोडून डोंगरात जाणं फक्त फक्त चुकीचंच नाही तर पाप ठरेल पाप. नाय काय फरक पडत एखादा वर्ष हातून निसटलं तरी.

काही कमर्शियल ट्रेकिंग संस्थांशी बोलणं झालं या विषयावर. सध्याच्या काळाची नाजूकता समजून त्यांनी स्वतः काही काटेकोर नियम बनवले आहेत. काहींना समजतंय आणि काहींना समजून घ्यायचं नाही असं किमान सध्याच्या वातावरणात चालवून घेणं अवघड ठरेल. भटक्यांच्या अंगात डोंगराची सजगता भिनायला हवी, मग काहींच्या अंगात पैश्याचा धनुर्वात कसा काय रुजला?

ट्रेक सुरु झाले नाहीत तर स्थानिकांची घरं चालणार नाहीत अशी पुडी का सोडावी लागतेय.
काळजी घेऊन ट्रेक. म्हणजे नेमका कसा ट्रेक हे कोण ठरवणार. ठरवता येईलही पण “काळजी” ठरवलेल्या मार्गानेच घेतली जातेय यासाठीचं मॉनिटरिंग कोण आणि कसं करणार?

तुम्हालाच एकट्याला काळजी आहे का, आम्हाला नाही का ??? असा उलट प्रश्न विचारताही येईल. पण अपघात सांगून होत नसतात आणि जाणून बुजून अपघाताला निमंत्रणही देऊ नये एवढं समजून घेतलं तरी पुरे सध्या.

ट्रेक बंद पडल्यामुळं स्थानिकांची घरं चालणार नाहीत असं जर खरंच निदर्शनास आलं तर अनेक संस्था आहेत ज्या अश्या हव्या तेवढ्या गावांची भूक भागवतील. अनेक संस्थांची तशी मदतही पोच होतेय.

जगभरात लॉकडाऊनचे जसे आर्थिक तोटे समोर आले तसे निसर्गाच्या जखमा भरून आल्या हेही पाहता आलं. कधी अमेरिकेतल्या एकाद्या शहरी रस्त्यावर हरणं पळताना दिसली, इटलीच्या शहरातून फिरणाऱ्या कॅनॉलमध्ये हंस, डॉल्फिन परत आलेले दिसले, पंजाबमधून कधी काळी दिसणारी हिमालयाची रांग परत दिसायला लागली. जुन्नरच्या डोंगरात कुठून तरी रानगवे आले. गावच्या गर्दीतून हरवलेले बरेच पक्षी परत गावात आहे.

अजून थोडे दिवस आपली पावलं या वाटांवर फिरली नाहीत तर चांगलंच होईल, वाईट नाही काय व्हायचं !!!

कमर्शियल असू देत किंवा मनमौजी भटके, कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या डोंगरावर आपण डोंगरभाऊ समोरासमोर येणार आहोत. दोन पाच पैश्यांसाठी किंवा अंगात उठणाऱ्या सुरसुरीपायी गावच्या लोकांच्या जीवाशी खेळ आणि ट्रोलिंगच्या माध्यमातून चिखलफेक करण्याएवढा मनातला किल्ला मारू नका एवढंच !!!!

शेवटी काये,

no mountains are calling & we must not go !!

डोंगरं खुश आहेत एकट्यात, नाही कोणी आवाज देत आपल्याला अजून काही महिने…

  •  लेखक : रवी राजेंद्र पवार (बोंबल्या फकीर) 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.