आदिवासी दारूला पौष्टिक समजून पितात, मात्र खरी परिस्थिती अशी आहे…

आदिवासी समाजाबद्दल आपण कायम एक गोष्ट ऐकत असतोय, ‘त्यांच्या घरात दारु बनते. तिथं दारु पिणं लय नॉर्मल आहे.’ आता अर्थात ही परिस्थिती सगळीकडेच लागू होते असं नाही. अनेक आदिवासीबहुल भागांमध्ये तर दारूबंदीही लागू करण्यात आली आहे. पण आजही आदिवासी आणि दारू पिणं याबद्दल चर्चा होत असते.

हा मुद्दा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या आकडेवारीनुसार राज्यात दारू पिणाऱ्यांचं प्रमाण आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त आहे. 

महिलांच्या दारू पिण्याच्या प्रमाणात धुळे जिल्हा ३८.२ टक्क्यांसह अव्वल आहे. तर त्यापाठोपाठ गडचिरोली ३.१ टक्के, नंदुरबार २.८ टक्के आणि पालघर जिल्ह्यात १.४ टक्के महिला दारू पितात. सोबतच पुरुषांच्या बाबतीत गडचिरोली ३४.७ टक्क्यांसह अव्वल आहे. तर त्यापाठोपाठ भंडारा ३६ टक्के, वर्धा २४.४ आणि गोंदिया जिल्ह्यात २२.६ टक्के पुरुष दारू पितात.

आता भिडूंनो तुम्ही म्हणाल की, आदिवासी समाजात दारू पिण्याचं प्रमाण जास्तच असतं आणि आदिवासी सुद्धा हातभट्टीच्या दारूला पौष्टिक मानतात. त्यामुळे यात काय नवीन? तर भिडूंनो हाच आपला मुख्य मुद्दा आहे. 

खुद्द आदिवासी त्यांच्या दारू पिण्याच्या संस्कृतीचा उदो उदो करतात. मात्र दारूच्या व्यसनामुळे आदिवासी समाजात अनेक समस्या आहेत. 

पहिलं म्हणजे आरोग्याच्या समस्या

आदिवासी पाड्यांवर घरीच दारू बनत असल्यामुळे आदिवासींमध्ये दारूचं अतिसेवन केलं जातं. त्यामुळे अनेक लोकं बराच काळ नशेत झिंगत असतात. त्यामुळे आरोग्याच्या समस्या फार मोठ्या आहेत. या समस्यांवर उपचार आणि आहाराची आवश्यकता असते. मात्र दारूचे व्यसन असल्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. 

आदिवासींमध्ये सिकलसेल आणि कुपोषणाचं प्रमाण फार मोठं आहे. दारूच्या व्यसनामुळे या समस्या आणखी जास्त क्रिटिकल होतात. तसेच हृदयाच्या, किडनीच्या आणि आतड्यांच्या संबंधीचे आजार सुद्धा वाढलेले आहेत. अनेकदा स्थिती गंभीर असते मात्र आजारी व्यक्ती दारूच्या नशेत असल्यामुळे रुग्णालयात जात नाही आणि त्याचा मृत्यू होतो. 

काही वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील एक आदिवासी महिला आपल्या नवजात बाळाला घेऊन शेकोटीच्या शेजारी झोपली होती. पण रात्री खाटेवरची मुलगी खाली शेकोटीत पडली आणि जळून ठार झाली. मात्र याची साधीशी कल्पना सुद्धा त्या महिलेला आली नाही. 

आदिवासी समाजातील दारूमुळे होणाऱ्या  समस्येबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी बोल भिडूने मेळघाटमधील महान ट्रस्टचे संचालक डॉ. आशिष सातव यांच्याशी संपर्क साधला.

ते म्हणाले, “दारूमुळे आदिवासी समाजात आरोग्याची समस्या बरीच गंभीर आहे. ज्या भागात दारूबंदी आहे त्या भागात कॅन्सर, हृदयरोग, ब्लड प्रेशर या समस्या तुलनेने कमी आहेत. तर दारू पिणाऱ्या भागात याचं प्रमाण बरंच मोठं आहे.”

दुसरं म्हणजे अस्वच्छता

आदिवासी समाजात अस्वच्छतेचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. निरक्षरता आणि नैसर्गिक पद्धतीने जीवन जगण्याच्या पद्धतीमुळे अस्वच्छता तर असतेच पण दारूच्या अतिसेवनामुळे त्यात वाढ होते. नशेत आपण काय करतोय याकडे माणसाचे लक्ष नसते. घरात, वैयक्तिक, कपडे, भांडी-कुंडी आणि खानपानाच्या वस्तूंबाबत पाळायची स्वच्छता पाळली जात नाही. परिणामाची घराच्या आत आणि बाहेर तसेच गावात अस्वच्छता जशीच्या तशी राहते. 

तिसरी गंभीर समस्या आहे ती गुन्हेगारी 

आदिवासी समाजात कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण कमी होतं, मात्र नागरी समाजाच्या संपर्कामुळे, दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक हिंसाचार, मारामारी, खून, गुन्हे यांचे प्रमाण वाढत आहे. जिथे दारूची नशा केली जाते. तिथे ही समस्या जास्त असते. त्यामुळे आदिवासी समाजात ही समस्या मोठी होत चालली आहे.

“दारूच्या नशेत आदिवासी पालकांनी मुलांना मारहाण करणे, पतिपत्नीत भांडण होणे, गावातील लोकांबरोबर वादविवाद आणि भांडण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेक ठिकाणी खून करण्यासारख्या टोकाच्या घटना सुद्धा वाढलेल्या आहेत,” असं मेळघाटमध्ये अभ्यास करणारे डॉ आशिष सातव सांगतात.

चौथं म्हणजे तरुणांमध्ये कायम असलेली व्यसनाधीनता

सांस्कृतिक प्रभावामुळे आदिवासी समाजाच्या नवीन पिढीत सुद्धा दारूच्या व्यसनाचं प्रमाण जास्त आहे. संस्कृतीचा आधार देत तरुण दारूच्या व्यसनाकडे वळतात. सरकारच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहांमध्ये सुद्धा दारू प्यायली जाते असं आदिवासी भागातील जाणकार सांगतात.

इतर नागरी समाजासोबतच आदिवासी समाजातील तरुणांमध्ये दारूचं व्यसन वाढत आहे. आदिवासी समाजाला दारू पिण्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी असल्यामुळे ही समस्या आणखी गंभीर आहे. याचा परिणाम थेट मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर होतो. अनेक मुलं आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत त्यामुळे अकॅडमिक करियरमध्ये आदिवासी मुलं मागे राहिलेली दिसतात.

दारूमुळे आदिवासी समाजात असलेल्या समस्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी बोल भिडूने मोळघाटातील खोज संस्थेचे संस्थापक बंड्या साने यांच्याशी संपर्क साधला.

दारूच्या समस्येची माहिती देताना बंड्या साने सांगतात की, “आदिवासी समाजात दारू पिण्याचं प्रमाण मोठं असणं ही समस्या एक सामाजिक मानसिकतेची समस्या आहे. समाज ज्या वातावरणात राहतो किंवा आधीपासून ज्या पद्धती स्वीकारतो तो नंतरही त्याच प्रमाणे जगात असतो. आदिवासी समाजात दारू ही अशीच मानसिक समस्या आहे. जी लोकांनी स्वीकारलेली आहे.” असं बंड्या साने यांनी सांगितलं.

“ही समस्या सोडवण्यासाठी केवळ कागदी पत्रक बनवून आणि ते वाटून चालणार नाही. तर त्यासाठी ऑडिओ व्हिजुअल स्वरूपात जाहिराती बनवणे आणि त्या लोकांना दाखवणं गरजेचं आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभाग आणि सरकारी यंत्रणेने पुढाकार घेणं घरजेचं आहे.” असं ते म्हणाले.

१९९४ सालात गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आलीय. मात्र अजूनही याचं प्रमाण कमी झालेलं नाहीय.

जिल्ह्यातील आदिवासी तसेच इतर समाजातील दारूचं पिण्याचं प्रमाण कमी व्हावं आणि त्यांची आर्थिक प्रगती व्हावी हा या दारूबंदीमागील उद्देश होता. मात्र अलीकडे जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ३४. ७ टक्के पुरुष आणि ३.१ टक्के महिला दारू पितात असं आढळून आलंय.

गडचिरोली जिल्ह्यातील दारूच्या परिस्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी बोल भिडूने जिल्ह्यात दारूबंदीवर काम करणाऱ्या संतोष जवळकर यांच्याशी संपर्क साधला. 

त्यांनी सांगितलं कि, “दारूबंदीमुळे नक्कीच परिणाम झालेला आहे. दारू पिणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी हे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत कमी आहे. आदिवासी भागात पूर्वी केवळ कुटुंबासाठी दारू बनवली जायची मात्र आता त्याचा वापर आर्थिक साधन म्हणून केला जातो. त्यामुळे दारूचं प्रमाण अजूनही जास्त आहे.”

दारूबंदी केल्यामुळे जगातील अनेक भागात सुधारणा घडून आलेल्या आहेत. हीच गोष्ट आदिवासी भागावर लागू होते. आदिवासी भागात जिथे चांगल्या पद्धतीने दारूबंदीची अंमलबजावणी करण्यात आली तिथे बदल घडून आलेला आहे. इतर नागरी समाजाच्या तुलनेत आदिवासी समाज जास्त मागासलेला आहे, त्यामुळे या भागात दारूबंदी करून विकासाला पूरक वातावरण निर्माण करणे गरजेचं आहे. आदिवासी समाज दारू पितो म्हणून तो स्वस्थ असतो किंवा दारू पौष्टिक असते असा दावा अगदी निराधार आहे, असं आदिवासी भागातील सामाजिक कार्यकर्ते सांगतात.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.