४ पक्ष सोबत होते पण इंदिराजींच्या एका सभेमुळे मुख्यमंत्र्यांचा पोट निवडणुकीत पराभव झाला

बंगालमध्ये आज ममता दीदींच्या भवानीपूर जागेवरच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. यात त्यांनी ५८ हजार ८३२ मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्री पद आता पुढेच ५ वर्ष शाबूत राहणार आहे. मे महिन्यात लागलेल्या निकालामध्ये त्यांचा पराभव झाला होता, त्यामुळे त्यांना पुढच्या ६ महिन्यात आमदार होणे अनिवार्य होते.

पण भारताच्या इतिहासात असेही एक मुख्यमंत्री होऊन गेले ज्यांना पोटनिवडणुकीत हरल्याने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशी वेळ येणारे ते इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री ठरले होते. विशेष म्हणजे त्यांना ४ पक्षांचा पाठिंबा होता. पण तरीही त्यांचा पराभव झाला होता. अशा या मुख्यमंत्र्यांचं नाव म्हणजे,

त्रिभुवन नारायण सिंह

१९६९ सालच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. त्याचा परिणाम उत्तर प्रदेशच्या राजकारणावर देखील झाला. कमलापती त्रिपाठी यांच्या गटाने इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. तर राज्यातील दुसरे दिग्गज नेते रघुनाथ सिंह सिंडिकेट गटात गेले. सोबत चंद्रभानु गुप्ता हे देखील सिंडिकेट गटात गेले.

या सगळ्यामुळे फेब्रुवारी १९७० मध्ये चंद्रभानु गुप्ता यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर कमलापती त्रिपाठी यांच्या पाठिंब्यावर चौधरी चरण सिंह यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशमध्ये सरकार बनले. कमलापती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले. पण सप्टेंबरमध्ये अचानक त्रिपाठी यांनी चरणसिंह यांचा पाठिंबा काढून घेतला.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. मात्र पुन्हा तडजोड झाली आणि त्रिभुवन नारायण सिंह यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आलं. पण ते त्यावेळी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यामुळे त्यांना पुढच्या सहा महिन्यात आमदार होणे बंधनकारक होते.

त्रिभुवन यांच्या सुदैवाने त्यावर्षी आमदार असलेले महंत अवैद्यनाथ हे लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांची मानीरामची जागा रिकामी झाली होती. हे महंत अवैद्यनाथ यांची ओळख म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गुरु. अवैद्यनाथ यांचा पाठिंबा त्रिभुवन यांना मिळाला. सोबतच आणखी ४ पक्षांनी देखील सिंह यांना पाठिंबा जाहीर केला.

याच मानीराम जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा झाली.

त्यावेळी काँग्रेस (ओ) कडून त्रिभुवन यांची उमेदवारी जाहीर झाली तर काँग्रेस (आर) कडून रामकृष्ण द्विवेदी यांना तिकीट देण्यात आलं.

असं म्हणतात कि, पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर वातावरण टी.एन. सिंह यांच्या बाजूने होते. त्रिभुवन नारायण सिंह यांची ओळख सांगायची तर ते माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे जवळचे मित्र होते आणि राज्यात त्यांची प्रामाणिक राजकारणी अशी ओळख होती. सोबतच जवाहरलाल नेहरू आणि शास्त्री यांच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते.

मात्र काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन गट तयार झाले होते.

एवढे दिग्गज आणि प्रामाणिक नेते असून देखील त्रिभुवन यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचं कारण होते इंदिरा गांधी यांची सभा. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा संकेत होता कि ते पोट निवडणुकांमध्ये प्रचाराला जात नव्हते. त्यांचाच संकेत त्रिभुवन यांनी पुढे नेला. त्रिभुवन नारायण केंद्रात मंत्री राहिले होते. सोबतच ते मुख्यमंत्री देखील होते.

त्यामुळे ते या विधानसभा निवडणुकीत प्रचाराला आले नव्हते.

त्यांचा ग्रह होता कि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी देखील येणार नाहीत. पण इंदिरा गांधी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत प्रचाराला आल्या. मतदानाच्या २-३ दिवस आधीच त्यांनी रामकृष्ण द्विवेदी यांच्या साठी भव्य प्रचारसभा घेतली. मंचावरून इंदिरा गांधी यांनी सिंह यांच्यावर अनेक आरोप केले.

इंदिरा गांधी यांच्या याच सभेनंतर मतदारसंघातील वातावरण बदलले.

निकाल लागला तेव्हा त्रिभुवन नारायण सिंह १६ हजार मतांनी निवडणूक हरले. निकाल जाहीर झाला तेव्हा ते सभागृहात होते. तिथं त्यांना हि बातमी मिळाली. त्यावेळी त्यांनी स्वतः आपल्या पराभवाची माहिती सभागृहात दिली आणि राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यावेळी भारतात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी पोटनिवडणूक हरली होती.

त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस (आर) विजयी झाली आणि कमलापती त्रिपाठी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्रिभुवन यांचा पराभव करणाऱ्या रामकृष्ण द्विवेदी यांना बक्षीस मिळाले. त्रिपाठी सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री करण्यात आले होते. असं म्हणतात कि रामकृष्ण द्विवेदी हे मानीराम मधील स्थानिक रहिवासी असल्याने त्याचा त्यांना फायदा झाला. तर सिंह वाराणसीचे रहिवासी होते.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.