माजी मुख्यमंत्र्यांना हाताशी धरून तृणमूल काँग्रेस गोव्याच मैदान मारण्याची तयारी करत आहे?
ममता दिदींनी आज गोव्याच्या राजकारणात धमाका केलाय. थेट माजी मुख्यमंत्री लुइजिन्हो फलेरो यांनाच दिदींनी तृणमूलमध्ये आणण्याची तयारी केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपाला पाणी पाजणारा तृणमूल काँग्रेस पक्ष आता गोव्याच्या मैदान मारायला सज्ज झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेस गोव्याच्या राजकारणात चांगलाच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
२३ सप्टेंबर रोजी तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरिक ओ ब्रायन आणि प्रसून बॅनर्जी गोव्यात आले होते. सध्या पक्षात हे दोन्ही नेते पहिल्या फळीतील मानले जातात. पक्षाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात देखील या दोघांचा समावेश असतो. मात्र त्याच्याही आधी महिनाभरापासून पक्षाचे काही नेते राज्यात तळ ठोकून होते. या काळात त्यांनी गोव्यात तृणमूलच्या चंचूप्रवेशासाठी कशी रणनीती आखता येईल याचा अभ्यास केल्याचं सांगितले जाते.
सोबतच या नेत्यांनी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आप या पक्षातील काही जणांशी प्राथमिक चर्चा केली. त्यांनी पक्षात यावे यासाठी मनधरणी केल्याचं बोललं जात आहे. त्यापैकी काही जणांना कोलकात्याला देखील नेण्यात आले. तिथं त्यांना पक्षाच्या ध्येय धोरणांविषयी माहिती देण्यात आली आहे. यात काही आजी-माजी आमदार, इतर पक्षांचे पदाधिकारी, विचारवंत अशांचा समावेश होता.
प्रशांत किशोर देखील सध्या गोव्यात
तृणमूल काँग्रेसचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे मागच्या आठवड्यामध्येच एका दिवसासाठी गोव्यात आले होते. त्यावेळी त्यांनी लुइजिन्हो फलेरो यांच्यासह राज्यातील सर्व पक्षांच्या इच्छुक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर आज २७ सप्टेंबरला प्रशांत किशोर पुन्हा एकदा गोव्यात दाखल झाले आहेत.
प्रशांत किशोर यांच्याच उपस्थितीमध्ये फलेरो यांचा आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता. मात्र काही कारणास्तव आज टाळला आहे. पण लवकरचे ते तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. असं सांगितले जात आहे कि तृणमूलकडून त्यांना राज्यसभा सदस्यत्व देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
यामुळे तृणमूलला गोव्यात हात-पाय पसरण्यासाठी जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पश्चिम बांगलनंतर प्रशांत किशोर गोव्यात भाजपला पाणी पाजणार का हा प्रश्न आहे.
लुइजिन्हो फलेरोंपाठोपाठ त्यांचे समर्थक देखील तृणमूलमध्ये?
लुइजिन्हो फलेरो यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचचं आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यांच्या पाठोपाठ प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस अॅडव्होकेट यतीश नाईक, विजय पै, प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव मारिओ पिंटो यांनी देखील पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
संध्याकाळपर्यंत आणखी काँग्रेस पदाधिकारी राजीनामा देणार असल्याचेही बोलले जात आहे.
तसेच भाजपाशी पूर्ण ताकदीने फक्त तृणमुल काँग्रेसच लढा देऊ शकते हे आता गोव्यातही लोकांना कळले आहे. त्यामुळे जरा थांबा पुढच्या आठवड्यापर्यंत तृणमूल काँग्रेसमध्ये गोव्यातील आणखीही लोक प्रवेश करणार हे ध्यानात ठेवा असा दावा फलेरो यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस आणि इतर पक्षातील मोठे तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी देखील गोव्यात येणार
सध्या गोव्यात असलेले तृणमूलचे खासदार डेरिक ओ ब्रायन आणि प्रसून बॅनर्जी यांनी माहिती दिल्याप्रमाणे,
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमुल कॉंग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी हे येत्या १० दिवसात गोव्यात येणार आहेत. यावेळी स्थानिक नेत्यांशी चर्चा करून आणि आम्ही तयार केलेला अहवाल बघून ते गोव्यातील युती व इतर गोष्टींबाबत घोषणा करणार आहेत. सोबतच याच वेळी काही मोठे नेते पक्षात प्रवेश करणार आहेत.
तृणमूलच्या आगमनाचा काँग्रेसला आणि भाजपला कसा तोटा बसेल?
फालेरो यांच्या राजीनाम्यानंतर आणि राज्यात तृणमूलच्या आगमनानंतर गोव्यात काँग्रेस पक्षाची मोठी ताकद कमी होईल अशा शक्यता स्थानिक वृत्तपत्राचे राजकीय वार्तांकन करणारे पत्रकार व्यक्त करत आहेत.
त्यांच्या म्हणण्यानुसार,
सध्या गोव्यातील ख्रिस्ती मतदारांमध्येही काँग्रेसविरोधात वैफल्याची भावना आहे. काँग्रेसचे आमदार जिंकून येऊन भाजपामध्ये जातात. त्यामुळे मग काँग्रेसला मत देऊन उपयोग काय? हा पक्ष भगव्या विचारसरणीच्या विरोधात प्रखर झुंज देण्यास निकामी ठरला आहे अशी मतदारांमध्ये सार्वत्रिक भावना आहे.
दुसरीकडे गोवा भाजपविरोधात सध्या कोरोना काळातील अनेक कामांमुळे आणि निर्णयांमुळे नाराजी आहे. अशावेळी मतदारांना काँग्रेस आणि भाजप सोडून इतर पर्याय हवे आहेत. अशावेळी आम आदमी पक्षाला मोठी संधी होती. मात्र आता तृणमूलच्या आगमनाने मतदारांपुढे ठोस पर्याय उभा राहण्याची शक्यता आहे.
तर प्रसून बॅनर्जी यांचं एक वाक्य तृणमूल गोव्यासाठी किती आग्रही आहे याचा अंदाज देऊन जाते. बॅनर्जी म्हणाले कि, सर्वच्या सर्व जागा लढवून जिंकण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. ‘मर भी जायेंगे लेकीन भाजप को हरायंगे !’
हे हि वाच भिडू
- गोवा जिंकण्यासाठी दुपारची झोप हा महत्वाची ठरणार आहे!
- उत्पल्ल पर्रिकर वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी तयार आहेत पण फडणवीस सिरीयस नाहीत.
- नितीन गडकरींच्या एका वाक्यानं भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री टेन्शनमध्ये आलेत