ट्रू कॉलरने तुमच्या बँक खात्याला गंडा घालायला सुरवात केलीय ?

तर आमच्या लहानपणी मोबाईल नव्हते. बीएसएनएलच्या लँडलाईन ठोकळ्यावरून फोन करायला लागायचे. आम्ही जरा मोठे झाल्यावर बीएसएनएलच्या कृपेने मिळालेल्या डिरेक्टरीतून पोरींच्या बापांचे नंबर शोधून काढायचो आणि हळूच त्यांना फोन करायचो.

तर झालं असं की बीएसएनएल अपडेट झाली, पोरींचे बाप लोक सुद्धा अपडेट झाले. त्यांनी कॉलर आयडी नावाचा छोटा ठोकळा आपल्या  लँडलाईनला जोडला आणि आमचं छोटसं भावविश्व उधळून टाकलं.

तर मग दिवस गेले, दहा आकडी नंबर असणारे मोबाईलफोन आले. लँडलाईनचा विषय भूतकाळात जमा झाला. आता unknown नंबरवरून आलेले फोन ओळखायच अवघड होऊन बसलं. फोन आला की डिस्प्लेवर मोबाईल नंबर येतो पण तो कोणाचा हे ओळखायला काही डिरेक्टरी नसते. आमच्या तारुण्यात या गोष्टीचा आम्ही पुरेपूर फायदा उठवला. अनेक मित्रांचा बाजार देखील उठवला.

पण काळ कोणासाठी थांबत नसतो. नोकियाचे टिकाऊ फोनसुद्धा आउटडेटेड झाले. अॅपल, अँड्र्ॉइडचा फोनसारख्या स्मार्टफोनचा जमाना आला.प्लेस्टोरवरून whatsapp, facebook कसं डाऊनलोड करायचं वगैरे शिकत होतो. आत्मविश्वासाने पोरीना मेसेज टाकत होतो.

अशातच एका बेसावध क्षणी कळाल इथ सुद्धा आपला घात झालाय. आमच्या जीवावर उठलेल्या अॅप्लिकेशनचं नाव होतं, truecaller.

ट्रू कॉलर म्हणजे आजच्या घडीचा कॉलर आयडी कम डिरेक्टरी. म्हणजे तो आपल्याला फोन आल्यावर त्या व्यक्तीच नाव सांगतो पण ते काही खर असेलच याची खात्री ९०%चं असते. पण तरी डिटेक्टीव्हगिरी करायला जेम्स बॉंड बनायला हे अॅप्लिकेशन बरच उपयोगी होतं.  म्हटल थोडासा दर्द हुआ पर चलता है.

नंतर बातमी आली की हा ट्रू कॉलर जेम्स बॉंड नाही तर एक नंबरचा चोर आहे.

तो काय करतो तर आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये घुसतो आणि आपल्या कडच्या सगळ्या नंबरची माहिती सेव्ह करून घेतो. अशी प्रचंड माहिती त्यांनी गोळा केली आणि त्यावरून आपल्याला फोन कोणाचा आलाय ही जादू दाखवायला सुरवात केली. आपण फुल इम्प्रेस झालेलो पण नंतर पटापट ते अप्लिकेशन डिलीट मारलं. पण चोराने डाव साधलाच होता.

परत काही दिवस गेले. ट्रू कॉलर ला चांगला आणि सुरक्षित पर्याय येईल म्हणून आपण वाट बघितली. पण तसं काही घडलं नाही. तोपर्यंत आपण पण निगरगट्ट झालेलो. आधीच लुटला गेलेला माणूस आणखी किती लुटणार म्हणत आपण ट्रू कॉलर परत इंस्टॉल केलं. त्यांचा सगळा कारभार डोळ्याआड केला.

अचानक परवा या ट्रू कॉलरचा नवीन उद्योग समोर आलाय. त्यांच्या म्हणे अॅप्लिकेशन मध्ये बग आलय आणि त्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या युपीआयला आपल्याला रजिस्टर केलंय. परवानगी न घेता, जबरदस्तीनं!!

आता ज्या कोणाला युपीआय ठाऊक नसेल त्यांच्यासाठी युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. म्हणजे आपलं मोबाईल नबरला लिंक असणारं बँक अकाउंट एका मोठ्या सुरक्षित नेटवर्कला जोडलं जाणार, ज्याचा वापर करून आपण एका सेकंदात त्या नेटवर्कमधल्या कोणत्याही अकाउंटवर पैसे ट्रान्स्फर करू शकतो, तेही फ्री.

आता तसं बघायला गेलं युपीआय म्हणजे  खूप उपयोगी गोष्ट. भारतसरकारच भीम, गुगलचं गुगल पे, फोनपे अशा बऱ्याच युपीआय प्लटफॉर्मनी भारतात क्रांती आणली. चटकन रिचार्ज, बिल पेमेंट करता येऊ लागलं. कॉन्ट्री काढताना तर सगळ्यात जास्त उपयोगी पडू लागलं.

पण ते सगळ ठीक आहे हो. हे सगळ आपल्या परवानगीने चालत तो पर्यंत ठीक आहे. पण बिनविचारता केलं म्हणजे गुन्हा होतो.(कन्सेंट महत्वाचा)

पण ट्रू कॉलरने भलताच गंडा घातला. दोन तीन दिवसापूर्वी अनेकांना सकाळसकाळी आपल्या मोबाईलमध्ये अजब गजब मेसेज आलेले दिसले. जरा टेक्निकल डोकं असणाऱ्यांनी नेमक काय झालंय ते बघितलं तर त्यांना कळाल की आपलं ट्रू कॉलर अप अपडेट झालंय आणि त्यांनी आपल्याला आयसीआयसीआयच्या युपीआयला ऑटोमेटिक रजिस्टर केलय तेही न विचारता. काही जणांना तसा मेसेजही आला. यापैकी अनेकांचं आयसीआयसीआय बँकेत खातं देखील नव्हतं. तरी ट्रू कॉलरने हा उद्योग केलाय.

आता बँकखात्याबरोबर छेडखाणी झाली की माणूस पेटून उठतोय. झालं ही तसच. आता पर्यंत आमच नाव गाव, बड्डे, इमेल आयडी असली माहिती विकणारे ट्रू कॉलर आता आमच्या बँकेत पैसा किती आहे वगैरे माहिती पण विकू लागलंय हे कळल्यावर पुंग्या टाईट झाल्या. उद्या पैसे काढून घेतले तरी कळणार नाही.

दोन दिवस ही बोंबाबोंब सुरु आहे. ट्रू कॉलरवाले म्हणत आहेत की हा एक बग आहे. म्हणजेच अॅप्लिकेशनचं अपडेट देताना आलेला प्रोगार्मिंग एरर आहे. त्यांनी परत नवीन अपडेट आणला आहे. ज्यांना हे युपीआय वापरायचं नाही ते आपलं नाव काढून घेऊ शकतात पण हे ऑटोमटीक होणार नाही, त्यासाठी मॅन्युअली प्रोसिजर पूर्ण करावी लागेल. त्यांनी या घटनेची चौकशी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे.

थोडक्यात आपली चांगलीच लागली आहे. तरी पण बरेच जण अंधारात आहेत, आणि ज्यांना हा गोंधळ कळलाय ते म्हणत आहेत की ट्रू कॉलरला पर्याय काय? आम्हाला unknown नंबरची माहिती कोण सांगणार? आता एवढ्यावेळा गंडवलेल्या ट्रू कॉलरवर कितपत विश्वास ठेवायचा हा तुमचा डिसिजन आहे. बघा माहिती देणं आमचं काम आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.