ट्रम्पला विष्णुचा अवतार मानून भारतीयांनी अमेरिकेत राडा घालायला सुरवात पण केलीय भिडू

काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी आपल्या प्रेसिडेन्शियल डिबेट मध्ये अकलेचे तारे तोडले. त्यांचं म्हणणं होतं की भारतातली हवा घाणेरडी आहे. ट्रम्प तात्यांचं तोंड काय  नाही.

नेल्सन मंडेला म्हणायचे,

“जगात सगळीकडं सगळ्याच जास्त घाण पसरवणारा देश म्हणजे अमेरिका.”

खरंच आहे. इंग्लिश न कळणाऱ्या माणसांना सुद्धा ट्रम्पतात्या येड्या डोक्याचं आहे हे माहित झालेलं आहे. ह्याला त्यांनी कसा निवडून दिला असल असा प्रश्नही त्यांना पडतो. त्यातही ट्रम्प येत्या निवडणुकीत जिंकून येऊ शकतोय ही दाट शक्यता निर्माण झालीय.

आणि ह्याचं कारण आहे त्याला मोठा अवतार मानणाऱ्या त्याच्या सपोर्टर लोकांचा नवा ग्रुप,

क्यूएनॉन

ह्या लोकांचं असं मत आहे की अमेरिकेच्या मागच्या बऱ्याच राष्ट्राध्यक्षांनी अनेक लहान पोरांना मारून खाल्लं आहे. ह्याच्यात बराक ओबामा, हिलरी क्लिंटन आणि इतरही डेमोक्रॅटिक पार्टीच्या लोकांची नावं घेतली जात आहेत. ही माणसं सैतानाची पूजा करतात आणि बारक्या पोरांना कापून खातात.

अमेरिकेला वाचवणाऱ्या काही दैवी शक्तींनी ट्रम्पला ह्यासाठी पुढं पाठवलं आहे आणि जगभरातील पोरं खाणाऱ्या सगळ्या नेत्यांशी लढण्यासाठी तो आता समोर आला आहे. त्याच्याविरोधात जगातली लोकं एकसुरात बोलतात त्याचं कारण म्हणजे ट्रम्प लवकरच त्यांचा पर्दाफाश करणार आहे, म्हणून ती सगळी बावचळल्यात.

अमेरिकेतील अशा लोकांचं काळं साम्राज्य (डीप स्टेट) उकरून काढून अमेरिकेला दैवी दिशेला नेण्यासाठी ट्रम्पला देवानं पाठवलं आहे.

थांबा. पचणार नाय माहिताय. रूको जरा, सबर करो-अमेरिकेच्या थोड्या शान्यासुरत्या लोकांनी गेल्याच आठवड्यात ट्रम्पची मानसिक चाचणी करण्यात यावी हि मागणी केलेली आहेचय. तुम्हाला वाटल एखाददोन खुळ्या लोकांनी हे धंदे केले असत्याल. किंवा “सोनम गुप्ता बेवफा” टाईपचा काहीतरी ट्रेंड असेल ह्यो.

ना मुन्ना, ना! ही टिंगल नायय…

जवळपास काही लाख लोकांनी ह्या मोहिमेत सहभाग घेतला आहे आणि करोडो मिलियन रुपयांची/डॉलर्सची मदत त्याच्यासाठी पाठवली जात आहे. स्वतः ट्रम्पनेही,

“माझा ह्या लोकांवर जीव आहे, त्यांचा माझ्यावर जीव आहे, आमचा एकमेकांवर जीव आहे”

असं विधान पत्रकार परिषदेत केलं आहे. (होऊ भिडूलोक, ट्रम्प त्याच्याइकडं नेहमी आठवले स्टाईलने यमक साधून बोलत असतोय… )

त्यांच्या मताने ट्रम्प आता एकाच दिवशी तयारी करून पोरांचं मटण खाणाऱ्या लोकांविरुद्ध जगभर मोहीम चालवणार आहे. त्या दिवसाला त्यांनी “द स्टॉर्म” ( ट्रम्प – एक आंधी, भिरभिरतं वादळ म्हणूयात तेला) नाव दिलं आहे.

बरं आता काय ब्वा हे तिकडचं खूळ म्हणायची सोय राहिलेली नाही कारण इथून अमेरिकेत गेलेल्या भारतीय लोकांनी ह्या थियरीचं स्वतःचं देशी फक्कड व्हर्जन तयार करून ट्रम्प हा विष्णूचा अवतार असल्याची बोंब उठवायला सुरवात केली आहे.

“हिंदुज फॉर ट्रम्प” असं ह्या गटाचं नाव आहे.

ही फालतुगिरी कशासाठी?

तुमच्यातल्या ज्यांचा ह्याच्यावर विश्वास नसेल त्यांच्यासाठी म्हणून सांगायलोय, अमेरिकेच्या फक्त फ्लोरिडा, व्हर्जिनिया, मिशिगन आणि पेनिसिल्व्हानिया ह्या चार राज्यातच एकूण मिळून २५ लाख भारतीय लोकं राहतात.

आता आपल्याइकडं २५ लाख मतदार म्हणजे एका बगलतलं क्यास. पण अमेरिकन राजकारणात ही फिगर भवळ आणणारं मार्जिन ठरू शकतेय. ह्या लोकांना भुरळ पाडण्यासाठी ट्रम्पतात्यांच्या विरोधी पार्टीने कमला हॅरिस ह्या भारतीय बाईला उपराष्ट्रध्यक्षाच्या निवडणुकीत उतरवलं आहे. ह्याच्यावरूनच ठरवा,

आपली माणसं तिकडं किती धुरळा करू शक्त्यात…

त्यातल्या त्यात अमेरिकेत भारतातून गेलेल्या बहुतांश वर्ग हा उच्चवर्णीय आणि पूर्वपार शिक्षण मिळालेला आहे. त्यामुळं त्यांना त्याचा इतका लळा लागलेला आहे की त्यांची जवळपास मतं एकगठ्ठा पडत असतात. आणि यंदा तिकडल्या आपल्या माणसांनी ट्रम्पच्या नादी लागायचा प्लॅन केलाय.

त्यांनी “इंडियन वोइसेस फॉर ट्रम्प” संघटना बनवून ट्रम्पतात्यांच्या प्रचाराला सुरवात केलीय.

त्याच्या उपाध्यक्ष बाई ‘मृणालिनी कुमार’ म्हणत्यात की,

“औंदा हवा बदललीय आणि जेव्हापासून ट्रम्प यांनी टेक्सास (तिकडला गायपट्टा) मध्ये  मोदी सायबांसोबत “हाऊडी मोदी” इव्हेन्ट केलाय, सगळी भारतीय ट्रम्पलाच निवडून देत्यात का नाय, बघत राहा!”

तेव्हा त्यांना डॉलांड म्हणलेलं कुणीच जीवाला लावून घेतलेलं नाही.

पण मग नक्की सगळ्या भारतीयांचं असंच मतय का बघायला अमेरिकाभर सर्व्हे केला आणि लोकांनी आपापली डोकी किती सुपीक आहेत ते उचकटून दाखवलं. खाली दिलेली सगळी मतं इथून अमेरिकेत गेलेल्या भारतीय माणसाचीयत.

मूळनिवासी म्हणून आपला त्यांच्याशी काहीच संबंध नाय.

डॉलांड ट्रम्प, विष्णूचा अवतार आणि दैत्यांचा संहारक

ह्या “इंडियन वोइसेस फॉर ट्रम्प” संघटनेच्या एका तज्ञ पदाधिकाऱ्याने म्हटलंय की,

“आमचे राष्ट्राध्यक्ष हे विष्णूचा अवतार असून जगातल्या वाईटाचा नायनाट करण्यासाठी देवाने पाठवलेला दूत आहे. जगाला योग्य मार्गावर नेण्यासाठी ते काम करत असून समलैंगिक लोकांची गॅंग, गर्भपाताच्या बाजूच्या लोकांची टोळी आणि दहशतवाद्यांच्या लॉबीसोबत एकहाती लढत आहेत. हा माणूस कधीच कुणाच्या दबावात न येता काम करत असतोय.

दुष्टांचा संहार करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठीच ट्रम्प यांची ही लढाई आहे. त्याच्यासाठी त्यांना जरी काही चुकीच्या लोकांशी सोयरीक करावं लागत असली तरी शेवटी त्यातच अमेरिका आणि भारताचं भलं आहे.”

आनंदाची गोष्ट म्हणजे हा माणूस १९९० साली अमेरिकेत शिकायला गेलथा आणि तिकडंच नोकरी मिळवून सेटल झालाय. हे वाचून तरी आपण “इथली हुशार माणसं अमेरिकेत गेल्यानं आपला ब्रेनड्रेन हुतोय” अशा खोट्या तक्रारी बंद केल्या पाहिजेत.

संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या मते ‘भारतात मोदींसारखे महाऋषी पाकिस्तानशी टक्कर देत असतानाच ट्रम्पही चिन्यांशी तशीच झुंज देत आहेत. तेच्यामुळं ट्रम्पला मदत करणे हा भारतीयांचा धर्मय!

मृणालिनी कुमार वहिनींनी सुद्धा ह्या माणसाच्या म्हणण्याला दुजोरा दिलाय. ह्या बाई ट्रम्पसोबत अतिशय जवळून काम करत असतात.

मृणालिनी वहिणींसोबत तात्या

त्या म्हणतात,

‘ट्रम्पच्या विरोधी पार्टीतली लोकं मुसलमान आणि ब्लॅक ख्रिश्चन लोकांच्या जास्त जवळची आहेत. त्यांना खुश करायची कामं ते करतात. त्याच्यामुळं हिंदूंनी असल्या पक्षाला मतं देऊ नयेत.’

देवेंद्र मक्कर नावाचे मोठ्ठे असामी ‘इंडियन्स फॉर ट्रम्प’ नावानं फेसबुक पेज चालवतात.

२०१६ पासून त्यांनी पोलिटिकल ऍक्शन कमिटी म्हणून आपलं पेज रजिस्टर केलंय. हा माणूस मोदींवर टीका करतो पण ट्रम्प यांना बापासारखं मानतो. तो म्हणतो, 

“एकसुद्धा भारतीय जेव्हा तात्यांच्यामागं उभा नव्हता तेव्हापासून मी त्यांचा  कार्यकर्ता आहे. ट्रम्प बिजनेसमॅन माणूसय त्यामुळं ते पाघळ न लावता काम करत असतात. माझा आज्जा आणि माझे वडील दोघंही शाखेत जायचे. भारतात होतो तेव्हा मी पण संघाची शाखा कधीच चुकवली नाही. इकडं आल्यावर मी कायम आपल्या धर्माला आधार देणाऱ्या लोकांना सपोर्ट करत आलोय. ट्रम्प हा त्यातला सगळ्यात बेश्ट माणूसय. मोदी साहेबांपेक्षा ट्रम्प भारतीयांचं आणि त्यातल्या त्यात आपल्या धर्माचं जास्त कल्याण करतील… ”

आजपर्यंत तिथं गेलेली भारतीय माणसं जास्त राजकारणाच्या फंदात पडत नव्हती मात्र हे येणारं इलेक्शन अमेरिकेच्या इतिहासाला सगळ्यात मोठं वळण लावणारं असेल असं म्हटलं जातंय.

एकदोन शहाणे देश वगळता आत्तापर्यंत अमेरिका जाईल त्याच्यामागं जगाने वाटचाल केलीय. आता नेमकं ह्या निवडणुकीत अमेरिका काय करते आणि आपली लोकं त्यात कुठल्या बाजूनं उतरतात त्यावर जगाची गणितं अवलंबून आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.