तू तेंव्हा तशी…

जेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांना आपण ओळखतो ते “सन्नाटा” या नावाने. “जिस देश में गंगा रहतां हैं” मधला हळवा सन्नाटा. त्यांनी बोलभिडूसाठी लिहलेला हा खास लेख.

दसरा सणाचा दिवस. संध्याकाळ…

तू मला दसऱ्यानिमित्त आपट्याच पान दिलस. पाया पडलीस. आपण दोघेही तसे वयाने लहान. दसऱ्याच्या सणाच महत्व कळत नव्हतं. पण तिन्हीसांजेन. दोघांना एकमेकांत विरघळून टाकलं होतं. पाया पडायला वाकलीस, पण मी लगेच तुझे दोन्ही खांदे धरले. शेवटी व्हायचे तेच झाले. त्या वयातसुद्धा मला वेड लावणाऱ्या तूझ्या घनदाट लांबसडक केसांच्या दोन्ही वेण्या. माझ्या पायाला स्पर्श करत होत्या. तुझ्या खांद्यावर साखळ दंडाप्रमाणे असलेल्या मखमली वेण्यांचा स्पर्श. माझ्या हाता पायांच्या माध्यमाने, माझ्या शरीरात वितळत होतीस. तुझ आणि माझं चुंबकत्व एक झालं..

जिथे आपण उभे होतो. तिथे बिल्डिंगचा दरवाजा, त्याच्या अगदी समोर वर जायचा जीना. तू चौथ्या आणि तिसऱ्या माळ्यावर रहायचीस, मी तिसऱ्या माळ्यावर.

आपण दोघ समोरासमोर त्या जिन्याच्या तोंडाशी उभे. तू दिलेलं सोनं म्हणून आपट्याचं पान माझ्या आयुष्याच सोन करील अशी दोघांची मुकस्थिती. ती स्तब्धता आपण दोघही निशब्ध उभे होतो. दोघांच्या भावना व्यक्त होत नव्हत्या. न कळत एक कृती घडली. तुझा हात हातात घेतला. तू दिलेलंल पान तूझ्या हातात ठेवलं. त्यावर माझा हात ठेवला. तितक्याच सहजतेने माझ्या हातावर हात ठेवलास.

आपल्या चार तळव्यांच्यामध्ये आपट्याच्या पानामुळे. दोघांच फुफ्फूस झालं. आपट्याचं पान आपल्या फुफ्फूसाचं प्रतिक झालं.

अजून मी आपल्या एका फुफ्फूसावरच जगतोय. तुझाच श्वास, तुझाच ध्यास, ध्यानी मनी ओठावर तुझच नाव खळकळत असत. त्या नावाच्या अनेक शब्दांनी मनातल्या मनात तूला हाक मारायचो. अजूनही. लिहून ठेवायचा प्रयत्न केला असता, विष्णू सहस्र नामावली सारखी तूझी नामावली झाली असती. इतकी ती नावं जीभेचा ताबा घेत होती, लाळेप्रमाणे…

 

 

तो दसरा सण, ती संध्याकाळ, ती जिन्याची पायरी, ती स्तब्धता. तो क्षण त्या क्षणाला वयाचा, भाषेचा, कुठल्याही लौकीक प्रकाराशी कसलाच संबध नव्हता. अबोल अबोध किती शुद्धता. त्या वयात प्रेम हा शब्द माहित नव्हता. साठ वर्षांपुर्वीचा तो काळ. त्या भावनेला आज I love you चा बाजारूपणा आलाय. 

ती आठवण तू व मी..

ह्या नम्र गोडप्रेमाची भाषा कधी बोलून दाखवावी लागली नाही, आणि ती आपण अजून जोपासली. तीला भाषाच नाही. ती शुद्धता अजून टिकली आज २०१८ पर्यन्त पुढे कदाचित अनेक जन्म ती स्वप्नवत अवस्था ती वेळ तो दिवस पुढे कसा सरकला काही कळलच नाही. 

सोसाट्याचा वादळी पाऊस थांबल्या सारखं वाटतय. मला स्वर्गाप्रमाणे असेलेली बिल्डींग आज त्या जागी नाही. ती मोडकळीस येत असताना, मी अधून मधून येत होतो. फक्त तुझ्यासाठी, सतारीच निमित्त महत्वाच होतं. अण्णांकडे म्हणजे तुझ्याकडेच तुझ्याचसाठी. 

बिल्डिंगमध्ये शिरल्यावर तेव्हडाच तो कोपरा किती आनंदाने न्याहाळत असे मी. एक वेगळाच आनंद अनुभवायचो. गोड सुखद क्षण अजूनही तिथे गोठलेला होता. ते मोडकळीस आलेले जिने, तुझ्या आठवणींच्या पायऱ्या चढायला लावीत असत. पहिल्या माळ्यापासून कोपरान् कोपरा तुझ्या आठवणींना बिलगत असे. अशावेळी तू दिसेपर्यन्त मी तुझ्यात विरघळलेला असे. लौकिक अर्थाने माझ प्रेम व्यक्त होण्याची गरजच वाटली नाही. जे माझ म्हणजे माझच, हेच खर.

हे ही किती त्रिवार सत्य, की दोघांची एकच अवस्था आहे… 

हि अवस्था एकमेकांच्या सानिध्यात राहण्यासाठी आहे. ज्या प्रमाणे सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रत्येक जीव त्याच्या कर्माप्रमाणे अनुभवत असतो. जशी संध्याकाळ मावळतीकडे जाते, तसे त्याच्या शरिराचेही असते. प्रत्यक्षात शारिरिक दृष्ट्या हा आभास आहे. जसे कपडा जूना झाल्यासारखे वाटणे. म्हणजेच आपल्याला आपल्यातील ओझं कमी कमी होत असल्यासारखे वाटणे. पण आपल्या माणसांची ओढ वाढत जाते. ही ओढ मरेपर्यन्त परिपक्व झालेली असते. आपण हवे ते साध्य करण्यासाठी सतत मनाच्या शक्तीला जो आकार दिलेला असतो, तो आकार, तो सोबती शेवटपर्यन्त सोबत असावा हि अपेक्षा पुढच्या कर्म भोगासाठी त्याची साथ त्याला का मिळू नये असा विचार नैसर्गिक आहे. 

माझ अधून मधून येणं. तुला पाहिल्यावर आपल्या विषय न बोलणं. तरी शब्दां पलिकडच समजून घेणं. ह्या अलौकीक भाषेच ध्वनित रुपांतर होवून, शब्दरुप झालं तर त्या संगितोत्सवाच्या आनंदोत्सवाच्या कारंज्यात आपण उभे राहू..!! 

  • किशोर नांदलस्कर
Leave A Reply

Your email address will not be published.