१०० वर्षे झाली आजही तुळजापूरात निजामाचा मंदिर बंदीचा कायदा पाळला जातो.

तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमधील आद्य पीठ मानले जाते. इथे तुळजाभवानीचे प्राचीन देऊळ असून हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले आहे. तुळजापूरची आई भवानी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी.

यंदाच्या वर्षी कोरोनामुळे अगदी नवरात्रीच्या काळातही हे मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी बंदच राहिलं, गेल्या काही दिवसांपूर्वी मंदिर खुले करण्यासाठी आंदोलने झाली, पोलिसांना कडक कारवाई देखील करावी लागली.

तुळजा भवानी ही फक्त महाराष्ट्राचीच नाही तर नेपाळच्या राजाचीही आराध्य देवता आहे. यामुळेच या मंदिराच्या बद्दल अनेकांच्या आस्था तीव्र आहेत. 

इथला प्राचीन इतिहास ठामपणे सध्यातरी सांगता येत नसला तरी, ‘तेर’ हे प्रसिद्ध सातवाहनकालीन व्यापारी केंद्र याच प्रदेशात असल्या कारणाने तुळजापूर परिसरातून इंडो-रोमन व्यापारी मार्ग जात असावा. या प्रदेशांवर पुढच्या काळात बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य, यादव, बहमनी, आदिलशाही, मोगल व निजाम या राजवटींचा अंमल होता.

तुळजाभवानीचे मंदिर बालाघाट डोंगररांगेतील ‘यमुनाचल’ नावाच्या डोंगरावर बांधलेले आहे.

सध्याच्या तुळजाभवानी मंदिरात मूळ जुन्या मंदिराचे काही अवशेष दिसून येतात. मंदिराच्या सभामंडपातील काही स्तंभ, तसेच मंदिर परिसरातील इतर प्राचीन अवशेषांवरून हे मंदिर साधारणतः १३ व्या शतकात बांधले असावे, असे दिसते. या काळात अनेक परकीय आक्रमणे तुळजापूरने झेलली, अफझलखानाने देखील हे मंदिर फोडले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीची पुनर्प्रतिष्ठापना केली होती.

आज आपण पाहतो त्या मंदिराची बांधणी साधारणतः अठराव्या शतकात निजामाच्या काळात निंबाळकर घराण्याच्या योगदानातून झाली असं सांगितलं जातं.

उस्मानाबाद, लातूर नांदेड हा मराठवाड्याचा भाग त्याकाळी निजामाच्या अखत्यारीत येत होता.  तुळजापूरवर देखील त्यांचच शासन होतं. हे मुस्लिम शासक सुरवातीच्या काळात मंदिराच्या कारभारात हस्तक्षेप करत नसत.

तुळजाभवानी मंदिराचा कारभार बहुतांश काळ स्थानिक पुजारीच पाहात होते.

सर्व जाती-धर्माचे पुजारी असलेले हे एकमेव देवस्थान. पण येथेही त्यांचे दोन गट. एक पाळीकर, तर दुसरा सोळानी. पाळीकरांचे अधिकार म्हणजे येणाऱ्या भक्तांची राहण्याची व्यवस्था करणे. पूजा, नैवेद्य, देवीच्या डाव्या बाजूस उभे राहण्याचा मान यांचा, तर देवीला अलंकार चढवणे, अभिषेक, पूजा, नैवेद्य आणि मूर्तीच्या उजव्या बाजूला उभे राहण्याचा अधिकार सोळानींचा. मंदिरातील हक्कावरून या दोन गटांत वाद निर्माण व्हायचे.

हे वाद वाढल्यावर निझामाचे तत्कालीन जहागीरदार रावरंभा निंबाळकर यांनी हे वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. 

पुढील काळात देखील हे वाद वाढत गेले. हे मतभेद मिटावेत व कायदा सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी, यासाठी निझाम सरकारने १२ मार्च १९०९ रोजी मंदिर ताब्यात घेऊन त्यासाठी देऊल ए कवायत कायदा तयार केला.

सहावा निजाम मीर मेहबूब अली हा आधुनिक विचारांचा होता. इंग्रजी शिक्षण घेतलेला तो पहिला निजाम.

त्याच्याच काळात हैद्राबाद मध्ये अनेक सुधारणा झाल्या. सरकारचे स्वतंत्र चलन बनवले, रेल्वे आणली. मीर मेहबूब अलीने आपल्या राज्यामध्ये स्वतंत्र खाती तयार करून मंत्रिमंडळ तयार केले होते.  धर्मासाठी स्वतंत्र कारभार पाहणारे खाते बनवले होते. या खात्याअंतर्गत प्रत्येक धर्माचा आदर राखण्याचीही भावना होती.

याच खात्यानुसार तुळजाभवानी मंदिरासाठी देऊल ए कवायत या स्वतंत्र कायद्याची निर्मिती केली. या कायद्याअनुसार मंदिरावर निजामाच्या प्रशासनाचा ताबा असला तरी मंदिरातील धार्मिक विधी किंवा पारंपारिक रीतिरीवाजामध्ये कोणताही हस्तक्षेप केला गेला नाही.

मुस्लिम धर्माचे कट्टरपणे पालन करणारा निजामाचा भावी वंशज मीर उस्मान अली याने देखील वडिलांची परंपरा पुढे देखील पाळली.

मंदिराच्या पारंपरिक विधींची जपणूक करताना त्यात अडचणी निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था कशी करावी, वाद न मिटल्यास न्यायालयात दाद मागावी, पुजाऱ्यांचे हक्क कायम राहावेत, अशा अनेक नियमांचा या कायद्यात समावेश होता. मात्र, मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक हिंदू धर्मातीलच असावेत, अशीही अट घालण्यात आलेली. जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराची ३ महिन्याला तपासणी करावी, संबंधित पुजारी वेळेत न आल्यास दुसऱ्या पुजाऱ्यांकडून पूजा विधी करून घ्यावेत आदी विषयांची या कायद्यात तरतूद होती.

देऊल ए कवायत कायद्यामध्ये अनेक महत्त्वाच्या तरतुदींचाही समावेश आहे. यामध्ये मंदिरात भाविकांना त्रास होऊ नये, आपसात वाद होऊन पावित्र्य भंग होऊ नये यासाठी गैरवर्तन करणाऱ्यांना मंदिर बंदीचा नियम करण्यात आला. अनेकांना या नियमानुसार मंदिरबंदी करण्यात आली असून यामध्ये सर्वाधिक पुजाऱ्यांचा समावेश आहे.

तरीही पुजाऱ्यांच्या मते देऊल ए कवायत हा कायदा चांगलाच असून त्यामध्ये सगळ्यांना न्याय  दिला जात होता. चुकीचे वागणाऱ्यांना शिक्षा, मंदिरात शिस्त राहावी, गडबड होऊ नये यासाठीची सोय होती.

मात्र काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने पुजाऱ्यांच्या हातून कारभार काढून घेतला व मंदिर राज्यसरकारच्या ताब्यात आणले. आजही देऊल ए कवायतचे पालन होत असले तरी मंदिरातील पुजाऱ्यांचे हक्क, विविध विधी व पूजा, भाविकांनी अर्पण केलेल्या देणगी यांविषयीचे पारंपरिक हक्क यांना आता पायबंद बसला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.