महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी नेपाळच्या राजाची कुलदेवता कशी?

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे.

भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता-तुरजा-तुळजा (भवानी) या नावाने ओळखली जाते. फक्त महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून शेकडो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात.

आश्चर्य म्हणजे ही तुळजापूरची तुळजाभवानी नेपाळच्या राजाचीही आराध्यदेवता आहे.

तुळजाभवानी नेपाळला गेली कशी यामागेही एक मोठा इतिहास आहे.

कर्नाटकी घराण्याचा हरीसिंह हा बिहारच्या चंपारण्यचा राजा होता. याचं घराणं दक्षिण भारतातील होतं. त्यांच्या देवघरात तुळजाभवानीची मूर्ती होती.

पुढे जेव्हा दिल्लीचा सुलतान घियासुद्दीन तुघलक याने हरीसिंहला युद्धात पराभूत केले तेव्हा हरीसिंह नेपाळला पळाला.

जाताना आपल्यासोबत देवघरातील तुळजाभवानीची मूर्ती नेली.

नेपाळमध्ये तेव्हा मल्ल राजांचे राज्य होते. तिथल्या रूद्रमल्ल या राजाला एक मुलगी होती. तिच्याशिवाय नेपाळच्या राजाला वारस नव्हता. रुद्रमल्लने तिचे लग्न हरीसिंह याच्या मुलाशी जयपालसिंग याच्याशी करून दिले.

रुद्रमल्लनंतर हरीसिंहचं घराणं नेपाळनरेश बनलं.

वाताहत झालेलं त्याच राज्य त्यांना परत मिळालं. ही सगळी तुळजाभवानीची कृपा अस म्हणून नेपाळच्या राजांनी तिची भक्तपुर येथे प्रतिष्ठापना केली. एक सुंदर मंदिर उभारलं. तेव्हापासून तुळजाभवानी तिथल्या राजांची कुलदेवता बनली.

IMG 20200921 212746

 

पुढे नेपाळच्या राजाचा साम्राज्यविस्तार घडून आला.

साम्राज्यविस्तारोबरच या घराण्याचे तीन भाग पडून भक्तपूर, काठमांडू आणि पाटण अशा तीन राजधान्या तयार झाल्या.

मल्ल राजांनी तुळजाभवानी आपल्या प्रत्येक राजधानीत विराजमान केली.

इ. स. १५६७ साली महेंद्रमल्ल राजाने काठमांडूत तर १६६७ ला श्रीनिवास मल्लाने भक्तपूर आणि १७३६ ला विष्णू मल्लाने पाटण याप्रमाणे भव्य अशी तुळजाभवानीची मंदिरे बांधली.

IMG 20200921 212403

नेपाळी भाषेत तुळजाभवानीला देगू तलेजूभवानी म्हटले जाते.

मल्ल राजांनी बांधलेली तुळजाभवानीची मंदिरे नेवारी बांधकामशैलीची आदर्श उदाहरणे आहेत. उतरते छप्पर किंवा पॅगोडा स्टाईल मधली ही मंदिरे भव्य असून देगू तलेजूभवानीच्या बाजूला राजाचा भव्य राजवाडा बांधलेला आहे.

या मंदिर परिसराला दरबार चौक म्हटले जाते.

नेपाळच्या राजाच्या वंशावळीचे एका ग्रंथात उल्लेख आहे यात हे घराणे कोकणदेशातून आल्याचा उल्लेख आहे. सोलापुरात चंद्रभागातिरी त्यांचे राज्य होते व तिथून ही मंडळी उत्तरेत गेली.

आजही तुळजापूरच्या तुळजाभवानीची जशी पूजा केली जाते तशीच पूजा नेपाळच्या तुळजाभवानीची होते.

तुळजापुरातील सेवेकऱ्यांना सोळा सेवेकरी म्हटले जाते त्याप्रमाणे तिथे सोलकास्ट म्हणतात. हे पुजारी देखील शेकडो वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून नेपाळला गेले आहेत असं सांगितलं जातं.

शेवटचे हिंदू राजे म्हणवले जाणाऱ्या नेपाळची राजेशाही देखील विलीन झाली. मात्र राजघराणे कोठेही गेले तरी त्यांच्या सोबत कुलदेवता तुळजाभवानीची मूर्ती देव्हाऱ्यात असतेच. नेपाळच्या राजांची ही देवता तिथल्या प्रजेचीही आराध्यदैवत बनली आहे.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Vivek says

    Jay bhawani

  2. भारतीय वंशाच्या देवतेला नेपाळ राजांनी आपले मानले, हे महाराष्ट्र किती सांस्कृतिक दृष्ट्या पुढारलेला आहे, याचा पुरावा होय. जय तुळजा मटा भवानी.

Leave A Reply

Your email address will not be published.