पुण्यातील तुळजा भवानी मंदिरात फक्त नवरात्रच नाही तर शिवजयंती सुद्धा जोरात साजरी होते

“जय भवानी जय शिवाजी” ही एक गर्जना संपुर्ण महाराष्ट्राला नवसंजीवनी देते. या दोन्ही नावापुढे मराठी माणूस आपोआप नतमस्तक होतो. छत्रपती शिवराय ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि भवानीमाता ही या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांनी भवानी मातेची निष्ठेने अखंड सेवा केली. त्यामुळे छत्रपती शिवरायांची आणि तमाम महाराष्ट्राची आराध्य दैवत म्हणून भवानी माता गौरविली गेली. 

छत्रपती शिवरायांनी जगदंबेची महापूजा कोल्हापूर व प्रतापगडावर प्रामुख्याने बांधली. शिवरायांच्या काळात या जगदंबेची उपासना नवीन साडेतीन पीठे मान्य करून महाराष्ट्रामध्ये केली गेली. तुळजाभवानी या तुळजापूरच्या पीठाचे ठाणे म्हणून पुण्यामध्ये एक मंदिर बांधले गेले ते म्हणजे भवानी पेठेतील भवानी मातेचे मंदिर.

पुण्याच्या पूर्व भागात भवानी मातेचे मंदिर आहे. पूर्व भागात साधारणता व्यापारी, मुसलमान, ख्रिश्चन आणि सिंधी या लोकांची जास्त वस्ती आहे. या भागात पूर्वी औरंगजेबाच्या सैन्याची छावणी होती. पुढे त्या जागेवर पुण्याचा विस्तार पेशव्यांच्या काळात झाला. तेलबिया, लाकूड आणि भुसारी व्यापाऱ्यांची अशी ही पेठ वसवली गेली होती. भवानी मातेच्या मंदिरामुळे या पेठेला भवानी पेठ असे नाव देण्यात आले.

 या पेठेच्या मध्यभागी असलेल्या सूर्यमुखी सिद्धिविनायक मंदिराच्या जवळच एक चावडी होती. त्यावर रामोशी समाजाचे पहारेकरी असायचे. म्हणूनच त्या भागाला रामोशी गेट असे नाव पडले. 

भवानी मातेचे मंदिर कधी बांधले गेले याचा निश्चित असा पुरावा उपलब्ध नाही. पण माधवराव पेशव्यांचे कारभारी सखाराम भगवंत यांनी या देवीचे मंदिर बांधले असे म्हंटले जाते. परंतु सुतवणे व सातपुते या घराण्याकडे या मंदिराची मालकी पूर्वापार होती असे सुद्धा आढळून येते. मंदिराचे सर्व बांधकाम दगडी असून मंदिर भक्कम पायावर उभे आहे. मंदिराचा विस्तार मोठा असून गाभारा, सभामंडप व पुढे मोठा चौक अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या तिन्ही कोपऱ्यात कोंढणपुरची दुर्गामाता, विठ्ठल व काळुबाई या देवतांची छोटी छोटी मंदिरे आहेत.

मंदिरात असलेली भवानीमातेचे मूर्ती कोणी घडविली याबाबत माहिती उपलब्ध नाही. मूर्तीची उंची तीन फूट आहे. पण आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे संपूर्ण मूर्ती ही वाळू पासून बनविलेली आहे. मूर्ती चतुर्भुज असून ती स्वयंभू आहे असे म्हणतात. छत्रपती शिवरायांनी मान्य केलेल्या पिठाचे हे एक ठाणे असल्याने या मंदिराकडे भाविकांचा जास्त ओढा असतो.

या देवीचे वैशिष्ट्य म्हणजे जुन्या काळातील जुन्या प्रकारातील अलंकार म्हणजेच तन्मणी, ठुशी, चिंच पेटी इत्यादी अलंकार या देवीला घातलेले आहेत.

नवरात्र हा या देवीचा मुख्य उत्सव असला तरी शिवजयंती सारखा उत्सव हे मंदिर मोठ्या प्रमाणात साजरा करते. शिवजयंती निमित्त येथे मोठ्या प्रमाणावर मिरवणूक काढण्यात येते. आणि दरवर्षी पुणे महानगरपालिकेच्या महापौरांच्या हस्ते या मिरवणुकीचा नारळ फोडण्यात येतो.

या देवीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही देवी इतर जाती जमातींच्या भाविकांचे पण श्रद्धास्थान आहे. विशेष म्हणजे सिंधी समाजात या देवी बद्दल फार आदर आहे गेले चाळीस वर्षे न चुकता सिंधी भाविक या देवीच्या दर्शनाला येतात. पंढरपुराहून विठ्ठलाचे दर्शन घेऊन येणाऱ्या काही पालख्या या परतीच्या वेळेस या मंदिरात विश्रांतीसाठी थांबतात. या मंदिरात त्या पालख्यांना मानाचा प्रसाद असतो.

असे हे ऐतिहासिक महत्त्व लाभलेले पुण्यातील भवानी पेठेतील तुळजा भवानी मातेचे मंदिर.

  •  कपिल जाधव
हे हि वाच भिडू
Leave A Reply

Your email address will not be published.