नंबर वन सिंगर बनण्याची क्षमता असणाऱ्या तिला परिस्थितीने ‘टुणटुण’ बनवलं.

११ जुलै १९२३ रोजी युपीच्या अमरोही जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात उमादेवी खत्री नावाच्या मुलीचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताची. हे एक शेतकऱ्याच कुटुंब. आई जन्म देताच गेली होती, वडिलांचा जमिनीच्या वादातून खून झाला आणि अगदी लहान वयातच उमा पोरकी झाली. अगदी दोन वेळच जेवण मिळणे देखील मुश्कील झाल.

अशातच तिचा सांभाळ तिच्या काकांनी केला.

जुने कर्मठ घर असल्यामुळे मुलीना शिकण्याची परवानगी नव्हती. त्यांनी फक्त स्वयंपाक, भांडी, धुणी एवढच करायचं. पण उमा मोठी जिद्दी होती. घरातच आपल्या भावांकडून पुस्तक वाचायला शिकली, आकडेमोड करायला शिकली.  तिचा आवाज मोठा सुरेल होता. सगळे तिच्या गाण्याचं कौतुक करायचे.

तिच्या घरात एक रेडीओ होता. त्यारेडीओ वर वाजणाऱ्या फिल्मी गाण्यांच्या स्वप्नाळू विश्वात छोटी उमा हरवून जायची. जसे जसे पंख फुटू लागले तस ते घराच्या चार भिंतीमधल छोटसं जग तिला अडवू शकल नाही.

सतरा अठरा वर्षांची असतानाच ती घर सोडून पळाली.

ती आणि तिची एक मैत्रिण थेट मुंबईला आल्या. मुंबईत तेही संगीतकार नौशाद यांच्या दारावर थडकल्या. उमादेवी त्याकाळच्या मानाने प्रचंड बोल्ड होती. जर तुम्ही मला काम दिल नाही तर मी सरळ समुद्रात उडी मारून आत्महत्या करेन अशी धमकी तिने नौशाद यांना दिली.

नौशादना तिचा बेधडकपणा आवडला. बघू तरी अस म्हणत त्यांनी या जिद्दी मुलीची ऑडिशन घेतली. आश्चर्य म्हणजे तिचा आवाज त्यांना पसंत पडला. त्यांनी तिला वामिक आझरा या सिनेमात गाण्याची संधी दिली.

नौशाद यांनी उमा देवीची ओळख ए.आर.कारदार या प्रोड्युसरशी करून दिली.

कारदार हे त्याकाळी हिंदी फिल्मइंडस्ट्रीमधले सर्वात निर्माते दिग्दर्शक होते. त्यांनी नौशाद, सुरैय्या, मजरूह सुलतानपुरी अशा अनेक नव्या कलाकारांना संधी दिली होती. रफी यांचं पहिलं हिट गाण सुद्धा कारदार यांच्या सिनेमातीलच आहे. रत्नपारखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारदार यांनी सिंगर उमा देवीला साईन केल.

आपल्या पहिलाच सिनेमात म्हणजे दर्द मध्ये उमादेवीनी गायलेली सगळी गाणी चांगलीच गाजली पण त्यातल एक गाण सुपरहिट होत,

“अफसाना लिख रही हुं दिले बेकरार का, आंखो में रंग भर के तेरे इंतजार का “

उमाच हे गाण रेडीओमुळे संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात गाजलं. ते वर्ष होतं १९४७.

तिथून पुढे उमाकडे अनेक सिनेमांची लाईन लागली. मदर इंडिया बनवणारे मेहबूब खान यांच्या अनोखी अदा या सिनेमातील “काहे जिया डोले” आणि “दिल को  लगाके हमने कुछ भी ना पाया” अशी गाणी रेडीओवर धुमाकूळ घालत होती. तिची चर्चा भारतातल्या नंबर वन सिंगर मध्ये केली जात होती.

अशातच तिने चंद्रलेखा या तामिळ सिनेमाच्या हिंदी व्हर्जनमध्ये सात गाणी गायली. या सिनेमातील सांज कि बेला हे गाण आजही तीच सर्वश्रेष्ठ गाण समजल जात.

पण दुर्दैवाने याच सिनेमानंतर तिच्या गाण्याच्या करीयरला उतरती कळा लागली.

चंद्रलेखा बनवणाऱ्या मद्रासच्या जेमिनी स्टुडीओ बरोबर काम करून उमादेवीने कारदार यांच्याशी केलेल्या कराराचा भंग केला होता. याचा तिला फटका बसला. मुंबईमधल्या अनेक निर्मात्यांनी तिला काम देण्यास नकार दिला. अशातच लता व आशा या मंगेशकर भगिनींचा तेव्हा उदय होत होता.

फाळणी नंतर नूरजहा सारख्या नंबर वन सिंगर पाकिस्तानला गेल्या होत्या, त्यांची जागा घेऊ पाहणारी उमा देवी शास्त्रीय संगीताचे शिक्षण नसल्यामुळे मागे पडली. लता मंगेशकर यांच्या आवाजातील रेंज, त्यातील वैविध्य, गोडवा हा उमादेवी कडे नव्हतं.

तिची बरीचशी कामे लता मंगेशकर यांच्या कडे गेली.

दरम्यानच्या काळात अख्तर अब्बास काझी या माजी एक्साईज ड्युटी ऑफिसरसोबत तीच लग्न झालं होत. ते फाळणीनंतर पाकिस्तानला गेले होते पण फक्त तिच्यासाठी ते परत आले. लग्न तर केल पण त्यांच्याकडे देखील नोकरी नव्हती.

पुढे काय हा उमा देवी समोर प्रश्न पडला होता. त्यातच तिला तिचे मानलेले भाऊ व गुरु नौशाद यांनी सल्ला दिला कि,

तुम अॅक्टिंग ट्राय क्यू नही करती?”

उमादेवी बडबडी होती, ती जिथे जाईल तिथे आपल्या उर्जेने तिथलं वातावरण भारावून टाकत असे. तिची विनोदबुद्धी तीक्ष्ण होती. पण उमा दिसायला देखणी नव्हती. लग्नानंतर प्रेग्नन्सी नंतर तीच वजन प्रचंड होतं. पण अनेकदा ती स्वतःच स्वतःच्या जाडेपणावर जोक मारायची.

तिचा हाच बिनधास्तपणा, तिचा सहज कॉमिक सेन्स सिनेमात भरपूर रोल मिळवून देईल हे नौशाद यांनी तिला समजावलं. उमा देवी गाण सोडून अभिनयाकडे वळायला तयार झाली. तिची फक्त एकच विचित्र अट होती कि

पहिला सिनेमा करणार ते दिलीप कुमार बरोबरच करणार.

दिलीप कुमार त्याकाळचा सुपरस्टार होता.

भारतभरातल्या मुली त्याच्यावर आपल जीव ओवाळून टाकायच्या. यात उमा सुद्धा होती. तिचं दिलीप कुमार सोबत काम करायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी देखील नौशाद यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या शिफारसीमुळे उमा देवीला बाबुल हा सिनेमा मिळाला. यात दिलीप कुमारची हिरोईन नर्गिस होती. उमाला सुद्धा एक छोटासा रोल होता.

दिलीप कुमारने या सिनेमात तीच टुणटुण अस नामकरण केलं.

तिथून पुढे उमादेवी कायमची टुणटुण बनली.

गुरुदत्तचा आरपार, प्यासा, कागज के फुल, राज कपूरचा फिर सुबह होगी अशा सिनेमापासून तिचा प्रवास सुरु झाला. सिनेमात टुणटुणची वादळी एन्ट्री झाल्यापासून अख्खं थिएटर हास्यस्फोटाने दणाणून जायचं. मुक्री सारखा बुटका नवरा आणि टुणटुण त्याची कजाग हिडींबा बायको असे हे सीन असायचे.

एके काळी नाजूक गाणी गाणारी उमादेवी बटबटीत कुरूपतेचा मेकअप करून भसाड्या आवाजात आपल्या नवऱ्याला वठणीवर आणायची ते बघून सगळा देश खो खो हसायचा.

फक्त टुणटुणची कॉमेडी बघायला लोक सिनेमा बघायला जाऊ लागले. एवढे दिवस कॉमेडी ही फक्त पुरुष कलाकारांची मक्तेदारी होती. पण ही बंद दारे टुणटुणने आपल्या शक्तीशाली हातानी मोडून काढली. भगवान दादा, जॉनी वॉकर,मेहमूद, केश्तो मुखर्जी, मुक्री, धुमाळ अशा तगड्या कॉमेडी अभिनेत्यांच्या समोर टुणटुण झाकोळली नाही.

टुणटुणच्या नावावर देखील सिनेमा चालू लागला.

साठच्या व सत्तरच्या दशकात जवळपास प्रत्येक सिनेमात तीच दर्शन होई. एखाद्या मोठ्या स्टारप्रमाणे ती फेमस होती.

आज मागे वळून पाहिलं तर जाणवत की हिंदी सिनेमातल्या तिच्या आयुष्यात फक्त जाडेपणावर काळ्या रंगावर जोक झाले. बाकी तिच्या अभिनयक्षमतेचा कस पाहणारे, वेगळे रोल कधी मिळालेच नाही. दिलीपकुमार पासून ते नमक हलालच्या अमिताभ बच्चनपर्यंत बदलत गेलेला भारतीय सिनेमा पाहिला, अनुभवला.

पण तिच्या करीयरचे रोल कधी बदलत गेले नाही.  

प्रेक्षकांनी देखील तिला कधी वेगळ्या रोल मध्ये बघायचा विचार देखील केला नाही. इतकच काय तर संपूर्ण भारतात जाडेपणावर चिडवण्यासाठी टुणटुण हा शब्द वापरला जाऊ लागला. टुणटुणने देखील ते खिलाडूवृत्तीने स्वीकारलं. कोणतीही टीका, उपहास तिला रोखू शकला नाही. आपल आयुष्य ती मानाने जगली. जवळपास २०० सिनेमात काम केल. फिल्म इंडस्ट्री मध्ये पन्नास वर्षे गाजवली.

२४ नोव्हेंबर २००३ रोजी मुंबईत राहत्या घरी तिचं निधन झाल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.