जम्मू काश्मीरच्या शेवटच्या टोकावर, दहा हजार फुटांवर शिवरायांची प्रतिमा आहे..

“टुरटुक” हे जम्मू आणि काश्मीरच्या लेह जिल्ह्यातील एक गाव आहे. हे श्योक नदीच्या काठावर लेह शहरापासून २०५ किमी अंतरावर असलेल्या नुब्रा तहसीलमध्ये स्थित आहे…

१९७१ पर्यंत टुरटुक पाकिस्तानच्या ताब्यात होत, त्यानंतर भारताने या रणनीतिक क्षेत्रावर नियंत्रण मिळविले…

हे गाव २००९ मध्ये पर्यटकांसाठी उघडण्यात आले.

भौगोलिकदृष्ट्या, टुरटुक बाल्टिस्तान प्रदेशात येणाऱ्या चार गावांपैकी एक आहे (त्याक्षी, चालुंखा आणी थांग हे बाकी ३ गावे). हे प्रामुख्याने एक मुस्लिम गाव आहे आणि रहिवासी लडाखी आणि उर्दू यासारख्या भाषा बोलतात.

हे भारतातील शेवटचे प्रमुख गाव आहे जिथे पर्यटक नियंत्रण रेषेखालील (LOC) पर्यटनाची परवानगी आहे. भारताची शेवटची चेकपोस्ट इथेच आहे त्यानंतर पाकिस्तान-नियंत्रित गिलगिट-बाल्टिस्तानची सुरुवात होते. सियाचिन ग्लेशियरचे प्रवेशद्वार म्हटले जाते..

या गावात आम्ही रात्री ९.३० ला पोचलो. इथे २-४ हॉटेल्स आहेत, योगायोगाने आम्हाला रूम भेटली. हॉटेलमालक सांगत होता रात्री ११ ला लाईट जाणार आहे, पटकन जेवणाची ऑर्डर द्या. (११ वाजता त्याने जनरेटर बंद केला, आता LOC जवळ असल्याने या गावात लाईट नसेल असा अंदाज आम्ही लावला). सकाळी ४ ला उजेड पडतो इथे त्यामुळे सगळ्यांना लवकर जाग आली. ७ वाजेपर्यंत आम्ही यावरून LOC बघायला जायचं ठरवलं. हॉटेल मालक कडून सगळी माहिती घेतली. टुरटुक मधुनपुढे २-३ किमी वर आर्मीचा चेकपोस्ट आहे.

गाडी वळून चेकपोस्ट कडे वळती तोच आमच्यात एकजण बोला “राजेंचा” फोटो इथे १०,००० फुटावर…आम्ही सगळे ते पाहून भारावून गेलो.

अंगावर काटा येण्यासारखा प्रसंग होता तो. चेक पोस्ट जवळ पोहचतास असं लक्षात आलं कि LOC ची पूर्ण जबाबदारी हि “मराठा बटालियन”चा एक भाग असलेली “जंगी पलटण” कडे आहे.

चेकपोस्ट जवळ गेल्यावर मराठी लोकांना पाहून त्यांना पण हायस वाटलं. LOC पाहायची वेळ ही सकाळी ९-४ अशी आहे. त्यामुळे १.३० तास आम्हाला बसावं लागल. पण यावेळेत कमांडरनी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यातूनच माहिती मिळाली कि हा आपण जिथे बसलोय तो प्रदेश १९७१ च्या युद्धात आपण पाकिस्तान कडून जिंकलाय. अजून पण त्या गावातील काही लोकांचे पाहुणे पाकिस्तानमध्ये आहेत. कोणाचे आई वडील तिकडे, तर कोणाची पोरंबाळं तिकडं. भेटायला जातात अधून मधून (अर्थातच व्हिसा काढून). 

त्या थंडीमध्ये १०,००० फुटावर त्यांनी आम्हाला गरम गरम बटाटावडा तयार करून दिला.

९ नंतर त्यांनी आम्हाला पुढे LOC पाहायला पुढे जाण्यास परवानगी दिली. त्या आधी त्यांनी पुढच्या मिलिटरी बेस  ला इथून एक टुरिस्ट बस सोडत आहोंत असा कॉल केला. असं का विचारलं तेव्हा हसत हसत ते म्हणाले २० मिनटात तुमची गाडी तिथं पोहचली नाहीतर तुमच्या गाडीला काहीतरी घातपात झालाय असं समजतो आम्ही. 

leh2

ज्या ठिकाणी पुढचा मिलिटरी बेस होता ते म्हणजे भारतातील शेवटचं गाव “थांग” पाकिस्तान पासून फक्त २.२ किमी लांब उभा होतो आम्ही. त्या बेसवर शिपाई होते त्यांनी आम्हाला दुर्बीण मधून समोरच्या डोंगरामधले पाकिस्तान आर्मीचे बेस दाखवले…तिथे फडकणारा पाकिस्तानचा झेंडा स्पष्ट दिसत होता. ३ डोंगरांच्या मध्ये आम्ही उभे होता.

समोर आणि डाव्या हाताला नदीच्या पलीकडे पाकिस्तानचा डोंगर. त्या डोंगरावरती जो पाकिस्तानचा बेस होता तिथून आमच्यावर सुद्धा नजर ठेवली जात आहे असं आम्हाला तो शिपाई सांगत होता. 

यावेळेतच तिथे त्या गावातला एकजण आम्हला पाहत होता. हळूहळू त्याच्या बोलण्यातून या भागाच्या बऱ्याच गोष्टी कळाल्या. 

मोहम्मद, जो आता पन्नाशीचा असेल याच “थांग” गावात राहतो, त्याचा मोठा भाऊ आणि आजोबा इथेच रहायचे पण त्याचे आई-वडील १९७१ नंतर पाकिस्ताननी व्यापलेल्या बाल्टिस्तान मध्ये आहे. दुपारच्या चहाचा घोट घेत असताना तो सांगत होता, त्यावेळी युद्धविराम घोषित केल्यानंतर भारतीय आर्मी ने त्याच्या वडिलांना हातात पांढरा झेंडा घेऊन पाकिस्तान बॉर्डर कडे पाठवले होते. 

त्यांच्या हातात भारतीय आर्मीने एक पात्र होते ज्यात आपल्या कुटुंबाला भारतीय बाजूला आणण्यासाठी विनंती केली होती, पण त्यांना ताब्यात घेण्यात आले. 

मोहम्मद ला काही झालं तरी आपल्या आई वडिलांना भेटायचं होत. 

शेवटी २०१४ मध्ये त्याला दीर्घकाळ आणि वेदनादायक प्रक्रियेनंतर पाकिस्तानचा व्हिसा मिळाला.

“जर माझे आई वडील मरण पावले आहेत असं आम्हाला कळालं असत तर आम्हाला एवढं दुःख झालं नसत, पण ते जिवंत असून पण आम्हाला त्यांना भेटायला मिळत नाही..”

असं तो एकदम भरलेल्या आवाजात बोलला…

१९७१ मध्ये युद्धबंदी जाहीर केल्यानंतर भारतीय जवान काबीज केलेल्या गावांच्या मूलभूत गरजा पूर्ण करु लागल्या. कापड, केरोसिन सारख्या दैनिक वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची व्यवस्था करण्यात आली. डॉक्टर आणि हॉस्पिटल कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आणि नवीन पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या. नंतर ‘ऑपरेशन सद्भावना’ यासारख्या उपक्रमांची सुरूवात गरिबी कमी करण्यासाठी आणि नोकर्या तयार करण्यासाठी लष्कराला करण्यात आली. या क्षेत्रात वैद्यकीय आणि शालेय सुविधाही आणत आहेत.

मोहम्मद हा भारतीय सेनेचा खूप आभारी आहे असं म्हणतो. 

“मी भारतीय सैन्याची प्रशंसा करतो आणि त्यांनी आम्हाला दिलेली सर्व मदत – अन्न, कपडे, शिक्षण. माझ्यासाठी, उपर अल्लाह, आणि नीचे भारतीय सेना, “तो म्हणाला. लहानपणी त्याला आणी त्याच्या भावाला आर्मी लाल रंगाचे कपडे द्यायची. काही लाकडं जाळून धूर करायची आणि त्यांना मोकळ्या जागेत खेळून द्याची कारण फक्त त्या धुरामुळे त्याच्या आई वडिलाना पाकिस्तान बॉर्डर वरून दुर्बिणीतून बघता यावं.

नियतीचा खेळ पण कसा आहे ना “थांग” पासून बाल्टिस्तानच अंतर फक्त २.२ किमीच पण आई-वडिलांना भेटायला त्याला ४६ वर्ष लागली…

  • ऋषीकेश चव्हाण.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.