एक छोटासा अपघात झाला आणि जगातील सर्वात रहस्यमयी कबरीचं दार उघडलं गेलं..

उत्खनन म्हणजे गाडलेली मढी, संस्कृती उकरून काढणं. आता आपल्याला जगात आहे तेवढीच लफडी झेपत नाहीत. पण काही लोक त्यांच्या पलीकडे जाऊन कित्येक शतके आधी काय घडून गेलं याचा शोध लावत असतात.

थियोडोर डेव्हीस नावाच्या माणसात याचा मोठा कीडा होता. १९०७ सालची गोष्ट. आपल्या टीमसंगट बाकी ठिकाणी वाळू उकरत असताना डेव्हीसला काही वस्तू अचानक घावल्या.

त्याच्यावर काही चिन्हे कोरलेली होती आणि काही वस्तूंवर त्याला तुतनखामनचं नाव सापडलं.

आता तुतनखामन म्हणजे काय? तर बाकी जगातले लोक जेव्हा शिकारी अवस्थेत होते तेव्हा इंजिप्तमध्ये एक मोठं राजघराणे सुरू झालं होतं. या राजाला म्हणायचे फॅरो – म्हणजे देवाचा पोरगा. आणि हा फॅरो तेव्हा सगळ्या इजिप्तवर राज्य करायचा.

त्यातला सगळ्यात फेमस झालेला राजा म्हणजे हा तुतनखामन!

आपण टिव्हीत जो पिरॅमिड बघतो तो याच्यासाठीच बनवला गेला होता.

याची ममी म्हणजे डेडबॉडी तिथं ठेवलेली आहे. 1342 ते 1325 इसवी सन पूर्व काळात याचं राज्य होतं. त्याच्या राज्याला न्यू किंगडम म्हणून ओळखलं जातं.

त्याचा फादर सुद्धा मोठा राजा होता. आई पण राजघराण्यातील म्हणजे त्याची आत्याच होती. त्यामुळं बख्खळ पैसा.

म्हणून राजा मेल्यावर लोकांनी त्याच्या नावाने मोठमोठ्या पिरॅमिड बांधल्या. अनेक दागिने आभूषणे गडगंज सोनं नाणे भरून ठेवलं.

त्याच्या कबरीला KV62 असं नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे. त्याच्या कबरीला दिलेलं नाव फेमस असण्याचं कारण म्हणजे या सोन्याच्या आख्यायिका. लोकांमध्ये त्याचं नाव प्रचंड फेमस झालं होतं.

या खोऱ्यालाच राजाचं खोरं म्हनलं जायचं.

हॉवर्ड कार्टर नावाच्या माणसानं १९२२ साली याचा शोध लावला. त्या काळातल्या जुन्या कामगार लोकांच्या झोपड्या जिथं होत्या त्याच्या खाली कार्टर सायबानी उत्खनन करायला सुरुवात केली.

दरम्यानच्या काळात या ठिकाणी दोन वेळा लूटमार होण्याची घटना घडली होती.

होरेमहेब राजाच्या कबरीचा शोध नुकताच लागला होता. त्यामुळे डेव्हीस साहेबांनी दुसरी कबर आपल्याला नक्कीच मिळेल या विश्वासाने आपले उत्खनन चालूच ठेवले.

1912 साली त्यांनी प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधामध्ये या दोन्ही कबरींच्या उत्खननाचा सविस्तर उल्लेख त्यांनी आपल्या लेखनात केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात की

आता व्हॅली ऑफ किंग्स ही जागा रिकामी झाली आहे असे मला वाटते. म्हणजे इथून पुढे तेथे कोणत्याही राजांच्या कबरी सापडणार नाहीत असे ते म्हणतात.

लॉर्ड कारनारवोन या श्रीमंत माणसाने आपला ब्रिटिश अधिकारी आणि इजिप्तच्या विषयांमधल्या तज्ञ हॉवर्ड कार्टर यांची नेमणूक 1922 साली या ठिकाणी केली.

कार्टर येथे आधीही येऊन गेला होता. त्याने त्या काळात झोपड्यांच्या खाली केलेले उत्खनन अजूनही त्याच अवस्थेत होते. त्यामुळे त्याने तेथूनच पुन्हा या सगळ्याचा कारभार आपल्या हातात घेतला पुन्हा नव्याने उत्खनन करायला त्याने सुरुवात केली.

त्यांनी पुन्हा तेथील नव्या झोपड्या हटवल्या व उत्खननाच्या जागेवरचा राडारोडा चिखल आणि माती बाजूला सारली.

त्याच्या टीम मध्ये त्याच्या सोबत काही स्थानिक आणि काही ब्रिटिश लोक होते. स्थानिक लोकांपैकी अब्दुल रसूल हा लहान पोरगा संशोधकांना पाणी देण्यासाठी मदत करत होता.

अब्दुल नेहमीच उत्खननाच्या जागेवरती येत असे. एकदा असाच तो पाणी घेऊन आलेला असताना एका दगडावरून त्याचा पाय घसरला.

तो दगड बाजूला झाल्यानंतर त्याच्या खाली एक प्रचंड मोठी पायऱ्यांची ओळ संशोधकांना तेथे आढळून आली. याचा अजून शोध घेतल्यानंतर हा मार्ग एका वेगळ्याच ठिकाणी जात होता. कार्टरने या पायऱ्या थोड्या थोड्या करून खणून काढल्या.

इतर कुणालाही हे काम देण्याऐवजी कार्टर स्वतः यामध्ये उतरला. याठिकाणी काहीतरी नवीन सापडेल अशी त्याला खात्री होती. त्यामुळे त्याने स्वतः या कामात रस घेतला.

पायऱ्या कोरून झाल्यानंतर त्याला चिखलाने पूर्णपणे माखलेले एक दार सापडले.

या दारावरती काही जुनी चिन्हे होती व काही मजकूर हा हायरोग्लिपिक या जुन्या लिपीमध्ये कोरलेला होता.

त्याने तातडीने आपला बॉस लॉर्ड कारनारवोन याला तार पाठवली व आपल्या हातात असेल ते काम सोडून ताबडतोब इजिप्तमध्ये यायला सांगितले. त्याने ही तार वाचून या कामाचे महत्त्व ओळखले व लगेचच तो इजिप्त कडे निघाला. येथे पोहोचल्यानंतर दोघांचा आश्चर्याला पारावार उरला नाही.

आतापर्यंत फक्त याच्या दंतकथा आणि आख्यायिका सांगितल्या जात होत्या. त्या राजाच्या कबरीचा ठिकाणा साक्षात दोघांच्या हातात आला होता. या ठिकाणी अनेक सोने-नाणे असणार होते.

तसेच या राजाचा पूर्णपणे सोन्याने बनवलेला मुखवटा देखील येथेच लपलेला होता.

पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर खाली अजुन एक दार पूर्णपणे बंद केले होते. ते दार आजवर कधीच उघडले गेले नाही असे त्याला वाटत होते. मात्र नंतरच्या काळात अधिक संशोधन झाल्यानंतर हे दार त्याआधी दोनदा उघडले गेले होते याचा शोध लागला. अर्थात हे दार नेमके कोणत्या काळात उघडले गेले याची कोणतीही माहिती अद्याप तरी मिळू शकलेली नाही.

खाली गेल्यानंतर त्याला चुनखडी त्यातून तयार केलेला एक बोगदा सापडला. हा बोगदा कदाचित चोरांनी तयार केला असावा आणि या जागेची माहिती असणारे काही लुटारू सोने चोरून नेण्यासाठी याचा वापर करत असावेत असा त्याचा अंदाज होता. या बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला अजून एक बंद केलेले दार होते हे दार इथून पुढे जाता येणार होते मात्र या दारातून मेणबत्तीचा उजेड जाईल इतपत पुढे फट होती.

कार्टरने या दाराला मेणबत्ती लावली. आपल्या आठवणींमध्ये तो लिहिताना सांगतो की

“जेव्हा मी पहिल्यांदा या दारा जवळ गेलो तेव्हा आतून जोरात गरम हवा बाहेर येत होती. त्यामुळे मेणबत्ती मिनमिण करत होती. म्हणून मला सुरुवातीला काहीच दिसू शकले नाही. पण जेव्हा थोडी धूळ दूर झाली तेव्हा मी समोर पाहिले. सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, आकृत्या आणि वस्तू दिसू लागल्या. लॉर्ड हा माझ्या मागेच उभा होता. त्याला काहीच दिसत नव्हते. म्हणून त्याने मला विचारले

“कार्टर, तुला काही दिसत आहे का?”

मी काही बोलायचा स्थितीत नव्हतो मी त्याला फक्त हलकेच एवढंच सांगितलं की “हो! मला खूप अद्भुत गोष्टी दिसत आहेत.” समोर फार मोठ्या प्रमाणात सोने ठेवलेले होते.

29 नोव्हेंबर 1922 सालि या कबरीचे औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले. याचा विस्तृत वृत्तांत पुढच्या दिवशी टाइम्स पेपर मध्ये छापण्यात आला होता.

यावेळी कार्टर फक्त आपल्या एकाच सहकाऱ्या सोबत सर्व उत्खननाची जबाबदारी घेत होता. हे काम प्रचंड मोठे होते. त्यामुळे त्यांनी शहरातील मेट्रो पोलिटीयन म्युझियम कडे काही कर्मचार्‍यांची मदत मिळावी अशी मागणी केली.डिसेंबरच्या महिन्यापासून त्यांनी एक उत्खनन करायला सुरुवात केली आणि 27 तारखेला त्यांना या उत्खननातून पहिली वस्तू बाहेर काढण्यात यश आले.

16 फेब्रुवारी 1920 साली त्यांच्या टीमला राजाला गाडून टाकलेली खोली सापडली.

1924 च्या 12 फेब्रुवारी मध्ये कार्डचे येथील काही स्थानिक संस्थांचे मोठे वाद झाले त्याच्या कामामध्ये अनेक अडथळे येत आहेत. तसेच इजिप्तमधल्या बाकीच्या संस्था कामांमध्ये आडकाठी आणत आहेत असे त्याचे मत होते. वैतागून त्याने काम बंद केले आणि अमेरिकेमध्ये भाषण देण्यासाठी तो एका लांबलचक दौऱ्यावरती निघून गेला.

कार्टर ग्रुपमधून गेल्यानंतर त्याचे काम किती महत्त्वाचे होते हे तेथील लोकांना कळाले. तेव्हा त्यांनी खटला परत बोलावण्याची व येथील उत्खनन पुन्हा सुरू करण्याची विनंती केली.

एका वर्षानंतर कार्टर पुन्हा इथे आला व त्याने हे उत्खनन चालू ठेवले. ही प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ होती मातीचा थर काळजीपूर्वक छोट्याशा ब्रशने काढावा लागत होता.

आपल्याकडून कोणतीही चूक होऊ नये यासाठी कार्टर प्रचंड प्रयत्नशील होता. त्याच्या या प्रयत्नांची दखल त्यावेळच्या पेपरांनी सविस्तरपणे घेतलेली आहे.

19 ते 25 जानेवारी महिन्यामध्ये तो पुन्हा मध्ये आला आणि त्याने काम पूर्वीच्याच उत्साहाने सुरू केले. ऑक्टोबर मध्ये त्याला सर्वात बाहेर असणारी कबर सापडली.

तसेच दुसऱ्या क्रमांकाची कबर त्याला 23 ऑक्टोबरला लगेच मिळाली या कबरीचे फक्त झाकण उघडण्यासाठी त्याने पाच दिवस घेतले.

पाच दिवसांनी या कंपनीचे झाकण उघडल्यानंतर आत मध्ये प्राचीन राजाची ममी अर्थात जपून ठेवलेला मृतदेह त्याला सापडला.

हे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यानंतरच त्याने आपले लक्ष खजिन्याकडे वळवले. 1926 सालच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याने हे काम हाती घेतले आणि हे काम सलग आठ वर्षे चालू होते.

आपल्या या उत्खननातून शेवटची वस्तू बाहेर आणेपर्यंत कित्येक वर्षांचा काळ लोटून गेला होता. एका तरुण व्यक्ती पासून कार्टर आता म्हातारा माणूस झाला होता पण यावर त्याचे संशोधन अजूनही सुरूच होते.

KV62 ही जागा आता एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाली आहे दररोज जवळपास कमीत कमी चारशे लोक या जागेला भेट देत असतात . कार्टरने उत्खनन केलेली संपूर्ण जागा आणि राजांचे खोरे कोणत्याही पर्यटकाला जाऊन पाहता येते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.