TVF मधली प्रत्येक गोष्ट ‘आपली’ वाटते, याचं कारण अरुणभ कुमारच्या स्ट्रगलमध्ये सापडतं
एकीकडे बॉलिवूड भारी की टॉलिवूड भारी यावरून राडा सुरु आहे. दुसरी दुनिया वेब सिरीज लाऊन बिंज करण्यात गुंतलीये. वेब सिरीजच्या दुनियेत सगळ्यात चालणारं गणित म्हणजे मारहाण, बोल्ड सीन, खच्चून शिव्या. पण कसंय ही नाण्याची एकच बाजू आहे, नाण्याची दुसरी बाजू समाजातले छोटे छोटे प्रश्न घेऊन लोकांचं मनोरंजन करणाऱ्या TVF नं दाखवून दिलीये.
आता पंचायतचंच बघा ना, यात हिंसा नाही, शिव्या नाहीत, बोल्ड सिन तर नावालाही नाहीत. तरीही पंचायतचे दोन्ही सिझन लोकांनी डोक्यावर घेतलेत. बरं लोकं नुसती सिरीज बघून थांबत नाहीयेत, तर त्यातल्या प्रत्येक कॅरेक्टरबद्दल जाणून घेण्यासाठी लोकं आतुर आहेत.
पंचायत आपण बघितली ॲमेझॉन प्राईमवर, पण तिचे निर्माते आहेत TVF वाले. आता TVF म्हणजे काय, तर ‘द व्हायरल फेव्हर.’
ॲमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, हॉटस्टार या असल्या बड्या भिडूंची तुलना TVF शी होते. सगळ्या दुनियेत नेटफ्लिक्स गाजतं, प्राईमचं मार्केटही ग्लोबल आणि वेगवेगळ्या भाषांमधलं आहे.
तरीही वाढीव सीन्स न वापरता, उगाच गोळीबार आणि गुन्हेगारीच्या नादाला न लागता, लोकांचे डोळे TVF वर खिळून राहिलेत आणि यामागचं कारण आहे…
त्यांचा संस्थापक अरुणभ कुमार.
वर्गातली स्कॉलर पोरं लावतात तसला चष्मा, हे पोरगं कधी शिवीसुद्धा देत नसेल असं वाटणारी चेहरेपट्टी आणि जगाच्या काही पावलं पुढं चालणारं डोकं, असं अरुणभचं वर्णन करता येऊ शकतं.
अरुणभ हा मूळचा बिहारमधल्या मुज्जफरपूरचा. त्याचा जन्म झाला २६ नोव्हेंबर १९८२ ला. मुज्जफरपूर हे अत्यंत मागास गाव होतं. साधं १२ वी करेपर्यंत त्याला ७ ते ८ शाळा बदलाव्या लागल्या होत्या. पण गडी अभ्यासात प्रचंड हुशार.
त्यानं आयआयटीची तयार करण्यासाठी कोटा गाठलं (इथंच त्याला कोटा फॅक्टरीची आयडिया सुचली असणार.) कोटामध्ये त्याला दोन गोष्टी समजल्या, एक म्हणजे दुनियादारी आणि दुसरं म्हणजे खरा भारत.
अरुणभच्या डोक्यात एक डोस फिट्ट बसला होता, ‘जिंदगीत मोठं काही करायचं असेल तर त्यासाठी आधी इंजिनियर व्हायला लागतं.’
त्यामुळं भावानं कोटामध्ये असताना फक्त अभ्यासाकडं लक्ष दिलं. कारण सिम्पल होतं, जिंदगीत मोठं कायतरी करायचं होतं.
मोठं व्हायची पहिली स्टेप होती, आयआयटीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवून खडकपूरला इलेक्ट्रिक इंजिनियरिंगला ॲडमिशन घेणं. पण इथंच त्याला मोठं व्हायची दुसरी स्टेप पण घावली, अभ्यासाच्या दुनियेबाहेर. त्याला एक नवं विश्व दिसलं, पिक्चरचं.
निम्मी दुनिया करते, तसं तोही जॉबच्या मागे लागला आणि बी.टेकनंतर दोन कंपन्यात इंटर्नशिप केली. आणि त्यानंतर अरुणभला नोकरी लागली,
ती युएस एअर फोर्समध्ये.
इतक्या भारी ठिकाणी लागलेली नोकरी त्यानं सहा महिन्यांत सोडून दिली. कारण काय होतं? तर गड्याला शॉर्ट फिल्म बनवायची होती. यूएस एअर फोर्समध्ये लागलेला जॉब सोडून शॉर्ट फिल्म बनवायचा नाद केला… आपण इमॅजिनही करू शकत नाही.
यानं नाद केला आणि तो वायाही नाही गेला, दोन-तीन शॉर्ट फिल्म झाल्यानंतर मित्राच्या सल्ल्यानुसार अरुणाभनं असिस्टंट डायरेक्टर म्हणून नोकरी शोधायला सुरुवात केली.
गौरी खानच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंट मध्ये त्याला नोकरी मिळाली. ओम शांती ओमसाठी त्यानं फराह खानल असिस्ट केलं. पण विषय असा होता, की त्याची स्वप्न मोठी होती. स्पॉटबॉयची कामं कर, प्रिंट आऊट आणून दे, यातून पैसे मिळायचे खरे पण या कामात किक नव्हती.
त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं.
तेव्हा MTV तरुणांच्या शोवर काम करत होतं, त्यामुळे अरुणभ MTV कडे गेला आणि त्यानं आपल्या आयडिया MTV ला दाखवल्या. त्यांना मात्र त्याच्या आयडिया बाद वाटल्या आणि भारतीय तरुणांना हा कंटेन्ट बिलकुल आवडणार नाही असं सांगत, अरुणभ रिजेक्ट झाला.
सगळीकडून नकार पचवल्यानंतर त्याला एक गोष्ट समजली की, आपली आयडिया आपण स्वतःच मोठी करु शकतो. त्याच्यासोबत आणखी दोन आयआयटीमधून बाहेर पडलेले कार्यकर्ते होते, ते म्हणजे अमित गोलानी आणि बिस्वपती सरकार.
नकार पचवलेल्या या तीन गड्यांनी मोठं पाऊल उचललं आणि TVF ची सुरुवात झाली.
या तिघांनी एक गोष्ट सिद्ध केली, “दोस्त यार केह देने से, दोस्त यार नहीं बनते प्रधानजी. निभाना भी पडता है.”
TVF च्या युट्युब चॅनेलवर ‘इनग्लोरिया सिनियर’ हा पहिला व्हिडीओ अपलोड करण्यात आला. पहिल्या दोन दिवसात १७ हजार पेक्षा जास्त जणांनी हा व्हिडीओ पाहिला. तर पुढच्या व्हिडीओला पुढच्या ५ दिवसांमध्ये १० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. दुसऱ्या व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळाल्यानं अरुणभ आणि गॅंग खुश होती.
त्यांनी युट्युब गाजवायला सुरुवात केली, पिचर्स हा आयएमडीबीनं आपल्या लिस्टमध्ये सामील केलेला पहिला शो होता.
TVF ट्रिपलिंग्स, बेअर्ली स्पिकिंग विथ अर्णब, राऊडीज सारखे शो लोकांना खूप आवडले होते. कधी स्वतःच्या कल्पनेतुन आलेले शो होते, तर कधी तुफान डोकं लाऊन बनवलेल्या पॅरोडीज. पुढं TVF फक्त युट्युबपर्यंत मर्यादित राहिलं नाही. त्यांनी स्वतःची वेबसाईट आणली, ॲप आणलं.
शहरं सोडा, TVF आज खेड्यापाड्यापर्यंत पोहचलंय.
अरुणभच्या आयुष्यातल्या लडतरी इथंच थांबल्या नाहीत, २०१७ मध्ये त्याच्यावर TVF मधल्या ५० महिलांनी सेक्श्युअल हॅरॅसमेन्टची केस दाखल केली. त्यानंतर त्यानं राजीनामाही दिला, पण नंतर या केसमध्ये काहीच झालं नाही. त्यामुळं परत ३ वर्षानंतर अरुणभनं पुन्हा TVF जॉईन केलं.
आज कन्टेन्ट, विषयांची निवड सगळ्याच बाबतीत TVF बाकीच्यांना मागं टाकून पुढं निघून गेलंय. तरीही त्यांनी आपण लय भारी काही तरी करतोय अशी कधीच जाहिरात केली नाही. कारण आपण भारी आहोत, हे त्यांचा कंटेन्टच सांगत होता.
या सगळ्या यशामागे टीमवर्क तर आहेच, पण अरुणभ कुमारचं डोकंही आहे.
ॲस्पिरंटस, कोटा फॅक्टरी, ये मेरी फॅमिली, इनमेट्स, गुल्लक, फ्लेम्स, हॉस्टेल्स डेज आणि आता पंचायत TVF नं कित्येक बाप सिरीज बनवल्या. ज्या बघता बघता आपल्याला वाटतं, की ही तर आपलीच गोष्टय.
पण अरुणभ आणि त्याची टीम आपल्या गोष्टी सांगतं, कारण त्यानं कोटा असेल किंवा आयआयटी… तिथं जाऊन खरा भारत अनुभवलाय, त्यानं नकार पचवलेत, मजबूत पगार देणारी नोकरी सोडलीये, अपयश सोसलंय आणि याचं प्रतिबिंब म्हणून TVF उभं राहिलंय…
म्हणूनच “हर कोई कहीं ना कहीं नाच ही रहा है, सचिवजी” हे जितकं खरं, तितकंच TVF भारी आहे ही गोष्टही…
हे ही वाच भिडू
- मॉडेलिंग करायला आलेली पोरगी टी सिरीजची मालकीण झाली…
- हिरो कोण असतो…जितू भैय्यानं परफेक्ट इस्कटून सांगितलय…
- सध्या बॉलीवुडचा फ्लॉप शो सुरुये.. पण पूर्वी फ्लॉप व्हावा म्हणून काढलेला पिक्चर पण सुपरहिट ठरला होता