TVS कंपनीचा १०० वर्षांचा इतिहास एखाद्या पिक्चरपेक्षा कमी नाही…

स्वातंत्र्य मिळायच्या देखील खूप खूप वर्षा पूर्वीची गोष्ट. तामिळनाडू मधील मदुराई गाव. मीनाक्षीचं भव्य पुरातन मंदिर, आजूबाजूला असणारी छोटी मोठी दुकानं, वेगवेगळ्या भागातून आलेल्या भाविकांची लगबग सोडली तर शांत निवांत टुमदार गाव.

तिथं एक तरुण रोज आपल्या लाकडाच्या वखारीत बसायचा. नाव टी.व्ही.सुंदरम अय्यंगार. त्याच्या दुकानाचा कधी चांगला धंदा व्हायचा तर कधी नाही. सुंदरम अय्यंगार चांगला वकिली शिकलेला होता. रेल्वेत नोकरी देखील केली होती. पण सगळं सोडून स्वतःचा धंदा सुरु करायचा म्हणून लाकडाच्या वखारीच्या उद्योगाला लागला होता.

दिवसभर पुस्तकं वाचत बसणाऱ्या सुंदरमच्या दुकानापासून एकदा एक मिलिटरी वाल्यांची बस निघून गेली. आपल्या मदुराई सारख्या छोट्या गावातल्या छोट्या  रस्त्यावरून इतक्या वेगाने एक गाडी धावते आहे आणि त्यात माणसं प्रवास करत आहेत हे बघून सुंदरमला भारी आश्चर्य वाटलं.

साधारण १९११ साल असावं. अजून भारतात सध्या मोटारगाड्या हळूहळू प्रवेश करत होत्या. रेल्वे कशीबशी आपल्या माणसांच्या पचनी पडली होती पण पॅसेंजर बस म्हणजे हे कोणच्या दिवास्वप्नात देखील आले नव्हते.

सुंदरमच्या डोक्यात आलं की आपल्या आसपासच्या गावातल्या लोकांना प्रवासासाठी बस सेवा सुरु केली तर ?

त्याने दोन डेनिस अँड कॉमर कंपनीच्या बसेस विकत घेतल्या. मदुराईला आणल्या आणि मदुराई-देवकुट्टाई गावांच्या दरम्यान पॅसेंजर बस सेवा सुरु केली. तिकीट दर होता ४ रुपये. ताशी १५ मेल वेगाने धावणाऱ्या या बस मध्ये बसून प्रवास करणे म्हणजे विमानात बसल्यासारखं त्यावेळच्या लोकांना वाटलं असेल.

लक्षात घ्या ही भारतातली पहिली सार्वजनिक बससेवा. अगदी मुंबईची बेस्ट सुद्धा अजून सुरु झाली नव्हती आणि मदुराई सारख्या छोट्या गावात टी व्ही सुंदरम शेठ आपल्या बसेस पळवत होते.

काही दिवसातच त्यांची बस फेमस झाली. इतर लोकांना पण या बिझनेस मधला फायदा लक्षात आला. वडाप सारख्या बसेस सुरु झाल्या. सुंदरम यांनी २ च्या ४ बस केल्या, ४ च्या दहा केल्या. इतकंच नाही तर टायर, पेट्रोल देखील विकायला सुरवात केली. त्यांनी आपल्या बसेसच्या कंपनीला नाव देखील दिल होतं,

सदर्न रोडवेज लिमिटेड.

सुंदरम अय्यंगार शेठ तामिळनाडूच्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक गणले जाऊ लागले. वेगाने काळ बदलत चालला होता. गांधीजींच्या स्वातंत्र्यलढयाच्या चळवळीने देशाला भारावून टाकलं होतं. विशेषतः मदुराई मध्ये गांधीजींचा मोठा प्रभाव होता. याच गावात त्यांनी अंगावरील कपडे त्याग करून खादी स्वीकारली होती. मदुराईचं मंदिर दिनदलितांना खुले व्हावे म्हणून त्यांनी आंदोलन केलं होतं.

गांधीजींच्या विचारांचा टीव्ही सुंदरम अय्यंगार यांच्यावर मोठा परिणाम झाला. त्यांच्या सख्ख्या बहिणीचा त्यांनी विधवा पुर्नविवाह एका गांधीवादी तरुणांबरोबर करून दिला. तिने स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. या चळवळीला सुंदरम शेठजींचा पूर्ण पाठिंबा होता.

हे सगळं चालू असताना पैसा छापणं मात्र थांबलं नव्हतं.

दुसऱ्या महायुद्धात मिलिट्रीच्या गरजेमुळे देशात पेट्रोल तुटवडा पडला. तर टीव्हीएस नि तामिळनाडूमध्ये गॅस प्लॅन्ट उभा केला. याशिवाय रबर कंपनी सुरु केली. त्यांना स्वतःला टेक्निकल गोष्टींची आवड होती. एक अख्खा ट्रक खोलून परत जोडण्याची हिंमत त्यांच्याकडे शेवट्पर्यंत होती असं म्हणतात.

BL12TVSGROUPENGINE

१९४७ साली देश स्वतंत्र झाला. लवकरच टीव्ही एस शेठ देखील वारले. त्यांच्या पश्चात त्यांची चार मुले, लेकी,सुना, नातवंडे, दोन कंपन्या, अनेक उद्योगधंदे असा पसारा होता. अमेरिकेच्या जनरल मोटर्सचे डिस्ट्रिब्युशनचे राईट्स होते.

पुढे १९६२ साली त्यांच्या मुलांनी इंग्लडमधल्या कंपनीबरोबर कोलॅब्रेशन करून ब्रेक, एक्झॉस्ट, कॉप्रेसर अशा ऑटोमोटिव्ह गोष्टींचे स्पेअरपार्ट देखील बनवण्यास सुरवात केली होती. यात देखील त्यांना चांगले यश आले होते.

दरम्यान मधल्या काळात पंतप्रधान नेहरूंच्या प्रयत्नामुळे भारतात बजाज स्कुटर, रॉयल एन्फिल्ड बुलेट बनवणाऱ्या कंपन्या उभ्या राहू लागल्या होत्या. मोटर कारच मार्केट मोठं होतच पण दुचाकी गाड्या भारतात खपाचा विक्रम करत होत्या.

हे बघून सुंदरम शेठजींच्या मुलांच्या मनात आलं की आपल्या कड संपूर्ण दक्षिण भारतात पसरलेले डिस्ट्रिब्युशन सिस्टीम आहे, आपण ऑटोमोटिव्ह पार्ट बनवण्यातले दादा आहोत. अनुभव, पैसे सगळे आहे तर आपण सुद्धा गाड्या बनवण्याच्या उद्योगात का पडू नये?

नाही-होय, रिस्क, सरकारी परवानग्या वगैरे वगैरे अनेक उहापोह झाल्यावर शेवटी ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उतरायचं ठरलं. वडिलांच्या स्मरणार्थ नाव दिलं,

टीव्हीएस मोटर कंपनी.

१९७६ साली त्यांनी तामिळनाडूच्या होसूर येथे आपला प्लांट उभा केला. पुढच्या चार वर्षातच त्यांची पहिली मोपेड बनून बाहेर पडली. नाव होतं, टीव्हीएस ५०. हि भारतातली पहिली दोन सीटर मोपेड म्हणून ओळखली वाजते.

जागतिकीकरणाच्या तोंडावर सुझुकी बरोबर त्यांनी टेक्निकल करार केले. नव्वदच्या दशकात सुझुकी सामुराई सारख्या गाड्यांनी दबदबा तर केलाच. पण टीव्हीएसच स्वतःच असं नाव होत नव्हतं.

ते झालं १९९४ साली लॉन्च झालेल्या स्कुटीमुळे.

ऑटो स्टार्ट असणाऱ्या छोट्या स्कुटर सारख्या असणाऱ्या स्कुटीने इतिहास घडवला. मुलींच्या हातात शस्त्र आल्याप्रमाणे स्कुटरने महिलवावर्गात क्रांती केली. स्कुटीच्या धुरळ्यात सनी,लुना वाहून गेल्या. स्कुटी हे ब्रॅन्डचं नाव नसून त्या सेगमेंट मधल्या इतर गाड्यांची देखील ओळख बनली.

आज टीव्हीएस  रिक्षा पासून ते टीव्हीएस अपाचे पर्यंत अनेक गाड्या भारतीय रस्त्यांवर टी व्ही सुंदरम अय्यंगार यांचं स्वप्न पूर्ण करत दौडत आहेत. त्यांची स्कुटी आजही आयकॉन मानली जाते. अनेक परदेशी कंपन्यांना टक्कर देत टीव्हीएस भारतातली आघाडीची कंपनी तर बनली आहेच पण ६० देशात आपल्या गाड्या एक्स्पोर्ट करून त्यांनी जगात आपलं नाव कमावलं आहे.

मदुराईच्या छोट्याशा गल्ल्यांमध्ये आलेली बस अख्ख्या देशाचं चित्र बदलून गेली. टीव्ही सुंदरम अय्यंगार यांचा पुतळा आजही या गावात उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आजकालची पिढी त्यांना मदुराईचा सूर्यवंशम म्हणून ओळखते.

हे ही वाच भिडू.

 

2 Comments
 1. ऑपरेटर says

  TVs breaks India, waki मधील कंपनी का बंद केली. पंधरा वर्ष सरकारी टॅक्स सूट चा फायदा घेतला कमी पैशात कामगारांकडून काम करून घेतले आणि कामगारांना पगारवाढ देण्याची वेळ आली तर कामगारांना पूर्व कल्पना न देता त्यांच्या अकाउंट ला दोन तीन लाख रु जमा करून कंपनी बंद केली,पंधरा वर्ष काम करून फक्त दोन तीन लाख दिले आणि हे कसले सूर्यवंशम.
  कामगार चेन्नई ला जावून त्यांच्या पायांवर डोकं ठेवून आले तरी त्यांना पाझर फुटला नाही,
  पंधरा वर्ष सेझ मध्ये कंपनी टाकून जमीन पाणी लाईट आणि कामगार कमी पैशात मिळवायचे, पंधरा वर्ष टॅक्स सूट चा पुरेपूर फायदा घ्यायचा, आणि पंधरा वर्ष नंतर टॅक्स देण्याची वेळ आली तर कंपनी बंद करून टाकायची आणि दुसऱ्या राज्यात परत सेझ मध्ये कंपनी चालू करायची असे यांचे पद्धत आहे.
  आणि हे कशाचे सूर्यवंशम. थोतांड आहे सगळं

 2. Ravindran 3 says

  His name was T.V. Sundaram Iyengar and NOT Iyer.
  Please make correction.

Leave A Reply

Your email address will not be published.