स्त्री मुक्तींच रंगबेरंगी शस्त्र म्हणून TVS स्कुटीचं नाव इतिहासात नोंदवलं जाईल.

भारतात स्त्री मुक्तींच आंदोलन कधी सुरू झालं ? महिला चुल आणि मुल या संकल्पनेतून कधी बाहेर पडल्या ? निर्विवाद आपणाला या इतिहासाची सुरवात क्रांन्तीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापासूनच करावी लागेल. मात्र इतिहास लिहता लिहता जेव्हा तुम्ही २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर याल तेव्हा तुम्हाला दारात उभा असणारी रंगेबिरंगी TVS स्कुटी दिसेल !  

ती साधी स्कुटी नाही तर ती आहे महिलांच्या मुक्तीचं ठरलेलं प्रभावी शस्त्र !

काय झालं तर याच स्कुटीमुळे खऱ्या अर्थाने महिला गाडी चालवू लागल्या आत्ता तुम्ही म्हणालं मग लुनाचं काय, मग एमएटीचं काय त्या देखील महिला चालवत होत्या की. अगदी मान्य पण त्या गाड्या खऱ्या तर नपुसंकलिंगी प्रकारात मोडणाऱ्या होत्या. फक्त आणि फक्त महिलांनी आपला अधिकार दाखवलेली आणि महिलांसाठीचं म्हणून असणारी हक्काची पहिली गाडी म्हणून तो मान TVS स्कुटीला द्यावा लागतो. 

TVS स्कुटीचं खरतर महिलांसाठी काढण्यात आलीच नव्हती ! 

आईशप्पथ हि खरी गोष्ट आहे. खोटं आजपर्यन्त आम्ही सांगितलेलं नाही. तर TVS स्कुटीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा महिलांसाठीच गाडी असावी अशी रिस्क घेणारी कोणतीच कंपनी बाजारपेठेत नव्हती. ९० टक्के पुरूष चालक असताना असा मुर्खपणा करण्याची शक्यता देखील नव्हती. 

मग काय झालं. तर भारतीय मार्केटला समोर ठेवून TVS वाल्यांनी एक छोटीशी गाडी मार्केटमध्ये आणण्याचं ठरवलं. १९९४ साली पहिली स्कुटी लॉन्च करण्यात आली. झालं सगळं चांगल पार पडू लागलं. १९९४ साली फक्त महिलाच खरेदी करतील अशी स्ट्रॅटेजी ठरवणं म्हणजे कंपनी बंद पाडण्याचा प्रकार होता. पण झालं अस की १९९६ साली म्हणजे दोन वर्षानंतर कंपनीने आपल्या गाड्यांच्या खपाचा आढावा घेतला तर त्यांच्या लक्षात आलं की महिलांनी मोठ्या प्रमाणात हि गाडी खरेदी केली आहे. 

pic – GYpsyFLY

१९९६ साली स्कुटी ES नावाचं मॉडेल लॉन्च केलं. ते हि संपुर्णपणे महिलांच्या मार्केटचा विचार करुन. झालं आत्ता मार्केटनं जोरात वेग घेतला. गाड्या खपू लागल्या. मुली असो वा महिला, कॉलेज असो वा बचत गट सगळीकडे महिला स्कुटीवरुन दिमाखात जावू लागल्या. कुणी आपल्या मुलींला अभिमानं स्कुटी गिफ्ट दिली तर कुणाच्या नवऱ्यानं आपल्या बायकोला प्रेमानं स्कुटी दिली. तर पोरगी शिकली प्रगती झाली च्या धर्तीवर कित्येक पोरींनी आपल्या पहिल्या पगारातून स्कुटी घेतली ! 

सन २००३ साली किक आणि सेल्फ स्टार्ट बटनवाली स्कुटी पेप बाजारात आली. त्यानंतरच्या दोनच वर्षात स्कुटी पेप प्लस आली आणि लागलीच दोन वर्षात स्कुटी टिन्स बाजारात आली लगेच दोन वर्षात म्हणजे २००९ ला स्कुटी स्ट्रिक मार्केटमध्ये आली. दोन दोन वर्षाच्या अंतराने एकाच मॉडेलला विकसित करण्यात आलं. 

प्रेमाचे रंग ९९ 

आत्ता हे आणि काय तर २००५ चं साल आठवतय का. तेव्हा काय झालं तर भारताचे रस्ते रंगबेरंगी दिसू लागले. स्कुटी पेप प्लसनं एक नवा इतिहास रचला तो म्हणजे गाडीच्या ९९ रंगांचा. ९९ रंग तर होय या कंपनीने आपली स्कुटी ९९ वेगवेगळ्या रंगात उपलब्ध करून दिली. विचार करा मुली किती कन्फ्यूज झाल्या असतील. गुलाबी रंगात १० शेड असतात याची जाणिव पुरूषमंडळींना देखील नव्यानं झाली असेल. रंग ओळखायचं स्किल किमान वाढलं देखील असेल मग काय हा प्रयोग देखील तितकाच सुपर डुपर हिट झाला. 

हे ही वाचा –  

दरम्यानच्या काळात सामाजिक उत्तरादायित्वाचा बिझनेस प्रयोग. 

आत्ता मार्केट फोकस केलय म्हणल्यानंतर त्याची जबाबदारी देखील घेतली पाहीजेच. म्हणून कंपनीनं काय केलं तर महिलांसाठी खास ट्रेनिंग स्कुल चालू केले. टू व्हिलर ते हि महिलांना शिकवणाऱ्या महिला नेमण्यात आल्या. 

देशभरातल्या मोठ्या आणि मध्यम शहरांमध्ये एकुण ८० प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आली. त्यातून ४२ हजार महिला टू व्हिलर चालवण्यास शिकल्या. त्या काळात टू व्हिलर शिकलेल्या महिलांपैकी TVS च्या स्कुल मधून शिकलेल्या महिलांचा आकडा जवळपास २० टक्के असल्याचं सांगितलं जातं. 

आत्ता पुढे काय ? 

तर पुढे नेहमीप्रमाणे एखादा हिरो जसा विस्मृतीत जातो तशीच हिरोईनपण जातेच की. टिव्हीस स्कुटीला टक्कर द्यायला एक्टिवा आली. महिलांनी तिकडे मोर्चा वळवला. कारण ती गाडी घरातले सगळेच चालवू शकत होते. महिला ग्राहकांच्या मार्केटवर लक्ष दिल्याने स्कुटी फक्त त्यांचीच झालेली पुरुषांना चारचौघाच्यात ती गाडी घेवू जायला नको वाटायचं यातच अॅक्टिव्हा भाव खावून गेली. पाठोपाठ अनेक गाड्या आल्या. पण स्त्री मुक्तीच्या लढ्यात स्कुटीला पण तितकचं स्थान द्यायला हवं हे आपण विसरायला नको इतकचं ! 

हे ही वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.